माझ्या भारतीय बांधवांनो,

नमस्कार!

26 नोव्हेंबर हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. सन 1949 मध्ये, याच दिवशी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले होते, संविधान हा एक पवित्र दस्तऐवज, जो अत्यंत स्पष्टतेने आणि दृढ विश्वासाने राष्ट्राच्या प्रगतीला सातत्याने मार्गदर्शन करत आलेला आहे . म्हणूनच, जवळपास एका दशकापूर्वी, सन 2015 मध्ये, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

ही आपल्या संविधानाचीच शक्ती आहे की, माझ्यासारख्या एका सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला सलग 24 वर्षांपेक्षा जास्त काळ सरकारचे प्रमुख म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. सन 2014 मध्ये मी पहिल्यांदा संसदेत आलो, तेव्हा लोकशाहीच्या या महान मंदिराच्या पायऱ्यांना नतमस्तक होऊन स्पर्श केल्याचे क्षण मला आजही आठवतात. तसेच, सन 2019 मध्ये, निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा मी संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये (मध्यवर्ती सभागृहात) प्रवेश केला, तेव्हा आदराचे प्रतीक म्हणून मी नतमस्तक होऊन संविधान आपल्या कपाळाला लावले होते. या संविधानाने माझ्यासारख्या इतर अनेकांना स्वप्न पाहण्याची ताकद आणि त्या दिशेने काम करत राहण्याची करण्याची ऊर्जा दिली आहे.

संविधान दिनानिमित्त, आपण संविधान निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या सर्व प्रेरणादायी सदस्यांचे स्मरण करत आहोत. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांचे स्मरण करतो, त्यांनी विलक्षण द्रष्टेपणाने मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. संविधान सभेतील अनेक प्रतिष्ठित महिला सदस्यांनी त्यांच्या चिंतनशील सूचनांनी आणि दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाने संविधानाला समृद्ध केले.

मला सन 2010 मधील घडमोडी आठवतात. त्याच वर्षी भारताच्या संविधानाला 60 वर्षे पूर्ण झाली होती. दुर्दैवाने, त्या वेळी या घटनेला राष्ट्रीय स्तरावर मिळायला हवे तेवढे महत्व दिले गेलेच नाही. परंतु, संविधानाबद्दल आपली सामूहिक कृतज्ञता आणि वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी, आम्ही गुजरातमध्ये 'संविधान गौरव यात्रा' आयोजित केली होती. आपले संविधान एका हत्तीवर ठेवले होते, आणि माझ्यासोबत समाजातील विविध क्षेत्रांमधील अनेक लोकांना या यात्रेचा भाग बनण्याचा मान मिळाला होता.

संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली, तेव्हाच आम्ही ठरवले की हा भारतीय नागरिकांसाठी एक असाधारण ऐतिहासिक टप्पा ठरेल. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आम्हाला संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा आणि देशव्यापी कार्यक्रम सुरू करण्याचा बहुमान मिळाला. या कार्यक्रमांमध्ये विक्रमी सार्वजनिक सहभागही दिसून आला.
यावर्षीचा संविधान दिन अनेक कारणांमुळे खास आहे.

याच वर्षी सरदार वल्लभभाई पटेल आणि भगवान बिरसा मुंडा या दोन असाधारण व्यक्तिमत्वांचे 150 वे जयंती वर्षे आहे. या दोघांनीही आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले आहे. सरदार पटेल यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाने भारताची राजकीय अखंडता सुनिश्चित केली. त्यांच्या प्रेरणेने आणि दृढ विश्वासापूर्ण धैर्यातून मिळालेल्या प्रेरणेमुळे आम्हाला कलम 370 आणि 35(A) विरोधात कार्यवाही करण्याचे मार्गदर्शन लाभले. आता भारताचे संविधान जम्मू काश्मीरमध्ये पूर्णतः लागू झाले आहे, यामुळे तिथल्या लोकांसाठी, विशेषतः महिला आणि दुर्बल घटकांसाठी, सर्व घटनात्मक अधिकारांची सुनिश्चिती झाली आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनही आपल्या आदिवासी समुदायांसाठी न्याय, सन्मान आणि सक्षमीकरण सुनिश्चित करण्याच्या भारताच्या संकल्पाला सातत्याने प्रेरणा देत आले आहे.

यावर्षी, आपण वंदे मातरम् च्या 150 व्या वर्षपूर्तीचा उत्सवही साजरा करत आहोत, या गीताचे शब्द भारतीयांच्या युगानुयुगांच्या सामूहिक संकल्पाशी जुळणारे आहेत. त्याच वेळी, आपण श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या बलिदान दिनाचा स्मरणोत्सवही पाळत आहोत. त्यांचे जीवन आणि त्याग आजही आपल्याला धैर्य, करुणा आणि सामर्थ्य यांचा प्रकाश देत राहतात .

ही सर्व व्यक्तिमत्त्वे आणि महत्त्वाचे टप्पे आपल्याला आपली कर्तव्ये प्राधान्याने पार पाडण्याचे स्मरण करून देतात, ज्यावर संविधानाने कलम 51अ मधील मूलभूत कर्तव्यांवरील एका समर्पित प्रकरणाद्वारे भर दिला आहे. ही कर्तव्ये आपल्याला सामूहिकरित्या सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी साध्य करायची याचे मार्गदर्शन करतात. महात्मा गांधी नेहमीच नागरिकांच्या कर्तव्यांवर भर देत असत. त्यांचा असा विश्वास होता की उत्तम प्रकारे पार पाडलेले कर्तव्य तद्नुरूप अधिकार निर्माण करते आणि खरे अधिकार हे कर्तव्यबजावणीचाच परिपाक आहेत.

या शतकाचा प्रारंभ होऊन 25 वर्षे उलटून गेली आहेत. आतापासून अवघ्या दोन दशकांनी, आपण वसाहतवादी राजवटीपासून मुक्त होण्याची 100 वर्षे साजरी करणार आहोत. वर्ष 2049 मध्ये, संविधान स्वीकृतीला शंभर वर्षे पूर्ण होतील. आपण आखत असलेली धोरणे, आपण आज घेत असलेले निर्णय आणि आपल्या सामूहिक कृती येणाऱ्या पिढ्यांचे जीवन घडवतील.

यातून प्रेरणा घेत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण वाटचाल करत असताना, आपल्या राष्ट्राप्रती असलेली आपली कर्तव्ये अग्रस्थानी असल्याचे आपण कायम ध्यानीमनी ठेवायला हवे.

आपल्या राष्ट्राने आपल्याला खूप काही दिले आहे आणि त्यातून आपल्या अंतःकरणात कृतज्ञतेची खोल भावना निर्माण होते आणि आपण जेव्हा या भावनेने जगतो तेव्हा, आपली कर्तव्ये पार पाडणे आपल्या स्वभावाचा अविभाज्य भाग बनतात. आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी, प्रत्येक कार्यात आपली पूर्ण क्षमता आणि समर्पण अत्यावश्यक ठरते. आपली प्रत्येक कृती संविधानाला बळकटी देणारी हवी आणि राष्ट्रीय ध्येय आणि हिताला पुढे नेणारी हवी. आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. या कर्तव्याच्या भावनेने जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपल्या राष्ट्राची सामाजिक आणि आर्थिक प्रगती अनेक पटींनी वाढेल.

आपल्या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. नागरिक म्हणून आपल्या नावाची नोंद असलेल्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान करण्याची संधी आपण कधीही गमावू नये. हे आपले कर्तव्य आहे. इतरांसाठी प्रेरणा म्हणून, 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवांसाठी आपण दर 26 नोव्हेंबर रोजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विशेष समारंभ आयोजित करण्याचा विचार करू शकतो. अशा प्रकारे प्रथमच मतदान करणाऱ्या युवांमध्ये ते विद्यार्थी असण्यासोबतच, राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत सक्रिय भागीदारही असल्याच्या भावनेला बळकटी मिळेल.

आपण आपल्या युवांमध्ये जबाबदारीची आणि अभिमानाची भावना जागृत केली, तर ते आयुष्यभर लोकशाहीच्या मूल्यांशी वचनबद्ध राहतील. ही वचनबद्धतेची भावना एका मजबूत राष्ट्राचा पाया आहे.
चला, या संविधान दिनी, या महान राष्ट्राचे नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करूया. याद्वारे, आपण सर्वजण विकसित आणि सशक्त भारताच्या उभारणीत सार्थ योगदान देऊ शकतो.

आपला,

नरेंद्र मोदी

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
APEDA Facilitates First Export Of Premium Areko Cherries And Scentrose Plums From J&K To Singapore

Media Coverage

APEDA Facilitates First Export Of Premium Areko Cherries And Scentrose Plums From J&K To Singapore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताच्या एकात्मतेसाठी आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन
July 06, 2026

आज सहा जुलै, राष्ट्रवाद आणि निस्वार्थ सेवेचा आदर्श मानणाऱ्या, त्यांची जपणूक करणाऱ्या सर्व लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती आहे. भारत मातेच्या सेवेप्रती कटिबद्धता आणि धैर्य यांचे ते कालातीत मूर्तिमंत उदाहरण आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात, असे अगदी कमी लोक आहेत, ज्यांच्यात बुद्धीमत्ता, सार्वजनिक सेवाभाव आणि नैतिक दृढनिश्चय यांचा संगम आढळतो, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्यापैकीच एक आहेत.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म अशा परिस्थितीत झाला होता, जिथे, त्यांना सहज एक आरामदायी आणि सुरक्षित आयुष्य मिळू शकले असते. त्यांचे पिता, सर आशुतोष मुखर्जी, त्या काळातील एक आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर बुद्धिवादी होते. नियतीने त्यांना, एक अत्यंत उच्चभ्रू, सुखासीन आयुष्य दिले असले, तरी त्यांच्यातील विवेकाने, त्यांना देशसेवा आणि त्यागाचा मार्ग दाखवला. त्या काळातील अत्यंत अस्थिर परिस्थितीत आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असा कौल त्यांच्या मनाने त्यांना दिला. मग ती वसाहतवादी शक्तींशी लढाई असो, जातीवाद, धर्मभेद किंवा मग मानवतेसमोरची आव्हाने असोत, अथवा इतर काही. त्यांच्या या प्रवासात त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे, दु:खाचा सामना करावा लागला, यात अगदी त्यांचं बाळ आणि नंतर त्यांच्या पत्नीचे झालेले देहावसान, अशा अपार दु:खाच्या प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागला. मात्र अशा सगळ्या दु:खांनी, त्यांचा दृढनिश्चय अधिक वाढवला आणि देशाची सेवा करण्याची कटिबद्धता अधिक दृढ केली.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या सार्वजनिक जीवनातील एक आदर्श, जो या सगळ्या गुणांच्या वर होता, असे सांगायचे झाले, तर तो आदर्श गुण ठरेल, अखंड भारताप्रती त्यांची निष्ठा! फाळणीच्या गदारोळात, हिंसाचारातही, पश्चिम बंगाल हा भारताचा अविभाज्य घटक राहील, यासाठी ते पाय घट्ट रोवून उभे राहिले. काही वर्षांनी, त्यांच्या याच अखंडतेच्या ध्यासाने, ते जम्मू आणि काश्मीरला गेले. तिथे झालेला तुरुंगवास ही त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करु शकला नाही. मात्र, याच तुरुंगवासात त्यांचा अकाली मृत्यू झाला. तुरुंगावासात, अशा ठिकाणी..एकटेपणात.. ज्या लाखो लोकांचं आयुष्य त्यांनी स्वतःचे आयुष्य बनवले होते, अशा सगळ्या मोलाच्या माणसांपसून दूर. इतिहासात असे काही क्षण येतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सर्वोच्च बलिदानामुळे ती व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे जाते आणि त्यांचे कर्तव्य, एका राष्ट्रीय स्मृती ठरतात. आचार्य विनोबा भावे एकदा असे म्हणाले होते की, ज्या तत्वावर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा दृढविश्वास होता, त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःचे बलिदान दिले. या घटनेनंतर अनेक वर्षांनी, कलम 370 आणि अनुच्छेद 35 (अ) हटवणे (2019 चा कायदा), ही त्यांच्या बलिदानाला दिलेली सर्वोच्च मानवंदना होती.

डॉ. मुखर्जी यांनी, कायमच भारताला आणि भारतीय मूल्यांना प्रथमस्थानी ठेवले. त्यासाठी त्यांनी त्या काळातील प्रचलित विचारसरणींना छेद देणाऱ्या संस्था उभारून आणि सक्षम व्यवस्था घडवून हे सिद्ध केले. ते कलकत्ता विद्यापीठाचे सर्वांत तरुण कुलगुरू बनले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीद्वारे त्यांनी देशभक्तीची प्रेरणा देणारे आणि भविष्याची दृष्टी असलेले सकारात्मक बदल घडवून आणले. शिक्षणतज्ज्ञांच्या एका परिषदेला संबोधित करताना डॉ. मुखर्जी यांनी अतिशय समर्पक शब्दांत म्हटले होते की, शैक्षणिक संस्थांकडे संभाव्य कारकून आणि अल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी तयार करणारे कारखाने म्हणून पाहणे चुकीचे आहे. नगरपालिका, प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळे यांसारख्या आपल्या स्वशासित संस्थांना नेतृत्व देण्यास सक्षम असलेले, तसेच वित्तीय, व्यापारी आणि औद्योगिक अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांतील कामकाजाचे संचालन करू शकणारे विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता विद्यापीठाने ग्रंथालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, विज्ञान विषयातील संशोधनाला चालना देणे, पुरावस्तूंच्या अध्ययनाला प्रोत्साहन देणे तसेच कृषी विषयातील अभ्यासक्रम सुरू करणे, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. त्यांनी क्रीडा, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी कल्याण यांसारख्या क्षेत्रांकडेही विशेष लक्ष वेधले. विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी 24 जानेवारी हा दिवस विद्यापीठाचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. विद्यापीठासाठी गीत रचण्याची विनंती त्यांनी थेट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनाच केली होती.

त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, त्यातूनही हीच भावना दिसून येते. त्या काळात काँग्रेस पक्षाचे सगळीकडे वर्चस्व असताना, भारताच्या प्रगतीसाठी आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहून पर्यायी आवाज उभा राहणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांना वाटत होते. कदाचित म्हणूनच त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मातीचा दिवा होते. एक दिवा दिसायला साधा वाटू शकतो; मात्र स्वतःच्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक अंधार दूर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. जनसंघाने आपल्या कार्यरत असलेल्या काळात आणि त्यानंतरही नेमके हेच कार्य केले.

भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा कार्यकाळ हा विकासाविषयी अत्यंत व्यापक आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या एका नेत्याचे दर्शन घडवतो. नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राचा सन्मान, संधी आणि आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याचे साधन म्हणून त्यांनी उद्योगांकडे पाहिले. संपत्तीची निर्मिती आणि मूल्यवर्धन यांचा त्यांनी आदर केला. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, सिंद्री खत प्रकल्प आणि भक्कम औद्योगिक धोरण यांसारख्या अग्रणी उपक्रमांद्वारे आधुनिक औद्योगिक भारताचा पाया रचत असतानाच, भारताच्या पारंपरिक सामर्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही त्यांनी खात्री केली. हातमाग, कुटीर उद्योग, कारागीर आणि वस्त्रोद्योगातील कामगार यांनाही त्यांच्यामध्ये तितकाच कटिबद्ध पुरस्कर्ता लाभला.

याठिकाणी मला एक वैयक्तिक अनुभव सांगायचा आहे. आत्मनिर्भरतेच्या स्पष्ट दृष्टिकोनातून डॉ. मुखर्जी यांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या सिंद्री खत प्रकल्पाकडे अनेक दशके देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मला याचा अभिमान वाटतो की, आमच्या सरकारला या परंपरेच्या पुनरुज्जीवनात योगदान देण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात उपस्थित राहणे हा खरोखरच सर्वात विशेष क्षणांपैकी एक होता.

भारताच्या सांस्कृतिक परंपरेने फार पूर्वीपासून संवाद आणि चर्चांना महत्त्व दिले आहे. डॉ. मुखर्जी यांनी याच लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व केले होते. सुरुवातीच्या काळात राष्ट्र उभारणीचे कार्य राजकीय मतभेदांच्या पलीकडचे आहे, असा विश्वास बाळगून ते पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात सामील झाले. त्यांनी प्रामाणिकपणे आणि विधायक भावनेने काम केले; परंतु जेव्हा त्यांना वाटले की राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांसाठी वेगळ्या मार्गाची आवश्यकता आहे, तेव्हा त्यांनी सन्मानाने पदाचा त्याग केला आणि राष्ट्राला आवश्यक असलेल्या राजकीय कार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.

75 वर्षांपूर्वी, पंडित नेहरूंनी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणारे होते. डॉ. मुखर्जी हे त्याच्या सर्वात कट्टर विरोधकांपैकी एक होते. काँग्रेस काय करू शकते, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आणि पुढील घडामोडींनी त्यांची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध केले. ज्यांनी 75 वर्षांपूर्वी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, त्यांनीच 1975 मध्ये आणीबाणी लादली आणि त्यानंतर 50 वर्षांपूर्वी 42वी घटनादुरुस्ती करून उदारमतवादी लोकशाही मूल्यांच्या मुळावरच घाव घातला.

डॉ. मुखर्जी त्यांचा मानवतावादी कार्यासाठीही ओळखले जातात. 1943 मध्ये जेव्हा बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला, तेव्हा डॉ. मुखर्जींनी स्वतःला पीडितांच्या सेवेत झोकून दिले. लोकांना अन्न मिळावे, यासाठी त्यांनी अनेक उपहारगृहे आणि मदत केंद्रे उघडली जातील याची खात्री केली. एकीकडे ते आपल्या लोकांच्या दुर्दशेने अत्यंत व्यथित झाले होते, तर दुसरीकडे वसाहतवादी शासकांच्या असंवेदनशीलतेमुळे ते व्यथित झाले होते. त्यांनी ‘पंचशेर मनवंतर’ नावाचे एक पुस्तकही लिहिले, ज्यात त्यांनी आपली व्यथा मांडली. 1942 मध्ये जेव्हा मेदिनीपूरला महाचक्रीवादळाचा तडाखा बसला, तेव्हा परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा झाली.

कोलकाता येथील एका महाविद्यालयात बोलताना डॉ. मुखर्जी यांनी तरुणांना आवाहन केले, “तुम्ही जे काही काम हाती घ्याल, ते गांभीर्याने, सखोलपणे आणि उत्तमरित्या करा; ते कधीही अर्धवट किंवा अपूर्ण सोडू नका, आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान देत नाही, तोपर्यंत समाधानी राहू नका.”

भारत देश ‘विकसित भारता’च्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, त्यांनी ज्या मजबूत, एकसंध, आत्मविश्वासी आणि करुणामय भारतावर दृढ विश्वास ठेवला होता, तो घडवण्यासाठी दररोज प्रयत्न करणे, हीच त्यांच्या स्मृतीला वाहीलेली सर्वोत्तम आदरांजली आहे. आजच्या तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते या आवाहनाला समर्थन देतील.