पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज प्रथमच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल स्वागत केले. राज्यसभेच्या सर्व माननीय सदस्यांसाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सभापतींचे मनःपूर्वक स्वागत करताना मोदी म्हणाले, "सभागृहाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. मी तुम्हाला हे देखील आश्वासन देतो की या वरिष्ठ सभागृहातील सर्व माननीय सदस्य नेहमीच या प्रतिष्ठित संस्थेचे पावित्र्य जपतील आणि तुमच्या प्रतिष्ठेचा मान राखण्याची नेहमीच काळजी घेतील. हे माझे तुम्हाला ठाम आश्वासन आहे."
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर चर्चा होणार असताना, सभापतींचे नेतृत्व राज्यसभेचे कामकाज आणखी समृद्ध करेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
शेतकरी कुटुंबातून आलेले सभापती राधाकृष्णन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. "समाजसेवा ही त्यांची सातत्याने असलेली ओळख आहे. राजकारण हा केवळ एकच पैलू होता, सेवेची भावना त्यांच्या जीवनकार्याच्या केंद्रस्थानी राहिली," असे मोदी म्हणाले. सार्वजनिक कल्याणासाठी त्यांची दीर्घकाळ असलेली बांधिलकी समाजाच्या सेवेला महत्त्व देणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे ते पुढे म्हणाले.
सभापतींच्या विस्तृत सार्वजनिक कारकिर्दीवर भाष्य करताना, पंतप्रधानांनी कॉयर बोर्डाचे ऐतिहासिकदृष्ट्या उच्च-कामगिरी करणाऱ्या संस्थेत रूपांतर करण्याच्या त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. तसेच, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पुद्दुचेरी येथे राज्यपाल आणि नायब राज्यपाल म्हणून त्यांनी दिलेल्या समर्पित सेवेचीही त्यांनी दखल घेतली. विशेषतः झारखंडमधील आदिवासी समुदायांसोबतच्या त्यांच्या सखोल संपर्काचे त्यांनी कौतुक केले; ते लोकांच्या गरजा समजून घेण्यासाठी अनेकदा दुर्गम खेड्यांमध्ये प्रवास करत असत आणि लहान वस्त्यांमध्ये रात्रभर मुक्काम करत असत. "राज्यपाल पद सांभाळत असतानाही तुमची सेवावृत्ती वाढतच गेली," असे उद्गार त्यांनी काढले.
वर्षानुवर्षे असलेल्या संबंधातून आपल्या वैयक्तिक निरीक्षणातून मिळालेली माहिती सांगताना, पंतप्रधानांनी नमूद केले की राधाकृष्णन हे शिष्टाचारांच्या बंधनांच्या पलीकडे जाऊन स्वतःला वेगळे सिद्ध करतात. "सार्वजनिक जीवनात, शिष्टाचारांच्या पलीकडे जगण्यात एक विशेष ताकद असते, आणि ती ताकद आम्ही तुमच्यात नेहमीच पाहिली आहे," यावर मोदींनी भर दिला. सभापती राधाकृष्णन यांचा जन्म "डॉलर सिटी" मध्ये म्हणजे जी त्यांची स्वतःची एक भक्कम ओळख असलेली जागा आहे तिथे झाला असला तरी, त्यांनी डॉलर सिटीमधील शोषित, वंचित किंवा दुर्लक्षित समुदायांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणे निवडले, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की, लहानपणी सी.पी. राधाकृष्णन् यांना अविनाशी मंदिरातील तलावात बुडून जवळजवळ मृत्यूच्या दाराजवळ पोहोचल्याचा अनुभव आला होता. राधाकृष्णन आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या या बचावाचे अनेकदा दैवी कृपेने केलेले रक्षण असे वर्णन करतात, असे त्यांनी सांगितले. आणखी एका जीवघेण्या घटनेचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या नियोजित यात्रेच्या काही काळापूर्वी कोइम्बतूरमध्ये झालेल्या विनाशकारी बॉम्बस्फोटाचे वर्णन केले. या स्फोटात जवळजवळ 60 ते 70 लोकांचा मृत्यू झाला आणि राधाकृष्णन् थोडक्यात बचावले होते.
“या घटना, ज्यांना ते दैवी हस्तक्षेपाचे संकेत मानतात , या घटनांनी त्यांचा समाजाच्या सेवेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याचा त्यांचा दृढनिश्चय अधिक बळकट केला,” असे मोदी म्हणाले. अशा जीवनानुभवांचे अधिक सकारात्मकता आणि वचनबद्धतेत रूपांतर करणे हे सभापतींच्या उल्लेखनीय व्यक्तिमत्वाचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की सभापती राधाकृष्णन यांनी आपल्या काशीच्या पहिल्या भेटीदरम्यान गंगा मातेच्या आशीर्वादाने प्रेरित होऊन त्यांनी स्वतःहून मांसाहाराचा त्याग करण्याचा वैयक्तिक नियम घेतला होता. हा निर्णय त्यांच्या आंतरिक प्रेरणा आणि आध्यात्मिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवतात आणि त्यामागे कुठल्याही आहारपद्धतीबद्दल निर्णय घेण्याचा हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. “आपले नेतृत्वगुण आपल्या विद्यार्थीदशेपासूनच स्पष्ट दिसतात. आज आपण राष्ट्रीय नेतृत्वाच्या दिशेने सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे आला आहात. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे”, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणीच्या काळात सभापतींनी घेतलेल्या धाडसी भूमिकेचे स्मरण केले . सभापतींनी मर्यादित संसाधने असूनही लोकशाहीसमोरील आव्हानांना तोंड दिले, यातून त्यांची अतूट भावना आणि वचनबद्धतेची प्रचिती येते, असे ते म्हणाले. “तुमच्या संघर्षात लोकशाहीसाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबविणे समाविष्ट होते. तुम्ही लोकांना ज्या पद्धतीने प्रेरित केले ते सर्व लोकशाही प्रेमींसाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहेत आणि पुढेही राहतील”, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
सभापतींच्या संघटनात्मक कौशल्याची दखल घेत पंतप्रधानांनी राधाकृष्णन यांचे त्यांच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडल्याबद्दल , नवीन कल्पना स्वीकारल्याबद्दल, ऐक्य वाढवल्याबद्दल आणि तरुण नेत्यांना संधी दिल्याबद्दल कौतुक केले. “कोईम्बतूरच्या जनतेने तुम्हाला त्यांचे खासदार म्हणून निवडून दिले आणि सभागृहातही आपण आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या गरजांवर सातत्याने प्रकाश टाकला, त्यांना जनतेसमोर आणि संसदेसमोर योग्य महत्त्व दिले”, असे मोदी यांनी नमूद केले.
खासदार, राज्यसभेचे सभापती आणि आता उपराष्ट्रपती म्हणून राधाकृष्णन यांचा प्रदीर्घ अनुभव सभागृहासाठी आणि देशासाठी मार्गदर्शक प्रेरणा म्हणून काम करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Thiru CP Radhakrishnan Ji comes from a humble farming background and has devoted his entire life to public service: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 1, 2025
Seva, Samarpan and Sanyam have been integral to the personality of Thiru CP Radhakrishnan Ji: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 1, 2025


