हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने मोठी प्रगती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील हंसलपूर येथे हरित गतिशीलता उपक्रमांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात भारताच्या 'मेक इन इंडिया' प्रवासात एक नवीन अध्याय जोडला जात आहे. "मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड" या सामायिक ध्येयाच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे असे ते म्हणाले. आजपासून भारतात उत्पादित होणारी इलेक्ट्रिक वाहने 100 देशांमध्ये निर्यात केली जाणार आहेत यावर मोदी यांनी भर दिला. देशात हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादन सुरू झाल्याची घोषणा त्यांनी केली. आजचा दिवस भारत आणि जपानमधील मैत्रीला एक नवीन आयाम जोडत आहे यावर भर देत, पंतप्रधानांनी भारतातील सर्व नागरिकांचे , जपानचे आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे मनापासून अभिनंदन केले.
भारताच्या यशोगाथेची बीजे12–13 वर्षांपूर्वी रोवली गेली होती याचे स्मरण करत मोदी म्हणाले की 2012 मध्ये, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, हंसलपूरमधील भूखंड मारुती सुझुकीला देण्यात आला होता. त्यावेळीही आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे स्वप्न होते यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की सुरुवातीचे ते प्रयत्न आता देशाच्या सध्याच्या संकल्पांची पूर्तता करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
दिवंगत ओसामु सुझुकी यांचे मनापासून स्मरण करत, पंतप्रधान म्हणाले की त्यांना पद्मविभूषण देऊन गौरवण्याचा मान भारत सरकारला मिळाला आहे. ओसामु सुझुकी यांनी मारुती सुझुकी इंडियासाठी जे स्वप्न पाहिले होते त्याचा व्यापक विस्तार झालेला पाहताना त्यांना आनंद होत आहे.

भारताकडे लोकशाहीच्या सामर्थ्य आणि लोकसांख्यिकतेचा लाभ आहे, भारताकडे मोठ्या प्रमाणात कुशल कामगारही आहेत, यामुळेच भारताच्या प्रत्येक भागीदारासाठी एक विन-विन म्हणजेच दोघानांही लाभदायी स्थिती निर्माण होते, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. जपानची सुझुकी ही कंपनी भारतात उत्पादन घेत असून, इथे उत्पादित होणारी वाहने पुन्हा जपानमध्ये निर्यात केली जात आहेत, ही बाबही त्यांनी नमूद केली. या संपूर्ण घडामोडीतून भारत आणि जपानमधील संबंधांच्या सामर्थ्यासोबतच जागतिक कंपन्यांचा भारतावर वाढता विश्वासही दिसून येतो ही बाबही पंतप्रधानांनी नमूद केली. मारुती सुझुकीसारख्या कंपन्या मेक इन इंडिया उपक्रमाच्या प्रभावशाली ब्रँड ॲम्बेसेडर बनल्या असल्याचे ते म्हणाले. सलग चार वर्षांपासून मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार निर्यातदार कंपनी असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला, आणि त्याच प्रमाणात आजपासून इलेक्ट्रिक वाहनांची निर्यातही आजपासून सुरू होईल, अशी घोषणा त्यांनी केली. जगभरातील डझनभर देशांमध्ये धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवर मेड इन इंडिया हा शिक्का दिसणे ही अभिमानास्पद बाब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
इलेक्ट्रिक वाहन प्रणाली आणि निर्मिती परिसंस्थेत बॅटरी हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. काही वर्षांपूर्वी भारतात बॅटरी पूर्णपणे आयात केली जात होती, अशा वेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला बळकटी देण्यासाठी देशांतर्गत बॅटरी उत्पादन सुरू करणे ही भारताची गरज होती ही बाब त्यांनी नमूद केली. 2017 मध्ये याच दृष्टीकोनातून टीडीएसजी (TDSG) बॅटरी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आल्याचे स्मरणही त्यांनी यानिमित्ताने करून दिले. टीडीएसजीच्या एका नवीन उपक्रमांतर्गत, तीन जपानी कंपन्या भारतात पहिल्यांदाच एकत्रितपणे बॅटरी सेल्सचे उत्पादन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आता भारतातच स्थानिक पातळीवर बॅटरी सेल इलेक्ट्रोड्सचे उत्पादनही घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे झालेल्या स्थानिकीकरणामुळे भारताच्या आत्मनिर्भरतेला बळ मिळेल, ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यामुळे संमिश्र प्रकाराच्या इलेक्ट्रिक वाहन (हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्राच्या प्रगती आणि विस्ताराला गती मिळेल, असे ते म्हणाले. या ऐतिहासिक प्रारंभासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांकडे केवळ निवडीसाठीचा एक पर्याय म्हणून पाहीले जात होते, मात्र इलेक्ट्रिक वाहने म्हणजे अनेक आव्हानांवरची ठोस उपाययोजना आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. गेल्या वर्षी दिलेल्या सिंगापूर भेटीदरम्यान, आपण जुनी वाहने आणि रुग्णवाहिकांचे संमिश्र प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता, याचे स्मरणही त्यांनी करून दिले. आणि आता मारुती सुझुकीने हे आव्हान स्वीकारून केवळ सहा महिन्यांत एक कार्यरत प्रारुप अर्थात प्रोटोटाइप विकसित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुकही केले. यावेळी पंतप्रधानांनी स्वतः या संमिश्र प्रकारच्या रुग्णवाहिकेच्या प्रोटोटाइपची पाहणी केली. ही संमिश्र प्रकारची रुग्णवाहिका पूर्णपणे पीएम ई-ड्राइव्ह (PM E-DRIVE) योजनेला अनुसरून असल्याचेही त्यांनी नमूद केले. 11,000 कोटी रुपयांच्या या योजनेअंतर्गत ई-रुग्णवाहिकेसाठी समर्पित अर्थसंकल्पीय तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली. संमिश्र प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणात घट व्हायला मदत होईल आणि जुन्या वाहनांचे रूपांतर करण्यासाठी एक व्यवहार्य पर्यायही उपलब्ध होईल, असे त्यांनी अधोरेखित केले.
स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ गतिशीलता हे भारताचे भविष्य दर्शवितात यावर भर देऊन, पंतप्रधान मोदी म्हणाले की अशा प्रयत्नांद्वारे भारत स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ गतिशीलतेसाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून जलद गतीने उदयास येत आहे.
जग जेव्हा पुरवठा साखळीतील व्यत्ययांशी झुंजत आहे तेव्हा देखील मागील दशकातील भारताचे धोरणात्मक निर्णय अत्यंत प्रभावी ठरत आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले. 2014 मध्ये, देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर, या परिवर्तनाची तयारी सुरू करण्यात आली होती, याची आठवण करून देताना पंतप्रधानांनी मेक इन इंडिया अभियानाची सुरुवात तसेच जागतिक आणि देशांतर्गत उत्पादकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर प्रकाश टाकला. भारत आपले उत्पादन क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी औद्योगिक कॉरिडॉर विकसित केले जात आहेत तसेच देशभरात प्लग-अँड-प्ले पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स पार्क स्थापन केले जात आहेत, असेही ते म्हणाले. उत्पादन क्षेत्रातील विविध कंपन्यांना उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनेक क्षेत्रातील उत्पादकांना फायदे दिले जात आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले.

मोठ्या सुधारणांमुळे गुंतवणूकदारांसमोरील दीर्घकालीन आव्हाने दूर झाली आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. या सुधारणांमुळे गुंतवणूकदारांना भारताच्या उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करणे सोपे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी या प्रयत्नांचे प्रत्यक्ष परिणाम अधोरेखित केले. केवळ या दशकातच भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जवळपास 500 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर 2014 च्या तुलनेत मोबाईल फोन उत्पादनात 2,700 टक्क्यांनी वाढ झाली आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या दशकात संरक्षण उत्पादनातही 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या यशामुळे भारतातील सर्व राज्यांना प्रोत्साहन मिळत असून सुधारणा आणि गुंतवणुकीबाबत राज्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण झाली आहे, ज्याचा संपूर्ण देशाला फायदा होत आहे, असे त्यांनी नमूद केले. जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्यवसाय सुलभतेसह विकासाभिमुख धोरणे आणि सुधारणा आणण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले.
“भारत येथेच थांबणार नाही; ज्या क्षेत्रांमध्ये भारताने उत्तम कामगिरी केली आहे, त्या क्षेत्रात आणखी उत्कृष्टता साध्य करण्याचे ध्येय आहे”, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या प्रगतीला गती देण्यासाठी सरकार मिशन मॅन्युफॅक्चरिंगला प्राधान्य देत आहे, असे त्यांनी सांगितले. भारताचे लक्ष आता भविष्यकालीन उद्योगांकडे वळेल, हे त्यांनी अधोरेखित केले. सेमीकंडक्टर उद्योग झपाट्याने पुढे सरकत असून देशभरात सहा कारखाने उभारले जाणार असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाला पुढे नेण्याचा दृढनिश्चय असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भारत सरकारचे दुर्मिळ खनिजांच्या कमतरतेमुळे वाहन उद्योगासमोर उभ्या रहाणाऱ्या आव्हानांकडे देखील लक्ष आहे, असे मोदी पुढे म्हणाले.या क्षेत्राचे सबलीकरण करण्यासाठी,त्यांनी राष्ट्रीय दुर्मिळ खनिज अभियान सुरू करत असल्याचा उल्लेख केला.या मोहिमेअंतर्गत, भारतातील विविध ठिकाणी महत्त्वाच्या खनिजांचे संपादन करण्यासाठी 1,200 हून अधिक शोध अभियान राबवण्यात येणार आहेत.

पुढील आठवड्यात जपानला भेट देणार असल्याची घोषणा यावेळी पंतप्रधानांनी केली. भारत आणि जपानमधील संबंध केवळ राजनैतिक संबंधांपेक्षा अधिक आहेत - ते संस्कृती आणि परस्पर विश्वासावर रुजलेले आहेत यावर त्यांनी भर दिला.
दोन्ही देश एकमेकांच्या विकासात स्वतःची प्रगती साध्य करु पाहतात असे त्यांनी नमूद केले. मारुती सुझुकीने सुरू केलेला प्रवास आता बुलेट ट्रेनपर्यंत वेगाने पोहोचला आहे हे लक्षात घेऊन, भारत-जपान भागीदारीची औद्योगिक क्षमता साकार करण्याची मोठी सुरुवात प्रथम गुजरातमध्ये झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भूतकाळाची आठवण करून देताना पंतप्रधानांनी नमूद केले की वीस वर्षांपूर्वी जेव्हा व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद सुरू झाली तेव्हा जपान त्यातील एक प्रमुख भागीदार होता.गुजरातमधील लोकांनी त्यांच्या जपानी समकक्षांची ज्या प्रेमाने काळजी घेतली त्याची त्यांनी प्रशंसा केली.समजणे सोपे व्हावे यासाठी,उद्योगाशी संबंधित नियम आणि कायदे जपानी भाषेत छापण्यात आले आहेत असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.
जपानी पाहुण्यांच्या सोयीसाठी जपानी पाककृतींची देखील व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.जपानमधील गोल्फच्या छंदाची त्यांनी प्रशंसा केली आणि त्यांच्या आवडी लक्षात घेऊन 7-8 नवीन गोल्फ मैदाने विकसित करण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठे आता जपानी भाषा शिक्षणाला प्राधान्य देत आहेत, असे मोदी यांनी पुढे नमूद केले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत– जपान यांच्यातील जनतेतील लोकांमधील संबंध अधिकाधिक दृढ होत आहे. कौशल्य विकास आणि मानवी संसाधनांच्या गरजा आता दोन्ही देश आता एकमेकांच्या माध्यमातून पूर्ण करत आहेत. मारुती सुझुकीसारख्या कंपन्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि युवकांच्या देवाण–घेवाण कार्यक्रमांना चालना द्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पुढील काळात सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांत सातत्याने प्रगती करत राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आज केलेल्या प्रयत्नांच्या बळावर 2047 पर्यंत विकसित भारताचा पाया भक्कम होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. हे ध्येय साध्य करण्यामध्ये जपान हा भारताचा विश्वासू भागीदार राहील, असे ते म्हणाले.
या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, भारतातील जपानचे राजदूत ओनो केइची तसेच सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी
पंतप्रधानांच्या हस्ते अहमदाबादमधील हंसलपूर येथील सुझुकी मोटर प्रकल्पात दोन ऐतिहासिक टप्प्यांचे उद्घाटन झाले. हे महत्त्वाचे उपक्रम पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या वचनबद्धतेला पुढे नेत भारताच्या हरित गतिशीलतेसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास आले असल्याचे अधोरेखित करतात.
मेक इन इंडियाच्या यशस्वीतेचे मोठे उदाहरण म्हणजे पंतप्रधानांनी “ई–विटारा” या सुझुकीच्या पहिल्याच जागतिक धोरणात्मक बॅटरी विद्युत वाहनाचे लोकार्पण करत त्याला झेंडा दाखवला. पूर्णतः भारतात निर्मित ( मेड-इन-इंडिया) ही विद्युत वाहने युरोप आणि जपानसह जगातील शंभराहून अधिक देशांना निर्यात केली जाणार आहेत. यामुळे भारत आता सुझुकीसाठी विद्युत वाहनांचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल. याशिवाय पंतप्रधानांनी गुजरातमधील टीडीएस लिथियम–आयन बॅटरी प्रकल्पात हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनाचे उदघाटन करून भारताच्या बॅटरी परिसंस्थेच्या पुढील टप्प्याचे उद्घाटन केले. तोशिबा, डेंसो आणि सुझुकी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेला हा प्रकल्प देशांतर्गत उत्पादन व स्वच्छ ऊर्जा नवोपक्रमाला चालना देईल. या विकासामुळे आता बॅटरीच्या एकूण मूल्यापैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक उत्पादन भारतातच होणार आहे.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Make in India, Make for the World. pic.twitter.com/KZsJB9qrKt
— PMO India (@PMOIndia) August 26, 2025
India has the power of democracy, the advantage of demography and a very large pool of skilled workforce, making it a win-win situation for every partner. pic.twitter.com/TggFpUSLlR
— PMO India (@PMOIndia) August 26, 2025
The world will drive EVs that say… Made in India! pic.twitter.com/HFDCW83sqV
— PMO India (@PMOIndia) August 26, 2025
The Make in India initiative has created a favourable environment for both global and domestic manufacturers. pic.twitter.com/1RjY3VYjVo
— PMO India (@PMOIndia) August 26, 2025
In the coming times, the focus will be on futuristic industries and India is taking off in the semiconductor sector. pic.twitter.com/oVQcksqurI
— PMO India (@PMOIndia) August 26, 2025


