पंतप्रधानांनी सुझुकीच्या पहिल्या मेड-इन-इंडिया ग्लोबल स्ट्रॅटेजिक बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल “ई-विटारा” चे उद्घाटन केले आणि त्याला हिरवा झेंडा दाखवला
मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड, भारतात बनवलेली इलेक्ट्रिक वाहने आजपासून 100 देशांना निर्यात केली जातील, हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादनाला देखील आजपासून प्रारंभ होत आहे: पंतप्रधान
भारताकडे लोकशाहीची शक्ती आहे, लोकसंख्याशास्त्राचा फायदा आहे आणि मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ आहे, त्यामुळे प्रत्येक भागीदारासाठी ही एक समान हिताची संधी आहे: पंतप्रधान
जगभरात अशी इलेक्ट्रिक वाहने धावतील ज्यावर लिहिले असेल मेड इन इंडिया : पंतप्रधान
मेक इन इंडिया उपक्रमाने जागतिक आणि देशांतर्गत उत्पादकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे: पंतप्रधान
मेक इन इंडिया उपक्रमाने जागतिक आणि देशांतर्गत उत्पादकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे: पंतप्रधान
आगामी काळात, भविष्यकालीन उद्योगांवर लक्ष केंद्रित केले जाईल: पंतप्रधान

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, भारतातील जपानचे राजदूत  केइची ओनो सान, सुजुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुजुकी सान, मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हिसाशी ताकेउची सान, अध्यक्ष आर. सी. भार्गव, हंसलपूर प्रकल्पातील सर्व कर्मचारी  आणि उपस्थित मान्यवर.

गणेशोत्सवाच्या या उत्साहपूर्ण वातावरणात आज ‘मेक इन इंडिया’च्या प्रवासात एक नवा टप्पा गाठला जात आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड  या आपल्या ध्येयाकडे हे एक मोठे पाऊल आहे. आजपासून भारतात निर्मित  झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची 100 देशांमध्ये निर्यात होणार आहे. त्याचबरोबर, हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादनाला देखील सुरुवात होत आहे. आजचा हा दिवस भारत-जपान मैत्रीला नव्या उंचीवर नेणारा आहे. मी सर्व देशवासीयांचे, जपानचे,  सुजुकी कंपनीचे  मनःपूर्वक अभिनंदन करतो. एका अर्थाने आज मारुतीच्या प्रवासाचे तेरा वर्ष, म्हणजेच किशोरावस्थेत प्रवेश होत आहे. किशोरावस्था म्हणजे पंख पसरविण्याचा कालखंड, स्वप्नांच्या उड्डाणाचा काळ. या वयात असंख्य स्वप्ने आकार घेतात आणि पाय जमिनीवर टिकत नाहीत, असेही म्हटले जाते. मला आनंद आहे की, गुजरातमधील मारुती आता किशोरावस्थेत प्रवेश करत आहे. येत्या काळात मारुती नवे पंख पसरवेल, नवी उमेद आणि नव्या उत्साहाने पुढे जाईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

 

मित्रांनो,

भारताच्या या यशोगाथेची बीजे जवळपास 13 वर्षांपूर्वी पेरली गेली होती. 2012 मध्ये, जेव्हा मी येथील मुख्यमंत्री होतो, तेव्हा हंसलपूर येथे आम्ही मारुती सुजुकीला जमीन दिली होती. त्यावेळीही आमचा दृष्टीकोन आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया हाच होता. तेव्हाचे आमचे प्रयत्न आज देशाच्या संकल्पपूर्तीमध्ये मोठी भूमिका बजावत आहेत.

मित्रांनो,

या प्रसंगी मी दिवंगत ओसामू सुजुकी सान यांचे मनापासून स्मरण करतो. आमच्या सरकारने त्यांचा  पद्मविभूषण देऊन गौरव केला आहे. त्यांनी मारुती सुजुकी इंडियासाठी जो व्यापक दृष्टिकोन ठेवला होता, त्याचे मूर्त स्वरूप आपण आज विस्ताराच्या रूपात पाहत आहोत, हे निश्चितच अभिमानास्पद आहे.

मित्रांनो

भारताकडे लोकशाहीची ताकद आहे, तसेच लोकसंख्याशास्त्रीय लाभ आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कौशल्यपूर्ण कामगार वर्ग आहे. त्यामुळे भारतासोबतची भागीदारी ही प्रत्येक भागीदारासाठी  दोन्ही पक्षांसाठी लाभदायी ठरते.  आपण पाहताय , सुजुकी जपान भारतात उत्पादन करीत आहे आणि ज्या गाड्यांचे उत्पादन करीत आहे, त्यांची  पुन्हा जपानला निर्यात होत आहेत. हे केवळ भारत-जपान यांच्यातील संबंध बळकट करत नाहीत, तर जागतिक कंपन्यांचा भारतावर असलेला विश्वासही अधोरेखित करते. एक प्रकारे, मारुती सुजुकीसारख्या कंपन्या ‘मेक इन इंडिया’च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ठरत आहेत. सलग 4 वर्षे मारुती भारतातील सर्वात मोठी वाहन निर्यातदार कंपनी ठरली आहे. आता आजपासून इलेक्ट्रिक वाहने ( ईव्ही )  निर्यातीला देखील त्याच प्रमाणावर प्रारंभ होत आहे. आता जगातील डझनभर देशांमध्ये जी इलेक्ट्रिक वाहने धावतील, त्यावर  मेड इन इंडिया लिहिलेले असेल.

मित्रांनो,

आपल्या सर्वांना माहित आहे की, इलेकट्रीक वाहनांचा पर्यावरणीय व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बॅटरी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात बॅटऱ्या पूर्णपणे आयात केल्या जात होत्या. ईव्ही उत्पादनाला गती देण्यासाठी भारताने स्वतः बॅटरी उत्पादन करणे आवश्यक होते. याच दृष्टीकोनातून 2017 मध्ये येथे ( TDSG ) टीडीएसजी बॅटरी प्रकल्पाची पायाभरणी केली. आता टीडीएसजीच्या नव्या उपक्रमाअंतर्गत, तीन जपानी कंपन्या एकत्रितपणे भारतात प्रथमच बॅटरी सेल उत्पादन करणार आहेत. बॅटरी सेल्सचे इलेक्ट्रोड देखील स्थानिक पातळीवर तयार केले जातील. या स्थानिकीकरणामुळे भारताच्या आत्मनिर्भरतेला नवी ताकद मिळेल. हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाला यामुळे आणखी गती मिळेल. या ऐतिहासिक उपक्रमासाठी मी आपणा सर्वांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

काही वर्षांपूर्वीपर्यंत इलेकट्रीक वाहनांकडे  केवळ एक नवीन पर्याय म्हणून पाहिले जात होते. परंतु माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की,  इलेकट्रीक वाहन अडचणींवर एक ठोस उपाय आहे. म्हणूनच गेल्या वर्षी सिंगापूर भेटीदरम्यान मी म्हटले होते की, आपण आपल्या जुन्या गाड्यांना, जुन्या रुग्णवाहिकांना हायब्रिड ईव्हीमध्ये रूपांतरित करू शकतो. मारुती सुजुकीने ही आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारली आणि अवघ्या सहा महिन्यांत एक कार्यरत प्रोटोटाइप तयार केला. आत्ता मी त्या हायब्रिड रुग्णवाहिकेचा प्रोटोटाइप  प्रत्यक्ष पाहिला  आहे. या हायब्रिड रुग्णवाहिका “पीएम ई-ड्राईव्ह” योजनेत पूर्णतः बसतात. सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या या योजनेत ई-रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र बजेट निश्चित केले गेले आहे. हायब्रिड ईव्हीमुळे प्रदूषण कमी होईल आणि जुन्या वाहनांचे रूपांतर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होईल.

मित्रांनो,

स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक हेच आपले भविष्य आहे. अशा प्रयत्नांमुळे भारत वेगाने स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतुकीचे एक विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास येईल.

मित्रांनो,

आज जेव्हा जग पुरवठा साखळीतील अडचणींशी सामना करत आहे, अशा काळात भारताने गेल्या दशकात केलेल्या धोरणनिर्मितीचे महत्त्व प्रकर्षाने समोर येत आहे. 2014 मध्ये मला देशसेवेची संधी मिळाल्यानंतर लगेचच आपण या तयारीस सुरुवात केली होती. आपण “मेक इन इंडिया” अभियान सुरू केले, ज्यामुळे जागतिक आणि देशांतर्गत उत्पादक या दोघांसाठीही देशात अनुकूल वातावरण निर्माण झाले. भारतातील उत्पादन कार्यक्षम आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक व्हावे यासाठी आपण औद्योगिक कॉरिडॉर्स उभारले. आपण प्लग-अँड-प्ले पायाभूत सुविधा तयार करत आहोत.  लॉजिस्टिक्स पार्क्स निर्माण करीत आहोत. भारत अनेक क्षेत्रांत उत्पादक कंपन्यांना उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजना देखील देत आहे.

 

मित्रांनो,

अनेक मोठ्या सुधारणा करून आपण गुंतवणूकदारांसमोरील जुन्या अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी सोपे झाले आहे. त्याचे परिणाम आपल्या समोर आहेत. याच दशकात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जवळपास 500 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 च्या तुलनेत मोबाईल फोन उत्पादनात तब्बल 2,700 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातही गेल्या दशकात 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हे यश आज भारतातील सर्व राज्यांना प्रोत्साहित करीत आहे. सुधारणा आणि गुंतवणुकीबाबत राज्यांमध्ये निरोगी स्पर्धा सुरू झाली आहे, ज्याचा संपूर्ण  देशाला लाभ होत आहे.

प्रत्येक बैठकीत, वैयक्तिक चर्चेत, तसेच सार्वजनिक व्यासपीठांवर मी प्रत्येक राज्यांना सांगत आलो आहे की, आपण सक्रिय  व्हायला हवे. आपल्याला विकासाभिमुख धोरणे राबवावी  लागतील, एक खिडकी मंजुरीवर भर द्यावा लागेल.  आपल्याला कायद्यातील सुधारणांवर भर द्यावा लागेल. आजच्या या स्पर्धेच्या युगात ज्या राज्याने जितक्या वेगाने आपल्या धोरणांना नीटनेटके ठेवले, जर आणि पण न ठेवता, पारदर्शकपणा ठेवला तर त्यांच्याकडे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. गुंतवणूकदार धाडसाने पुढे येतात. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. अशा वेळी कोणतेही राज्य मागे राहता कामा नये. प्रत्येक राज्याने या संधींचा लाभ घ्यायला हवा. अशी स्पर्धा व्हावी की भारतात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला निर्णय घ्यायला कठीण जाईल की, त्याने कोणत्या राज्यात गुंतवणूक करावी. इतकी स्पष्ट स्पर्धा असली पाहिजे , यामुळे देशाला लाभ होणार आहे आणि म्हणूनच मी सर्व राज्यांना निमंत्रण देतो की या, सुधारणांशी स्पर्धा करा, चांगल्या शासनाशी स्पर्धा करा, प्रगतीमुख अशा धोरणांशी स्पर्धा करा आणि असे करून आपण 2047 ला विकसित भारत बनविण्याच्या लक्ष्याला वेगाने साध्य करण्यासाठी आपला सहभाग सुनिश्चित करूया.             

मित्रांनो,

भारत इथे थांबणारा नाही. ज्या क्षेत्रांत आपण उत्तम कामगिरी केली आहे, त्यात अजूनही चांगले करण्याची गरज आहे. यासाठी आपण उत्पादन क्षेत्रावर मोहिमेप्रमाणे भर देत आहोत. आगामी काळात आपला भर भविष्यकालीन उद्योगांवर असेल. अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) क्षेत्रात भारत उड्डाण घेत आहे. देशात यासाठी 6 विशिष्ट कारखाने उभारले जात आहेत. आपल्याला अर्धसंवाहक उत्पादन आणखी पुढे न्यायचे आहे.

 

मित्रांनो,

भारत सरकार वाहन उद्योगासाठी दुर्मिळ धातूंच्या कमतरतेशी निगडित अडचणींबाबतही सजग आहे. या दिशेने देशाची क्षमता वाढविण्यासाठी आपण राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियान (एनसीएमएम्‌) सुरू केले आहे. त्याअंतर्गत देशभरात 1,200 पेक्षा जास्त शोधमोहीमा राबवल्या जातील व महत्त्वपूर्ण खनिजे शोधली जातील.

मित्रांनो,

पुढील आठवड्यात मी जपानला जात आहे. भारत आणि जपान यांचे नाते हे केवळ राजकीय संबंधांपुरते मर्यादित नसून ते सांस्कृतिक आणि विश्वासाचे नाते आहे. आपण एकमेकांच्या प्रगतीत स्वतःची प्रगती पाहतो. मारुती सुजुकीसोबत आपण जी यात्रा सुरू केली, ती आता बुलेट ट्रेनच्या गतीपर्यंत पोहोचली आहे.

भारत-जपान भागीदारीच्या औद्योगिक शक्यता प्रत्यक्षात आणण्याची मोठी सुरुवात याच गुजरात राज्यातून झाली होती. मला आठवते, आपण 20 वर्षांपूर्वी ‘वायब्रंट गुजरात’ शिखर परिषद सुरू केली होती, तेव्हा जपान हा एक प्रमुख भागीदार होता. आपण विचार करा, एका विकसनशील देशातील, एका छोट्या राज्याची गुंतवणूक शिखर परिषद आणि जपानसारखा विकसित देश त्याचा भागीदार असणे, हे दाखवते की भारत-जपान नात्याची पायाभूत रचना किती मजबूत आहे. आज वायब्रंट गुजरातच्या प्रवासाची आठवण काढताना मला आनंद आहे की माझे मित्र जे इथे उपस्थित आहेत, ते 2003 मध्ये भारतात राजदूत होते, आता ते निवृत्त झाले आहेत, पण त्यांचे भारत आणि गुजरातप्रेम तसेच टिकून आहे. त्यांचे मी स्वागत करतो. गुजरातच्या लोकांनीही जपानी लोकांचा आत्मीयतेने सन्मान केला. आपण उद्योगाशी संबंधित नियम व नियमन जपानी भाषेत प्रकाशित केले. मी गुजरातमध्ये असताना प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देत होतो. अगदी माझे परिचयपत्र देखील जपानी भाषेत बनवायचो. प्रचार व्हिडिओसुद्धा जपानी भाषेत डब करून दाखवायचो. कारण मला माहिती होते की या मार्गावर आपल्याला दृढ पावले टाकायची आहेत.मी सर्व राज्यांना आवाहन करतो, आकाश खुले आहे, तुम्हीही मेहनत करा,  मैदानात या, प्रचंड फायदा होईल.

मला आठवतं, जपानमधील मित्र जेव्हा सुरुवातीला येत होते, तेव्हा माझी त्यांच्याशी जवळीक वाढत गेली आणि त्यांच्या संस्कृतीला मी समजून घेतले. जपानी लोकांचा स्वभाव असा आहे की त्यांचा सांस्कृतिक परिसर ही त्यांची पहिली प्राथमिकता असते. जसे गुजरातचे लोक आहेत, ते गुजरातमध्ये शनिवार-रविवारी विविध उपहार गृहांमध्ये मेक्सिकन किंवा इटालियन अन्न खातात, पण गुजरातबाहेर गेले की गुजराती अन्न शोधतात. तसाच स्वभाव जपानी लोकांचाही आहे.म्हणूनच मी येथे जपानी भोजनपद्धतीची व्यवस्था केली. जपानी मित्रांना ‘गोल्फ’ आवडतो असे सांगितले गेले आणि मग गुजरातमध्ये 7-8 नवीन गोल्फ कोर्स विकसित केले.विकास साधायचा असेल, गुंतवणूक आणायची असेल, जगाचे लक्ष वेधायचे असेल तर प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. देशातील अनेक राज्ये हे करत आहेत. यात मागे असलेल्या राज्यांना मी आवाहन करतो की प्रत्येक बाबतीत संधी बघा आणि विकासाची नवी दिशा पकडा.आपल्याकडे शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जपानी भाषा शिकवली जात आहे. अनेक जपानी भाषा शिक्षक आज गुजरातमध्ये आहेत. अनेक शाळांमध्ये जपानी भाषा शिकवली जाते.

 

मित्रांनो,

या प्रयत्नांमुळे भारत-जपानमधील व्यक्ती - व्यक्ती संपर्क वाढत आहे. कौशल्ये आणि मानव संसाधन यासंबंधी एकमेकांच्या गरजा आपण पूर्ण करीत आहोत. मला अपेक्षा आहे की मारुती-सुजुकीसारख्या कंपन्याही या प्रयत्नांचा भाग बनतील आणि युवा विनिमय सारख्या उपक्रमांना चालना देतील.

मित्रांनो,

आपल्याला भविष्यातील सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती करायची आहे. मला विश्वास आहे की आपले आजचे प्रयत्न 2047 च्या विकसित भारताच्या इमारतीला नवी उंची देऊन जातील. जपान ह्या प्रवासात आपला विश्वासू भागीदार असेल आणि आपली मैत्री अखंड टिकेल. मी तर नेहमी म्हणतो की भारत-जपान संबंध हे "मेड फॉर इच आदर" सारखे संबंध आहेत. आज मी विशेषतः मारुतीला शुभेच्छा देतो. ही तर त्यांच्यासाठी जणू काही तारुण्यमय अशी सुरुवात आहे, अजून त्यांना उंच भरारी घ्यायची आहे. नवे स्वप्न रंगवायचे आहेत. तुमच्या संकल्पांसाठी भारत सरकार तुमच्यासोबत आहे. आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला आपण पुढे न्यायचे आहे. ‘लोकलसाठी व्होकल’ व्हायचे आहे. स्वदेशी हा आपला जीवन मंत्र व्हायला हवा. माझ्या मित्रांनो अभिमानाने स्वदेशीच्या वाटेवर चला. जपानमधून भारतात जे उत्पादन होत आहे, तेही स्वदेशी आहे. माझ्या दृष्टीने स्वदेशीची व्याख्या सोपी आहे – पैसा कोणाचा आहे, डॉलर-पाउंड आहे किंवा कोणतेही दुसरे चलन आहे,ते चलन काळे आहे की पांढरे आहे, त्याने फरक पडत नाही. पण उत्पादनामध्ये माझ्या देशवासीयांचा घाम असेल, माझ्या मातृभूमीच्या मातीचा सुगंध असेल, हाच खरा स्वदेशीचा मंत्र आहे.

मित्रांनो,

या भावनेने आपण पुढे जाऊया. 2047 मध्ये आपण असा हिंदुस्तान घडवू ज्याचा अभिमान पुढील पिढ्या बाळगतील. आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या या मार्गासाठी मी देशवासीयांना आमंत्रण देतो. चला, आपण सर्वजण एकत्र पुढे जाऊया, 2047 मध्ये विकसित भारत बनवूया.जगाच्या भल्यामध्ये भारताचा वाटा वाढवत राहूया, या भावनेने मी आपणास शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद !

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India stands out; emerging markets to outperform global equities over next decade: Goldman Sachs

Media Coverage

India stands out; emerging markets to outperform global equities over next decade: Goldman Sachs
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles loss of lives due to accident in Medinah involving Indian nationals
November 17, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over loss of lives due to accident in Medinah, Saudi Arabia, involving Indian nationals. He extended his heartfelt condolences to the families who have lost their loved ones and prayed for the swift recovery of those injured.

The Prime Minister stated that India’s Embassy in Riyadh and Consulate in Jeddah are providing all possible assistance to the affected individuals. He also informed that Indian officials are in close contact with the Saudi Arabian authorities to ensure necessary support and coordination.

The Prime Minister wrote on X;

“Deeply saddened by the accident in Medinah involving Indian nationals. My thoughts are with the families who have lost their loved ones. I pray for the swift recovery of all those injured. Our Embassy in Riyadh and Consulate in Jeddah are providing all possible assistance. Our officials are also in close contact with Saudi Arabian authorities.”