माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार !
देशात आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, त्यानिमित्त मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा उत्सव सर्वांसाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.
या वर्षी, हा उत्सव आपल्यासाठी आनंद साजरा करण्याचे आणखी एक कारण घेऊन आला आहे. 22 सप्टेंबरपासून, वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर लागू झाले असून देशभरात 'जीएसटी बचत उत्सव' किंवा 'जीएसटी सेव्हिंग फेस्टिव्हल’ सुरु झाला आहे.
या सुधारणांमुळे बचतीला चालना मिळेल आणि समाजातील प्रत्येक घटकाला याचा थेट लाभ होईल, मग ते शेतकरी असोत, महिला असोत, युवक असोत, गरीब असोत, मध्यमवर्ग असोत, व्यापारी असोत किंवा एमएसएमई असोत. यामुळे विकास आणि गुंतवणूकीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल आणि प्रत्येक राज्य आणि प्रदेशाच्या प्रगतीला गती मिळेल.
नवीन जीएसटी सुधारणांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आता प्रामुख्याने 5% आणि 18% असे दोनच टप्पे असतील.
अन्न, औषधे, साबण, टूथपेस्ट यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू , विमा आणि इतर अनेक वस्तू आता एकतर करमुक्त असतील किंवा सर्वात कमी 5% कराच्या कक्षेत येतील. यापूर्वी ज्या वस्तूंवर 12% कर आकारला जात होता त्या बहुतांश वस्तू पूर्णपणे 5% कराच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत.
विविध दुकानदार आणि व्यापारी सुधारणांपूर्वीचे आणि सुधारणांनंतरचे कर दर्शविणारे 'तेव्हा आणि आता' असे फलक लावत आहेत हे पाहून खूप आनंद होतो आहे .
गेल्या काही वर्षांमध्ये, देशातील 25 कोटी लोक गरीबीतून वर आले आहेत आणि एक आकांक्षी नव-मध्यमवर्ग तयार झाला आहे.
याशिवाय, 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य कर आकारणीद्वारे मोठ्या प्रमाणात प्राप्तीकर कपात करून आम्ही आपल्या मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढवली आहे.
जर आपण प्राप्तिकर कपात आणि नवीन जीएसटी सुधारणा एकत्र केल्या तर त्यामुळे लोकांची सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे.
यामुळे तुमचे घरगुती खर्च कमी होतील आणि घर बांधणे, वाहन खरेदी करणे, उपकरणे खरेदी करणे, बाहेर खाणे किंवा कुटुंबाबरोबर सुट्टीचे नियोजन करणे यांसारखी स्वप्ने पूर्ण करणे सुलभ होईल.
2017 मध्ये सुरू झालेला आपल्या देशाचा जीएसटी प्रवास हा आपल्या नागरिकांना आणि व्यवसायांना विविध करांच्या जाळ्यातून मुक्त करण्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. जीएसटीने देशाला आर्थिकदृष्ट्या एकत्र आणले. ‘एक राष्ट्र, एक कर’ या प्रणालीने एकसमानता आणि दिलासा दिला. केंद्र आणि राज्यांच्या सक्रिय सहभागाने जीएसटी परिषदेने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले.
आता, या नवीन सुधारणा आपल्याला आणखी पुढे घेऊन जातील , कर प्रणाली सुलभ करतील , दर कमी करतील आणि अधिक बचतीमुळे लोकांच्या हातात अधिक पैसे येतील.
आपले लघु उद्योग, दुकानदार, व्यापारी, उद्योजक आणि एमएसएमई यांना व्यवसाय सुलभता आणि अनुपालन सुलभता यात वाढ झालेली दिसून येईल. कमी कर, कमी किंमती आणि सोप्या नियमांमुळे विक्री चांगली होईल , अनुपालनाचा भार कमी होईल आणि विशेषतः एमएसएमई क्षेत्रात संधींमध्ये वाढ होईल,.
2047 पर्यंत विकसित भारत उभारणीचे आपले सामूहिक ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी, स्वयंपूर्णतेच्या मार्गावर चालणे अत्यावश्यक आहे. या सुधारणांमुळे आपला स्थानिक उत्पादन पाया मजबूत होईल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मार्ग प्रशस्त होईल.
याच अनुषंगाने , या सणासुदीच्या काळात, आपण मेड इन इंडिया उत्पादनांना पाठिंबा देण्याचा संकल्प करूया. म्हणजेच स्वदेशी उत्पादने खरेदी करूया , ज्यांच्या निर्मितीमध्ये भारतीयाचा घाम आणि परिश्रम आहेत , भले ती उत्पादने बनवणारे ब्रँड किंवा कंपनी कोणतीही असो.
प्रत्येक वेळी आपल्या देशातील कारागिरांनी, कामगारांनी आणि उद्योगांनी बनवलेले उत्पादन खरेदी करता तेव्हा, तुम्ही, अनेक कुटुंबांना त्यांची उपजीविका मिळवण्यास मदत करत आहात आणि आपल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करत आहात.
मी आपल्या दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना भारतात बनवलेली उत्पादने विकण्याचे आवाहन करतो.
आपण अभिमानाने म्हणूया - आपण जे खरेदी करतो ते स्वदेशी आहे.
आपण अभिमानाने म्हणूया - आपण जे विकतो ते स्वदेशी आहे.
मी राज्य सरकारांना देखील उद्योग, निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे आणि गुंतवणूकविषयक वातावरण सुधारण्याचे आवाहन करतो.
पुन्हा एकदा, मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आनंदमय नवरात्रीच्या तसेच 'जीएसटी बचत महोत्सवा'च्या माध्यमातून आनंद आणि बचतीने परिपूर्ण उत्सवाच्या शुभेच्छा देतो.
या सुधारणा प्रत्येक भारतीय कुटुंबात अधिक समृद्धी घेऊन येवो.


