पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्यात आज दूरध्वनीवरुन संभाषण झाले.
फ्रान्समध्ये सध्या पडलेला भीषण दुष्काळ आणि वणवे याबद्दल, मोदी यांनी आपल्या सहवेदना यावेळी व्यक्त केल्या.
दोन्ही नेत्यांनी यावेळी संरक्षण सहकार्याअंतर्गत सुरु असलेले प्रकल्प आणि नागरी अणुऊर्जा सहकार्यासह इतर द्वीपक्षीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
तसेच, जागतिक अन्नसुरक्षेसह, इतर काही महत्वाच्या भू-राजकीय आव्हानांविषयी देखील दोघांमध्ये चर्चा झाली.
गेल्या काही वर्षांत, भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत, सखोल आणि व्यापक झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, सहकार्याच्या नवनव्या क्षेत्रात एकत्रित काम करण्यासह दोन्ही देशातील संबंध अधिक व्यापक करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.


