भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय!
व्यासपीठावर उपस्थित राज्यपाल श्रीमान अजय भल्ला जी, राज्य प्रशासनाचा अधिकारी वर्ग आणि या कार्यक्रमाला उपस्थित मणिपूरच्या माझ्या बंधू-भगिनींनो,आपणा सर्वांना नमस्कार.
मणिपूरची ही भूमी साहस आणि धैर्याची भूमी आहे. हे डोंगर निसर्गाची बहुमोल देणगी आहेत आणि त्याचबरोबर आपणा सर्व लोकांच्या अखंड मेहनतीचेही प्रतिक आहेत. मणिपूरच्या लोकांच्या जिद्दीला मी नमन करतो. मुसळधार पावसातही इतक्या मोठ्या संख्येने आपण इथे आलात, आपल्या या स्नेहाबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. पावसामुळे माझे हेलिकॉप्टर येऊ शकले नाही, तेव्हा मी रस्ता मार्गे येण्याचे ठरवले आणि रस्ता मार्गे येताना हातात तिरंगा घेऊन आबालवृद्ध पाहिले, या सर्वांचे प्रेम, आपुलकी पाहिली आणि माझे हेलिकॉप्टर इथे येऊ शकले नाही, हे ईश्वराने चांगलेच केले, असे मला वाटले. आपले हे प्रेम, ही आपुलकी, माझ्या जीवनातले हे क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय राहतील, मणिपूरवासियांना मी नतमस्तक होऊन नमन करतो.
मित्रहो,
या भागाची संस्कृती,परंपरा,इथली विविधता आणि चैतन्य भारताचे मोठे सामर्थ्य आहे. मणिपूरच्या नावातच मणी आहे. हा असा मणी आहे जो येत्या काळात संपूर्ण ईशान्य भारताची लकाकी वाढविणार आहे. मणिपूरला विकासाच्या मार्गावर वेगाने घेऊन जाण्यासाठी भारत सरकार सदैव प्रयत्नशील आहे. म्हणूनच, मी आज आपणा सर्वांसमवेत इथे आलो आहे. थोड्या वेळापूर्वीच या मंचावरून सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे. हे प्रकल्प मणिपूरच्या लोकांचे, इथल्या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाचे जीवनमान अधिक उंचावतील. आपणासाठी आरोग्य आणि शिक्षणाच्या नव्या सुविधा निर्माण करतील. या प्रकल्पांबद्दल, मणिपूरच्या सर्व लोकांचे, चुराचांदपूरच्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो.

मित्रहो,
मणिपूर हे सीमेलगतचे गाव आहे.कनेक्टीव्हिटी हे इथे नेहमीच आव्हान राहिले आहे. चांगल्या रस्त्यांअभावी आपल्याला होणारा त्रास मी जाणतो. म्हणूनच 2014 नंतर, मणिपूरच्या कनेक्टीव्हिटीवर सातत्याने काम करण्यावर माझा भर राहिला आहे आणि यासाठी भारत सरकारने दोन स्तरावर काम केले. पहिला स्तर म्हणजे आम्ही मणिपूरसाठीच्या रेल्वे आणि रस्ते बजेटमध्ये अनेक पटींनी वाढ केली आणि दुसऱ्या स्तरावर शहरांबरोबरच गावांपर्यंत रस्ते पोहोचविण्यावर भर दिला.
मित्रहो,
गेल्या काही वर्षांमध्ये,इथे राष्ट्रीय महामार्गासाठी 3700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, 8700 कोटी रुपये खर्चाच्या नव्या महामार्गांचे काम झपाट्याने सुरु आहे.पूर्वी इथल्या गावांपर्यंत पोहोचणे किती कठीण होते हे आपणाला माहीतच आहे. आता शेकडो गावांमध्ये रस्ते कनेक्टीव्हिटी पोहोचवली आहे. डोंगराळ भागातील आदिवासी गावांना याचा मोठा लाभ झाला आहे.
मित्रहो,
आमच्या सरकारच्या कार्यकाळातच मणिपूरमध्ये रेल्वे कनेक्टीव्हिटी विस्तारत आहे. जीरीबाम-इम्फाळ रेल्वे मार्ग लवकरच इम्फाळला राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडेल. या प्रकल्पावर सरकार 22 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. 400 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला नवा इम्फाळ विमानतळ, हवाई कनेक्टीव्हिटी, नव्या शिखरावर नेत आहे. या विमानतळावरून राज्याच्या दुसऱ्या भागांसाठी हेलिकॉप्टर सेवाही सुरु करण्यात आली आहे. ही वाढती कनेक्टीव्हिटी, मणिपूरच्या आपणा सर्वांच्या सुविधांमध्ये वाढ करत आहे, इथल्या युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहे.

मित्रहो,
आज भारत झपाट्याने प्रगती करत आहे.लवकरच आपण जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनणार आहोत.विकासाचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावा असा माझा प्रयत्न आहे. एक काळ होता जेव्हा दिल्लीत जाहीर झालेली घोषणा इथे पोहोचेपर्यंत दशके उलटत असत. आज आपले चुराचांदपूर, आपले मणिपूरही देशाच्या इतर भागांबरोबरच विकास करत आहे.देशातल्या गरिबांसाठी पक्की घरे बनविण्याची योजना आम्ही सुरु केली. मणिपूर मधल्या हजारो कुटुंबाना याचा लाभ झाला. इथे सुमारे साठ हजार घरे बांधण्यात आली आहेत. याचप्रमाणे, या भागात पूर्वी विजेची समस्या होती, आमच्या सरकारने या त्रासापासून जनतेला मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. परिणामी, मणिपूरमधेही एक लाखापेक्षा जास्त कुटुंबाना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
मित्रहो,
आपल्या माता-भगिनींना,पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. यावर उपाय म्हणून आम्ही ‘हर घर नल से जल’ ही योजना सुरु केली. मागील काळामध्ये 15 कोटीपेक्षा जास्त देशवासीयांना ‘नल से जल’ ही सुविधा प्राप्त झाली आहे. 7-8 वर्षांपूर्वी, मणिपूरमध्ये फक्त 25-30 हजार घरांमध्ये नळाद्वारे पाणी येत असे. मात्र, आज इथे साडेतीन लाखापेक्षा जास्त घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. अगदी लवकरच मणिपूर मधल्या प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा होईल, असा मला विश्वास आहे.
मित्रहो,
आधीच्या काळी डोंगराळ आणि आदिवासी भागात चांगल्या शाळा, महाविद्यालये, चांगली रुग्णालये हे स्वप्न होते. कोणी आजारी पडले तर त्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी बराच वेळ लागत असे. आज भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती बदलते आहे. आता चुराचांदपूरमध्येच एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे, येथे नवीन डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जात आहे आणि आरोग्य सुविधांमध्येही सुधारणा होत आहेत. जरा विचार करा, स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपासून मणिपूरच्या डोंगराळ भागात एकही वैद्यकीय महाविद्यालय नव्हते, हे काम आमच्या सरकारने केले आहे. आमचे सरकार पंतप्रधान डिव्हाईन योजनेअंतर्गत पाच डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आधुनिक आरोग्य सेवा विकसित करत आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत भारत सरकार गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देखील देत आहे. मणिपूरमधील सुमारे 2.5 लाख रुग्णांना या योजनेद्वारे मोफत उपचार मिळाले आहेत. ही मोफत उपचार सुविधा नसती तर येथील माझ्या गरीब बंधू आणि भगिनींना आपल्या उपचारांवर स्वतःच्या खिशातून 350 कोटी रुपये खर्च करावे लागले असते. पण हा सर्व खर्च भारत सरकारने उचलला आहे. कारण प्रत्येक गरीब व्यक्तीच्या चिंता दूर करण्याला आपले प्राधान्य आहे.

मित्रहो,
मणिपूरची ही भूमी, हा प्रदेश, आशा आणि अपेक्षांची भूमी आहे. मात्र दुर्दैवाने हिंसाचाराने या सुंदर प्रदेशाला वेढा घातला आहे. काही काळापूर्वी मी छावण्यांमध्ये राहणाऱ्या पीडित लोकांना भेटलो. त्यांच्याशी बोलल्यानंतर, मी असे म्हणू शकतो की आशा आणि आत्मविश्वासाची एक नवीन पहाट मणिपूरमध्ये येऊ घातली आहे.
मित्रहो,
कोणत्याही ठिकाणी विकासासाठी शांतता प्रस्थापित करणे खूप महत्वाचे आहे. गेल्या अकरा वर्षांत, ईशान्य भागात अनेक दशकांपासून सुरू असलेले अनेक वाद आणि संघर्ष संपले आहेत. लोकांनी शांततेचा मार्ग निवडला आहे, विकासाला प्राधान्य दिले आहे. मला समाधान वाटते की अलीकडेच, डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये, वेगवेगळ्या गटांसोबत करारांसाठी चर्चा सुरू झाली आहे. हा भारत सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामध्ये संवाद, आदर आणि परस्पर सामंजस्याला महत्त्व देऊन शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले जाते आहे. मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गावर पुढे जाण्याचे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे, त्यांच्या मुलांचे भविष्य सुनिश्चित करण्याचे आवाहन करेन. आणि मी आज तुम्हाला वचन देतो की, मी तुमच्यासोबत आहे, भारत सरकार तुमच्यासोबत आहे, मणिपूरच्या लोकांसोबत आहे.
मित्रहो,
मणिपूरमध्ये जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आमचे सरकार बेघर झालेल्या कुटुंबांसाठी सात हजार नवीन घरे बांधण्यासाठी मदत करत आहे. अलिकडेच सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देखील मंजूर करण्यात आले आहे. विस्थापितांना मदत करण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.
मित्रहो,
मणिपूरच्या आदिवासी युवा वर्गाच्या स्वप्नांची आणि संघर्षांची मला चांगली जाणीव आहे. तुमच्या चिंता दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर काम केले जात आहे. सरकार स्थानिक प्रशासन संस्थांना बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या विकासासाठी पुरेसा निधी देखील उपलब्ध करून दिला जात आहे.

मित्रहो,
आज प्रत्येक आदिवासी समुदायाचा विकास हा देशाचा प्राधान्यक्रम आहे. आदिवासी भागांच्या विकासासाठी पहिल्यांदाच धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान राबवले जाते आहे. याअंतर्गत मणिपूरमधल्या पाचशे पेक्षा जास्त गावांमध्ये विकास कामे केली जात आहेत. आदिवासी भागातही एकलव्य मॉडेल निवासी शाळांची संख्या वाढवली जात आहे. मणिपूरमध्येही अठरा एकलव्य मॉडेल निवासी शाळा बांधल्या जात आहेत. शाळा आणि महाविद्यालयांच्या आधुनिकीकरणामुळे येथील डोंगराळ जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
मित्रहो,
मणिपूरची संस्कृती नारी शक्तीला प्रोत्साहन देत आहे. आणि आमचे सरकार नारी शक्तीला सक्षम बनवण्यातही गुंतले आहे. मणिपूरच्या मुलींना मदत करता यावी म्हणून सरकार काम करणाऱ्या महिला वसतिगृहे देखील बांधत आहे.

मित्रहो,
आम्ही मणिपूरला शांती, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक बनवण्याच्या ध्येयाने वाटचाल करत आहोत. मी तुम्हाला खात्री देतो की, मणिपूरच्या विकासासाठी, विस्थापितांना लवकरात लवकर योग्य ठिकाणी वसवण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी, भारत सरकार येथील मणिपूर सरकारला पाठिंबा देत राहील. विकास प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि मला दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मी मणिपूरच्या लोकांचे मनापासून आभार मानतो.
माझ्याबरोबर बोला -
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
अनेकानेक आभार.


