शेअर करा
 
Comments
"भारताच्या इतिहासात, मेरठ हे केवळ शहर नाही तर संस्कृती आणि सामर्थ्याचे महत्त्वपूर्ण केंद्र"
देशात खेळांची जोमाने वाढ होण्यासाठी युवकांचा खेळावर विश्वास असायला हवा आणि, खेळाला व्यवसाय बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे. हा माझा संकल्प आणि माझे स्वप्नही आहे”
"गावे आणि लहान शहरांमध्ये क्रीडा पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे, या ठिकाणांहून खेळाडूंची संख्या वाढत आहे"
“संसाधने आणि नवीन शाखांसह उदयोन्मुख क्रीडा परिक्षेत्र नवीन शक्यता निर्माण करत आहे.यामुळे खेळाडू होणे हा योग्य निर्णय आहे असा विश्वास समाजात निर्माण होतो”
“मेरठ केवळ स्थानिकांना संधीच देत नाही तर स्थानिकांना जागतिक बनवत आहे”
“आपले ध्येय स्पष्ट आहे- तरुणांनी त्यांचे आदर्श ओळखावेत, आणि त्याच स्वतःही एक आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा"

भारत माता की, जय.  

भारत माता की, जय. 

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.

वर्षाच्या सुरुवातीला मेरठला येणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारताच्या इतिहासात मेरठचे स्थान केवळ एका शहराचेच नाही, तर मेरठ हे आपल्या संस्कृतीचे, आपल्या सामर्थ्याचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. रामायण आणि महाभारत काळापासून ते जैन तीर्थंकर आणि पंज-प्यारांपैकी एक, भाई धरमसिंह पर्यंत, मेरठने देशाचा विश्वास वृद्धिंगत केला आहे.

सिंधू संस्कृतीपासून देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत या प्रदेशाने भारताची क्षमता काय आहे हे जगाला दाखवून दिले आहे. 1857 मध्ये बाबा औघडनाथ मंदिरातून स्वातंत्र्याची जी साद घातली गेली, दिल्लीकडे प्रस्थान करण्याची हाक दिली गेली, त्याने गुलामगिरीच्या अंधाऱ्या बोगद्यात देशाला नवा प्रकाश दाखवला. क्रांतीच्या या प्रेरणेने पुढे जाताना आपण स्वतंत्र झालो आणि आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभिमानाने साजरा करत आहोत. येथे येण्यापूर्वी मला बाबा औघडनाथ मंदिरात जाण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. मी अमर जवान ज्योती येथेही गेलो, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी काही केले त्यांच्या हृदयात तळमळ असल्याची भावना स्वातंत्र्य संग्राम संग्रहालयात मी अनुभवली.

 

बंधू आणि भगिनींनो,

स्वतंत्र भारताला नवी दिशा देण्यात मेरठ आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशाचेही मोठे योगदान आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवरचे बलिदान असो किंवा क्रीडांगणातील राष्ट्राचा आदर असो, या क्षेत्राने नेहमीच देशभक्तीची ज्योत तेवत ठेवली आहे. चौधरी चरणसिंग यांच्या रूपाने नूरपूर मडैयाने देशाला दूरदर्शी नेतृत्व दिले. मी या प्रेरणास्थानाला सलाम करतो, मी मेरठ आणि या भागातील जनतेचे अभिनंदन करतो.

 

बंधू आणि भगिनींनो, 

मेरठ हे देशाचे आणखी एक महान सुपुत्र मेजर ध्यानचंद जी यांचेही जन्मस्थान आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने देशातील सर्वात मोठ्या क्रीडा पुरस्काराला या क्षेत्रातील आदर्शाचे नाव दिले आहे. आज मेरठचे क्रीडा विद्यापीठ मेजर ध्यानचंद जी यांना समर्पित केले जात आहे आणि जेव्हा या विद्यापीठाचे नाव मेजर ध्यानचंद जी यांच्याशी जोडले जाते तेव्हा त्यांचे शौर्य केवळ प्रेरणा देत नाही, तर त्यांच्या नावातही एक संदेश आहे. त्यांच्या नावात जो शब्द आहे, त्याचा अर्थ लक्ष केंद्रित न करता, केंद्रित क्रिया केल्याशिवाय कधीही यश मिळत नाही आणि म्हणूनच ध्यानचंद यांच्याशी ज्याचे नाव जोडले गेले आहे अशा विद्यापीठात पूर्ण लक्ष देऊन काम करणारे तरुण देशाचे नाव उंचावतील, याची मला पूर्ण खात्री आहे.

उत्तर प्रदेशचे पहिले क्रीडा विद्यापीठ बनल्याबद्दल मी उत्तर प्रदेशातील तरुणांचे खूप खूप अभिनंदन करतो. 700 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे हे आधुनिक विद्यापीठ जगातील सर्वोत्तम क्रीडा विद्यापीठांपैकी एक असेल. येथे युवकांना खेळाशी निगडीत आंतरराष्ट्रीय सुविधा तर मिळतीलच, शिवाय खेळाला करिअर म्हणून अंगीकारण्यासाठी आवश्यक कौशल्येही तयार होतील. दरवर्षी 1000 हून अधिक मुले आणि मुली सर्वोत्तम खेळाडू म्हणून उदयास येतील. म्हणजेच क्रांतिकारकांचे शहर हे क्रीडापटूंचे शहर म्हणून आपली ओळख आणखी दृढ करेल.

मित्रांनो, 

पूर्वीच्या सरकारांमध्ये उत्तर प्रदेशात गुन्हेगार त्यांचा खेळ खेळत असत, माफिया त्यांचा खेळ खेळत असत. पूर्वी येथे बेकायदेशीर ताबा घेण्याच्या स्पर्धा होत असत, मुलींवर टीका करणारे मुक्तपणे फिरत होते. लोकांची घरे जाळली जात होती आणि पूर्वीचे सरकार आपल्या खेळात व्यस्त होते हे मेरठ आणि आजूबाजूच्या भागातील लोक कधीही विसरू शकत नाहीत. पूर्वीच्या सरकारांच्या खेळाचा परिणाम असा झाला की, लोक नाईलाजाने आपले वडिलोपार्जित घर सोडून स्थलांतर करत होते. 

आधी काय काय खेळ खेळले जायचे, आता योगीजींचे सरकार अशा गुन्हेगारांसोबत जेल-जेल खेळत आहे. पाच वर्षांपूर्वी याच मेरठच्या मुली संध्याकाळनंतर घराबाहेर पडायला घाबरत होत्या. आज मेरठच्या मुली संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. इकडे मेरठच्या सोतीगंज बाजारात वाहनांसोबतचा खेळही संपुष्टात आला आहे. आता उत्तर प्रदेशात खऱ्या खेळांना प्रोत्साहन दिले जात आहे, उत्तर प्रदेशच्या तरुणांना क्रीडा विश्वात रमण्याची संधी मिळत आहे.

 

मित्रांनो, 

आम्हाला येथे सांगितले आहे - महाजनो येन गताः स पंथा:

म्हणजेच ज्या मार्गावर महान व्यक्ती, महान विभूती चालतात, तोच आपला मार्ग आहे. पण आता भारत बदलला आहे, आता आपण 21व्या शतकात आहोत. आणि या 21व्या शतकातील नवीन भारतात, सर्वात मोठी जबाबदारी आपल्या तरुणांवर आहे आणि म्हणून, आता मंत्र बदलला आहे - 21 व्या शतकाचा मंत्र आहे - युवा जनो येन गताः  स पंथाः 

तरुण ज्या मार्गावर चालतील तोच देशाचा मार्ग आहे. तरुणाईची पावले जिकडे वळतात तिकडे ध्येय आपोआपच साध्य होते. युवा पिढी ही नवं भारताचे नेतृत्वही आहे, युवा पिढी ही नव्या भारताचा विस्तारही आहे. युवा पिढी ही नव्या भारताची नियंत्रकही आहे आणि युवा हा नव्या भारताचाही नेता आहे. आपल्या आजच्या तरुणांना प्राचीनतेचा वारसाही आहे, त्यांना आधुनिकतेची जाणीवही आहे. आणि म्हणूनच युवा ज्या दिशेने जातील त्या दिशेने भारतही जाईल आणि ज्या वाटेने भारत जाईल त्याच वाटेने आता जगही जाणार आहे. आज विज्ञानापासून साहित्यापर्यंत, स्टार्टअप्सपासून ते खेळांपर्यंत सर्वत्र भारतातील युवा वर्ग आहे.

 

बंधू आणि भगिनींनो, 

क्रीडाविश्वात आलेले आमचा युवा वर्ग पूर्वीही सक्षम होता, ते मेहनतीत आधीही कमी नव्हते. आपल्या देशात क्रीडा संस्कृतीही खूप समृद्ध राहिली आहे. आपल्या गावातल्या प्रत्येक उत्सवात, प्रत्येक सणात खेळाचा महत्त्वाचा वाटा असतो. मेरठमधील दंगल आणि त्यात तुपाचे डबे आणि लाडू जिंकण्याची बक्षिसे चाखण्यासाठी मैदानात उतरण्याचे कोणाचे मन नाही. पण आधीच्या सरकारांच्या धोरणांमुळे खेळाकडे बघण्याचा आणि खेळाडूंचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता हेही खरे. पूर्वीच्या शहरांमध्ये, जेव्हा तरुण स्वतःची ओळख खेळाडू म्हणून करून द्यायचा, तेव्हा तो म्हणायचा की मी खेळाडू आहे, मी अमुक खेळ खेळतो, त्या खेळात माझी प्रगती झाली आहे, मग समोरचे लोक काय विचारायचे, माहित आहे? समोरची व्यक्ती विचारायची- अरे बेटा, खेळतोस हे चांगले आहे, पण काम काय करतोस? म्हणजेच खेळाबद्दल कोणताही आदर नव्हता.

 

गावात कुणी स्वत:ला खेळाडू म्हणवलं तर लोक म्हणायचे सैन्यात किंवा पोलिसात नोकरी करण्यासाठी खेळत असेल. म्हणजेच खेळाबाबत विचार आणि आकलनाची व्याप्ती फारच मर्यादित झाली होती. तरुणांच्या या क्षमतेला पूर्वीच्या सरकारांनी महत्त्व दिले नाही. समाजातील खेळाबद्दलची विचारसरणी बदलून खेळ समोर आणणे ही सरकारांची जबाबदारी होती. पण घडले उलटे, देशातील बहुतांश खेळांबाबत उदासीनता वाढली. परिणाम असा झाला की ज्या हॉकीमध्ये गुलामगिरीच्या काळात मेजर ध्यानचंदजींसारख्या प्रतिभावंतांनी देशाला वैभव प्राप्त करून दिले, त्यातही पदकासाठी अनेक दशके वाट पाहावी लागली.

 

जागतिक हॉकी नैसर्गिक मैदानातून अॅस्ट्रो टर्फमध्ये गेली, पण आम्ही तिथेच राहिलो. आम्ही भानावर आलो तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रशिक्षणापासून संघ निवडीपर्यंत प्रत्येक पायरीवर घराणेशाही, भाऊबंदकीचे खेळ, भ्रष्टाचाराचे खेळ, भेदभाव आणि पारदर्शकतेचा मागमूसही दिसत नाही. मित्रांनो, हॉकी हे एक उदाहरण आहे, ती प्रत्येक खेळाची कहाणी होती. बदलते तंत्रज्ञान, बदलती मागणी, बदलती कौशल्ये यासाठी देशात पूर्वीची सरकारे उत्तम परिसंस्था निर्माण करू शकली नाहीत.

 

मित्रांनो, 

देशातील तरुणांमध्ये असलेली अमर्याद प्रतिभा सरकारच्या उदासीनतेमुळे बंधनात अडकली होती. 2014 नंतर त्याच्या पकडीतून बाहेर पडण्यासाठी आम्ही प्रत्येक स्तरावर सुधारणा केल्या. खेळाडूंची क्षमता वाढवण्यासाठी आमच्या सरकारने आपल्या खेळाडूंना चार शस्त्रे दिली आहेत. खेळाडूंना संसाधनांची गरज आहे, खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधांची गरज आहे, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय वाव मिळण्याची गरज आहे, खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता हवी आहे. गेल्या काही वर्षांत आमच्या सरकारने भारतातील खेळाडूंना ही चार शस्त्रे मिळवून देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आम्ही खेळांना तरुणांची तंदुरुस्ती आणि तरुणांचा रोजगार, स्वयंरोजगार, त्यांच्या करिअरशी जोडले आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम म्हणजेच टॉप्स हा असाच एक प्रयत्न आहे.

 

सरकार आज देशातील आघाडीच्या खेळाडूंना त्यांचा खुराक, फिटनेसपासून ट्रेनिंगपर्यंत लाखो करोडो रुपयांची मदत पुरवत आहे. खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून आज एखादा आपल्या कौशल्याने अगदी कमी वयातही देशाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख निर्माण करत आहे. अश्या खेळाडूंमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करण्यासाठी हर प्रकारे त्यांना मदत केली जात आहे. या प्रयत्नांमुळेच आज भारतातील खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय मैदानावर उतरतो तेव्हा त्याचा खेळ जगात बघितला जातो, त्याची वाहवा केली जाते. गेल्याच वर्षी आपण ऑलिंपिकमध्ये पाहिले, पॅरालिंपिक मध्ये पाहिले. आतापर्यंतच्या इतिहासात जे याआधी घडले नाही ते गेल्या ऑलिंपिकमध्ये माझ्या देशाच्या वीरपुत्र वीरपुत्रीनी करून दाखवले. मेडलची अशी काही रांग लावली की संपूर्ण देश भारावून गेला, आणि एकाच स्वरात उद्गारला – “खेळाच्या मैदानात भारताचा उदय झाला आहे.”

 

बंधु आणि भगिनींनो,

आज आपण पहात आहोत की उत्तरप्रदेशच्या , उत्तराखंडाच्या  अनेक छोट्या छोट्या गाव- खेड्यातून, सामान्य कुटुंबातील मुले मुली भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी ज्या खेळांमध्ये साधनसंपत्तीची ददात नसलेल्या कुटुंबातील युवकच भाग घेत अश्या खेळांमध्येही आमची मुले- मुली आघाडी घेत आहेत. याच प्रदेशातील अनेक खेळाडूंनी ऑलिंपिक्स आणि पॅरालिंपिक्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. खेळामधील आधुनिक मुलभूत सोयी सुविधा सरकार गावागावात निर्माण करत आहे, त्याचेच हे फलित आहे. आधी उत्तमोत्तम क्रीडागारे फक्त शहरांमध्येच उपलब्ध होती, आज खेळाडूंना गावाजवळच सुविधा मिळत आहेत.  

 

मित्रहो,

आपण जेव्हा नवीन कार्यसंस्कृती विकसित करण्याचे प्रयत्न करतो, तेव्हा त्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. कार्याशी नाते, विचारशक्ती आणि साधनसामग्री. खेळाशी आमचे शतकानुशतकांपासूनचे म्हणजे जुने नाते आहे.  पण खेळाची संस्कृती निर्माण करण्यासाठी फक्त जुने नाते असून चालणार नाही तर त्यासाठी आम्हाला नवा विचारही आत्मसात करावा लागेल. देशामध्ये खेळांसाठी आवश्यक आहे ते म्हणजे आपल्या युवकांमध्ये खेळासंबधी विश्वास निर्माण होणे, खेळाचा स्वीकार आपला व्यवसाय म्हणून करण्याची इच्छा वाढीला लागणे. आणि हाच माझा संकल्प आहे आणि माझे स्वप्नही आहे. माझी अशी इच्छा आहे की ज्याप्रकारे इतर व्यवसाय आहेत त्याप्रमाणे आपल्या युवावर्गाने क्रीडाक्षेत्राचाही व्यवसायासाठी स्वीकार सहज मानावा. आपल्याला ही जाणीव ठेवली पाहिजे की जो कोणी क्रीडा क्षेत्रात आहे त्या प्रत्येकाने जागतिक स्तरावर पहिला क्रमांक पटकावायला हवाच असे काही नाही. अरे, देशात जेव्हा क्रीडा-पर्यावरण तयार होते तेव्हा क्रीडा व्यवस्थापनापासून क्रीडा-लेखन आणि क्रीडा-मानसशास्त्रापर्यंत क्रीडाक्षेत्राशी संबधित कितीतरी शक्यता उद्याला येत असतात. हळूहळू समाजात असा विश्वास निर्माण होते की युवावर्गाचा क्रीडाक्षेत्राकडे वळण्याचा निर्णय एक योग्य निर्णय आहे. या प्रकारचे पर्यावरण निर्माण करण्यासाठी आवश्यकता असते ती साधनसामग्रीची. जेव्हा आपण आवश्यक साधनसामग्री, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करत असतो तेव्हा क्रीडासंस्कृतीच बळकट होत असते. जर खेळासाठी आवश्यक सोयीसुविधा असतील तर खेळाची संस्कृती बळकट होत जाते. जेव्हा खेळासाठी आवश्यक सोयीसुविधा असतील तेव्हा देशात खेळाची संस्कृती आकार घेईल, विस्तारेल. म्हणूनच आज या प्रकारची क्रीडा विद्यापीठेही तेवढीच आवश्यक आहेत. ही क्रीडा विद्यापीठे खेळाची संस्कृती फळण्या-फुलण्यासाठी नर्सरीसारखे काम करते. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर सात दशकांनी 2018मध्ये पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आमच्या सरकारने मणिपुरमध्ये स्थापन केले. गेल्या सात वर्षांमध्ये देशभरात क्रीडा शिक्षण आणि कौशल्य यांच्याशी संबधित अनेक संस्थाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे, आणि आता देशाला मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ ही क्रीडा क्षेत्रातील उच्च शिक्षणातील अजून एक संस्था लाभली आहे.

मित्रहो,

क्रीडाविश्वाशी संबधित अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि मेरठच्या लोकांना तर हे अगदी चांगलेच माहित आहे.  खेळांशी संबधित सेवा आणि साहित्याची जागतिक बाजारपेठ लाखो करोडो रुपयांची आहे. इथून, मेरठमधूनच आता शंभराहून अधिक देशांमध्ये क्रीडासाहित्य निर्यात होते. मेरठ लोकलसाठी व्होकल तर आहेच पण लोकलला ग्लोबलसुद्धा बनवतो आहे. देशभरात असे अनेक स्पोर्ट्स क्लस्टर्स आजही विकसित केले जात आहेत. उद्देश हाच की देशाने क्रीडासाहित्य आणि उपकरणांच्या उत्पादनातही आत्मनिर्भर व्हावा.

आता जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होत आहे त्यातही खेळाला प्राधान्य दिले गेले आहे. आता विज्ञान, गणित, भूगोल किंवा अश्याच अभ्यासक्रमांच्या श्रेणीत क्रीडाविषयसुद्धा आणला आहे. याआधी खेळाला अभ्यासेतर उपक्रम मानले जात होते, पण आता क्रीडा हा शाळेतील एक नियमित विषय असेल.

 

मित्रहो,

उत्तरप्रदेशच्या युवकांमध्ये तर एवढी प्रतिभा आहे, आमच्या उत्तरप्रदेशचे युवक इतके प्रतिभावान आहेत की आभाळ अपुरे पडेल. म्हणून उत्तर प्रदेशात डबल इंजिन सरकार अनेक विद्यापीठांची स्थापना करत आहे. गोरखपूरमध्ये महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठ, प्रयागराज येथे डॉ राजेंद्रप्रसाद विधी विश्वविद्यालय, लखनौमध्ये राज्य न्यायवैद्यक संस्था , अलीगढ़मध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विश्वविद्यालय, सहारनपूर येथे माँ शाकुंबरी विश्वविद्यालय आणि येथे मेरठमध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ, आमचे लक्ष्य स्वच्छ आहे. आमचे युवक फक्त रोल मॉडेल बनावेत एवढंच नव्हे तर त्यांना आपले रोल मॉडेल कळावेत देखील.

सरकारांची भूमिका पालकांसारखी असते. योग्यता असल्यास प्रोत्साहन देणे आणि चुका झाल्यास मुलांकडून चुका होतात असे म्हणून जबाबदारी न टाळणे. आज योगीजींचे सरकार युवकांच्या विक्रमी सरकारी नियुक्त्या करत आहे. आयटीआयमधून ट्रेनिंग मिळालेल्या हजारो तरुणांना मोठमोठ्या कंपनीत रोजगार मिळवून दिला आहे. राष्ट्रीय उमेदवारी योजना असो किंवा पंतप्रधान कौशल्य विकास योजना, लाखो युवकांना याचा लाभ दिला गेला आहे. अटलजींच्या जयंतीला उत्तरप्रदेश सरकारने विद्यार्थ्यांना टॅब्लेट आणि स्मार्टफोन देण्याची मोहीम सुरु केली  आहे.

 

मित्रहो,

 केंद्रसरकारच्या अजून एका योजनेबद्दल उत्तर प्रदेशाच्या युवकांनी माहिती घेणे आवश्यक आहे. ही योजना म्हणजे स्वामित्व योजना. या योजनेंतर्गत केंद्र सरकार गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या मालकीच्या हक्कांचे कागदपत्र म्हणजे स्थावर अधिवास नोंदणी कागदपत्र देत आहे. स्थावर अधिवास नोंदणी कागदपत्र मिळाल्यावर गावांमधील युवकांना आपले कामकाज , व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकांकडून सहज मदत मिळेल. हे स्थावर अधिवास नोंदणी कागदपत्र गरीब, दलित, वंचित, पिडीत, मागास, समाजातील प्रत्येक वर्गाला आपल्या घरावर बेकायदेशीर ताबा होण्याच्या चिंतेपासून मुक्त करेल. मला याचा आनंद आहे की स्वामित्व योजनेला योगी सरकार अगदी व्यवस्थित गती देत आहे. उत्तर प्रदेशच्या 75 जिल्ह्यांमध्ये 23 लाखांहून अधिक स्थावर अधिवास नोंदणी कागदपत्रे दिली गेली आहेत. निवडणुकांनंतर योगी सरकार या योजनेला आणखी वेग देईल.

 

बंधू भगिनींनो,

या प्रदेशातील आधिकाधिक युवक ग्रामीण प्रदेशातील रहिवासी आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीही आमचे सरकार सातत्याने काम करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून कालच उत्तरप्रदेशातील लाखो शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात करोडो रुपये जमा केले गेले. याचा भरपूर फायदा या प्रदेशातील लहान शेतकऱ्यांनाही होतो आहे.

 

मित्रहो,

जे याआधी सत्तेत होते त्यांनी आपल्या उसाची रक्कम आपल्याला हप्त्या हप्त्याने, छळत छळत दिली. योगी सरकारने उसाच्या शेतकऱ्यांना जेवढा मोबदला दिला आहे तेवढा तर मागील दोन्ही सरकारांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. आधीच्या सरकारांच्या कार्यकाळात साखर कारखाने कवडीमोलाने विकले जात होते, हे माझ्यापेक्षा अधिक चांगले आपल्याला माहिती आहे. माहिती आहे की नाही? साखर कारखाने विकले की नाही? भ्रष्टाचार झाला की नाही? योगीजींच्या सरकारच्या काळात कारखाने बंद होत नाहीत, उलट इथे तर त्यांचा विस्तार होतो.  नवीन कारखाने उघडले जातात. आता उत्तरप्रदेश उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या उत्पादनातही वेगाने मुसंडी मारत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये उत्तरप्रदेशातून सुमारे 12 हजार कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी केले गेले आहे. सरकार कृषीसंबधी पायाभूत सुविधा आणि अन्न प्रक्रिया यासारख्या उद्योगांचाही विकास वेगाने करत आहे. आज ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, साठवणीची व्यवस्था, शीतगृहे यावर एक लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

 

बंधू भगिनींनो

डबल इंजिन सरकार युवकांच्या क्षमतेसोबतच या प्रदेशाची क्षमता वाढवण्यावरही काम करत आहे. मेरठची रेवडी-गजक, हँडलूम, ब्रास बँड, दागिने या प्रकारांना किंमत आहे. मेरठ-मुजफ्फरनगर मध्ये छोट्या लउद्योगांचा अजून विस्तार व्हावा, येथे मोठ्या उद्योगांना आधारवड होण्याचे सामर्थ्य लाभावे, येथील कृषी उत्पादनांना, येथे उपज होणाऱ्या मालाला नवीन बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच या प्रदेशाला देशातील अत्याधुनिक आणि सर्व प्रदेशांशी जोडलेला प्रदेश बनवण्यासाठी काम सुरू आहे. दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेमुळे दिल्ली आता एका तासाच्या अंतरावर आहे. आता काही दिवसांपूर्वीच ज्या गंगा एक्स्प्रेसवेचे काम सुरू झाले आहे, त्याची सुरवातही मेरठहूनच होणार. मेरठची कनेक्टीविटी उत्तर प्रदेशातील इतर शहरांशी संबध आणि व्यवहार सुलभ करण्यासाठी मदत करेल. देशातील पहिली स्थानिक वेगवान रेल्वे ट्रांझिट व्यवस्थाही मेरठला राजधानीशी जोडते आहे. मेरठ देशातील पहिले असे शहर असेल जेथे मेट्रो व वेगवान रॅपीड रेल्वे सोबतच धावतील, मेरठचे आयटी पार्क ही आधीच्या सरकारची फक्त घोषणा होती त्याचे लोकार्पण झाले आहे.

 

मित्रहो,

हा दुहेरी फायदा, दुप्पट वेग हीच डबल इंजिन सरकारची ओळख आहे. ही ओळख दृढ करायची आहे. माझ्या पश्चिमी उत्तर प्रदेशातील लोकांना माहिती आहे की आपण तेथून हात पुढे केलात तर लखनौमध्ये योगीजी आणि येथून हात लांबविलात की आपणासाठी दिल्लीत मी आहे. विकासाला गती द्यायची आहे. नव्या वर्षात आपण नव्या जोमाने पुढे जाऊ. माझ्या तरुण मित्रांनो, आज संपूर्ण हिंदूस्तान मेरठची शक्ती बघत आहे, पश्चिमी उत्तर प्रदेशाची शक्ती पाहत आहे, युवकांची शक्ती पाहत आहे. ही शक्ती देशाची शक्ती आहे. आणि या शक्तीला अजून प्रोत्साहन देण्यासाठी  नव्या विश्वासाने पुन्हा एकदा आपल्याला मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठासाठी अनेकानेक शुभेच्छा.

भारत मातेचा विजय असो! भारत मातेचा विजय असो!

वंदे मातरम! वंदे मातरम!

Explore More
पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद

लोकप्रिय भाषण

पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा पीएम मोदी के साथ’ चा मराठी अनुवाद
PM Modi’s Mother Hiraba Joins ‘Har Ghar Tiranga’ Campaign In Gujarat

Media Coverage

PM Modi’s Mother Hiraba Joins ‘Har Ghar Tiranga’ Campaign In Gujarat
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM condoles passing away of noted stock investor Rakesh Jhunjhunwala
August 14, 2022
शेअर करा
 
Comments

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the passing away of noted stock investor Rakesh Jhunjhunwala.

In a tweet, the Prime Minister said;

"Rakesh Jhunjhunwala was indomitable. Full of life, witty and insightful, he leaves behind an indelible contribution to the financial world. He was also very passionate about India’s progress. His passing away is saddening. My condolences to his family and admirers. Om Shanti."