पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील उडुपी येथील श्री कृष्ण मठातील 'लक्ष कंठ गीता पारायण' कार्यक्रमाला संबोधित केले. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य दर्शनाचे समाधान, श्रीमद् भगवद्गीतेच्या मंत्रांचा आध्यात्मिक अनुभव आणि इतक्या पूज्य संत आणि गुरूंची उपस्थिती, हे आपल्यासाठी एक परम भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे असंख्य आशीर्वादांची प्राप्ती करण्यासारखे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
तीन दिवसांपूर्वीच आपण गीतेची भूमी असलेल्या कुरुक्षेत्राच्या भूमीवर होतो, याची आठवण करून देत, मोदी म्हणाले की, आज भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने पावन झालेल्या आणि जगद्गुरू श्री मध्वाचार्य जी यांच्या वैभवाने भूषवलेल्या या भूमीवर येणे, ही माझ्यासाठी परम समाधानाची बाब आहे. या निमित्ताने, एक लाख लोकांनी भग्वदगीतेतील श्लोकांचे एकत्रित पठण केले, तेव्हा जगभरातील लोकांनी भारताच्या हजारो वर्षांच्या अध्यात्मिक वारशाच्या जिवंत दिव्यत्वाचे दर्शन घेतले, असे त्यांनी नमूद केले.
कर्नाटकच्या भूमीवर येऊन येथील अतिशय प्रेमळ लोकांमध्ये असणे, हा अनुभव नेहमीच त्यांना एक अद्वितीय आनंद देतो, असे त्यांनी सांगितले. उडुपीच्या या पवित्र भूमीला भेट देणे नेहमीच विलक्षण असते, असे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, त्यांचा जन्म गुजरातमधील असला तरी, गुजरात आणि उडुपी यांच्यात नेहमीच एक सखोल आणि विशेष संबंध राहिला आहे. मोदींनी या श्रद्धेची आठवण करून दिली की, येथे स्थापित केलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पूर्वी द्वारका येथे माता रुक्मिणीद्वारे पूजली जात होती आणि नंतर जगद्गुरू श्री मध्वाचार्य यांनी या मूर्तीची उडुपी येथे प्रतिष्ठापना केली. गेल्या वर्षीच आपल्याला समुद्राखालील श्री द्वारका जी ला भेट देण्याचा दिव्य अनुभव मिळाला होता, असे त्यांनी नमूद केले. या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर त्यांना जो गहन अनुभव आला, त्याची एखाद्याला कल्पना करता येऊ शकेल, असे ते म्हणाले आणि हे दर्शन मिळाल्याने त्यांना अपार आध्यात्मिक आनंद मिळाला, असे त्यांनी सांगितले.

उडुपीला येणे हे आपल्यासाठी आणखी एका कारणासाठी खास असल्याचे सांगून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले की, उडुपी ही जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या शासन ‘मॉडेल’ ची कर्मभूमी आहे. त्यांनी आठवण करून दिली की, 1968 मध्ये उडुपीच्या लोकांनी जनसंघाचे व्ही.एस. आचार्य यांना नगर परिषदेवर निवडून दिले आणि त्यांच्या माध्यमातून त्यावेळी उडुपीमध्ये एका नवीन शासन मॉडेलचा पाया घातला गेला. पंतप्रधानांनी नमूद केले की, आज राष्ट्रीय स्तरावर दिसणारी स्वच्छता मोहीम पाच दशकांपूर्वी उडुपीने स्वीकारली होती. तसेच पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, आत्ता आपण पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे एक नवीन मॉडेल प्रदान करत असलो तरी, 1970 च्या दशकात उडुपीने असे कार्यक्रम सुरू केले होते. त्यांनी सांगितले केले की, आज या मोहिमा राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असून, त्या राष्ट्रीय प्राधान्याचा भाग बनल्या आहेत आणि या योजना देशाला पुढे नेत आहेत.
रामचरितमानसातील शब्दांचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले, "कलियुगात केवळ भगवंताच्या नावाच्या जपानेच मनुष्याला संसारिक अस्तित्वाच्या सागरातून मुक्ती मिळते". त्यांनी अधोरेखित केले की, समाजात मंत्रांचे आणि गीतेतील श्लोकांचे शतकानुशतके पठण होत आहे, परंतु ज्यावेळी एक लाख स्वर संयुक्तपणे हे श्लोक एकत्रितपणे पठण करतात, त्यावेळी एक अनोखा अनुभव निर्माण होतो. पंतप्रधानांनी पुढे असे नमूद केले की, ज्यावेळी इतके लोक गीतेसारख्या पवित्र ग्रंथाचे पठण करतात, त्या ग्रंथातील दिव्य शब्द एकाच ठिकाणी एकत्रितपणे प्रतिध्वनित होतात त्यावेळी एक विशेष ऊर्जा उदयास येते; या उर्जेमुळे मन आणि बुद्धीसाठी एक नवीन स्पंदन निर्माण करतात, एक नवीन शक्ती देतात. ही ऊर्जा अध्यात्माची शक्ती आहे आणि सामाजिक एकतेचीही शक्ती आहे. त्यांनी सांगितले की आज एक लाख स्वरांनी गीतेचे पठण करण्याचा प्रसंग हा एक विशाल ऊर्जा क्षेत्र अनुभवण्याची संधी बनला आहे आणि जगाला सामूहिक चेतनेच्या शक्तीचे प्रदर्शन करीत आहे.

आजच्या या दिवशी आपण परमपूज्य श्री श्री सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजींना विशेष वंदन करू इच्छितो. स्वामीजींनी लक्ष कंठगीतेची संकल्पना प्रत्यक्षामध्ये साकार केली आहे, असे नमूद करून पंतप्रधान म्हणाले, जगभरातील लोकांना गीता स्वहस्ते लिहिण्यास प्रेरित करून, कोटी गीता लेखन यज्ञ सुरू केला आहे. हा यज्ञ सनातन परंपरेचे एक जागतिक जनआंदोलन बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले की, भारतातील तरुण भगवद्गीतेच्या भावना आणि शिकवणींशी जोडले जात आहेत. गीता या विषयाबरोबर जोडले जाणे म्हणजेच त्या व्यक्तीचा एक चांगल्या प्रकारे विकास आहे. त्यांनी आठवण करून दिली की, भारतात शतकानुशतके वेद, उपनिषद आणि शास्त्रांचे ज्ञान पुढच्या पिढीला देण्याची परंपरा आहे आणि हा कार्यक्रम देखील पुढच्या पिढीला भगवद्गीतेशी जोडण्यासाठी एक अर्थपूर्ण प्रयत्न बनला आहे.
येथे येण्याच्या तीन दिवस आधीच आपण अयोध्येला देखील भेट दिली होती, असे सांगून 25 नोव्हेंबर रोजी विवाह पंचमी च्या पवित्र दिवशी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरावर ध्वज फडकवण्यात आला, असे पंतप्रधान म्हणाले. अयोध्येपासून ते उडुपीपर्यंत श्रीरामांच्या असंख्य भक्तांनी हा दैवी आणि भव्य सोहळा अनुभवला. राम मंदिर आंदोलनात उडुपीने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे, असे ते म्हणाले. अनेक दशकांपूर्वी परमपूज्य विश्वेश तीर्थ स्वामीजींनी या संपूर्ण आंदोलनाला दिशा दिली होती आणि ध्वजारोहण समारंभ त्या योगदानाचे फळ म्हणून साजरा होणारा उत्सव बनला आहे, असे त्यांनी सांगितले. उडुपी साठी राममंदिराच्या उभारणीला एक वेगळे महत्त्व आहे, या नवीन मंदिराचे भव्य प्रवेशद्वार जगद्गुरू मध्वाचार्य जी यांच्या नावे उभारले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्रभू श्रीरामाचे परम भक्त जगद्गुरु मध्वाचार्य जी यांनी एक श्लोक लिहिला होता ज्याचा अर्थ भगवान श्री राम सहा दैवी गुणांनी सुशोभित आहेत, ते सर्वोच्च भगवान आहेत आणि ते अफाट सामर्थ्य आणि धैर्याचे महासागर आहेत, असा होतो. त्यामुळेच राममंदिर संकुलात त्यांच्या नावे द्वार असणे ही कर्नाटकासाठी, उडुपीतील लोकांसाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
जगद्गुरु मध्वाचार्य जी हे भारताच्या द्वैत तत्त्वज्ञानाचे प्रणेते होते आणि वेदांताच्या ज्ञानाने प्रकाशमान होते असे सांगून पंतप्रधान म्हणाले की त्यांनी उडुपी मध्ये निर्माण केलेली अष्ट मठांची पद्धत ही संस्था बांधणीचे जिवंत उदाहरण असून ती नवनवीन परंपरा निर्माण करत आहे. येथे भगवान श्रीकृष्णाची भक्ती, वेदान्ताचे ज्ञान आणि हजारो लोकांना अन्नदान करण्याचा निर्धार आहे, एका अर्थाने हे स्थान ज्ञान, भक्ती आणि सेवा यांचा पवित्र संगम आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

जगद्गुरु मध्वाचार्य जी यांचा जन्म झाल्यानंतरच्या काळात भारतात अनेक अंतर्गत आणि बाह्य आव्हाने होती, अशा परिस्थितीत त्यांनी भक्तीचा मार्ग दाखवला एक असा मार्ग ज्याने समाजाच्या प्रत्येक स्तराला आणि विचारसरणीला एका सूत्राने जोडता येईल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे, कित्येक शकांनंतर देखील त्यांनी त्यांनी स्थापन केलेले मठ दररोज लाखो लोकांची सेवा करत आहेत, त्यांच्या प्रेरणेने द्वैत परंपरेत अनेक महान व्यक्ती उदयास आल्या ज्यांनी नेहमीच धर्म, सेवा आणि राष्ट्र उभारणीचे कार्य पुढे नेले. सार्वजनिक सेवेची ही शाश्वत परंपरा उडुपीचा सर्वात मोठा वारसा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
जगद्गुरु मध्वाचार्य जी यांच्या परंपरेने हरिदास परंपरेला जन्म दिला, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की पुरंदर दास आणि कनक दास यांच्या सारख्या महान संतांनी साध्या, सुरेल आणि सुलभ कन्नड भाषेत भक्तीमार्गाचा प्रसार केला.
पुरंदर दास यांच्या रचनांनी समाजातील प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श केला, त्या अगदी सर्वात गरीब घटकांपर्यंत पोहोचल्या, या रचनांनी त्यांना धर्म तसेच सनातन मूल्यांशी जोडले, या रचनांचा संदर्भ आजच्या पिढीसाठीही तितकाच लागू होतो ही बाब पंतप्रधानांनी नमूद केली. आजही युवा वर्ग जेव्हा समाज माध्यमांवर पुरंदर दास यांची चंद्रचूड शिव शंकर पार्वती ही रचना ऐकतात, तेव्हा ते एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात जातात असे ते म्हणाले. आजही उडुपीतील आपल्यासारख्या एखाद्या भक्ताला जेव्हा एका लहान झरोक्यातून भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होते, तेव्हा ती त्याच्यासाठी कनक दास यांच्या भक्तीसोबत जोडले जाण्याची एक संधीच ठरते असे पंतप्रधानांनी नमूद केले. आजच नाही तर यापूर्वीही आपल्याला कनक दास यांना वंदन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपण स्वतःला खूप भाग्यवान मानतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

भगवान श्रीकृष्णांची शिकवण प्रत्येक युगासाठी व्यवहार्य आहे आणि गीतेतील शब्द केवळ व्यक्तींनाच नव्हे, तर देशाच्या धोरणांसाठीही मार्गदर्शक आहेत असे ते म्हणाले. सर्वांच्या कल्याणासाठी आपण कसे कार्य करावे हे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगून ठेवले आहे याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. जगद्गुरू माधवाचार्यांनी देखील आयुष्यभर याच भावना जपल्या आणि भारताच्या एकतेला बळकटी दिली, असे त्यांनी नमूद केले.
सबका साथ, सबका विकास, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय या धोरणांमागे भगवान श्रीकृष्णांच्या श्लोकांची प्रेरणा आहे, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. भगवान श्रीकृष्णांनी गरिबांना मदत करण्याचा मंत्र दिला आहे आणि हीच प्रेरणा आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री आवास यांसारख्या योजनांचा आधार आहे असे ते म्हणाले. भगवान श्रीकृष्णांनी महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरणाचीही शिकवण दिली आहे, आणि याच शिकवणीतून देशाला नारी शक्ती वंदन अधिनियमासारखा ऐतिहासिक निर्णय घेण्याची प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले. भगवान श्रीकृष्णांनी सर्वांच्या कल्याणाचे तत्त्व मांडले आणि हेच तत्त्व व्हॅक्सीन मैत्री, सौर आघाडी आणि वसुधैव कुटुंबकम् यांसारख्या भारताच्या धोरणांचा आधार बनले असे ते म्हणाले.
भगवान श्रीकृष्णांनी युद्धभूमीवर गीतेचा संदेश दिला, शांतता आणि सत्य स्थापित करण्यासाठी अत्याचार करणाऱ्यांचा अंत करणेही आवश्यक आहे, हेच भगवद्गीता शिकवते ही बाब त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. हीच भावना राष्ट्राच्या सुरक्षा धोरणाचे मूळ आहे, असे त्यांनी सांगितले. भारत वसुधैव कुटुंबकम् बद्दल बोलतो आणि त्याचबरोबर धर्मो रक्षति रक्षितः हा मंत्रही आचरणात आणतो, असे त्यांनी नमूद केले. लाल किल्ल्यावरून श्रीकृष्णांच्या करुणेचा संदेश दिला होता आणि त्याच तटबंदीवरून मिशन सुदर्शन चक्राची घोषणाही केली होती, असे त्यांनी सांगितले. देशातील महत्त्वाची ठिकाणे, औद्योगिक आणि सार्वजनिक क्षेत्रे यांच्याभोवती शत्रूला भेदता येणार नाही अशी भिंत उभारणे हेच मिशन सुदर्शन चक्राचा अर्थ आहे, आणि जर शत्रू त्यासाठी धजावला तर भारताचे सुदर्शन चक्र त्यांना नेस्तनाबूत करेल, असे पंतप्रधान म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरच्या कारवाई मधून देशाने हा निर्धार बघितला आहे यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले की पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील लोकांसह अनेक देशवासीयांनी त्यांचे प्राण गमावले. ते म्हणाले की यापूर्वी जेव्हा असे दहशतवादी हल्ले झाले तेव्हा तत्कालीन सरकारे शांत बसत असत, मात्र हा नवा भारत आहे जो कोणाच्याही समोर झुकत नाही आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याच्या कर्तव्यापासून ढळत नाही. “शांतता कशी प्रस्थापित करावी आणि शांततेचे संरक्षण देखील कसे करावे हे भारत जाणतो,” पंतप्रधान म्हणाले.
भगवद्गीता आपल्याला आपली कर्तव्ये आणि जीवनाच्या बांधिलकीची जाणीव करून देते असे मत व्यक्त करत पंतप्रधानांनी त्यापासून प्रेरणा घेत प्रत्येकाला काही निर्धारांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.ते म्हणाले की ही आवाहने म्हणजे नऊ ठरावांसारखी आहेत आणि ती आपले वर्तमान आणि भविष्य अशा दोन्हीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ते पुढे म्हणाले की एकदा संत समुदायाने या आवाहनांना आशीर्वाद दिले की त्यांना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
पंतप्रधान म्हणाले की आपला पहिला निर्धार जल संवर्धन, पाण्याची बचत आणि नद्यांचे संरक्षण करण्याविषयी असला पाहिजे. “एक पेड माँ के नाम” या देशव्यापी अभियानाला मिळत असलेला भरघोस प्रतिसाद लक्षात आणून देत त्यांनी सांगितले की झाडे लावणे हा आपला दुसरा निर्धार असला पाहिजे आणि जर सर्व मठांची ताकद या अभियानाला मिळाली तर त्याचा परिणाम अधिकच व्यापक असेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की देशातील किमान एका गरीब व्यक्तीचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा आपला तिसरा निर्धार असायला हवा. आपला चौथा निर्धार म्हणजे स्वदेशीची संकल्पना स्वीकारणे यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले की, जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे. आज आपला देश आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या मंत्रासह आगेकूच करत असून आपली अर्थव्यवस्था, आपले उद्योग आणि आपले तंत्रज्ञान स्वबळावर स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत असे त्यांनी सांगितले. आणि म्हणूनच आपण सर्वांनी संपूर्ण शक्तीनिशी – ‘व्होकल फॉर लोकल’चा पुरस्कार करायला हवा हे त्यांनी अधोरेखित केले.

पाचव्या निर्धाराविषयी बोलताना मोदी यांनी नैसर्गिक शेतीला सर्वांनी चालना देण्याचा आग्रह व्यक्त केला. सहाव्या निर्धाराविषयी बोलताना त्यांनी सर्वांना निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे, आपल्या आहारात श्रीअन्नाचा समावेश करणे आणि आहारातील तेलाचे प्रमाण कमी करणे यांवर अधिक भर दिला. ते म्हणाले की योगाचा स्वीकार करणे आणि त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवणे हा आपला सातवा निर्धार असायला हवा. भारतातील प्राचीन ज्ञान हस्तलिखितांमध्ये दडलेले आहे याकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी ठळकपणे सांगितले की हस्तलिखितांचे जतन करणे हा आपला आठवा निर्धार असला पाहिजे. या ज्ञानाचे जतन करण्यासाठी भारत सरकार ज्ञान भारतम अभियानावर काम करत आहे हे नमूद करुन पंतप्रधान म्हणाले की हा अनमोल वारसा वाचवण्यासाठी लोकांचे सहकार्य उपयुक्त ठरेल
आपल्या वारशाशी संबंधित देशातील किमान 25 ठिकाणांना भेट देण्याचा नववा संकल्प करण्याचे आवाहन करून तीन ते चार दिवसांपूर्वी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे महाभारत अनुभव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले . भगवान श्रीकृष्णांचे जीवन तत्वज्ञान पाहण्यासाठी लोकांना या केंद्राला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. गुजरातमध्ये दरवर्षी भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या विवाहाला समर्पित माधवपूर मेळा आयोजित केला जातो,ज्यासाठी देशभरातून, विशेषतः ईशान्य भागातून मोठ्या संख्येने लोक येतात हे अधोरेखित करून पुढच्या वर्षी सर्वांनी या मेळ्याला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण जीवन आणि गीतेचा प्रत्येक अध्याय कर्म, कर्तव्य आणि कल्याणाचा संदेश देतो. भारतीयांसाठी 2047 चा काळ केवळ अमृत काळच नाही तर विकसित भारताच्या उभारणीसाठी कर्तव्यदक्ष काळ आहे असे त्यांनी अधोरेखित केले. मोदी म्हणाले की, प्रत्येक नागरिक, प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेची स्वतःची कर्तव्य आहेत . ही कर्तव्ये पार पाडण्यात कर्नाटकातील मेहनती लोकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की, प्रत्येक प्रयत्न राष्ट्रासाठी समर्पित असला पाहिजे आणि कर्तव्याच्या या भावनेचे पालन केल्यावरच विकसित कर्नाटक आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. उडुपीच्या भूमीतून निघणारी ऊर्जा विकसित भारताच्या संकल्पाला मार्गदर्शन करत राहो अशी इच्छा व्यक्त करून मोदींनी भाषणाचा समारोप केला. या पवित्र प्रसंगाशी संबंधित प्रत्येक सहभागीला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी या कार्यक्रमात उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी उडुपी येथील श्री कृष्ण मठाला भेट दिली आणि लक्ष कंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभागी झाले - विद्यार्थी, भिक्षू, विद्वान आणि विविध क्षेत्रातील नागरिकांसह 100,000 सहभागींचा हा भक्तीमय मेळावा होता ज्यात श्रीमद्भगवद्गीतेचे एकत्रितपणे पठण करण्यात आले.
पंतप्रधानांनी कृष्ण गर्भगृहासमोरील सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन केले आणि पवित्र कनकना किंडीसाठी कनक कवच (सोनेरी आवरण) समर्पित केले, ही एक पवित्र खिडकी आहे ज्यातून संत कनकदासाना भगवान कृष्णाचे दिव्य दर्शन झाले असे मानले जाते. उडुपी येथील श्री कृष्ण मठाची स्थापना 800 वर्षांपूर्वी वेदांताच्या द्वैत तत्वज्ञानाचे संस्थापक श्री माधवाचार्य यांनी केली होती.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कलियुग में केवल भगवद् नाम और लीला का कीर्तन ही परम साधन है।
— PMO India (@PMOIndia) November 28, 2025
उसके गायन कीर्तन से भवसागर से मुक्ति हो जाती है: PM @narendramodi pic.twitter.com/P0Wk11AZVk
The words of the Gita not only guide individuals but also shape the direction of the nation's policies: PM @narendramodi pic.twitter.com/FG3ZKkFOdl
— PMO India (@PMOIndia) November 28, 2025
The Bhagavad Gita teaches that upholding peace and truth may require confronting and ending the forces of injustice. This principle lies at the heart of the nation's security approach. pic.twitter.com/FuYHHC4Cyl
— PMO India (@PMOIndia) November 28, 2025
Let us take nine resolves... pic.twitter.com/v26kVZi00G
— PMO India (@PMOIndia) November 28, 2025


