आज कच्छ हे व्यापार आणि पर्यटनाचे एक मोठे केंद्र आहे, आगामी काळात कच्छची ही भूमिका आणखी महत्वपूर्ण ठरणार आहे: पंतप्रधान
सीफूडपासून ते पर्यटन आणि व्यापारापर्यंत, किनारी प्रदेशात भारत एक नवीन परिसंस्था निर्माण करत आहे: पंतप्रधान
आमचे धोरण दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे आहे: पंतप्रधान
ऑपरेशन सिंदूर हे मानवतेचे रक्षण आणि दहशतवादाचा अंत करण्याचे एक मिशन आहे: पंतप्रधान
भारताच्या रडारवर दहशतवादाचे मुख्यालय होते आणि आपण त्यांच्यावर अचूक हल्ला केला, यातून आपल्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचे आणि शिस्तीचे दर्शन घडते : पंतप्रधान
भारताची लढाई सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील भूज येथे 53,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध  विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण  केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी कच्छच्या लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि क्रांतिकारक आणि शहीदांना, विशेषतः महान स्वातंत्र्यसैनिक श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी कच्छचे सुपुत्र आणि कन्या यांच्या लवचिकतेची आणि योगदानाची दखल घेत त्यांना  अभिवादन केले.

मोदी यांनी आशापुरा मातेला वंदन केले आणि कच्छच्या पवित्र भूमीवरील तिच्या  दैवी अस्तित्वाचा  उल्लेख केला. त्यांनी या प्रदेशावर मातेच्या निरंतर कृपादृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि लोकांना अभिवादन केले.

कच्छशी असलेल्या आपल्या घनिष्ठ नात्याचे स्मरण करताना, मोदी यांनी या जिल्ह्यात अनेकदा दिलेल्या भेटींचा उल्लेख केला आणि या भूमीने त्यांच्या जीवनाला कसा आकार दिला यावर भर दिला. ते म्हणाले  की राहणीमानात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी, भूतकाळात अनेक आव्हाने होती. नर्मदेचे पाणी कच्छ प्रदेशात पोहोचले हे आपले सौभाग्य असल्याचे   त्यांनी नमूद केले.  मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी, ते अनेकदा कच्छला भेट देत असत आणि जिल्हा कार्यालयात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. कच्छमधील शेतकऱ्यांचा अतूट  दृढनिश्चय अधोरेखित करत मोदी यांनी नमूद केले कि त्यांचा उत्साह नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे. त्यांनी सांगितले की या प्रदेशातील अनेक वर्षांच्या त्यांच्या अनुभवाचे  विकासाच्या प्रयत्नांमध्ये मोठे योगदान आहे.

 

कच्छने उल्लेखनीय यश प्राप्त करण्यात आशेची ताकद  आणि अथक प्रयत्नांचे दर्शन घडवले आहे यावर भर देत पंतप्रधानांनी त्या विनाशकारी भूकंपाची आठवण करून दिली ज्यामुळे एकेकाळी अनेकांच्या मनात या प्रदेशाच्या भवितव्याबाबत  शंका निर्माण झाली होती. मात्र त्यांचा अढळ विश्वास होता की कच्छ राखेतून पुन्हा भरारी घेईल आणि इथल्या लोकांनी ते करून दाखवले.  "आज, कच्छ व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आले  आहे", असे पंतप्रधानांनी सांगितले. यापुढील  काळात या प्रदेशाची भूमिका आणखी विस्तारेल यावर त्यांनी भर दिला. कच्छचा जलद विकास पाहण्याचा आणि त्याच्या प्रगतीला पाठिंबा देतानाचा  आनंद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दौऱ्यात  पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासावर भर देणारे 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधानांनी नमूद केले की हे उपक्रम एक आघाडीची नील अर्थव्यवस्था आणि हरित ऊर्जेचे जागतिक केंद्र म्हणून भारताच्या उदयात महत्त्वपूर्ण योगदान देतील. या परिवर्तनकारी विकासासाठी त्यांनी कच्छच्या लोकांचे अभिनंदन केले.

"कच्छ हे जगातील  हरित ऊर्जेचे सर्वात मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे", असे अधोरेखित करत मोदी यांनी ग्रीन  हायड्रोजनच्या परिवर्तनीय क्षमतेवर भर देत हे  भविष्यातील इंधन आहे असे त्याचे वर्णन केले. ते म्हणाले की गाड्या , बसेस  आणि पथदिवे लवकरच ग्रीन हायड्रोजनवर चालवले जातील, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडेल. कांडला हे देशातील तीन चिन्हित ग्रीन हायड्रोजन हबपैकी एक आहे असे  मोदी यांनी नमूद केले. त्यांनी कच्छमध्ये नवीन ग्रीन हायड्रोजन संयंत्राची  पायाभरणी केल्याची  घोषणा केली आणि या सुविधेत वापरले जाणारे तंत्रज्ञान पूर्णपणे "मेड इन इंडिया" असल्याचे  अधोरेखित केले. तसेच . मोदी यांनी भारताच्या सौर क्रांतीमध्ये कच्छच्या मध्यवर्ती भूमिकेवर भर दिला आणि या प्रदेशात जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पांपैकी एक विकसित होत असल्याकडे लक्ष वेधले. खावडा कॉम्प्लेक्सच्या स्थापनेसह, कच्छने जागतिक ऊर्जा नकाशावर स्वतःचा ठसा उमटवला आहे असे  ते म्हणाले.

 

नागरिकांसाठी वीज खर्च कमी करून पुरेसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना, पंतप्रधानांनी पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या शुभारंभावर प्रकाश टाकला, ज्याचा गुजरातमधील लाखो कुटुंबांना आधीच फायदा झाला आहे. अनेक राष्ट्रांच्या विकासात सागरी समृद्धी हा एक महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी किनारी प्रदेशांचे आर्थिक महत्त्व अधोरेखित केले. प्राचीन बंदर शहरे धोलावीरा आणि लोथल ही भारताच्या समृद्ध वारशाची आणि ऐतिहासिक व्यापार आणि विकासातील त्यांच्या भूमिकेची प्रमुख उदाहरणे असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, "या वारशाने प्रेरित होऊन सरकार बंदरांभोवती शहरांचा विस्तार करून बंदर-केंद्रित विकासासाठी आपले दृष्टिकोन पुढे नेत आहे".

 

त्यांनी पुढे सांगितले की, भारत समुद्री खाद्य, पर्यटन आणि व्यापार यांचा समावेश असलेल्या नवीन किनारी परिसंस्थेला सक्रियपणे चालना देत आहे. बंदरांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली जात आहे, ज्यामुळे उल्लेखनीय परिणाम मिळत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पहिल्यांदाच, प्रमुख बंदरांनी एकत्रितपणे एका वर्षात विक्रमी 15 कोटी टन मालवाहतूक केली आहे, ज्यामध्ये कांडला बंदर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांनी नमूद केले की भारतातील जवळजवळ एक तृतीयांश सागरी व्यापार कच्छच्या बंदरांद्वारे व्यवस्थापित केला जातो. पायाभूत सुविधांचे महत्त्व ओळखून कांडला आणि मुंद्रा बंदरांवर क्षमता आणि संचारसंपर्क सतत वाढवला जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

या प्रसंगी, नौवहनाशी संबंधित अनेक सुविधांचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामध्ये एक नवीन जेट्टी आणि कामकाज सुलभ करण्यासाठी विस्तारित माल साठवणूक सुविधा यांचा समावेश आहे. सागरी क्षेत्रावर सरकारचे लक्ष केंद्रित करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्याच्या विकासासाठी विशेष निधी तयार करण्याची घोषणा केली. त्यांनी जहाजबांधणीचे महत्त्व अधोरेखित केले, भारत केवळ देशांतर्गत गरजांसाठीच नव्हे तर जागतिक मागणीसाठी देखील मोठ्या जहाजांची निर्मिती करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमांमुळे सागरी क्षेत्रात देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले.

कच्छच्या वारशाबद्दल सखोल आदर व्यक्त करत मोदी यांनी नमूद केले की हा वारसा आता या प्रदेशाच्या विकासामागील एक प्रेरक शक्ती बनला आहे. त्यांनी गेल्या दोन दशकांत भूजमधील कापड, अन्न प्रक्रिया, मातीकाम आणि मीठ उत्पादन यासह विविध उद्योगांमध्ये झालेल्या उल्लेखनीय वाढीवर प्रकाश टाकला. कच्छचे भरतकाम, ब्लॉक प्रिंटिंग, बांधणी कापड आणि चामड्याच्या वस्तू यासारख्या कच्छच्या पारंपरिक हस्तकलांना व्यापक मान्यता मिळाल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले आणि भुजोडी गावच्या हातमाग कलात्मकतेचे जिवंत संग्रहालय म्हणून कौतुक केले. इथल्या अजरख प्रिंटिंगच्या अद्वितीय परंपरेला आता भौगोलिक संकेत (जी आय) टॅग मिळाला आहे, ज्यामुळे कच्छमध्ये त्याचे मूळ अधिकृतपणे स्थापित झाले आहे.

त्यांनी या मान्यतेचे महत्त्व अधोरेखित केले, विशेषतः आदिवासी कुटुंबे आणि कारागिरांसाठी, कारण यामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख आणि कारागिरी मजबूत होते. याव्यतिरिक्त, मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदींवर प्रकाश टाकला, ज्या चामडे आणि कापड उद्योगांना पाठिंबा देतात, या क्षेत्रांना चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला पुन्हा अधोरेखित करतात.

 

कच्छमधील कष्टाळू शेतकऱ्यांना अभिवादन करताना, आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांच्या चिकाटीची कदर करताना, पंतप्रधानांनी गुजरातमधील भूजल पातळीत प्रचंड घट झाली होती आणि त्यामुळे गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या काळाची आठवण करून दिली. तथापि, नर्मदेच्या आशीर्वादाने आणि सरकारच्या समर्पित प्रयत्नांमुळे परिस्थिती बदलली आहे. कच्छचे नशीब पुन्हा घडवण्यातील केवडिया ते मोडकुबापर्यंत पसरलेल्या कालव्याची महत्त्वाची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली. आज कच्छमधील आंबा, खजूर, डाळिंब, जिरे आणि ड्रॅगन फ्रूट यांसारखी कृषी उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचत आहेत, असे त्यांनी नमूद केले. या प्रदेशाच्या भूतकाळाचा विचार करताना, पंतप्रधानांनी सांगितले की मर्यादित संधींमुळे कच्छला एकेकाळी सक्तीने स्थलांतर करावे लागत असे. तथापि, झालेल्या उल्लेखनीय प्रगतीमुळे स्थानिक तरुणांना आता कच्छमध्येच रोजगार मिळत आहेत, जे या प्रदेशाच्या वाढत्या समृद्धीचे प्रतीक आहे.

भारतातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्यांच्या सरकारचे प्रमुख प्राधान्य आहे, असे मोदी यांनी पुन्हा एकदा सांगितले. पर्यटन हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे सक्षम क्षेत्र आहे तसेच समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यासह कच्छ या क्षेत्रात विस्तारासाठी योग्य स्थितीत आहे यावर त्यांनी भर दिला. सतत नवीन उंची गाठणाऱ्या कच्छच्या रण उत्सवाच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल समाधान व्यक्त करताना मोदी यांनी स्मृती वन स्मारकावर प्रकाश टाकला आणि युनेस्कोने त्याला जगातील सर्वात सुंदर संग्रहालयांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे, हे नमूद केले.

आगामी काळात कच्छच्या पर्यटन उद्योगात आणखी वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि धोर्डो गावाने जागतिक स्तरावर सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली आहे हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याव्यतिरिक्त, मांडवीचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण म्हणून उदयास येत आहे, पर्यटनाची क्षमता आणखी वाढवण्यासाठी रण उत्सवादरम्यान मांडवीमध्ये समुद्रकिनारा महोत्सव आयोजित करण्याचे आवाहन मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना केले. अहमदाबाद आणि भूज दरम्यानची नमो भारत रॅपिड रेल या प्रदेशातील पर्यटनाला आणखी चालना देईल असेही त्यांनी नमूद केले.

 

26 मे ही तारीख आपल्यासाठी विशेष महत्त्वाची आहे, कारण 2014 मध्ये याच दिवशी आपण प्रथमच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 2014 मध्ये भारत हा जगातील 11 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता, परंतु आज तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पर्यटन हे लोकांना जोडणारे माध्यम आहे यावर भारताचा दृढविश्वास असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. या विरुद्ध पाकिस्तानसारखे देश पर्यटनाऐवजी दहशतवादाला प्रोत्साहन देतात असे त्यांनी सांगितले. “दहशतवाद हा संपूर्ण जागासाठी गंभीर धोका आहे आणि भारताची याविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करताना मोदी यांनी सांगितले की हे मिशन भारताची दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका अधोरेखित करते. भारताच्या नागरिकांना हानी पोहचवणाऱ्या कोणत्याही प्रयत्नाला भारत तितक्याच कठोर भाषेत प्रत्युत्तर देईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले केले. भारताला आव्हान देण्याचे धाडस करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला

“ऑपरेशन सिंदूर हे मानवतेचे रक्षण करण्याचे आणि दहशतवाद नष्ट करण्याचे मिशन आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. 22 एप्रिल रोजी बिहारमधील एका सभेतील आपल्या शब्दांचे त्यांनी स्मरण केले. या सभेत त्यांनी दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याची शपथ घेतली होती. पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसांनंतरही पाकिस्तानने दहशतवादी संघटनांविरुद्ध कोणतीही कारवाई सुरू केली नाही त्यामुळे भारतीय सशस्त्र दलांना प्रत्युत्तर देण्याची पूर्ण मोकळीक देण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले. भारताने दहशतवादी तळांना अचूकपणे लक्ष्य केले, त्यामुळे भारताच्या सशस्त्र दलांची क्षमता आणि शिस्त दिसून आली, असे पंतप्रधान म्हणाले. आपण दहशतवादी अड्डे अचूकपणे नष्ट करू शकतो, हे भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारताच्या निर्णायक कारवाईनंतर पाकिस्तानला वाटलेल्या भयाची पंतप्रधानांनी नोंद केली. पाकिस्तानने भारतीय नागरिकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने दुप्पट ताकदीने त्याला प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या लष्करी स्थानांवर असामान्य अचूकतेने हल्ला केला, असेही त्यांनी सांगितले. "भारताने पाकिस्तानचे हवाई तळ आणि लष्करी प्रतिष्ठानांचा नाश केल्याचे पाहून जग थक्क झाले", असे ते म्हणाले. अतुलनीय कार्यनिपुणता, शौर्य आणि अचूकता या गुणांबद्दल पंतप्रधानांनी सशस्त्र दलांचे कौतुक केले.

 

1971 च्या ऐतिहासिक युद्धात पाकिस्तानी सैन्याने भूज हवाई तळावर हल्ला केला होता, त्या ऐतिहासिक युद्धाच्या स्मृती जागवताना पंतप्रधानांनी भूज येथील महिलांच्या असाधारण शौर्याची प्रशंसा केली. या महिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीत हवाई तळ पुन्हा उभे करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आकाशातून पाकिस्तानचा सततचा बॉम्ब हल्ला सुरू असताना देखील, भूजच्या महिलांनी केवळ 72 तासांच्या आत हवाई तळ पुन्हा कसा बांधला, आणि त्यामुळे हे विमानतळ कसे जलद कार्यशील झाले याचे वर्णन पंतप्रधानांनी केले. आपल्याला या धाडसी महिलांना भेटण्याची संधी मिळाली होती असे सांगत पंतप्रधानांनी या महिलांच्या राष्ट्र प्रेमाची आणि योगदानाची प्रशंसा केली.

 

“भारताची लढाई सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाच्या आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध आहे”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. भारताचे शत्रुत्व कोणत्याही देशातील लोकांशी नाही तर दहशतवादाला पोसणाऱ्या शक्तींशी आहे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. कच्छमधील पाकिस्तानच्या नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधानांनी त्यांना त्यांच्या परिस्थितीची वास्तविकता ओळखण्याचे आवाहन केले. पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर दहशतवादाला सक्रियपणे पाठिंबा देत असून त्याचा वापर महसूल मिळविण्याचे साधन म्हणून करत आहे, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला. हा मार्ग खरोखर आपल्या हिताचा आहे का यावर विचार करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी पाकिस्तानी जनतेला केले. सत्ता कायम राखण्यासाठी पाकिस्तानी सरकार नागरिकांचे जीव धोक्यात घालत आहे आणि त्यांच्या मुलांचे भविष्य अंधारात ढकलत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पाकिस्तानला जर दहशतवादाच्या संकटातून मुक्त करायचे असेल तर तेथील लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि दहशतवादाच्या निर्मूलनात योगदान दिले पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.

भारताने निवडलेल्या स्पष्ट दिशेवर आणि विकास, शांतता आणि समृद्धीच्या मार्गावर भर देत मोदींनी विश्वास व्यक्त केला की कच्छचा आत्मा भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासात प्रेरणा म्हणून काम करेल. लवकरच कच्छी नववर्षाच्या निमित्ताने येणाऱ्या आषाढी बीजच्या पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी पुनश्च कच्छच्या लोकांचे त्यांच्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल आणि विकासात्मक कामगिरीबद्दल अभिनंदन करून आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India’s Northeast: The new frontier in critical mineral security

Media Coverage

India’s Northeast: The new frontier in critical mineral security
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जुलै 2025
July 19, 2025

Appreciation by Citizens for the Progressive Reforms Introduced under the Leadership of PM Modi