आज कच्छ हे व्यापार आणि पर्यटनाचे एक मोठे केंद्र आहे, आगामी काळात कच्छची ही भूमिका आणखी महत्वपूर्ण ठरणार आहे: पंतप्रधान
सीफूडपासून ते पर्यटन आणि व्यापारापर्यंत, किनारी प्रदेशात भारत एक नवीन परिसंस्था निर्माण करत आहे: पंतप्रधान
आमचे धोरण दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे आहे: पंतप्रधान
ऑपरेशन सिंदूर हे मानवतेचे रक्षण आणि दहशतवादाचा अंत करण्याचे एक मिशन आहे: पंतप्रधान
भारताच्या रडारवर दहशतवादाचे मुख्यालय होते आणि आपण त्यांच्यावर अचूक हल्ला केला, यातून आपल्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचे आणि शिस्तीचे दर्शन घडते : पंतप्रधान
भारताची लढाई सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात आहे : पंतप्रधान

भारत माता की जय।

आपला तिरंगा झेंडा सदैव फडकत राहो,

भारत माता की जय।

भारत माता की जय।

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, मंत्रिमंडळातील इतर सर्व सदस्य, खासदार, आमदार, इतर सर्व वरिष्ठ मान्यवर आणि कच्छमधील माझ्या  प्रिय बंधू आणि भगिनींनो!

मुज्झा शरद जा  संतरी एड़ा कच्छी माडू की आयों ? आऊँ कच्छजा सपूत एड़ा क्रांति गुरू श्यामजी कृष्ण वर्मा के घणे-घणे नमन करियां तो। अईं मड़े कच्छी भा भेणु के मुज्झा झझा झझा राम राम।

मित्रहो,

कच्छच्या या पवित्र भूमीवर आशापुरा  मातेचे आशीर्वाद आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आशापुरा मातेने नेहमीच या  भूमीवर आपली कृपादृष्टी राखली आहे. मी आज कच्छच्या भूमीवरून  आशापुरा  मातेला श्रद्धापूर्वक वंदन करतो आणि सर्व जनतेला प्रणाम करतो.

मित्रहो,

माझे आणि कच्छचे नाते खूप जुने आहे, तुम्हा लोकांचे प्रेम देखील इतके आहे की मी स्वतःला कच्छला येण्यापासून कधी रोखू शकत नाही. आणि जेव्हा मी राजकारणात नव्हतो आणि सत्तेशी माझा काहीही संबंध नव्हता, तेव्हाही कच्छला नियमितपणे माझे येणे-जाणे व्हायचे. इथल्या कानाकोपऱ्यात भेट देण्याची संधी मला मिळाली आहे. कच्छचे लोक, कच्छमधील लोकांचा आत्मविश्वास, कमतरतेच्या परिस्थितीतही आत्मविश्वासाने भरलेले लोक, या सर्वांनी नेहमीच माझ्या जीवनाला दिशा दिली आहे. जे जुन्या पिढीतील लोक आहेत , त्यांना माहित आहे, सध्याच्या पिढीला कदाचित माहित नसेल, आज तर इथले जीवन अतिशय सुलभ झाले आहे, मात्र त्याकाळी परिस्थिती काही वेगळी होती. आणि जेव्हा मी  मुख्यमंत्री म्हणून प्रथमच कच्छला भेट दिली, मला आठवतंय जेव्हा प्रथमच नर्मदेचे पाणी कच्छच्या भूमीवर आले , तो दिवस कच्छसाठी जणू दिवाळी  होती, आणि अशी दिवाळी यापूर्वी कधीही कच्छने पाहिली नसेल, जी त्या दिवशी आपण पाहिली होती. कच्छ अनेक शतकांपासून तहानलेला होता. माता नर्मदेने आपल्यावर कृपा केली आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की  या कोरड्या भूभागावर  पाणी पोहचवण्याच्या कामात निमित्त बनण्याची संधी तुम्ही सर्वांनी मला दिली .मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री कच्छला किती वेळा भेट देतात याची नोंद  लोक ठेवत असत. काही लोक तर म्हणायचे की मोदीजींनी शतक ठोकले आहे. अनेक गावांना भेटी देणे , माझ्या कार्यकर्त्यांच्या  घरी जाणे, लोकांना भेटणे, माझ्या कार्यालयात जाऊन बसने , हा माझ्या दैनंदिन कार्यक्रमाचा  एक भाग होता.

मी पाहिले आहे की कच्छमध्ये पाणी नव्हते, मात्र कच्छच्या शेतकऱ्यांचे डोळे पाणीदार होते, त्यांचा उत्साह नेहमीच पाहण्यासारखा असायचा . गेली अनेक वर्षे मी कच्छमध्ये जे काही अनुभवले आणि मला तिथे विकासाच्या भरपूर संधी दिसायच्या , कच्छ असे असूच  शकत नाही. हजारो वर्षांपूर्वी ज्या भूमीवर धोलावीरा होते , तिथल्या भूमीत नक्कीच कुठली तरी  शक्ती असली पाहिजे, आपण त्याची पूजा केली पाहिजे.

 

आणि मित्रहो,

कच्छने दाखवून दिले आहे की आशा आणि निरंतर  परिश्रमाने परिस्थिती बदलता येते, संकटाचे  संधीत रूपांतर करता येते आणि इच्छित परिणाम साध्य करता येऊ शकतो. जेव्हा येथे भूकंप झाला होता, तेव्हा जगाला वाटले होते की आता सर्व काही संपले आहे आणि आता काहीही होऊ शकत नाही. आणि कच्छ स्वतः भूकंपात मृत्यूच्या छायेत होते. मात्र मित्रांनो , मी कधी माझा विश्वास डगमगू दिला नाही , माझा विश्वास कच्छी खमीर वर होता आणि म्हणूनच मी म्हणायचो की आपल्याला मुलांना कच्छचा 'क' आणि खमीरचा 'ख' शिकवावा लागेल. आणि मला विश्वास होता की कच्छ या संकटावर मात करेल, भूकंपावरही मात करून  माझा कच्छीमाडू पुन्हा उभा राहील. आणि तुम्ही अगदी तसेच  केलंत. आज कच्छ हे व्यापार- उद्योग , पर्यटनाचे एक मोठे केंद्र आहे. आगामी काळात कच्छची ही भूमिका आणखी मोठी होणार आहे. म्हणूनच  जेव्हा जेव्हा मी कच्छच्या विकासाला गती देण्यासाठी येतो, तेव्हा मला वाटते की मी आणखी काही करेन, मी काहीतरी नवीन करेन, आणखी खूप काही करेन, मन थांबायचे नाव घेत नाही. आज येथे विकासाशी संबंधित पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांची  पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले आहे. एकेकाळी संपूर्ण गुजरातमध्ये पन्नास हजार कोटी रुपयांच्या योजनेबद्दल ऐकायला मिळत नसे , आज एका जिल्ह्यात पन्नास हजार कोटी रुपयांची कामे सुरु आहेत.

मित्रहो,

हे प्रकल्प भारताला जगातील एक खूप मोठी नील अर्थव्यवस्था आणि हरित ऊर्जेचे केंद्र बनविण्यास मदत करतील. मी तुम्हा सर्वाचे, माझ्या प्रिय कच्छीवासियांचे या सर्व विकासकामांसाठी खूप-खूप अभिनंदन करतो. एकदा तिरंगा फडकावून, जरा आपला आनंद देखील दाखवा, उत्साह दाखवा.

मित्रहो,

आपला कच्छ  हरित ऊर्जेचे जगातील सर्वात मोठे केंद्र बनत आहे. तुम्ही ऐकता  आहात ? मी काय म्हणालो? जगातील सर्वात मोठे केंद्र , होऊन जाऊदे एकदा. ग्रीन हायड्रोजन हे एक नवीन प्रकारचे इंधन आहे. आगामी काळात, गाड्या , बसेस , रस्त्यांवरील दिवे हे ग्रीन हायड्रोजनवर चालणार आहेत. कांडला हे देशातील तीन ग्रीन हायड्रोजन हबपैकी एक आहे. आजही येथे ग्रीन हायड्रोजन कारखान्याची पायाभरणी करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्हाला अभिमान वाटेल की या कारखान्यात वापरले जाणारे तंत्रज्ञान देखील मेड  इन इंडिया-  भारतात तयार झालेले आहे. आपला कच्छ भारताच्या सौर क्रांतीच्या केंद्रस्थानी देखील आहे. जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पांपैकी एक येथे, माझ्या कच्छमध्ये तयार होत आहे. एक काळ असा होता जेव्हा आपण कच्छचे वर्णन करायचो , तेव्हा म्हणायचो की इथे आपल्याकडे काय आहे,वाळवंट आहे, इथे काय होऊ शकते आणि त्यावेळी मी म्हणायचो , हे वाळवंट नाही, हे माझ्या गुजरातचे तोरण  आहे, आणि तेच वाळवंट, जे आपल्याला धुळीच्या वादळांनी आणि ओसाड जमिनीने वेढले होते, तेच वाळवंट आता केवळ आपल्यालाच नाही तर संपूर्ण भारताला ऊर्जावान बनवणार आहे.  खावडा संकुलामुळे, कच्छने संपूर्ण जगाच्या ऊर्जा नकाशात आपले स्थान निर्माण केले आहे.

मित्रहो,

आमच्या सरकारचा प्रयत्न आहे की तुम्हाला पुरेशी वीज देखील मिळावी आणि तुमचे वीज बिल देखील शून्य व्हावे. आणि म्हणूनच आम्ही पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. गुजरातमधील लाखो कुटुंबे या योजनेत सहभागी  झाली आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

जगातील ज्या ज्या देशांनी समृद्धी मिळवली आहे, तिथे समुद्र हे  समृद्धीचे एक प्रमुख कारण राहिले आहे. इथेही धोलावीराचे उदाहरण आपल्यासमोर आहे,लोथल सारखी प्राचीन बंदर शहरे येथे अस्तित्वात होती, जी भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या समृद्धीची केंद्रे होती.

बंदर-प्रणित  विकासाचे आमचे स्वप्न या महान वारशाने प्रेरित आहे. भारत बंदरांच्या आसपास शहरे विकसित करत आहे. सी-फूड पासून ते पर्यटन आणि व्यापारापर्यंत, किनारी प्रदेशात देश एक नवीन परिसंस्था निर्माण करत आहे. बंदरांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी देश मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. आणि याचे परिणाम देखील अद्भुत आहेत.

देशाातील काही मोठ्या बंदरांनी पहिल्यांदाच एका वर्षात विक्रमी 15 कोटी टन कार्गोंची ने-आण केली आहे. यामध्ये आपल्या  कांडला इथल्या दीनदयाळ बंदराचाही समावेश आहे. देशाच्या एकूण सागरी व्यापारी उलाढालीमध्ये जवळपास एक तृतियांश हिस्सा , एकट्या आपल्या कच्छच्या बंदरांतून ने-आण केला जातो. म्हणूनच कांडला आणि मुंद्रा बंदरांच्या क्षमतेमध्ये आणि त्यांच्या संपर्क सुविधेमध्ये सातत्याने वाढ-सुधारणा केली जात आहे. आजही इथल्या नौवहना संबंधित अनेक नवीन सुविधांचे लोकार्पण करण्यात आले आहे. इथे एक नवीन जेटी बनविण्यात आली आहे. इथे जास्तीत जास्त सामान साठवून ठेवता यावे, यासाठी कार्गो स्टोअरेजची सुविधा बनविण्यात आली आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये आम्ही नौवहन  क्षेत्रासाठी एका विशेष निधीची घोषणा केली आहे. अंदाजपत्रकामध्ये जहाज बांधणीवरही भर देण्यात आला आहे. आता आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जगाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारतामध्ये मोठ्या जहाजांची बांधणीचे काम सुरू करीत आहोत. एक काळ असा होता की, आपले मांडवी तर या कामासाठीच खूप प्रसिद्ध होते. मोठे-मोठाली जहाजे मांडवीमध्ये लोक बनवत होते. आजही अशीच क्षमता मांडवीमध्ये दिसून येत आहे. आता आपण आधुनिक जहाज तयार करून जगापुढे नेण्याची इच्छा बाळगून आहोत. मोठ्या जहाजाची निर्मिती करून त्याची निर्यात करण्याची मनीषा आहे. आणि यामुळेच आपल्या इथल्या हजारो नवयुवकांना रोजगार मिळू शकणार आहे. जहाज बांधणी बरोबरच आपल्याकडे अलंगमध्ये जहाज तोडणी यार्ड आहे, तिथेही रोजगार मिळतो. आता आपण पूर्ण शक्तीनिशी जहाज बांधणी क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे.

मित्रांनो,

आपल्या कच्छने नेहमीच आपल्या परंपरांचा आदर केला आहे. आता ही परंपराही कच्छच्या विकासाची प्रेरणा बनत आहे. गेल्या दोन-अडीच दशकांमध्ये भूजमध्ये वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, सिरॅमिक आणि मीठ यांच्याशी संबंधित उद्योग-व्यवसायांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. कच्छी भरतकाम, ब्लॉक प्रिटिंग, बांधणी कपडे आणि चामड्याच्या- कातडी  वस्तू यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. आणि आपल्या  भुजोडी सारखा तर इतर कुठेही हस्तकला कारखानाच नाही. या भुजोडीमध्ये अजरक छपाईची परंपरा जपली जाते,  कच्छचे ते वेगळे वैशिष्ट्य आहे. आणि आता तर आपल्या कच्छच्या सर्व कलांना जी-आय टॅग म्हणजे भोगोलिक ओळख म्हणून चिह्नीत केले आहे. ही आता कच्छची नवीन ओळख तयार झाली आहे. संपूर्ण जगामध्ये कच्छची ओळख पोहोचली आहे. याचा अर्थ आता कच्छच्या कलेवर जगातल्या लोकांची पसंतीची मोहर उमटली आहे. या  कलेचे मूळ स्‍थान कच्छ आहे, हे सर्वांना समजले आहे. आपल्या आदिवासी परिवारांसाठी आणि हस्तकला कारागिरांच्या दृष्टीने त्यांना अशी ओळख मिळणे, खूप मोठी गोष्ट आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये केंद्र सरकारने चर्मोद्योग आणि वस्त्रोद्योगासाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

 

मित्रांनो,

कच्छच्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना ते करीत असलेल्या परिश्रमासाठी मी  वंदन करतो. तुम्ही मंडळींनी अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्येही हार पत्करली नाही. एक काळ असा होता की, ज्यावेळी गुजरातमध्ये जमिनीखाली शेकडो फूट खोल गेल्यानंतर पाणी लागत होते. परंतु नर्मदामातेच्या कृपेमुळे आणि सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे आज स्थिती पूर्णपणे बदलली आहे. केवडियापासून ते कच्छमधल्या मोडकुबापर्यंत जो कालवा बनविण्यात आला आहे, त्यामुळे कच्छचे नशीब पालटले आहे. आज कच्छचे आंबे, खजूर, डाळींब, जीरे आणि ड्रॅगन फ्रूट ही पिके तर कमाल करीत आहेत. अशी इथली अनेक पिके आता जगभरातील बाजारपेठेपर्यंत पोहोचत आहेत. एक काळा असा होता की, कच्छच्या लोकांना नाइलाजाने इथून पलायन करावे लागत होते. इथल्या लोकसंख्येचा आलेख उणे दिशेने प्रवास करीत होता. लोकसंख्या कमी होत होती. आज मात्र कच्छच्या लोकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळत आहे. इतकेच नाही तर, मित्रांनो, कच्छच्या बाहेरच्या लोकांनाही आता कच्छची स्थिती  आशादायक वाटते.

मित्रांनो,

देशातील नवयुवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा, यासाठी भाजपा सरकार प्राधान्य देत आहे. पर्यटन एक असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये खूप मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. कच्छला  इतिहासही आहे,इथली संस्कृती आहे आणि निसर्गही आहे. मला आनंद होतो की, कच्छचा रणोत्सव  दिवसेंदिवस खूप लोकप्रिय होत असून नवनवीन विक्रम करीत आहे.  हे जे स्मृतिवन आपल्या भूजमध्ये बनविण्यात आले आहे, त्याला युनेस्कोने जगातील सर्वात देखणे वस्तुसंग्रहालय मानले आहे. आगामी काळामध्ये इथल्या पर्यटन क्षेत्राचा आणखी विस्तार होईल. धोरडो गाव, जगातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांपैकी एक आहे. धोरडोचे गावकरी आज इथे आले आहेत ना? जरा आपल्या हातातला तिरंगा फडकावून कुठे आहात ते दाखवा! मांडवीचा समुद्र किनाराही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केद्र बनत आहे. आणि मी तर भूपेंद्र भाईना विनंती करतो की, कच्छचे सगळे नेता आज इथं आले आहेत, त्यांनाही मी सांगत आहे.  ज्यावेळी आपला रणउत्सव सुरू असतो, त्यावेळीच आपण कच्छच्या सागरी किना-यावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले तर चांगले होईल. यासाठी तुमच्या हाती अजून अवधीही आहे. अलिकडच्या काळामध्ये सागरी किनारा क्रीडा प्रकारांची लोकप्रियता खूप वाढली आहे. अलिकडेच दीवमध्ये अशी राष्ट्रीय स्पर्धा झाली. त्यावेळी हजारो मुले खेळण्यासाठी आले होते. सागरी किना-यावरील वाळूमध्ये हे क्रीडा प्रकार खेळले जातात. मला असे वाटते की, तुम्ही ज्यावेळी नियमित रणउत्सवाचे आयोजन करता, त्याचवेळी मांडवीच्या सागरी किना-यावर देशभरातील लोक आले आणि खेळले तर सागरी किनारा क्रीडा उत्सव साजरा केला जावू शकतो. याचा अर्थ एक प्रकारे कच्छ पर्यटनाला नवीन उंची प्राप्त करता येईल. यासाठी तुम्हाला जी कोणती मदत लागेल, ती सर्व करण्यासाठी मी नेहमीच उपस्थित असणार आहे.

मित्रांनो,

अहमदाबाद आणि भूज यांच्या दरम्यान नमो भारत वेगवान रेल्वे सुरू होत आहे, त्यामुळेही इथल्या पर्यटनाला चांगली बळकटी येण्यासाठी मदत मिळत आहे.

मित्रांनो,

आज 26 मे आहे. मग असे एकदम शांत कसे काय आहात? तुम्ही सर्व गुजरातच्या बंधू-भगिनींनी मला अगदी वाजत-गाजत गुजरातमधून निरोप देवून दिल्लीला पाठवले होते. आणि 26 मे, 2014 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी आणि जवळपास याच वेळी मी देशाचा पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. देशाचा प्रधान सेवक म्हणून मी शपथ घेतली होती. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने 26-05-2014 रोजी गुजरातच्या सेवेतून आणखी पुढे जावून मी राष्ट्राच्या सेवेसाठी 11 वर्षाचा प्रवास केला. योगायोग असा आहे की,  26 मे रोजी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारून 11 वर्ष झाली आहेत आणि ज्यादिवशी मी प्रधान सेवकाची शपथ घेतली होती, त्यावेळी जगामध्ये देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती. आणि आज 11 वर्षांनंतर देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

मित्रांनो,

भारत  पर्यटनावर विश्वास करतो, पर्यटनामुळे लोकांशी जोडता येते, परंतु पाकिस्तानसारखा देशही आहे. हा देश टेररीझम म्हणजेच दहशतवादालाच टुरिझम मानतो. आणि ही गोष्ट संपूर्ण जगासाठी खूप धोकादायक आहे. आपल्या गुजरातच्या कच्छच्या लोकांना माहिती असेल की, आधी  म्हणजे 20-30 वर्षांपूर्वी, गांधीनगर येथून कोणीही मंत्री, मुख्यमंत्री कच्छला येत होते,  त्यावेळी त्यांच्या भाषणाला प्रारंभ पाकिस्तानापासून होत असे.  आणि त्यांचे भाषण पाकिस्तान या मुद्यावरच संपूर्ण होत असे. आणि हे मंत्री कच्छच्या लोकांना पुन्हा -पुन्हा आठवण करून देत होते- पाकिस्तान -पाकिस्तान -पाकिस्तान! तुम्ही पाहिलेच असेल की, 2001 मध्ये मी निश्चय केला की, अशा गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळे मी त्या विषयाचा साधा उल्लेखही आपल्या भाषणात कधीच केला नाही. मी फक्त कच्छची ताकत, इथल्या लोकांमध्ये असलेली अमर्याद क्षमता यांचा उल्लेख  करतो. या प्रचंड ताकदीचा सर्वांना विसर पडला होता, त्याचे स्मरण मी करून दिले. आणि विशेष म्हणजे मला कच्छच्या लोकांनी पूर्ण सामर्थ्याने सहकार्य केले. मित्रांनो,  पाकिस्तानला ईर्षा वाटावी,  असे आपले हे कच्छ आता बनले आहे.

 

मित्रांनो,

दहशतवादाविरुद्ध आमचे धोरण शून्य सहनशीलतेचे (दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याचे) आहे. ऑपरेशन सिंदूरने हे धोरण अधिक स्पष्ट केले आहे. जो कोणी भारतीयांचे रक्त सांडण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. भारताकडे वाकड्या नजरेने  पाहणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.

मित्रांनो,

ऑपरेशन सिंदूर हे मानवतेचे रक्षण करणे आणि दहशतवाद संपवण्याचे ध्येय आहे. 22 मे नंतर मी कधीही काहीही लपवले नाही. मी बिहारमधील एका जाहीर सभेत अभिमानाने घोषणा केली होती की मी दहशतवादाचे अड्डे नष्ट करेन. आम्ही 15 दिवस वाट पाहिली की पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध काही कारवाई करेल….पण कदाचित दहशतवाद हा त्यांचा उपजीविकेचा मार्ग आहे. जेव्हा त्यांनी काहीही केले नाही, तेव्हा मी देशाच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. भारताचे लक्ष्य दहशतवाद्यांचे मुख्यालय होते….शेकडो किलोमीटर आत घुसून…. आजूबाजूला असलेल्या कोणाचेही कोणतेही नुकसान न करता, थेट लक्ष्य भेदून ते परतले…अगदी अचूक प्रहार केला. यावरून आपले सैन्य किती सक्षम आणि शिस्तबद्ध आहे हे दिसून येते. आम्ही जगाला दाखवून दिले की आम्ही येथे बसून, दहशतवादी तळ आणि त्यांचे अड्डे धुळीस मिळवू शकतो.

मित्रांनो,

भारताच्या कृतीमुळे पाकिस्तान कसा हादरला हे देखील आपण पाहिले आहे. 9 तारखेच्या रात्री, आपल्या कच्छ सीमेवरही ड्रोन आले ड्रोन!त्यांना वाटले की मोदी गुजरातचे असल्याने  गुजरातमध्ये काही उचापती  कराव्यात….त्यांना माहीत नाही, फक्त 1971 आठवा… इथे ही जी  धाडसी महिला (वीरांगना) आली होती ना…तिने तुम्हाला धूळ चारली होती. या माता-भगिनी….त्या वेळी 72 तासांच्या आत धावपट्टी तयार केली आणि आम्ही पुन्हा हल्ले सुरू केले…आणि आज हे माझे भाग्य आहे की 1971 च्या युद्धातील त्या शूर मातांनी येऊन मला आशीर्वाद दिले आहेत….इतकेच नाही तर त्यांनी मला सिंदूरच्या झाडाचे रोप देखील दिले आहे. माता आणि भगिनींनो, तुम्ही दिलेले हे रोपटे आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी लावले जाईल… हे सिंदूरचे रोपटे आहे, त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही.

मित्रांनो,

पाकिस्तानने… आम्ही तर  दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला होता…त्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला…आणि जेव्हा त्यांचे ड्रोन दिसू लागले, तेव्हा तुम्ही त्यांना एकामागून एक, डोळ्याचं पातं लवतं नं लवतं तोच…. पडताना पाहिले. आणि मग भारतानेही त्यांच्या सैन्यावर दुप्पट ताकदीने हल्ला केला. भारताने पाकिस्तानचे हवाई तळ आणि त्यांचे लष्करी तळ ज्या अचूकतेने उद्ध्वस्त केले ते पाहून जग आश्चर्यचकित झाले. मी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही तर 1971 चे युद्ध पाहिले आहे…. यावेळी संपूर्ण पाकिस्तान थरथर कापत होता मित्रांनो…  थरथर कापत होता. आणि 1971 मध्ये, त्यांना वाटत होते की आपण भुज हवाईतळावर हल्ला केला होता आणि त्यावेळी आपल्या भगिनींनी कमाल करुन दाखवली  होती….शौर्याचे उदाहरण दाखवले होते.

आणि मित्रांनो,

पाकिस्तानच्या हल्ल्याला आपण  इतक्या ताकदीने प्रत्युत्तर दिले की त्यांचे सर्व हवाईतळ अजूनही अतिदक्षता विभागा (आयसीयू) मध्ये आहेत…आजही गलितगात्र आहेत. आणि मग पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली.  पाकिस्तानला वाटले की आता ते वाचू शकत नाहीत…भारताने आपला तिसरा डोळा उघडला  आहे. आणि शेवटी हा आपल्या सैन्याचा पराक्रम होता.. हे आपल्या सैन्याचे धाडस होते, ही आपल्या सैन्याची अचूक मोहीम होती…..काही तासांतच पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवायला सुरुवात केली, ते म्हणाले की आम्हाला गोळीबार करायचा नाही, आम्ही म्हणालो, आम्ही आधीच तर  हे म्हणत होतो ना बाबांनो…. आम्ही आधीच ते सांगितले होते, आम्हाला दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करायचे होते, त्यांना मारायचे होते, त्यांना धडा शिकवायचा होता… त्यानंतर तुम्ही शांत बसायला हवे होते, पण तुम्ही चूक केली, म्हणून तुम्हाला शिक्षा भोगावी लागली.

 

मित्रांनो,

भारताची लढाई, सीमेपलीकडून वाढणाऱ्या दहशतवादाविरुद्ध आहे. आज या दहशतवादाला पोसणाऱ्यांशी आमचे वैर आहे. माझा जिल्हा पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या कच्छच्या या भूमीला लागून आहे. मला पाकिस्तानच्या लोकांनाही सांगायचे आहे की, तुम्ही काय साध्य केले? भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था बनला आहे आणि तुमची काय अवस्था आहे, तुमच्या मुलांचे भविष्य कोणी उद्ध्वस्त केले? तुम्हाला दारोदार भटकायला कोणी भाग पाडले? दहशतवादाच्या या सूत्रधारांनी…..तिथल्या सैन्याचा, स्वतःचा कार्यक्रम आहे. पाकिस्तानातील नागरिक, विशेषतः तिथल्या मुलांनी, मोदी काय म्हणतात ते काळजीपूर्वक ऐका… तुमचे सरकार आणि तुमचे सैन्य… दहशतवादाला पाठिंबा देत आहे. पाकिस्तानचे सैन्य आणि सरकारसाठी दहशतवाद हा पैसा कमावण्याचे साधन बनला आहे. पाकिस्तानच्या तरुणांना निर्णय घ्यावा लागेल, पाकिस्तानच्या मुलांना निर्णय घ्यावा लागेल, हा मार्ग त्यांच्यासाठी योग्य आहे का? त्यांचे यातून भले होत आहे का? सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या या खेळांमुळे पाकिस्तानातील मुलांचे जीवन सुधारेल का? मी पाकिस्तानच्या मुलांना सांगू इच्छितो की, तुमचे हे राज्यकर्ते, तुमची ही सेना दहशतवादाच्या सावलीत वाढत आहे, ते तुमच्या आयुष्यात धोका निर्माण करत आहेत, तुमचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत, तुम्हाला अंधारात ढकलत आहेत. पाकिस्तानला दहशतवादाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, पाकिस्तानच्या लोकांना पुढे यावे लागेल, पाकिस्तानच्या तरुणांना पुढे यावे लागेल…सुखासमाधानाने जीवन जगा….भाकरी खा…. अन्यथा माझ्या गोळ्या आहेतच.

मित्रांनो,

भारताची दिशा अगदी स्पष्ट आहे. भारताने विकासाचा मार्ग निवडला आहे…शांतता आणि समृद्धीचा मार्ग निवडला आहे. मला खात्री आहे की कच्छचा स्थायीभाव… भारताच्या विकासासाठी सुद्धा प्रेरणा बनेल. माझ्या कच्छी बंधू आणि भगिनींनो, आता काही दिवसांनी आपली आषाढी बीज येईल, आपले कच्छी नवीन वर्ष… मी इथे आलो आहे, पूर्वी मी आषाढी बीजला इथे येण्याची संधी साधायचो. पण या वर्षी मी येऊ शकणार नाहीये… म्हणून आजच मी माझ्या कच्छी बंधू आणि भगिनींना आषाढी बीजेच्या …नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन जातो. कच्छच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमचे प्रेम, तुमचे आशीर्वाद आणि आज तुम्ही केलेला रोड शो…व्वा, इतक्या उन्हात, विमानतळापासून ते इथपर्यंत… लोक मोठ्या संख्येने जमले होते.  कच्छला माझे शेकडो…शेकडो सलाम! मित्रांनो, 100-100 नमस्कार (शंभर वेळा दंडवत)! पुन्हा एकदा, मी तुम्हाला अनेक विकासकामांसाठी शुभेच्छा देतो. माझ्यासोबत मोठ्याने, पूर्ण ताकदीने म्हणा आणि तिरंगा ध्वज उंच धरुन म्हणा-

 

 

भारत मातेचा विजय असो।

भारत मातेचा विजय असो।

भारत मातेचा विजय असो।

भारत मातेचा विजय असो।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

वंदे मातरम। वंदे मातरम।

खूप खूप आभार।

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
India’s Northeast: The new frontier in critical mineral security

Media Coverage

India’s Northeast: The new frontier in critical mineral security
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जुलै 2025
July 19, 2025

Appreciation by Citizens for the Progressive Reforms Introduced under the Leadership of PM Modi