दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, हे केंद्रशासित प्रदेश आमचा अभिमान आहेत, आमचा वारसा आहेत: पंतप्रधान
दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव अनेक योजनांमध्ये संपृक्ततेच्या स्तरावर पोहोचले आहेत: पंतप्रधान
जनऔषधी म्हणजे परवडणाऱ्या उपचारांची हमी! जनऔषधीचा मंत्र आहे - कमी किंमती, प्रभावी औषधे: पंतप्रधान
आपण सर्वांनी आपल्या स्वयंपाकातील तेलात 10% कपात केली पाहिजे, दरमहा 10% कमी तेलाचा वापर केला पाहिजे, लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे  2580 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी सिल्वासा येथे नमो  रुग्णालयाचे उद्घाटनही केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांना या प्रदेशाशी जोडण्याची आणि सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील समर्पित कामगारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली . इथल्या लोकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे आणि दीर्घकालीन बंध यांचा त्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की या प्रदेशाशी त्यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत . 2014 मध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून  दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव प्रदेशाने केलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली . या प्रदेशांनी त्यांची क्षमता  शक्तीमध्ये परिवर्तित करून आधुनिक आणि प्रगतीशील म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

"सिल्वासाचे नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील लोकांचे प्रेम, तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, तुम्हा सर्वांना माहित आहे की माझे तुमच्याशी किती जुने नाते आहे. हे अनेक दशके जुने ऋणानुबंध, इथे आल्यावर मला झालेला आनंद वाटतो, तो केवळ तुम्हालाच आणि मलाच माहीत आहे ,” असे मोदी पुढे म्हणाले. पंतप्रधानांनी नमूद केले की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा इथे भेट दिली तेव्हा हा भाग खूपच वेगळा होता, लोक प्रश्न विचारायचे की एका लहान किनारपट्टीच्या प्रदेशात काय होऊ शकते. मात्र, या ठिकाणच्या लोकांवर आणि त्यांच्या क्षमतेवर माझा नेहमीच विश्वास होता.  आपल्या  सरकारच्या नेतृत्वाखाली हा विश्वास प्रगतीमध्ये बदलला आहे, सिल्वासा असे शहर बनले आहे जिथे सर्व ठिकाणचे लोक राहत आहेत आणि तेथील सर्व रहिवाशांसाठी वेगाने नवीन संधींचा विकास झाला याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

 

यावेळी मोदी यांनी सिंगापूरचे उदाहरणही दिले, सुरुवातीच्या काळात ते मासेमारी करणारे छोटे गाव होते. मात्र सिंगापूरचा कायापालट तेथील लोकांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे झाला यावर त्यांनी भर दिला.  पंतप्रधानांनी केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना विकासासाठी असाच निर्धार करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि त्यांना आश्वासन दिले की ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील,मात्र त्यांनीही पुढे जाण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

"दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हे केवळ केंद्रशासित प्रदेश नाहीत  तर अभिमान आणि वारसा आहेत . त्यामुळेच आम्ही या प्रदेशाचे आदर्श राज्यात रूपांतर करत आहोत जे सर्वांगीण विकासासाठी ओळखले जाईल यावर  मोदी यांनी भर  दिला. उच्च तंत्रज्ञान-युक्त पायाभूत सुविधा, आधुनिक आरोग्य सेवा, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था, पर्यटन, नील अर्थव्यवस्था, औद्योगिक प्रगती, तरुणांसाठी नवीन संधी आणि विकासात महिलांचा सहभाग यासाठी हा प्रदेश ओळखला जावा अशी  कल्पना पंतप्रधानांनी मांडली.

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी नमूद केले की, प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याने, हा प्रदेश आपल्या  उद्दिष्टांची पूर्तता करण्‍यासाठी वेगाने प्रगती करत आहे. गेल्या 10  वर्षांत, विकासामध्‍ये लक्षणीय प्रगती झाली आहे. हा प्रदेश आता विकासाच्या बाबतीत एक वेगळी ओळख घेऊन राष्ट्रीय नकाशावर उदयास येत आहे. ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’, जल जीवन मिशन, भारतनेट, पंतप्रधान जन धन योजना,  पंतप्रधान जीवन ज्योती विमा आणि पंतप्रधान सुरक्षा विमा यासारख्या विविध सरकारी योजनांमुळे  लोकांना, विशेषतः वंचित आणि आदिवासी समुदायांना, मोठ्या प्रमाणात फायदे मिळाले  आहेत.

पंतप्रधानांनी घोषणा केली की, आता या  पुढील ध्येय स्मार्ट सिटीज मिशन, समग्र शिक्षा आणि पंतप्रधान मुद्रा योजना यासारख्या उपक्रमांमध्ये शंभर टक्के संतृप्तता साध्य करणे आहे. त्यांनी अधोरेखित केले की, सरकार पहिल्यांदाच या कल्याणकारी योजनांसह थेट लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार आहे.

पंतप्रधानांनी दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव  येथील पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार आणि औद्योगिक विकासातील परिवर्तनावर प्रकाश टाकला. त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की,  पूर्वी या प्रदेशातील तरुणांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागत असे, परंतु आज या प्रदेशात सहा राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहेत. यामध्ये नमो वैद्यकीय महाविद्यालय, गुजरात राष्‍ट्रीय विधी विद्यापीठ, आयआयआयटी दीव, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी), इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि दमण अभियांत्रिकी महाविद्यालय  यांचा समावेश आहे. या संस्थांमुळे  सिल्वासा आणि हा प्रदेश एक नवीन शैक्षणिक केंद्र बनले आहे. इथल्या स्थानिक तरुणांना अधिक फायदा व्हावा यासाठी, या संस्थांमध्ये त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  मला हे पाहून आनंद झाला की,  हा असा प्रदेश आहे, जिथे हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी अशा  चार वेगवेगळ्या माध्यमांमध्ये शिक्षण दिले जाते. आता, मला हे सांगताना अभिमान वाटतो की, येथील प्राथमिक आणि कनिष्ठ शाळांमधील मुले स्मार्ट क्लासरूममध्ये शिकत आहेत”, असेही पंतप्रधान  मोदी पुढे म्हणाले.

 

याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले की, अलीकडच्या वर्षांत, या प्रदेशात आधुनिक आरोग्य सेवांचा लक्षणीय विस्तार झाला आहे. “2023  मध्ये, मला येथे नमो वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या महाविद्यालयाला, 450 खाटांची क्षमता असलेले एक नवीन रुग्णालय जोडण्‍यात आले  आहे्.  त्या रूग्‍णालयाचे  आज उद्घाटनही करण्यात आले. सिल्वासातील आरोग्य सुविधांमुळे या प्रदेशातील आदिवासी समुदायाला मोठा फायदा होईल”, असे पंतप्रधान  मोदी यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधानांनी आजच्या आरोग्यसेवा प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले, कारण आज जनऔषधी दिवस आहे. जनऔषधी उपलब्ध करून दिले जात असल्यामुळे परवडणा-या दरामध्‍ये  उपचार सुनिश्चित होत आहेत,  यावर त्यांनी भर दिला. या उपक्रमांतर्गत, सरकार दर्जेदार रुग्णालये, आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार आणि जनऔषधी केंद्रांद्वारे परवडणा-या, किफायतशीर  किंमतीमध्‍ये  औषधे प्रदान केली जात आहेत. देशभरातील 15,000 हून अधिक जनऔषधी केंद्रांमध्‍ये 80 टक्क्यांपर्यंत कमी किंमतीमध्‍ये  औषधे  उपलब्ध करून दिली जातात. दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दिव येथील लोकांना सुमारे 40 जनऔषधी केंद्रांचा फायदा होत आहे. भविष्यात देशभरात 25,000  जनऔषधी केंद्रे उघडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. “या उपक्रमाच्या सुरुवातीपासून, गरजूंना सुमारे 6,500  कोटी रुपयांची किफायतशीर दरामध्‍ये  औषधे पुरवण्यात आली आहेत.  यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांची  30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रूपयांची बचत झाली आहे. या उपक्रमामुळे अनेक गंभीर आजारांवर उपचार अधिक परवडणारे झाले आहेत. यावरून   सामान्य नागरिकांच्या गरजांच्या बाबतीत सरकारकडे असलेली  संवेदनशीलता दिसून येते,” यावर पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या वाढत्या चिंतेवर विशेषतः लठ्ठपणाच्या समस्येवर भाष्य केले, जी आता एक गंभीर आरोग्य समस्या झाली आहे. त्यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा संदर्भ देत सांगितले की 2050 पर्यंत 440 दशलक्षहून अधिक भारतीय लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असतील. "हा चिंताजनक आकडा दर्शवतो की प्रत्येक तीनपैकी एक व्यक्ती गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जाईल आणि लठ्ठपणा जीवघेणा ठरू शकतो" असे ही मोदी म्हणाले. 

 

या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी प्रत्येकाला स्वतःहून पाऊल उचलण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वयंपाकाच्या तेलाचे प्रमाण दर महिन्याला 10 टक्क्यांनी कमी करण्याचे महत्त्व स्पष्ट केले आणि लोकांना त्यांच्या दैनंदिन स्वयंपाकात 10 टक्के कमी तेल वापरण्याचे आवाहन केले. यासोबतच, निरोगी जीवनशैली राखण्यासाठी दररोज काही किलोमीटर चालणे, अशा नियमित शारीरिक  हालचाली करण्याचा सल्ला दिला. "भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, हे लक्ष्य गाठण्यासाठी राष्ट्र आरोग्यदृष्ट्या मजबूत असणे महत्त्वाचे आहे," असे मोदी यांनी अधोरेखित केले.  

तसेच त्यांनी दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथे गेल्या दशकात झपाट्याने वाढलेल्या औद्योगिक विकासावर भर दिला. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आलेल्या "मिशन मॅन्युफॅक्चरिंग" उपक्रमामुळे या प्रदेशाला मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या परिसरात शेकडो नवीन उद्योग सुरू झाले असून, अनेक विद्यमान उद्योग विस्तारले आहेत.ज्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक या परिसराला मिळाली आहे. या उद्योगांमुळे विशेषतः आदिवासी समाज, महिला आणि वंचित गटांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. "गीर आदर्श जीविका योजना अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि महिलांना सक्षम करण्यासाठी राबवण्यात आली आहे. याशिवाय, लहान डेअरी फार्म्सच्या स्थापनेमुळे नव्या स्वयंरोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत," असे मोदी यांनी सांगितले.  

पंतप्रधानांनी हेही अधोरेखित केले की पर्यटन हा ही या प्रदेशातील रोजगाराचा एक प्रमुख स्रोत म्हणून विकसित होत आहे. येथील समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा भारतासह परदेशातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. राम सेतू, नमो पथ, दमणमधील टेंट सिटी आणि प्रसिद्ध नाईट मार्केट यांसारख्या विकास प्रकल्पांमुळे या भागाची लोकप्रियता आणखी वाढत आहे.  

 

मोदी म्हणाले की येथे मोठ्या पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे.तसेच दुधनी येथे एक भव्य इको-रिसॉर्ट उभारण्याचे काम सुरू आहे. दीवमध्ये समुद्रकिनाऱ्यांचे विकास प्रकल्प तसेच तटीय मार्गिकेचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.

"2024 मध्ये झालेल्या दीव बीच गेम्स मुळे समुद्रकिनारी खेळ खेळण्याची लोकप्रियता वाढली आहे. तसेच ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाल्यामुळे दीवमधील घोघला बीच एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. याशिवाय, दीवमध्ये केबल कार प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, जो पर्यटकांना अरबी समुद्राचे मनमोहक दृश्य अनुभवण्याची संधी देईल आणि त्यामुळे हा प्रदेश भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ म्हणून नावारुपास येईल," असे मोदी यांनी सांगितले.  

 

दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथे झालेल्या उल्लेखनीय वाहतूक आणि संपर्क सुविधांच्या सुधारणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. दादरा येथे बुलेट ट्रेन स्टेशन उभारले जात आहे, तसेच मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवे सिल्वास्सा मार्गे जात आहे. गेल्या काही वर्षांत शेकडो किलोमीटर नवीन रस्ते बांधण्यात आले असून, सध्या 500 किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे काम सुरू आहे, ज्यासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.  

"उडान योजनेचा या प्रदेशाला मोठा फायदा होत आहे, तसेच स्थानिक विमानतळाच्या आधुनिकीकरणामुळे हवाई संपर्क सुधारला जात आहे. सरकार या संपूर्ण प्रदेशाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठीआणि पायाभूत सुविधा मजबुत करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे," असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हे विकास, सुशासन आणि राहणीमान सुलभतेचे मॉडेल बनत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. पूर्वी लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागत असे, परंतु आता बहुतेक सरकारी कामे मोबाईल फोनवर फक्त एका क्लिकवर लोकांना पूर्ण करता येतात, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या नवीन दृष्टिकोनामुळे दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या आदिवासी भागांना मोठा फायदा झाला आहे. लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या जागेवरच सोडवण्यासाठी गावांमध्ये विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. पंतप्रधानांनी या प्रयत्नांसाठी प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले आणि लोकांना आश्वासन दिले की सरकार या प्रदेशाच्या विकासासाठी काम करत राहील. "आज सुरू झालेल्या यशस्वी विकास प्रकल्पांबद्दल मी दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथील लोकांचे अभिनंदन करतो. केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांनी केलेले सहर्ष स्वागत आणि दाखवलेले प्रेम आणि आदराबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो", असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना म्हटले.

पार्श्वभूमी

देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुविधा वाढवणे हे पंतप्रधानांचे प्राथमिक लक्ष्य राहिले आहे. याच अनुषंगाने, त्यांनी सिल्व्हासा येथे नमो रुग्णालय (फेज 1) चे उद्घाटन केले. 460 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चून बांधलेले हे 450 खाटांचे रुग्णालय केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य सेवांना लक्षणीयरीत्या बळकटी देणार आहे. हे या प्रदेशातील लोकांना, विशेषतः आदिवासी समुदायांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा प्रदान करेल.

 

पंतप्रधानांनी सिल्व्हासा येथे केंद्रशासित प्रदेशासाठी 2580  कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. यामध्ये विविध गावातील रस्ते आणि इतर जोड-रस्ते पायाभूत सुविधा, शाळा, आरोग्य आणि कल्याण केंद्रे, पंचायत आणि प्रशासकीय इमारती, अंगणवाडी केंद्रे, पाणीपुरवठा आणि सांडपाणी पायाभूत सुविधा इत्यादींचा समावेश आहे. या प्रकल्पांचे उद्दिष्ट कनेक्टिव्हिटी/दळणवळण सुधारणे, औद्योगिक विकासाला चालना देणे, पर्यटनाला प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि या प्रदेशात सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांना चालना देणे हे आहे.

गीर आदर्श आजीविका योजनेचे उद्दिष्ट अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), अल्पसंख्याक आणि दिव्यांगजन तसेच या भागातील महिलांना लहान दुग्धशाळा उभारून  त्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक बदल घडवणे आणि त्यांना आर्थिकरित्या सक्षमी करणे हे आहे. सिल्वन दीदी योजना ही महिला पथविक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या सह-निधीसह आकर्षकरित्या तयार केलेल्या गाड्या देऊन त्यांचे उत्थान करण्याचा एक उपक्रम आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Ilaiyaraaja Credits PM Modi For Padma Vibhushan, Calls Him India’s Most Accepted Leader

Media Coverage

Ilaiyaraaja Credits PM Modi For Padma Vibhushan, Calls Him India’s Most Accepted Leader
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 एप्रिल 2025
April 29, 2025

Empowering Bharat: Women, Innovation, and Economic Growth Under PM Modi’s Leadership