पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जानेवारी 2019 ला 9 व्या व्हायब्रंट गुजरात परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. 9 व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषदेला काही देशांचे प्रमुख, उद्योजक आणि विचारवंत उपस्थित राहतील.
नवभारतासाठी सर्वंकष आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत केलेल्या वैश्विक, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कार्यक्रमावर चर्चेसाठी मंच व्हायब्रंट गुजरात 2019 ही परिषद पुरवेल.
ज्ञानाच्या आदान प्रदानाचे स्वरुप अधिक वैविध्यपूर्ण करण्याच्या उद्देशाने मंचांचा संपूर्ण नवा संच असेल.
व्हायब्रंट गुजरातची संकल्पना नरेंद्र मोदी यांची असून, गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी ती राबवली होती. 2003 मध्ये सुरुवात झालेली ही परिषद देशातल्या सर्व राज्यांसाठी गुंतवणुकीला चालना देणारा, आता वैश्विक नेटवर्किंग मंच झाली आहे. जागतिक सामाजिक-आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांवर चर्चेबरोबरच, ज्ञानाचे आदान प्रदान करणारा आणि प्रभावी भागीदारीला चालना देणारा मंच म्हणून ही परिषद नावारुपाला आली आहे.
8 वी व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद जानेवारी 2017 मध्ये भरली होती. त्यात 100 हून अधिक देशांमधले 25 हजारांहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. यात 4 देशांचे प्रमुख, नोबेल पुरस्कार विजेते, उद्योजक आणि विचारवंत सहभागी झाले होते.
व्हायब्रंट गुजरात 2019ची वैशिष्ट्ये :
भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षण व संशोधन संधींसाठी गोलमेज परिषद
या गोलमेज परिषदेला देशातील शिक्षणतज्ज्ञ आणि केंद्र व राज्य सरकारमधले प्रमुख धोरणकर्ते उपस्थित राहतील. चर्चेतून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षण व संशोधन संधींसाठी आराखडा तयार केला जाईल.
भविष्यातील तंत्रज्ञान आणि अंतराळ मोहिमेवर प्रदर्शन
भविष्यातील अंतराळ प्रवासावर एक दृष्टिक्षेप
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यावर आंतरराष्ट्रीय परिषद
व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शन
2,00,000 चौ.मी. क्षेत्रावर असलेल्या या व्यापार प्रदर्शनात 25 क्षेत्रांचा समावेश आहे.
बंदरप्रणित विकास आणि भारत आशियातील ट्रान्स-शिपमेंट केंद्र म्हणून स्थापित व्हावे यासाठी व्यूहरचना
गुजरात आणि भारतामधील वाहतूक क्षेत्राच्या भविष्यातील विकासासाठी संबंधित संकल्पनांवर या चर्चासत्रात चर्चा होईल.
मेक इन इंडियावर चर्चासत्र
मेक इन इंडियाच्या यशोगाथा आणि या उपक्रमासाठी सरकारने उचललेली पावले, या चर्चासत्रात मांडली जातील.
संरक्षण आणि विमान क्षेत्रातील संधींवर चर्चासत्र
संरक्षण आणि विमान क्षेत्रात निर्मिती केंद्र म्हणून गुजरात उदयाला यावे, यासाठी तसेच या क्षेत्रातील संधींबाबत सहभागींना अवगत करण्याच्या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
चलनवलन प्रणित शहर विकास
चलनवलन प्रणित शहर विकास, प्रगत तंत्रज्ञान, पार्किंग समस्येवर उपाय, इलेक्ट्रिक वाहने यावर या उपक्रमात चर्चा होईल.
नवभारतासाठी शाश्वत तंत्रज्ञान प्रणित शेती
वस्त्रोद्योग परिषद – नवभारताच्या उभारणीसाठी वस्त्रोद्योग विकास क्षमतेचा शोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवभारताची संकल्पना पुढे नेतांना वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी उपाययोजना यावर परिषदेत चर्चा होईल. उद्योजक आणि धोरणकर्ते यात सहभागी होतील.


