पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रे वितरित करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.
रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला अनुसरून देशभरातील 47 ठिकाणी 15 वा रोजगार मेळा आयोजित केला जाणार आहे. यामुळे तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राष्ट्रीय विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध होतील.
देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी केंद्र सरकारमध्ये महसूल विभाग, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, रेल्वे मंत्रालय, श्रम आणि रोजगार मंत्रालय इत्यादी विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील.


