पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 च्या सुमाराला "विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, सुधारणा आणि वित्त" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील. या वेबिनारमध्ये सार्वजनिक भांडवली खर्च, पायाभूत सुविधा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, वित्तीय क्षेत्रातील रचना, भांडवली बाजारांचे सखोलीकरण आणि कर सुधारणांद्वारे जीवन सुलभता या मुद्यांवर चर्चा होईल.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मधील प्रमुख संकल्पनांवर आधारित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेतील हा पहिला वेबिनार आहे. या वेबिनारचे उद्दिष्ट भूतकाळातील अनुभवांमधून धडे घेणे आणि सहभागींकडून संरचित अभिप्राय मिळवणे, हे आहे, यामुळे विविध भागधारकांचे व्यावहारिक अनुभव आणि दृष्टिकोनाच्या आधारावर आर्थिक वर्ष 2026-27 च्या अर्थसंकल्पीय घोषणांची परिणाम-केंद्रित अंमलबजावणी मजबूत होण्याची खात्री मिळेल. या वेबीनारच्या माध्यमातून उद्योग, वित्तीय संस्था, बाजारपेठेतील सहभागी, सरकार, उद्योग नियामक आणि शिक्षण तज्ञ एकत्र येतील आणि अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या उपायांवर चर्चा करतील.


