भारतीय जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन बांधण्यात आले आहेत: पंतप्रधान
विकसित भारताच्या दिशेने आपण वाटचाल करत असताना, भारताने वसाहतवादी मानसिकतेतून पूर्णपणे मुक्त होणे अत्यंत आवश्यक आहे: पंतप्रधान
रेस कोर्स रोडचे नाव बदलून लोककल्याण मार्ग ठेवण्यात आले, हे केवळ नाव बदलणे नव्हते, तर सत्तेच्या मानसिकतेला सेवेच्या भावनेत बदलण्याचा हा प्रयत्न होता: पंतप्रधान
नवीन पंतप्रधान कार्यालयाचे नाव सेवा तीर्थ असे ठेवण्यात आले आहे; सेवा, किंवा सेवेची भावना हाच भारताचा आत्मा आहे, भारताची ओळख आहे: पंतप्रधान

केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व सरकारी कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो!

आज आपण सर्वजण एक नवा इतिहास घडताना पहात आहोत. विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी , फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ २४ चा शुभ मुहूर्त, शक संवत एकोणीसशे सत्तेचाळीस  आणि आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या विकासाच्या प्रवासातील एका नवीन अध्यायाचा आरंभाचा साक्षीदार होणारा दिवस आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये विजया एकादशीचे खूप महत्त्व आहे; या दिवशी आपण  जो संकल्प सुरू करतो त्यात आपण  निश्चितपणे विजयी होतो.

आज आपणही विकसित भारताचा संकल्प करून सेवा तीर्थ, कर्तव्य भवनात प्रवेश करत आहोत. आपले लक्ष्य गाठून त्यात विजय मिळविण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्याला पाठीशी आहेत. सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन या नवीन इमारतींबद्दल मी तुम्हा सर्वांचे, पंतप्रधान कार्यालयाच्या संपूर्ण समूहाचे , कॅबिनेट सचिवालयाचे आणि विविध विभागांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. या इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेल्या सर्व अभियंत्यांचे आणि कामगारांचेही मी आभार मानतो.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्यानंतर, साउथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक सारख्या इमारतींतून देशासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले,धोरणे आखली गेली.परंतु हे देखील खरे आहे, की या इमारती ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक म्हणून बांधल्या गेल्या होत्या. या इमारती बांधण्याचा उद्देश शतकानुशतके भारताला गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडून ठेवणे हा होता.

मित्रांनो,

तुम्हाला हे  माहिती आहे, की एक काळ असा होता जेव्हा कोलकाता देशाची राजधानी होती.पण 1905 मध्ये झालेल्या बंगालच्या त्या फाळणीदरम्यान, कोलकाता ब्रिटीशविरोधी चळवळीचे एक प्रबळ केंद्र बनले. म्हणूनच, 1911 मध्ये ब्रिटिशांनी भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवली आणि त्यानंतर, ब्रिटिश सरकारच्या गरजा आणि विचार लक्षात घेऊन, नॉर्थ ब्लॉक, साउथ ब्लॉक सारख्या इमारती बांधण्याचे काम सुरू झाले.

यानंतर, जेव्हा रायसीना हिल्स येथील या इमारतींचे उद्घाटन झाले होते तेव्हा तत्कालीन व्हाईसरॉय म्हणाले होते की ज्या नवीन इमारती बांधल्या गेल्या आहेत त्या ब्रिटिश सम्राटाच्या इच्छेनुसार बांधल्या गेल्या आहेत, म्हणजेच त्या काळातील या इमारती या ब्रिटनच्या महाराजांचे विचार गुलाम भारताच्या भूमीवर लादण्याचे  एक माध्यम होत्या.रायसीना हिल्सची निवड अशासाठी करण्यात आली होती, की या इमारती इतरांपेक्षा थोड्या अधिक उंचीवर असतील, त्यांच्याशी कोणीही बरोबरी करू शकणार नाही. योगायोगाने, संपूर्ण सेवा तीर्थ  संकुल हा परीसर टेकडीवर न वसता  जमिनीलगत असून जमिनीच्या जास्त जवळ आहे.

साउथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक सारख्या इमारती ज्या ब्रिटीश सरकारच्या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी बांधल्या गेल्या होत्या, त्याविरुद्ध  आज मी अभिमानाने म्हणू शकतो, की सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन सारखे नवीन संकुल भारत आणि त्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बांधले गेले आहे. येथे घेतलेले निर्णय कोणत्याही महाराजांच्या दृष्टिकोनावर आधारित नसून, 140 कोटी देशवासीयांच्या आकांक्षा पुढे नेण्यासाठी आधार म्हणून काम करतील. या अमृतमयी भावनेने, आज मी हे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन भारतातील लोकांना समर्पित करत आहे.

 

मित्रांनो,

एकविसाव्या शतकाची पहिली तिमाही आता पूर्ण झाली आहे. विकसित भारताची आपली संकल्पना  केवळ धोरणे आणि योजनांमध्येच नव्हे तर आपल्या कामाच्या ठिकाणी आणि आपल्या इमारतींमधून देखील प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. देशाचे प्रशासन ज्या ठिकाणाहून केले जाते ते प्रभावी आणि प्रेरणादायी असले पाहिजे.ते प्रभावी आणि प्रेरणादायी दोन्ही असले पाहिजे. आज, नवीन तंत्रज्ञान आपल्या जीवनात झपाट्याने प्रवेश करत आहे. तथापि, या सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन साधनांचा वापर करण्यासाठी जुन्या इमारती अपुर्‍या ठरत होत्या. साउथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकमधील जुन्या इमारतींतून जागेची कमतरता पडत होती, सुविधांना सुध्दा स्वतःच्या मर्यादा असतात आणि या जवळजवळ शंभर वर्षांच्या जुन्या इमारती आतून खराब होत चालल्या होत्या. याव्यतिरिक्त, इतरही अनेक आव्हाने होती.

मला वाटते की या आव्हानांबद्दल देशाला सतत माहिती देणे महत्वाचे आहे.उदाहरणार्थ, स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतरही, भारत सरकारची अनेक मंत्रालये दिल्लीतील पन्नासहून अधिक वेगवेगळ्या ठिकाणांहून चालवली जात होती.  दरवर्षी, या मंत्रालयांच्या इमारतींच्या भाड्यावर 1500 कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले जात होते. दररोज 8,000 ते 10,000 कर्मचाऱ्यांना एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत जाण्यायेण्यासाठी विशेष व्यवस्था लागत होती. आता, सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन या इमारतींच्या बांधकामामुळे, हा खर्च कमी होईल, वेळ वाचेल आणि या वाचलेल्या वेळेमुळे कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता वाढेल.

मित्रांनो,

या बदलादरम्यान, जुन्या इमारतीत घालवलेल्या काही वर्षांच्या आठवणी निःसंशयपणे आपल्यासोबत राहतील. वेगवेगळ्या काळात आव्हानांना तोंड देत अनेक महत्त्वाचे निर्णय तिथे घेण्यात आले. तिथेच देशाला एक नवीन दिशा मिळाली आणि सुधारणांचे अनेक उपक्रम योजले गेले. तो परीसर, ती इमारत, भारताच्या इतिहासाचा एक अमर भाग आहे. म्हणूनच आम्ही त्या इमारतीचे राष्ट्राला समर्पित अशा संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सतत विकसित होत असलेल्या युगेन युगे भारत संग्रहालयाचा भाग असेल, ही इमारत भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. नवीन पिढीचा युवावर्ग जेव्हा इथे जातील तेव्हा हा ऐतिहासिक वारसा त्यांना मार्गदर्शन करेल.

 

मित्रांनो,

विकसित भारताच्या या प्रवासात भारताने वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होऊन पुढे जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही वसाहतवादी प्रतीके आपल्याकडून वाहून नेली जात होती. पहा, पूर्वीची परिस्थिती काय होती? पंतप्रधानांच्या निवासस्थान जिथे आहे, त्याला रेसकोर्स म्हटले जात असे. उपराष्ट्रपतींसाठी कोणतेही निश्चित निवासस्थान नव्हते. राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या रस्त्याला लोकशाहीमध्ये राजपथ म्हटले जात असे. स्वतंत्र भारतात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचे कोणतेही स्मारक नव्हते. मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा दल आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे स्मारक नव्हते. याचा अर्थ असा की 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या आणि देशाचे प्रमुख निर्णय जिथून घेतले जात होते, ती देशाची राजधानी वसाहतवादी मानसिकतेने पूर्णपणे जखडलेली होती. दिल्लीच्या इमारती, सार्वजनिक ठिकाणे आणि ऐतिहासिक स्थळे वसाहतवादी प्रतिकांनी भरलेली आहेत.

परंतु मित्रांनो,

म्हणतात ना, काळाचे चक्र कधीच एकसारखे राहत नाही. 2014 मध्ये देशाने ठरवले की ही वसाहतवादी मानसिकता आता टिकणार नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी आम्ही एक मोहीम सुरू केली. आम्ही आमच्या वीरांच्या नावाने राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले. पोलिसांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही पोलिस स्मारक बांधले. रेसकोर्स रोडचे नाव बदलून लोककल्याण मार्ग ठेवले. आणि हा केवळ नाव बदलण्याचा निर्णय नव्हता; सत्तेच्या मानसिकतेचे सेवेच्या भावनेत रूपांतर करण्याचा हा एक पवित्र प्रयत्न होता.

मित्रांनो,

आपल्या या निर्णयांमागे एक सखोल भावना, एक दूरदृष्टी आहे. हे आपले वर्तमान, आपला भूतकाळ आणि आपले भविष्य भारताच्या अभिमानाशी जोडतात. पूर्वी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी सामान्य नागरिकांसाठी पुरेशा सुविधा आणि योग्य व्यवस्थांचा अभाव होता. आम्ही तो कर्तव्य मार्ग म्हणून विकसित केला आणि आज तेच ठिकाण कुटुंबे, मुले आणि देशभरातील नागरिकांसाठी एक चैतन्यमयी सार्वजनिक ठिकाण बनले आहे.

 

या संकुलात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्यात आला. बऱ्याच काळापासून आपल्या राजधानीत आपल्या महान वीरांच्या स्मृतीला या स्वरूपातील स्थान मिळाले नव्हते. आम्ही ठरवले की देशाच्या नवीन पिढीने राजधानीच्या मध्यभागी असलेल्या त्यांच्या वीरांपासून प्रेरणा घ्यावी. राष्ट्रपती भवन संकुलातही बदल करण्यात आले. मुघल गार्डनचे नाव अमृत उद्यान असे ठेवण्यात आले. जुन्या संसद भवनाजवळ नवीन संसद भवन बांधण्यात आले तेव्हा आम्ही जुनी इमारत विसरलो नाही, आम्ही त्याला 'संविधान सदन' अशी एक नवीन ओळख दिली.

जेव्हा विविध मंत्रालये एकाच संकुलात एकत्र आणली गेली तेव्हा त्या इमारतींना "कर्तव्य भवन" असे नाव देण्यात आले. नामांतराचा हा उपक्रम केवळ शब्द बदलण्याचा नाही; या सर्व प्रयत्नांमागील वैचारिक धागा एकच आहे: स्वतंत्र भारताची स्वतंत्र ओळख, वसाहतवादापासून मुक्त चिन्ह.

मित्रांनो,

नवीन पंतप्रधान कार्यालयाचे नाव सेवा तीर्थ आहे. सेवेची भावना हा भारताचा आत्मा आहे, सेवेची भावना ही भारताची ओळख आहे. श्री रामकृष्ण परमहंसजी म्हणाले, "शिवाच्या ज्ञानापासून ते जीवनाच्या ज्ञानापर्यंत, सेवा. हा विचार केवळ आध्यात्मिक नाही; हे राष्ट्रनिर्मितीचे तत्त्वज्ञान आहे. ही इमारत आपल्याला प्रत्येक क्षणी आठवण करून देईल की शासन म्हणजे सेवा आणि जबाबदारी म्हणजे समर्पण. आपले धर्मग्रंथ असेही म्हणतात, "सेवा परमो धर्मः." म्हणजेच, सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे. भारतीय संस्कृतीचा हाच विचार पंतप्रधान कार्यालय आणि सरकारचा दृष्टिकोन आहे.

म्हणूनच सेवा तीर्थ हे फक्त एक नाव नाही, तर हा एक संकल्प आहे. सेवा तीर्थ म्हणजे नागरिकांच्या सेवेने पवित्र झालेले स्थान! सेवेचा संकल्प सिद्धीपर्यंत नेण्याचे स्थान! तीर्थचा अर्थ होतो "तरति अनेन इति तीर्थ", म्हणजे ज्याच्यात उद्धार करण्याची, ओलांडण्याची क्षमता आहे, जे ध्येय साध्य करण्यास मदत करते, ते तीर्थ असते. आज भारताचे विकसित भारताचे, आत्मनिर्भर भारताचे ध्येय आहे. आपल्याला कोट्यवधी देशवासियांना गरिबीतून मुक्त करायचे आहे, आपल्याला देशाला वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त करायचे आहे आणि हे कार्य केवळ सेवेच्या सामर्थ्यानेच साध्य होईल.

 

मित्रांनो,

आज भारत रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार झाला असताना, भारत आंतरराष्ट्रीय संबंधांची एक नवीन गाथा लिहित असताना, नवीन व्यापार करारांमुळे शक्यतांची नवीन दारे खुली होत असताना, देश समृद्धीच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत असताना, सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनांवरील तुमचा नवा विश्वास आणि आपल्या सर्वांच्या कामाची नवीन गती देशाची उद्दिष्टे साध्य करण्यात मोठी भूमिका बजावेल.

मित्रांनो,

आपली संस्कृती सांगते की प्रत्येक शुभ कार्यापूर्वी स्वस्तिवाचन, कल्याणाची कामना, शुभसंकल्प, वैदिक मंत्र आपल्याला मार्गदर्शन करतात: "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वाः." म्हणजेच, कल्याणकारी विचार प्रत्येक दिशेने आपल्याकडे येत राहतील. हाच या इमारतीचा आत्मा असला पाहिजे. भारताच्या महान लोकशाहीमध्ये जनतेबद्दलचे विचार ही आपली शक्ती आहेत, त्यांची स्वप्ने आपली संपत्ती आहे, त्यांच्या अपेक्षाच आपली प्राथमिकता आहेत आणि त्यांच्या आकांक्षा आपले मार्गदर्शन आहेत.

या भावना आणि या भवनामध्ये कोणतीही भिंत नसावी, कोणतेही अंतर नसावे. जेव्हा तुम्ही जनतेची स्वप्ने समजून घ्याल, तेव्हाच धोरणे सजीव होतील; जेव्हा तुम्ही जनतेच्या आकांक्षा जाणून घ्याल, तेव्हाच निर्णय प्रभावी ठरतील.

 

गेल्या 11 वर्षांत आपण सुशासनाचा एक नवे प्रारुप पाहिले आहे — असे प्रारुप जिथे प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी भारताचा नागरिक आहे. “नागरिक देवो भव” हे केवळ वाक्य नाही, ती आमची कार्यसंस्कृती आहे.

ही भावना आत्मसात करूनच तुम्हाला या नव्या भवनांमध्ये प्रवेश करायचा आहे. सेवा तीर्थात घेतला जाणारा प्रत्येक निर्णय, येथे काम सुरू असलेली प्रत्येक फाईल, येथे घालवलेला प्रत्येक क्षण — 140 कोटी देशवासियांचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी असला पाहिजे. मी प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक कर्मयोगीला सांगू इच्छितो — जेव्हा तुम्ही या भवनात पाऊल टाकाल, तेव्हा क्षणभर थांबा, स्वतःला विचारा: आज माझे कार्य कोट्यवधी देशवासियांचे जीवन सोपे करणार आहे का? हे आत्मपरीक्षणच या स्थळाची सर्वात मोठी शक्ती बनेल.

मित्रांनो,

आपण येथे अधिकार दाखवण्यासाठी आलो नाही, तर जबाबदारी पार पाडण्यासाठी आलो आहोत. आणि आपण पाहिले आहे की, जेव्हा शासन सेवा भावनेने चालते, तेव्हा परिणामही असामान्य असतात. तेव्हाच 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडतात, तेव्हाच अर्थव्यवस्था नव्या वेगाने पुढे सरकते.

मित्रांनो,

आज विकसित भारत 2047 हे फक्त आपले लक्ष्य नाही, तर जगाच्या नजरेत भारताची प्रतिज्ञा आहे. त्यामुळे येथे घडणारे प्रत्येक धोरण, घेतला जाणारा प्रत्येक निर्णय सतत सेवाभावनेने प्रेरित असला पाहिजे. आणि एक दिवस, जेव्हा तुम्ही सेवा निवृत्त व्हाल किंवा बदलीनंतर या भवनातून बाहेर पडाल, तेव्हा मागे वळून पाहताना तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्ही स्वतःला म्हणाल — हो, ज्या दिवसांत मी सेवा तीर्थात, कर्तव्य भवनात होतो, त्या प्रत्येक दिवशी मी देशाच्या नागरिकांची सेवा केली, प्रत्येक निर्णय राष्ट्रहितासाठी घेतला. तो क्षण तुम्हाला समाधान देईल, तोच तुमची सर्वात मोठी उपलब्धी असेल, तीच तुमची वैयक्तिक संपत्ती असेल, आणि तीच संपत्ती तुमचे जीवन गौरवाने भारून टाकेल.

मित्रांनो,

महात्मा गांधीजींची अशी भावना होती की कर्तव्याच्या पायावरच अधिकाराची भव्य इमारत उभी राहते. आपण आपले कर्तव्य पार पाडले तर मोठ्यात मोठ्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो आणि त्यांचे निराकरण करू शकतो. आपल्या संविधान निर्मात्यांनीही म्हणूनच कर्तव्यांवर विशेष भर दिला आहे. म्हणूनच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे — कोट्यवधी देशवासियांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याचा पाया म्हणजे कर्तव्य! कर्तव्य हीच सुरुवात आहे; कर्तव्य या सजीव राष्ट्राचा प्राणवायू आहे.

करुणा आणि कर्मठतेच्या स्नेहसूत्रात बांधलेले कर्म म्हणजे कर्तव्य! संकल्पांची आशा म्हणजे कर्तव्य! परिश्रमाची पराकाष्ठा म्हणजे कर्तव्य! प्रत्येक समस्येचे उत्तर म्हणजे कर्तव्य; विकसित भारताचा विश्वास म्हणजे कर्तव्य! कर्तव्य म्हणजे समता, कर्तव्य म्हणजे ममता; कर्तव्य सर्वव्यापी आहे, सर्वस्पर्शी आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेत गुंफलेला मंत्र म्हणजे कर्तव्य! राष्ट्राप्रती समर्पणाची भावना म्हणजे कर्तव्य! प्रत्येक जीवनात प्रकाश चेतवणारी इच्छाशक्ती म्हणजे कर्तव्य! आत्मनिर्भर भारताचा उत्साह म्हणजे कर्तव्य! भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची हमी म्हणजे कर्तव्य! भारतमातेच्या प्राणऊर्जेचा ध्वजवाहक म्हणजे कर्तव्य! राष्ट्रभक्तीच्या भावनेतून केलेले प्रत्येक कार्य म्हणजे कर्तव्य! ‘नागरिक देवो भव’ या साधनेचा जागृत मार्ग म्हणजे कर्तव्य!

मित्रांनो,

याच कर्तव्यभावनेने, ही भावना सर्वोच्च मानून, आपल्याला सेवा तीर्थ आणि नव्या भवनांमध्ये कर्तव्यभावाने प्रवेश करायचा आहे.

मित्रांनो,

आज भारत वेगाने पुढे जात आहे — नवी उंची गाठण्याच्या दिशेने, नव्या युगाच्या दिशेने. येत्या काळात आपली ओळख केवळ अर्थव्यवस्थेमुळे नाही, तर सुशासनाच्या गुणवत्तेमुळे, धोरणांच्या स्पष्टतेमुळे आणि कर्मयोग्यांच्या निष्ठेमुळे असेल. सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा केवळ एका फाईलचा निर्णय नसेल, तर 2047 च्या विकसित भारताची दिशा ठरवणारा असेल. लक्षात ठेवा, 2047 हे केवळ एक वर्ष नाही, ती 140 कोटी स्वप्नपूर्ती करण्याचा निर्धारित कालावधी आहे. या प्रवासात प्रत्येक संस्था महत्त्वाची आहे, प्रत्येक अधिकारी महत्त्वाचा आहे, प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक कर्मयोगी महत्त्वाचा आहे.

माझी इच्छा आहे की, सेवा तीर्थ संवेदनशील शासनाचे प्रतीक बनावे, नागरिककेंद्रित व्यवस्थेचा आदर्श बनावे — असे स्थान, जिथे सत्ता नव्हे तर सेवा दिसेल; पद नव्हे तर बांधिलकी दिसेल; अधिकार नव्हे तर जबाबदारी दिसेल. मला पूर्ण विश्वास आहे, आपला संकल्प इतिहास घडवेल, आपले परिश्रम भावी पिढ्यांना दिशा दाखवतील. मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते — “हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे.” चला, आपण प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करूया. राष्ट्र प्रथम या भावनेने असे पुण्यकार्य करूया की येणाऱ्या शतकांमध्ये म्हटले जाईल — हाच तो काळ होता, जेव्हा भारताने स्वतःचे भाग्य नव्याने लिहिले. हाच तो काळ होता, जेव्हा भारताने पुढील हजार वर्षांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या ऊर्जेने आणि नव्या वेगाने भक्कम पाऊल टाकले.

याच विश्वासाने, आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद.

वंदे मातरम्!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
GIFT City scales new heights as India's 1st international finance and IT hub

Media Coverage

GIFT City scales new heights as India's 1st international finance and IT hub
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares address by Shri Amit Shah in Lok Sabha on India’s decisive fight against Naxalism
March 30, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi shared the outstanding speech delivered by Union Home Minister Shri Amit Shah ji, noting that it was filled with important facts, historical context, and a detailed account of the Government’s efforts over the past decade. Shri Modi highlighted that for decades, the retrograde Maoist ideology had an adverse impact on the development of several regions, with Left Wing Extremism severely affecting the future of countless youngsters.

He further underlined that over the last ten years, the Government has worked towards uprooting this menace, while simultaneously ensuring that the benefits of development reach areas affected by Naxalism. The Prime Minister reaffirmed that the Government will continue to focus on strengthening good governance and ensuring peace and prosperity for all.

The Prime Minister posted on X:

“This is an outstanding speech by the Home Minister, Shri Amit Shah Ji, filled with important facts, historical context and the efforts of our Government in the last decade.

For decades, the retrograde Maoist ideology had an adverse impact on the development of several regions. Left Wing Extremism has ruined the future of countless youngsters.

In the last decade, our Government has worked towards uprooting this menace and at the same time ensuring the fruits of development reach areas affected by Naxalism. We will keep focusing on furthering good governance and ensuring peace and prosperity for all.”