विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने आज भारत वाटचाल करत असताना, बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक : पंतप्रधान
विकासाच्या उद्देशाने केंद्र सरकार येथे पायाभूत सुविधा,नवोन्मेष आणि गुंतवणुकीला निरंतर नवी चालना देत आहे: पंतप्रधान
बंगालचा विकास हा भारताच्या भविष्याचा पाया आहे: पंतप्रधान
शहर गॅस वितरण प्रकल्प केवळ एक गॅस वाहिनीचा प्रकल्प नाही, तर सरकारी योजना दारापर्यंत पोहोचवल्या जातात, याचे एक उदाहरण : पंतप्रधान
जिथे ऊर्जा स्वस्त, स्वच्छ आणि सहजपणे उपलब्ध असेल, अशा भारताच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे : पंतप्रधान

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुकांत मजूमदार, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, अलीपुरद्वारचे लोकप्रिय खासदार भाई मनोज तिग्गा, इतर खासदार, आमदार आणि पश्चिम बंगालच्या माझ्या आणि भगिनींनो!

अलीपुरद्वारच्या या ऐतिहासिक भूमीवरून बंगालच्या सर्व जनतेला माझा नमस्कार!

अलीपुरद्वारची ही भूमी केवळ सीमांशी नव्हे, तर संस्कृतींशीही जोडलेली आहे. एकीकडे भूतानची सीमा आहे, तर दुसरीकडे आसामची, एका बाजूला जलपाईगुडीचे सौंदर्य आहे, तर दुसऱ्या बाजूला बिहारचा गौरव आहे. आज या समृद्ध भूमीवर तुम्हा सर्वांना भेटण्याचे भाग्य मला लाभले आहे.

मित्रहो,

आज भारत विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असताना बंगालचा सहभाग अपेक्षितही आहे आणि अनिवार्यही आहे. याच हेतूने केंद्र सरकार येथे पायाभूत सुविधा, नवोन्मेश आणि गुंतवणुकीला सातत्याने नवी चालना देत आहे. बंगालचा विकास हा भारताच्या भविष्याचा पाया आहे. आणि आज त्या पायाला आणखी एक मजबूत वीट जोडण्याचा दिवस आहे. काही वेळापूर्वी आपण  या व्यासपीठावरून अलीपूरद्वार आणि बिहार येथे सिटी गॅस वितरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अडीच लाखांहून अधिक घरांमध्ये वाहिनीद्वारे स्वच्छ, सुरक्षित आणि स्वस्त गॅस पोहोचवला जाईल. यामुळे स्वयंपाकघरासाठी सिलिंडर खरेदी करण्याची चिंता तर दूर होईलच, शिवाय कुटुंबांना सुरक्षित गॅस पुरवठा देखील मिळेल. त्याचबरोबर सीएनजी स्टेशनच्या उभारणीमुळे हरित इंधनाच्या सुविधांचाही विस्तार होईल. यामुळे पैशांची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि पर्यावरणालाही दिलासा मिळेल. या नवीन सुरुवातीबद्दल मी अलीपुरद्वार आणि कूचबिहारच्या नागरिकांचे अभिनंदन करतो. सिटी गॅस वितरणाचा हा प्रकल्प केवळ गॅस वाहिनी  प्रकल्प नसून सरकारी योजना घराच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या वचनबध्‍दतेचे  एक उदाहरण आहे.

 

मित्रहो,

भारताने गेल्या काही वर्षांत ऊर्जा क्षेत्रात जी प्रगती केली आहे ती अभूतपूर्व आहे. आज आपला देश गॅसआधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 2014 पूर्वी देशातील 66 जिल्ह्यांमध्ये सिटी गॅसची सुविधा होती. आज 550 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सिटी गॅस वितरणाचे जाळे पोहोचले आहे. हे जाळे आता आपल्या खेड्यांमध्ये, छोट्या शहरांपर्यंत पोहोचत आहे. लाखो घरांना वाहिनीद्वारे गॅस मिळत आहे. सीएनजीमुळे सार्वजनिक वाहतुकीतही बदल झाला आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होत आहे. म्हणजेच देशवासीयांचे आरोग्यही सुधारत आहे, आणि खिशावरील भारही कमी होत आहे.

मित्रहो,

पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे या परिवर्तनाला आणखी वेग आला आहे. आमच्या सरकारने 2016  मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेमुळे कोट्यवधी गरीब भगिनींचे जीवन सुकर झाले आहे. यामुळे महिलांची धुरापासून मुक्तता झाली आहे, त्यांचे आरोग्य सुधारले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील स्वयंपाकघरात सन्मानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 2014 मध्ये आपल्या देशात 14 कोटींपेक्षा कमी एलपीजी कनेक्शन होते. आज ही संख्या 31 कोटी पेक्षा अधिक आहे. म्हणजेच घरोघरी गॅस पोहोचवण्याचे स्वप्न आता साकार होत आहे. त्यासाठी आमच्या सरकारने देशाच्या कानाकोपऱ्यात गॅस वितरणाचे जाळे मजबूत केले आहे. त्यामुळे देशभरातील एलपीजी वितरकांची संख्याही दुपटी पेक्षा जास्त झाली आहे. 2014 पूर्वी देशात 14 हजारांहून कमी एलपीजी वितरक होते. आता त्यांची संख्याही 25  हजारांहून अधिक झाली आहे. गॅस सिलिंडर आता प्रत्येक गावात सहज उपलब्ध झाले आहेत.

 

मित्रहो,

आपण सर्वजण ऊर्जा गंगा प्रकल्पाशीही परिचित आहात. हा प्रकल्प गॅसआधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले क्रांतिकारी पाऊल आहे. या योजनेअंतर्गत, पूर्व भारतातील राज्यांना गॅस वाहिनीशी जोडण्याचे काम केले जात आहे. आता पश्चिम बंगालसह पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये वाहिनीद्वारे गॅस पोहोचत आहे. भारत सरकारच्या या सर्व प्रयत्नांमुळे शहरांमध्ये असो वा खेड्यांमध्ये, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. वाहिनी  टाकण्यापासून ते गॅस पुरवठ्यापर्यंत प्रत्येक स्तरावर रोजगार उपलब्ध झाला आहे. गॅसवर आधारित उद्योगांनाही यातून चालना मिळाली आहे. आता आपण अशा भारताकडे वाटचाल करत आहोत जिथे ऊर्जा स्वस्त, स्वच्छ आणि सर्वांना उपलब्ध असेल.

 

मित्रहो,

पश्चिम बंगाल हे भारतीय संस्कृती, ज्ञान आणि विज्ञानाचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे. विकसित भारताचे स्वप्न बंगालच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन, केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात येथे हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरू केली आहेत. पूर्वा एक्सप्रेसवे असो, की दुर्गापूर एक्सप्रेसवे, श्यामा प्रसाद मुखर्जी बंदराचे आधुनिकीकरण असो, की कोलकाता मेट्रोचा विस्तार असो. न्यू जलपाईगुडी स्थानकाचे पुनरुज्जीवन असो, की डुअर्स मार्गावर नवीन गाड्या चालवणे असो, केंद्रसरकारने पश्चिम बंगालच्या विकासाचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. आज सुरू झालेला हा प्रकल्प देखील केवळ गॅस वाहिनी  नसून प्रगतीची जीवनवाहिनी आहे. तुमचे जीवन सुलभ व्हावे, तुमचे भविष्य उज्जल असावे, हाच आमचा प्रयत्न आहे. आपला बंगाल विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल, अशी कामना करून मी पुन्हा एकदा आपल्याला या सर्व सुविधांसाठी शुभेच्छा देतो. आता 5  मिनिटांनंतर, मी इथून एका खुल्या व्यासपीठावर जात आहे, तुम्हाला माझ्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायच्या असतील, त्यासाठी ते व्यासपीठ अधिक योग्य आहे, म्हणूनच बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला तिथेच सांगेन, 5  मिनिटांनंतर. या कार्यक्रमात एवढे पुरेसे आहे, तुम्ही विकासाचा हा प्रवास उत्साहाने आणि जोमाने पुढे न्यायला हवा.

खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions