ओडिशा शेकडो वर्षांपासून भारतीय संस्कृती आणि सभ्यता समृद्ध करत आहे: पंतप्रधान
विकास आणि वारसा हा भारताच्या प्रगतीचा आधार बनला असताना ओडिशाची भूमिका आणखी व्यापक झाली आहे: पंतप्रधान
मागील वर्षात आदिवासी समाजाला हिंसाचारमुक्त करून विकासाच्या नवीन मार्गावर आणण्यासाठी आम्ही काम केले : पंतप्रधान
एकविसाव्या शतकातील भारताच्या विकासाला पूर्व भारतातून उभारी मिळेल: पंतप्रधान

जय जगन्नाथ!

जय जगन्नाथ!

जय बाबा लिंगराज!

मोर प्रिय ओडिशा बासींकु नमस्कार, जोहार!

ओदिशाचे राज्यपाल हरी बाबूजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माझीजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुएल ओरांवजी, धर्मेंद्र प्रधानजी, अश्विनी वैष्णवजी, ओदिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देवजी, प्रवाती परिदाजी, राज्य सरकारचे इतर मंत्रीगण, खासदार आणि आमदारगण, आणि ओडिशातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो!

आज, 20 जून हा दिवस खूप विशेष आहे. आज ओदिशातील पहिल्या भाजप सरकारने यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे. हा वर्धापनदिन केवळ सरकारचा नाही, तर हा सुशासनाच्या स्थापनेचा वर्धापनदिन आहे. हे एक वर्ष जनसेवा आणि जनविश्वासाला समर्पित आहे. ओदिशाच्या कोट्यवधी मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरण्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे हे एक शानदार वर्ष आहे. मी ओदिशाच्या जनतेचे, आपल्या सर्वांचे, मनापासून अभिनंदन करतो. मी मुख्यमंत्री मोहन माझी जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे देखील खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी प्रशंसनीय काम करून ओदिशाच्या विकासाला नवी गती दिली आहे.

 

मित्रांनो,

ओदिशा केवळ एक राज्य नाही, तर ते भारताच्या वारशाचा एक दिव्य तारा आहे. शेकडो वर्षांपासून ओदिशाने भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला समृद्ध केले आहे. त्यामुळे, आज जेव्हा विकास आणि वारसा हा मंत्र भारताच्या प्रगतीचा आधार बनला आहे, तेव्हा ओदिशाची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. गेल्या एका वर्षात ओदिशाने 'विकास आणि वारसा' या दोन्ही मंत्रांना आत्मसात करून दाखवले आहे, या मंत्रावर ते वेगाने पुढे सरकले आहे.

मित्रांनो,

हा एक सुखद योगायोग आहे की, जेव्हा ओदिशातील भाजप सरकार आपले एक वर्ष पूर्ण करत आहे, तेव्हा आपण सर्वजण भगवान जगन्नाथजींच्या रथयात्रेच्या तयारीत गुंतलेले आहात. महाप्रभू आमच्यासाठी आराध्य देखील आहेत, प्रेरणाही आहेत. आणि महाप्रभूंच्या आशीर्वादाने श्रीमंदिराशी संबंधित विषयांचे निराकरणही झाले आहे. मी मोहनजी आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो कारण, त्यांनी कोट्यवधी भक्तांच्या विनंतीचा मान राखला. येथे सरकार स्थापन होताच श्रीमंदिराचे चारही दरवाजे उघडले गेले होते, श्रीमंदिराचे रत्नभांडारही उघडले आहे. आणि हा काही राजकीय जय-पराजयाचा विषय नाही. हे कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान करण्याचे कार्य झाले आहे.

मित्रांनो,

अगदी  2 दिवसांपूर्वीच मी कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेसाठी गेलो होतो. तिथे मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फोन केला. ते म्हणाले की, "तुम्ही कॅनडाला आलाच आहात, तर वॉशिंग्टनला भेट देऊन जा. आपण एकत्र जेवण करू, बोलू." त्यांनी मला खूप आग्रहाने निमंत्रण दिले. मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना म्हणालो की, "तुमच्या निमंत्रणासाठी धन्यवाद, पण मला महाप्रभूंच्या भूमीवर जाणे खूप महत्त्वाचे आहे." आणि म्हणूनच मी त्यांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले, आणि तुमचे प्रेम, महाप्रभूंची भक्ती मला या भूमीवर खेचून घेऊन आली आहे.

 

बंधू-भगिनींनो,

स्वातंत्र्यानंतर अनेक दशके, देशातील जनतेने काँग्रेसचे  विकासाचे मॉडेल पाहिले. काँग्रेसच्या मॉडेलमध्ये ना सुशासन होते, ना लोकांचे जीवन सुकर होते. विकास प्रकल्पांना अडवून ठेवणे, रखडवणे, भरकटवणे आणि प्रचंड भ्रष्टाचार हीच काँग्रेसच्या विकासाच्या मॉडेलची ओळख होती. आता गेल्या काही वर्षांपासून देश मोठ्या प्रमाणावर भाजपचे, विकासाचे मॉडेल अनुभवत आहे.

गेल्या दशकात देशातील अनेक राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपची सरकारे स्थापन झाली आहेत. या राज्यांमध्ये केवळ सरकार बदलले नाही, तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे एक नवीन युग सुरू झाले आहे. मला तुम्हाला पूर्व भारतातील उदाहरणे देऊन समजावून सांगायचे आहे. मी आसामचे उदाहरण देतो, आसाममध्ये एक दशकापूर्वी परिस्थिती खूप वाईट होती. अस्थिरता, फुटीरता, हिंसाचार हे सर्व आसाममध्ये दिसत होते. पण आज आसाम विकासाच्या नव्या मार्गावर धावत आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अतिरेकी कारवाया थांबल्या आहेत. आज आसाम अनेक निकषांवर देशातील इतर राज्यांपेक्षा पुढे जात आहे.

त्याचप्रमाणे, मी दुसऱ्या एका राज्याचा उल्लेख करेन, त्रिपुरा. त्रिपुरामध्येही अनेक दशकांच्या डाव्या विचारसरणीच्या शासनानंतर, लोकांनी पहिल्यांदा भाजपला संधी दिली. त्रिपुराही विकासाच्या प्रत्येक निकषावर खूप मागे होता. पायाभूत सुविधांची दूरवस्था होती, सरकारी व्यवस्थेत लोकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. हिंसाचार आणि भ्रष्टाचाराने प्रत्येकजण त्रस्त होता. आणि जेव्हापासून भाजपला सेवा करण्याची संधी मिळाली, आज त्रिपुरा शांतता आणि प्रगतीचे एक उत्तम उदाहरण बनत आहे.

 

मित्रांनो,

आपला ओदिशासुद्धा अनेक दशकांपासून अनेक समस्यांशी झगडत होता. गरीब आणि शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे हक्क पूर्णपणे पोहोचत नव्हते. भ्रष्टाचार आणि लालफितीच्या कारभाराचा प्रभाव वाढला होता. ओडिशाची पायाभूत सुविधा दयनीय स्थितीत  होती. ओदिशातील अनेक भाग विकासात मागे पडत होते. अशी अनेक आव्हाने ओदिशाचे दुर्दैव बनली होती. या आव्हानांवर मात करण्यासाठी गेल्या एका वर्षात भाजप सरकारने पूर्ण ताकदीने काम केले आहे.

मित्रांनो,

येथे विकासाचे जे 'डबल इंजिन' चालले आहे, त्याचे फायदे आता दिसत आहेत. आज येथे जे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले आहे, त्यावर 'डबल इंजिन'ची छाप आहे. ओदिशातील 'डबल इंजिन'ने येथील जनतेला दुप्पट लाभ दिला आहे. मी एक उदाहरण देतो. तुम्हाला माहीत आहे की, दीर्घकाळापासून ओदिशातील लाखो गरीब कुटुंबे आयुष्मान योजनेच्या बाहेर होती. आज आयुष्मान भारत जन आरोग्य योजना आणि गोपबंधु जन आरोग्य योजना ही दोन्ही इंजिने येथे कार्यरत आहेत. यामुळे ओदिशातील सुमारे 3 कोटी लोकांना मोफत उपचारांचा लाभ मिळणार हे निश्चित झाले आहे. आणि केवळ ओदिशातील रुग्णालयांमध्येच नाही, तर जर कोणी कामासाठी देशातील दुसऱ्या राज्यांत गेला असेल, तर गरज पडल्यास त्याला तिथेही मोफत उपचार मिळण्यास सुरुवात झाली आहे. मी तर पाहत आहे, माझा जन्म गुजरातमध्ये झाला आणि आमच्या सूरत शहरात एका प्रकारे मी म्हणेन की तुम्ही दोन पावले चाललात की, तुम्हाला कोणी ना कोणी ओडिया माणूस भेटेल, इतके ओदिशाचे लोक सूरतमध्ये राहतात. आता या योजनेचा लाभ सूरतमध्ये राहणाऱ्या माझ्या ओदिशाच्या बांधवांनाही मिळेल. आतापर्यंत ओदिशातील ज्या 2 लाख लोकांवर या योजनेअंतर्गत उपचार झाले आहेत, त्यापैकी अनेकांना देशातील एक डझनहून अधिक राज्यांमध्ये मोफत उपचार मिळाले आहेत. एक वर्षापूर्वीपर्यंत इतक्या लोकांना मोफत उपचारांची अशी सुविधा शक्यच नव्हती. या 'डबल इंजिन'मुळे ‘सोन्याहून पिवळे’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 

ओदिशामध्ये 70 वर्षांवरील 23 लाखांहून जास्त वृद्ध आहेत. त्यांना प्रधानमंत्री वय वंदन योजनेद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची हमी देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आमच्या सरकारने सामान्य कुटुंबांची मोठी चिंता, हलकी करण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे, पूर्वी ओदिशातील शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा पूर्ण लाभ मिळू शकत नव्हता. आता ओदिशातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य, दोन्ही योजनांचा दुहेरी फायदा मिळू लागला आहे. शेतकऱ्यांना धानासाठी  जास्त किंमत देण्याच्या आम्ही दिलेल्या हमीमुळे लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे.

मित्रांनो,

केंद्राच्या अनेक योजना आहेत ज्यांचे पूर्ण फायदे पूर्वी ओदिशाला मिळत नव्हते. आज केंद्र आणि राज्य, दोन्ही सरकारांच्या योजनांचा लाभ लोकांना मिळत आहे. एवढेच नाही तर निवडणुकीदरम्यान आम्ही माता, भगिनी, शेतकरी आणि तरुणाईला दिलेल्या हमी, जलद गतीने अंमलात आणल्या गेल्या आहेत.

मित्रांनो,

आमच्या सरकारच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक म्हणजे वंचितांचे सक्षमीकरण! ओदिशात आपला आदिवासी समाज  मोठ्या प्रमाणात राहतो. परंतु दुर्दैवाने, भूतकाळात आदिवासी समाजाची सतत उपेक्षा झाली; त्यांच्या वाट्याला मागासलेपणा, गरिबी आणि दुर्भिक्ष्य आले. देशावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या पक्षाने आदिवासींचा राजकारणासाठी उपयोग केला. या लोकांनी आदिवासी समाजाला विकास दिला नाही किंवा सहभागही दिला नाही. या लोकांनी देशाचा एक मोठा भाग नक्षलवाद, हिंसाचार आणि अत्याचाराच्या आगीत ढकलला.

 

मित्रांनो,

परिस्थिती अशी होती की 2014 पूर्वी देशातील 125 हून अधिक आदिवासी बहुल जिल्हे, नक्षलवादी हिंसाचाराच्या विळख्यात होते. आदिवासी भागांना ‘रेड कॉरिडॉर’ (लाल पट्टा-नक्षलवाद/माओवादी हिंसाचारग्रस्त क्षेत्र) या नावाने बदनाम करण्यात आले होते. या भागांतील बहुतेक जिल्ह्यांना मागास घोषित करून जबाबदारी झटकली गेली होती.

बंधू आणि भगिनींनो,

गेल्या काही वर्षांत, आम्ही आदिवासी समाजाला हिंसाचाराच्या वातावरणातून बाहेर काढून विकासाच्या नवीन मार्गावर नेण्याचे काम केले आहे. एकीकडे, भाजपा सरकारने हिंसाचार पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली, तर दुसरीकडे, आदिवासी भागात विकासाची एक नवीन लाट आणली. याचा परिणाम असा झाला आहे की आज देशातील नक्षलवादी हिंसाचाराची व्याप्ती 20 पेक्षा कमी जिल्ह्यांपर्यंत उरली आहे. आणि ज्या वेगाने कारवाई केली जात आहे, त्यामुळे लवकरच आदिवासी समाजाला हिंसाचारापासून मुक्तता मिळेल….देशात नक्षलवाद संपेल आणि… ही मोदींची हमी आहे.

 

मित्रांनो,

आदिवासी मित्रांच्या स्वप्नांची पूर्तता करणे, त्यांना नवीन संधी देणे, त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. म्हणूनच, पहिल्यांदाच, आदिवासी विकासासाठी देशात दोन खूप मोठ्या राष्ट्रीय योजना आखण्यात आल्या आहेत. या दोन्ही योजनांवर एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च केले जात आहेत. पहिली योजना म्हणजे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान, ज्याचे नाव बिरसा मुंडा जी यांच्या नावावर आहे, या अंतर्गत, देशभरातील 60 हजारांहून अधिक आदिवासी गावांमध्ये विकास कामे केली जात आहेत. येथे ओदिशामध्येही आदिवासींसाठी घरे बांधली जात आहेत, रस्ते बांधले जात आहेत, वीज आणि पाण्याची सुविधा निर्माण केली जात आहे. येथे ओदिशाच्या 11 जिल्ह्यांमध्ये 40 निवासी शाळा देखील बांधल्या जात आहेत. केंद्र सरकार यावरही शेकडो कोटी रुपये खर्च करत आहे.

मित्रांनो,

दुसरी योजना म्हणजे पंतप्रधान जनमन योजना…या योजनेची प्रेरणा ओदिशाच्या भूमीतूनच मिळाली आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती, ओदिशाच्या कन्या, आदरणीय द्रौपदी मुर्मू जी यांनी या योजनेसाठी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. या योजनेअंतर्गत आदिवासींमधील सर्वात मागासलेल्या आदिवासी जातींना मदत करण्यासाठी काम केले जात आहे. त्यांच्या अनेक छोट्या-छोट्या आदिवासी पाड्यांमध्ये शेकडो कोटी रुपयांची कामे केली जात आहेत.

 

मित्रांनो,

ओदिशात मोठ्या संख्येने आपले मच्छिमार राहतात. त्यांच्यासाठीही पहिल्यांदाच पंतप्रधान मत्स्य संपदा योजना…एक खूप मोठी योजना..एक देशव्यापी योजना बनवण्यात आली आहे. पहिल्यांदाच मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा देखील मिळत आहे. केंद्र सरकार 25 हजार कोटींचा विशेष निधी तयार करणार आहे. याचा ओदिशातील समुद्रकिनारी भागात राहणाऱ्या मित्रांना, आपल्या तरुणाईला… खूप फायदा होईल.

मित्रांनो,

21 व्या शतकातील भारताच्या विकासाला पूर्व भारतातूनच गती मिळेल. हा पूर्वोदयाचा काळ आहे. याच भावनेने आम्ही ओदिशासह संपूर्ण पूर्व भारताच्या विकासासाठी झटत आहोत. एक वर्षापूर्वी येथे भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर, या मोहिमेला अधिक गती मिळाली आहे. ओदिशातील पारादीप ते झारसुगुडा पर्यंत औद्योगिक क्षेत्रे विस्तारत आहेत. यामुळे ओदिशातील खनिजे आणि बंदरांवर आधारित अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. केंद्र सरकार ओदिशातील रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. पारादीपमध्ये मेगा ड्युअल फीड क्रॅकर (दुहेरी कच्चा पुरवठा प्रक्रिया संयंत्र-दोन प्रकारच्या कच्च्या इंधनावर प्रक्रिया करून पेट्रोकेमिकल उत्पादन निर्मिती). आणि डाउन-स्ट्रीम युनिटची (अंतिम उत्पादन प्रक्रिया यंत्रणा-क्रॅकरमधून तयार झालेल्या रसायनांवर पुढची प्रक्रिया करुन वापरण्यायोग्य अंतिम उत्पादन बनवणे) स्थापना, चंडीखोलमध्ये कच्च्या तेलाची साठवणूक सुविधा, गोपाळपूरमध्ये एलएनजी सुविधा केंद्राचे ( द्रवरूप नैसर्गिक वायू टर्मिनल) बांधकाम, अशा अनेक निर्णयांद्वारे  ओदिशाला एक मोठे औद्योगिक राज्य म्हणून स्थापित केले जाईल. पेट्रोलियम, पेट्रो-रसायने, कापड आणि प्लास्टिकशी संबंधित उद्योगांना येथे चालना मिळेल. यामुळे येथे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचे एक मोठे जाळे निर्माण होईल आणि त्यामुळे तरुणाईसाठी लाखो नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गेल्या काही वर्षांत ओदिशातील पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ओदिशा हे भारताचे पेट्रोकेमिकल्स हब (प्रमुख केंद्र) बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

मित्रांनो,

मोठी ध्येये साध्य करण्यासाठी आपल्याला काळाच्या खूप पुढे पाहावे लागते…एक दूरदृष्टी ठेवावी लागते. येथील आपले भाजपा सरकार एका वर्षाच्या कामगिरीपुरते मर्यादित नाही आणि पाच वर्षांनी काय होईल यापुरताच फक्त विचार करत नाही. येत्या दशकांसाठी ओदिशाच्या विकासाच्या कार्यपद्धतीची रूपरेषा काय असेल यावर ते काम करत आहे. ओदिशा सरकारने 2036 साठी… जेव्हा ओदिशा राज्य 100 वर्षे पूर्ण करेल…एक विशेष योजना तयार केली आहे. ओदिशातील भाजपा सरकारकडे 2047 साठी… जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल…देखील एक रोडमॅप आहे,. मी ओदिशा व्हिजन-2036 पाहत होतो–त्यात खूप महत्त्वाकांक्षी संकल्प मांडले आहेत. मला खात्री आहे की ओदिशाच्या प्रतिभावंत आणि कष्टाळू तरुणाईच्या बळावर तुम्ही निश्चितच प्रत्येक ध्येय साध्य कराल. आपण सर्व मिळून एकत्रितपणे,  ओदिशाला विकासाच्या नवीन उंचीवर घेऊन जाऊ. या वचनासह, पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!

समस्तकुं पुणी थरे मोर नमस्कार, जोहार!(सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार, जोहार…दंडवत!

जय जगन्नाथ!

जय जगन्नाथ!

जय जगन्नाथ!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Apple exports record $2 billion worth of iPhones from India in November

Media Coverage

Apple exports record $2 billion worth of iPhones from India in November
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2025
December 17, 2025

From Rural Livelihoods to International Laurels: India's Rise Under PM Modi