“तिरंगा प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची शक्ती देतो”
"भारत आपल्या कर्तृत्व आणि यशाच्या आधारे नवीन प्रभाव निर्माण करत असून जग त्याची दखल घेत आहे"
"ग्रीस हे भारतासाठी युरोपचे प्रवेशद्वार ठरेल आणि भारत-यूरोपीय महासंघ संबंधांसाठी एक मजबूत माध्यम ठरेल"
"21 वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित असून 2047 सालापर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागेल"
"चांद्रयानाच्या यशामुळे निर्माण झालेला उत्साह शक्तीमध्ये परिवर्तित करणे आवश्यक"
“जी 20 शिखर परिषदेदरम्यान दिल्लीतील लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल मी आगाऊ माफी मागतो. मला खात्री आहे की जी 20 शिखर परिषद यशस्वी करून दिल्लीचे लोक शास्त्रज्ञांच्या कामगिरीला नवे बळ देतील”

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

आज सकाळी मी बंगळुरुला होतो, पहाटेच पोचलो होतो, असे ठरवले होते की भारतात गेल्यावर, ज्या शास्त्रज्ञांनी देशासाठी एवढी मोठी कामगिरी केली, त्यांचं  दर्शन घेईन, आणि म्हणून मी पहाटेच तिथे गेलो. पण जनतेने सकाळी सूर्योदयापूर्वीच हातात तिरंगा धरून ज्या प्रकारे चांद्रयानाचे यश साजरे केले ते खूप प्रेरणादायी होते, आणि आता कडक उन्हात सूर्य तापलेला आहे, या महिन्यातले उन तर कातडी जाळते. अशा कडक उन्हात आपण सर्वजण इथे आलात आणि चांद्रयानाचे यश साजरे केले, मलाही त्या आनंदात सहभागी करून घेतले, हे माझे भाग्य आहे. आणि मी यासाठी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो.

आज जेव्हा मी सकाळी इस्रोला पोहोचलो, तेव्हा चांद्रयानाने काढलेली छायाचित्रे पहिल्यांदा प्रकाशित करण्याचा बहुमान मला मिळाला. कदाचित आता तुम्हीही ती छायाचित्रे टीव्हीवर पाहिली असतील. ती सुंदर छायाचित्रे म्हणजे एक खूप मोठ्या वैज्ञानिक यशाचे जिवंत उदाहरण आहे. सर्वसामान्यपणे जगात एक परंपरा आहे की, अशा प्रकारच्या यशस्वी अभियाना बरोबर त्या जागेला काही नाव दिले जाते, तर खूप विचार केल्यावर मला असे वाटले, आणि  चांद्रयान-3 चंद्रावर ज्या जागी अवतरले, त्या जागेला एक नाव दिले गेले आणि ते नाव ‘शिवशक्ती’ असे आहे. जेव्हा शिवाचे नाव घेतले जाते, तेव्हा ते मंगलमय ठरते, आणि जेव्हा  शक्तीचा उल्लेख होतो, तेव्हा ती माझ्या देशाची नारी शक्ती असते. शिवाचा विचार केला की हिमालयाचा विचार येतो आणि जेव्हा शक्तीचा विचार येतो तेव्हा कन्याकुमारीचा विचार येतो, ही भावना हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत प्रतिबिंबित करण्यासाठी त्या जागेसाठी  ‘शिवशक्ती’ हे नाव निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे 2019 मध्ये चांद्रयान-2 च्या जागेला नाव देण्याचा विचार पुढे आला होता, पण मन तयार नव्हते, मनापासून असा संकल्प केला होता की ज्या वेळी आपल्याला या प्रवासात खऱ्या अर्थाने यश मिळेल, तेव्हा पॉइंट 2 ला देखील नाव मिळेल. आणि चांद्रयान-3 यशस्वी ठरले, त्यामुळे आज चांद्रयान-2 च्या जागेलाही (पॉइंट) नाव देण्यात आले, आणि त्या पॉइंटला 'तिरंगा' असे नाव देण्यात आले. तिरंगा प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देतो, तिरंगा प्रत्येक स्वप्न साकार करण्याची प्रेरणा देतो आणि म्हणूनच चांद्रयान 2 मध्ये अपयश आले, आणि चांद्रयान 3 मध्ये यश मिळाले, म्हणून तिरंगाच आपले प्रेरणा स्थान ठरले. त्यामुळे चांद्रयान-2 चा पॉइंट आता तिरंगा म्हणून ओळखला जाईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी आज सकाळी घोषित केली, 23 ऑगस्ट हा भारताच्या वैज्ञानिक विकासाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे आणि म्हणून भारत दरवर्षी 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करेल.

 

मित्रहो,

गेले काही दिवस मी ब्रिक्स (BRICS) परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत होतो. या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेला संपूर्ण आफ्रिकेतील देशांना निमंत्रित करण्यात आले होते. आणि ब्रिक्स परिषदेत मी पहिले की, जगात क्वचितच कोणी अशी व्यक्ती असेल, जी चांद्रयानाबद्दल बोलली नसेल, अभिनंदन केले नसेल, आणि तिथे जे अभिनंदन मिळाले, ते इथे येताच मी सर्व शास्त्रज्ञांच्या स्वाधीन केले, आणि आपल्या सर्वांनाही ते सुपूर्द करतो. संपूर्ण जगाने आपले अभिनंदन केले आहे.   

 

मित्रहो,

चांद्रयानच्या या प्रवासाविषयी, या कालातीत यशाबद्दल आणि नवीन भारताबद्दल, नवीन स्वप्नांबद्दल, नवीन संकल्पांबद्दल आणि नवीन सिद्धीबद्दल जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत होता, एकापाठोपाठ एक जगात नवा प्रभाव, जग आज भारताच्या तिरंग्याच्या ताकदीचा अनुभव घेत आहे, स्वीकारत आहे आणि त्याचा गौरवही करत आहे.

 

मित्रहो,

ब्रिक्स परिषदेनंतर मी ग्रीसला गेलो होतो, 40 वर्षे उलटून गेली, एकाही भारतीय पंतप्रधानाने ग्रीसला भेट दिली नव्हती. माझे हे भाग्य आहे की, अनेक राहून गेलेली कामे मला करायला मिळतात. ग्रीस मधेही भारताचा मान-सन्मान झाला, ग्रीस हे एक प्रकारे युरोपचे प्रवेशद्वार बनेल आणि भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी भारत आणि ग्रीस यांच्यातील मैत्री हे एक उत्तम माध्यम बनेल, असे ग्रीसला वाटते.

 

मित्रहो,

आगामी काळात आपल्यावरही काही जबाबदाऱ्या आहेत. शास्त्रज्ञांनी आपले काम केले आहे. उपग्रह असो, चांद्रयानाचा प्रवास असो, त्याचा सामान्य माणसाच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो आणि म्हणूनच आता माझ्या देशातील तरुणांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली पाहिजे, आपल्याला हे करायचे आहे. आपण केवळ उत्सव, आनंद, आशा, नवी ऊर्जा, यातच अडकून पडणारे लोक नाही आहोत, आपण एक यश मिळवतो, तेव्हाच मजबूत पावले टाकून नवीन झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आणि म्हणूनच, सुशासनासाठी, समाजाच्या वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी, सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्यासाठी हे अंतराळ विज्ञान कसे उपयोगी ठरू शकते, हे उपग्रह कसे उपयोगी ठरू शकतात, हा प्रवास कसा उपयोगी ठरू शकतो, या सर्व गोष्टींवर आपल्याला काम करायचे आहे. आणि म्हणूनच, सरकारच्या सर्व विभागांनाही मी सूचित करतो की, ते आपापल्या  विभागात सामान्य नागरिकांना सेवा देण्यामध्ये अंतराळ विज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करावा, त्वरित प्रतिसाद देण्यासाठी, पारदर्शक व्यवहारांसाठी उपयोग करावा, त्याचा परिपूर्ण उपयोग कसा करता येईल, हे त्यांनी शोधून काढावे. आणि मला लवकरच देशातील तरुणांसाठी हॅकाथॉनचे आयोजन करायचे आहे. भूतकाळात, देशातील लाखो विद्यार्थ्यांनी अनेक हॅकाथॉनमध्ये 30-30, 40-40 तास अथक काम केले आहे आणि उत्कृष्ट कल्पना मांडल्या आहेत आणि त्यातून एक प्रकारे वातावरण निर्मिती झाली आहे. मला येत्या काळात अशा हॅकाथॉनची एक मोठी मालिका चालवायची आहे जेणेकरून देशाचे तरुण मन, तरुण प्रतिभा आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्या अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवता येतील, आम्ही त्या दिशेने काम करू.   

याबरोबरच नवीन पिढीला विज्ञानाकडे आकर्षित करायचे आहे. 21 वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि तोच देश जगात पुढे जाणार आहे, ज्यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्राविण्य आहे. आणि म्हणूनच 2047 पर्यंत आपल्या देशाला विकसित भारत बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मार्गावर अधिक दृढतेने पुढे जाणे ही काळाची गरज आहे. आपल्या नव्या पिढीला वैज्ञानिक विचारांनी पुढे जाण्यासाठी लहानपणापासून तयार करावे लागेल. आणि म्हणूनच हे जे प्रचंड यश मिळाले आहे, ही आशा, हा उत्साह, याला शक्तीमध्ये परिवर्तीत करायचे आहे आणि त्यासाठी, 1 सप्टेंबरपासून MyGov वर एक प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू होणार आहे, आपले तरुण जेव्हा ती लहान लहान प्रश्नोत्तरे पाहतील, तेव्हा त्यांना हळूहळू त्यामध्ये रुची निर्माण होईल. आणि जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला मोठे स्थान देण्यात आले आहे. आपले नवीन शैक्षणिक धोरण त्याला मोठे बळ देणारे आहे आणि आपली प्रश्नमंजुषा स्पर्धा,  या दिशेला जाण्याचा एक मार्ग बनेल. आज मी या ठिकाणी देशातील युवा, माझ्या देशातील विद्यार्थी आणि प्रत्येक शाळेला हे आवाहन करतो की, चांद्रयानाशी संबंधित या प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. देशातील कोट्यवधी युवकांनी यात सहभागी व्हावे आणि त्याला पुढे घेऊन जावे, मला वाटते, याने खूप फरक पडेल.

आज तुम्ही सर्वजण माझ्यासमोर आला आहात, त्यामुळे मला आणखी एका गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. जगाचे भारताविषयीचे कुतूहल वाढले आहे, आकर्षण वाढले आहे, विश्वास वाढला आहे, पण हे सर्व असूनही असे अनेक प्रसंग असतात, जेव्हा या गोष्टींची जाणीव होणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना लवकरच ती संधी मिळणार आहे, आणि विशेषतः दिल्ली वासियांना ती संधी मिळणार आहे आणि ती म्हणजे, जी-20 परिषद. एक प्रकारे जगाचे निर्णायक नेतृत्व आपल्या दिल्लीच्या भूमीवर एकत्र येईल, ते भारतात असेल. संपूर्ण भारत यजमान आहे, पण पाहुणे दिल्लीत येणार आहेत.

जी-20 चे अध्यक्षपद, संपूर्ण देश यजमान आहे, पण सर्वात जास्त जबाबदारी माझ्या दिल्लीच्या बंधू-भगिनींची आहे, माझ्या दिल्लीच्या नागरिकांची आहे. आणि म्हणूनच आपल्या दिल्लीला हे दाखवून द्यायचे आहे की, देशाच्या प्रतिष्ठेला जराही धक्का लागू नये. माझ्या दिल्लीतील बंधू-भगिनींना देशाच्या अभिमानाचा झेंडा उंच उंचावण्याचे भाग्य लाभले आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जगभरातील पाहुणे येणार, तेव्हा गैरसोय तर होणारच, आपल्या घरी जेव्हा 5-7 पाहुणे येतात, तेव्हा घरातले लोक सोफ्यावर बसत नाहीत, बाजूच्या छोट्या खुर्च्यांवर बसतात, कारण आपण पाहुण्यांना जागा देतो. आपल्याकडे अतिथी देवो भव चे संस्कार आहेत, आपण जेवढा जास्त मान, सन्मान, आतिथ्य जगाला देऊ, तेवढा आपला सन्मान वाढणार आहे, आपला गौरव वाढणार आहे, आपली विश्वासार्हता वाढणार आहे, आणि म्हणूनच सप्टेंबर मध्ये 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत या ठिकाणी अनेक उपक्रम आयोजित केले जातील. या दिवसांमध्ये दिल्लीवासियांची जी गैरसोय होणार आहे, त्यासाठी मी आजच त्यांची क्षमा मागतो. आणि मी त्यांना विनंती करतो, हे पाहुणे आपल्या सर्वांचे आहेत, आपल्याला थोडी अडचण होईल, काही गैरसोय होईल, सर्व ठिकाणची वाहतूक व्यवस्था बदलेल, आपल्याला अनेक ठिकाणी जाण्यापासून रोखले जाईल, परंतु काही गोष्टी आवश्यक आहेत. आणि आपल्याला माहित आहे, कुटुंबात लग्न समारंभ असेल, तरी सगळे म्हणतात, नखे कापायची असतील, तरी रक्त येऊ नये, कारण समारंभामध्ये जखम होता कामा नाही, काही वाईट होऊ नये. तर हा एक मोठा प्रसंग आहे, एक कुटुंब म्हणून, हे सर्व पाहुणे आपले आहेत, आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने, आपली G-20 परिषद भव्य, रंगतदार व्हावी, आपली संपूर्ण दिल्ली रंग-सुरांनी भरून जावी, हे काम माझे दिल्लीचे नागरिक, बंधू-भगिनी करून दाखवतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,

काही दिवसांनी रक्षाबंधनाचा सण येईल. बहीण भावाला राखी बांधते. आणि आपण तर म्हणतो, चांदोमामा. लहानपणापासूनच शिकवले जाते, चांदोमामा, आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते, धरती माता, धरती आई आहे, चंद्र मामा आहे, म्हणजेच, आपली धरती माता चांदोमामाची बहीण आहे, आणि हा राखीचा सण ही धरती माता, लूनरला राखीच्या स्वरुपात पाठवून चांदोमामा बरोबर रक्षाबंधनचा सण साजरा करणार आहे. आणि म्हणूनच आपणही राखीचा हा सण असा साजरा करूया, असा बंधुभाव, असे प्रेम, या आपल्या संकृतीची, आपल्या परंपरेची जगाला ओळख करून देऊया. मला विश्वास आहे की, हा सण दिमाखदार असेल आणि सप्टेंबर महिना आपल्यासाठी अनेक अर्थाने तसा असेल. पुन्हा एकदा, यावेळी शास्त्रज्ञांनी चांद्रयानच्या यशाने जगात जो ध्वज फडकावला आहे, त्या ध्वजाला आम्ही दिल्लीकर G-20 च्या अप्रतिम आदरातिथ्याने नवीन बळ देऊ, असा मला विश्वास आहे. एवढ्या उन्हात येथे आल्याबद्दल, तिरंगा फडकावून आपल्या शास्त्रज्ञांच्या यशाचा उत्सव एकत्रितपणे साजरा केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्या बरोबर बोला-

भारत माता की जय! भारत माता की जय!

भारत माता की जय!

मनःपूर्वक धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Centre hikes MSP on jute by Rs 315, promises 66.8% returns for farmers

Media Coverage

Centre hikes MSP on jute by Rs 315, promises 66.8% returns for farmers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जानेवारी 2025
January 23, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Effort to Celebrate India’s Heroes