पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.
वर्ल्ड फूड इंडिया 2025 चे आयोजन 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले असून, या माध्यमातून अन्न प्रक्रिया क्षेत्र, अन्न शाश्वतता आणि पौष्टिक आणि सेंद्रिय अन्नाचे उत्पादन यामधील भारताचे सामर्थ्य प्रदर्शित केले जाईल.
वर्ल्ड फूड इंडियामध्ये, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण (पीएमएफएमई) योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया क्षेत्रातील 2,510 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सूक्ष्म प्रकल्पांसाठी सुमारे 26,000 लाभार्थ्यांना 770 कोटी रुपयांपेक्षा जास्त पत-आधारित सहाय्य प्रदान केले जाईल.
वर्ल्ड फूड इंडियामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठका, तांत्रिक सत्रे, प्रदर्शने आणि बी2बी (बिझनेस-टू-बिझनेस), बी2जी (बिझनेस-टू-गव्हर्नमेंट) आणि जी2जी (गव्हर्नमेंट-टू-गव्हर्नमेंट) बैठका यासह अनेक व्यावसायिक संवाद समाविष्ट असतील. यामध्ये 150 आंतरराष्ट्रीय सहभागींसह फ्रान्स, जर्मनी, इराण, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, डेन्मार्क, इटली, थायलंड, इंडोनेशिया, तैवान, बेल्जियम, टांझानिया, इरिट्रिया, सायप्रस, अफगाणिस्तान, चीन आणि अमेरिका यासह 21 प्रदर्शनकर्त्या देशांची प्रदर्शने देखील आयोजित केले जाईल.
वर्ल्ड फूड इंडियामध्ये जागतिक अन्न प्रक्रिया केंद्र म्हणून भारत, अन्न प्रक्रिया क्षेत्रात शाश्वतता आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट, अन्न प्रक्रियेतील अग्रणी, भारतातील पाळीव प्राण्यांचे अन्न उद्योग, पोषण आणि आरोग्यासाठी प्रक्रियाकृत अन्न, वनस्पती-आधारित अन्नपदार्थ, न्यूट्रास्युटिकल्स, विशेष अन्न पदार्थ, यासारख्या विविध विषयांवर आधारित सत्रे देखील असतील. प्रदर्शनात 14 मंडप असतील, यापैकी प्रत्येक मंडप विशिष्ट संकल्पनेसाठी समर्पित असेल, आणि या ठिकाणी सुमारे 100,000 लोक भेट देतील असा अंदाज आहे.


