भोपाळमध्ये विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन आणि पायाभरणी
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांचे नाव आपल्यामध्ये आदराची भावना निर्माण करते, त्यांच्या महान व्यक्तिमत्वाविषयी बोलायला शब्द अपुरे
देवी अहिल्याबाई या भारताच्या वारशाच्या महान संरक्षक होत्याः पंतप्रधान
माता अहिल्याबाई या राष्ट्रनिर्मितीमधील आपल्या महिला शक्तीच्या अमूल्य योगदानाचे प्रतीक आहेतः पंतप्रधान
आमचे सरकार महिला प्रणीत विकासाच्या दृष्टीकोनाला विकासाचा आस बनवत आहेः पंतप्रधान
नमो ड्रोन दीदी अभियान ग्रामीण महिलांना प्रोत्साहन देत आहे, त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहेः पंतप्रधान
आज, आपल्या प्रमुख अंतराळ मोहिमांमध्ये मोठ्या संख्येने महिला शास्त्रज्ञ काम करत आहेतः पंतप्रधान
ऑपरेशन सिंदूर देखील महिला शक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे- पंतप्रधान

लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात भोपाळ येथे लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी  भोपाळमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'माँ भारती'ला अभिवादन केले आणि भारतातील महिलांच्या सामर्थ्याचे महत्त्व विशद करत आपल्या संबोधनाची सुरूवात केली. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या भगिनी आणि कन्यांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांची आज असलेली 300 वी जयंती म्हणजे 140 कोटी भारतीयांसाठी प्रेरणादायी दिवस आहे आणि राष्ट्रउभारणीच्या उल्लेखनीय प्रयत्नांमध्ये योगदान देण्याचा क्षण आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देवी अहिल्याबाई यांचे विचार उद्धृत करत, खरे शासन म्हणजे लोकांची सेवा करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे आहे, असे त्यांनी सांगितले. आजचा कार्यक्रम त्यांच्या दृष्टीकोनाला सामावून घेणारा आणि त्यांच्या सिद्धांतांना पुढे नेणारा आहे, असे त्यांनी नमूद केले.  दतिया आणि सतनासाठी एयर कनेक्टिव्हिटीच्या समावेशाबरोबरच इंदूर मेट्रोचा शुभारंभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.  या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल, विकासाला चालना मिळेल आणि नव्या रोजगार संधी निर्माण होतील यावर त्यांनी भर दिला.

लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांचे नाव ऐकताक्षणी अतिशय मोठ्या प्रमाणात आदरभावना निर्माण होत असल्याचे सांगत मोदी म्हणाले की त्यांच्या उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. देवी अहिल्याबाई दृढ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाच्या शक्तीचे प्रतीक आहेत, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी परिवर्तनकारी परिणाम साध्य करता येतात हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. इतिहासाचा दाखला देत मोदी यांनी सांगितले की अडीच ते तीन शतकांपूर्वी, जेव्हा राष्ट्र दडपशाहीने जखडले गेले होते, तेव्हा अशा असाधारण पराक्रमांचे दर्शन घडवणे, जे इतके सखोल होते की पिढ्यानपिढ्या त्यांची चर्चा होत राहते – ते सोपे काम नव्हते,

 

देवाची सेवा आणि लोकसेवा यात लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी कधीही फरक केला नाही हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की त्या नेहमीच सोबत शिवलिंग घेऊन जात असल्याने त्यांच्या गाढ भक्तीसाठी त्या ओळखल्या जात होत्या. त्यांच्या काळातील आव्हानांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की अशा युगामध्ये राज्याचे नेतृत्व करणे म्हणजे काटेरी मुकुट परिधान करण्याप्रमाणे होते. तरीही लोकमाता अहिल्याबाईंनी गरिबातील गरिबाचे सक्षमीकरण करण्यासाठी स्वतःला समर्पित करत आपल्या राज्याला समृद्धीची एक नवी दिशा दिली. “लोकमाता अहिल्याबाई या भारताच्या वारशाच्या एक महान संरक्षक होत्या, असे मोदी यांनी सांगितले. ज्या काळात देशाची संस्कृती, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांवर हल्ले होत होते, त्या काळात या सर्वांचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काशी विश्वनाथसह देशातील असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. लोकमाता अहिल्याबाईंनी जिथे अतिशय मोठ्या प्रमाणात विकासाची कामे हाती घेतली त्या वाराणसी शहराची सेवा करण्याची जबाबदारी आपल्याकडे सोपवण्यात आल्याबद्दल त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

गरीब आणि उपेक्षितांच्या कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या एका अनुकरणीय शासनाच्या मॉडेलची त्यांनी अंमलबजावणी केली, असे मोदी यांनी अधोरेखित केले. रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी शेती, वनोत्पादन आधारित कुटिरोद्योग आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी, त्यांनी लहान कालवे विकसित केले आणि व्यापक जलसंधारणाचे प्रयत्न केले, सुमारे 250-300 वर्षांपूर्वी असंख्य तलाव बांधले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पीक विविधतेला चालना देण्यासाठी त्यांनी कापूस आणि मसाल्यांच्या शेतीला प्रोत्साहन दिले. आदिवासी जमाती आणि भटक्या समुदायाबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनावर मोदी यांनी भर दिला. त्यांच्या उपजीविकेला पाठबळ देण्यासाठी पडीक जमिनींवर त्यांना शेती करण्याच्या सुविधा दिल्या, असे सांगितले. भारताच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिलेच्या मार्गदर्शनानुसार काम करणे म्हणजे बहुमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जगप्रसिद्ध माहेश्वरी साड्यांच्या उत्पादनासाठी नव्या उद्योगांची स्थापना करून देशातील विणकरांना मोठ्या प्रमाणात फायदा करून देत वस्त्रोद्योग क्षेत्रात  देवी अहिल्याबाईंनी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली. देवी अहिल्याबाईंनी सुमारे 250-300 वर्षांपूर्वी गुजरातमधील जुनागढ येथील काही साडी विणणाऱ्या कुटुंबांना साडी विणण्यासाठी आमंत्रित केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

मुलींच्या विवाहाचे किमान वय वाढवणे, महिलांना मालमत्तेचा अधिकार मिळवून देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देणे अशा काही मुद्यांसह महत्त्वाच्या सामाजिक सुधारणांसाठी देवी अहिल्याबाई नेहमीच लक्षात राहतील, ज्या मुद्यांवर त्यांच्या काळात चर्चा करणेही कठीण होते, असे पंतप्रधान म्हणाले. सामाजिक आव्हानांना न जुमानता, देवी अहिल्याबाईंनी या प्रगतीशील सुधारणांचा जोरदार पुरस्कार केला, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी माळवा सैन्यात एक विशेष महिला तुकडी देखील स्थापन केली आणि गावांमध्ये महिला सुरक्षा गटांची स्थापना केली, ज्यामुळे संरक्षण आणि सक्षमीकरण सुनिश्चित झाले. "माता अहिल्याबाई राष्ट्र उभारणीत महिलांच्या अमूल्य योगदानाचे प्रतीक आहेत", असे सांगत मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आणि सर्वांवर त्यांचे आशीर्वाद कायम रहावेत अशी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी देवी अहिल्याबाई होळकर यांच्या एका प्रेरणादायी विधानाचा उल्लेख करत सांगितले की “जे काही आपण प्राप्त करतो, ते लोकांचे ऋण असते आणि ते फेडलेच पाहिजे.” हे मूल्य लक्षात घेऊनच सरकार ‘नागरिक देवो भव’ हा शासनाचा मंत्र म्हणून स्वीकारुन कार्य करत आहे. त्यांनी स्पष्ट केले की महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा दृष्टीकोन हा राष्ट्राच्या प्रगतीच्या केंद्रस्थानी ठेवला जात आहे. आई, बहीण आणि मुली यांना सक्षम करण्यावर केंद्रित असलेल्या प्रत्येक महत्त्वाकांक्षी शासकीय उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पंतप्रधानांनी नमूद केले की गरीबांसाठी 4 कोटी घरे बांधली गेली असून, त्यातील बहुसंख्य घरे महिलांच्या नावे नोंदणी करण्यात आली आहेत. यातील अनेक महिलांसाठी त्यांचे नाव मालमत्तेशी जोडले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे देशभरात कोट्यवधी महिला पहिल्यांदाच गृहस्वामिनी बनल्या आहेत.

 

ते पुढे म्हणाले की प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात सरकार यशस्वी झाले आहे. यामुळे महिलांना भेडसावणाऱ्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. पूर्वी कोट्यवधी महिलांना वीज, एलपीजी गॅस आणि स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. आज या सुविधा देऊन ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील माता-भगिनींचे जीवनमान मोठ्या प्रमाणात सुधारले आहे.

अनेक महिलांना आरोग्याच्या समस्यांबाबत लपवाछपवी करावी लागत असे. आर्थिक अडचणींमुळे गरोदरपणात रुग्णालयात जाणे टाळले जात असे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की आयुष्मान भारत योजनेमुळे आता त्या ₹5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार घेऊ शकतात. शिक्षण आणि आरोग्याच्या जोडीला आर्थिक स्वावलंबन हे महिलांच्या सबलीकरणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत असला की महिलांचा आत्मसन्मान वाढतो आणि घरातील निर्णयप्रक्रियेत त्यांची भूमिका बळकट होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

2014 पूर्वी 30 कोटींपेक्षा जास्त महिलांकडे बँक खाते नव्हते. सरकारने त्यांच्यासाठी जन धन योजना सुरू करून खाते उघडून दिले आणि विविध योजनांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. शहरी व ग्रामीण भागातील महिला आता रोजगार व स्वयंरोजगारात सक्रियपणे सहभागी होत असून मुद्रा योजनेमुळे त्यांना तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत आहे. मुद्रा योजनेच्या 75% लाभार्थ्यांमध्ये महिला आहेत, हे त्यांनी अभिमानाने सांगितले.

देशभरातील 10 कोटी महिला आज स्वयं-सहायता गटांमध्ये कार्यरत असून, त्या नव्या उत्पन्नाच्या संधी निर्माण करत आहेत. सरकारकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ दिले जात आहे. सरकारने 3 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे लक्ष्य ठेवले असून, यातील 1.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी हे यश आधीच प्राप्त केले आहे. गावागावात बँक व्यवहार सेवा पुरवणाऱ्या बँक सख्यांचे त्यांनी कौतुक केले आणि ‘बीमा सखी’ उपक्रमाचा उल्लेख करत महिलांचे विमा क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले.

पूर्वी महिलांना नव्या तंत्रज्ञानापासून दूर ठेवले जात होते, असे सांगून पंतप्रधानांनी स्पष्ट केले की आता भारताने तो काळ मागे टाकला आहे. महिला आणि मुलींना आधुनिक तंत्रज्ञानात नेतृत्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम बनवले जात आहे. शेतीतील ड्रोन क्रांतीत ग्रामीण महिलांचे नेतृत्व दिसून येत असून, ‘नमो ड्रोन दीदी’ उपक्रमामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे, उत्पन्नाच्या संधी मिळत आहेत आणि त्यांची वेगळी ओळख निर्माण होत आहे.

 

देशातील अनेक मुली आता शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंता आणि वैमानिक म्हणून कारकीर्द पूर्ण करत आहेत. विज्ञान व गणित शिक्षणात मुलींच्या नोंदणीत सातत्याने वाढ होत आहे. आज देशाच्या सर्व मोठ्या अंतराळ मोहिमांमध्ये महिला शास्त्रज्ञ काम करत आहेत. चांद्रयान-3 मोहिमेत 100 पेक्षा जास्त महिला शास्त्रज्ञ व अभियंते सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचे योगदानही उल्लेखनीय आहे. भारतातील सुमारे 45% स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे आणि ही संख्या सतत वाढत आहे.

धोरणनिर्मितीत महिलांचा सहभाग वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की भारतात प्रथमच पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री आणि महिला अर्थमंत्री झाल्या आहेत. ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढले असून, सध्या 75 महिला खासदार आहेत. हे प्रतिनिधित्व आणखी वाढावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हीच हाच दृष्टीकोन स्पष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षे रखडलेले हे विधेयक पारित करून सरकारने महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये आरक्षण मिळवून दिले आहे. प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांना सक्षम बनवण्याच्या दिशेने सरकार कार्यरत असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

“भारत ही संस्कृती व परंपरेने समृद्ध भूमी आहे, जिथे सिंदूर हे स्त्रीशक्तीचे प्रतीक मानले जाते,” असे सांगत पंतप्रधानांनी सांगितले की प्रभू रामाच्या भक्तीत रमलेला हनुमान सुद्धा सिंदूर लावत असे, आणि शक्तीपूजेच्या विधींमध्ये सिंदूर अर्पण केला जातो. “सिंदूर आता भारताच्या शौर्याचे प्रतीक झाले आहे,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सांगितले की या दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही, तर भारताच्या सांस्कृतिक मूल्यांवर आघात केला आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याहून महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिले आणि हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी घातक ठरले. “ऑपरेशन सिंदूर ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी दहशतवादविरोधी कारवाई ठरली आहे,” असे त्यांनी नमूद केले. ज्या ठिकाणी पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी भारतीय कारवाईची कल्पनाही केली नव्हती, त्या ठिकाणचे दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केले. दहशतवादाच्या छुप्या युद्धाला आता सहन केले जाणार नाही, हे भारताने स्पष्ट केले आहे. भारत आता केवळ देशांतर्गत धोकेच दूर करणार नाही, तर दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, हेही त्यांनी स्पष्ट केले. “आज प्रत्येक भारतीय हिच भावना व्यक्त करत आहे की तुम्ही गोळ्या झाडाल, तर तुम्हाला तोफांचे प्रत्युत्तर मिळेल,” असा इशारा त्यांनी दिला.

 

"ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या नारी शक्तीच्या क्षमतेचे आणि शौर्याचे प्रतीक आहे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या ऑपरेशनमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला. जम्मू ते पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत, मोठ्या संख्येने बीएसएफ महिला कर्मचारी आघाडीवर होत्या, असे पंतप्रधान म्हणाले. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला या महिलांनी दिलेल्या दृढ प्रतिसादाची, तसेच कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये आणि शत्रूच्या ठिकाणांना नष्ट करण्यात त्यांच्या सक्रिय सहभागाची त्यांनी प्रशंसा केली. राष्ट्रीय संरक्षणात भारताच्या मुलींची क्षमता जग अनुभवत असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा दलांमध्ये महिलांची भूमिका मजबूत करण्यासाठी गेल्या दशकात, सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सैनिक शाळांचे दरवाजे मुलींसाठी उघडण्यात आले, हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, असे ते म्हणाले. 2014 मध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेट्सपैकी केवळ 25% महिला होत्या, तर आज त्यांचा सहभाग 50% पर्यंत वाढला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी उत्तीर्ण झाल्याचा ऐतिहासिक क्षण पंतप्रधानांनी साजरा केला. महिला आता लष्कर, नौदल आणि हवाई दलात उच्च पदांवर कार्यरत आहेत, असे ते म्हणाले. महिला अधिकारी लढाऊ विमानांपासून ते आयएनएस विक्रांत युद्धनौकेपर्यंत धैर्य आणि नेतृत्व दाखवत आहेत आणि भारताच्या संरक्षण दलांमध्ये आपला वाढता सहभाग नोंदवत आहेत, असेही ते म्हणाले.

भारतीय नौदलातील महिलांनी अलिकडेच केलेल्या धाडसी प्रदर्शनावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. नाविका सागर परिक्रमेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की दोन धाडसी महिला अधिकाऱ्यांनी जवळजवळ 250 दिवसांचा सागरी प्रवास पूर्ण करताना जगाला फेरी घातली. या महिला अधिकाऱ्यांनी केवळ वाऱ्यावर चालणाऱ्या नौकेचा वापर करून हजारो किलोमीटर अंतर कापण्याची उल्लेखनीय कामगिरी केली असेही त्यांनी सांगितले. जमिनीचे दर्शन न होता समुद्रात दीर्घकाळ टिकून राहताना या महिलांनी हवामानाच्या ज्या तीव्र आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला, वादळांवर मात केली, मजबूत निर्धार दर्शवला, त्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. त्यांची कामगिरी म्हणजे सर्वात भयानक आव्हानांवरही मात करण्याच्या भारताच्या कन्यांच्या क्षमतेचा पुरावा आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलविरोधी कारवाया असोत किंवा सीमापार धोक्यांचा सामना असो, राष्ट्राचे रक्षण करण्यात महिलांच्या वाढत्या सहभागाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी देवी अहिल्याबाईंच्या भूमीवरून पुन्हा एकदा भारताच्या नारी शक्तीच्या ताकदीला आणि दृढनिश्चयाला सलाम केला.

देवी अहिल्याबाईंनी आपल्या कारकिर्दीत केवळ विकासच केला नाही तर भारताचा वारसाही जपला, हे त्यांनी अधोरेखित केले. आधुनिक भारतही त्याच मार्गावर चालत आहे, प्रगती आणि सांस्कृतिक संवर्धनाचा समतोल साधत आहे हे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या कार्यक्रमाचे उदाहरण म्हणून त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याच्या देशाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. मध्य प्रदेशला पहिली मेट्रो सेवा मिळाली, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे हे लक्षात आणून देत पंतप्रधानांनी सांगितले की स्वच्छतेसाठी जागतिक स्तरावर आधीच ओळखले जाणारे इंदूर आता मेट्रो सेवेसाठी देखील ओळखले जाईल. भोपाळमध्येही मेट्रोचे बांधकाम वेगाने सुरू आहे. केंद्र सरकारने अलीकडेच रतलाम-नागदा मार्गाचा चौपदरी विस्तार करण्यास मंजुरी दिल्याने या मार्गावर रेल्वे वाहतूक वाढली आहे आणि गर्दी कमी झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त, इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पाला सरकारने दिलेल्या मंजुरीवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. यामुळे या प्रदेशातील संपर्क सुविधा आणि पायाभूत सुविधा आणखी वाढल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. दातिया आणि सतना आता देशाच्या हवाई वाहतूक जाळ्यात समाविष्ट झाले आहेत अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. यामुळे बुंदेलखंड आणि विंध्य प्रदेशांमध्ये संपर्क सुविधा सुधारली आहे. या विकासामुळे माँ पितांबरा, माँ शारदा देवी आणि पूजनीय चित्रकूट धाम यासारख्या पवित्र स्थळांपर्यंत सहज पोहोचता येईल यावर त्यांनी भर दिला.

 

“भारत इतिहासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे, जिथे राष्ट्राने आपल्या सुरक्षिततेवर, सामर्थ्यावर आणि सांस्कृतिक वारशावर एकाच वेळी काम केले पाहिजे”, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. पंतप्रधानांनी वाढीव प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले आणि देशाचे भविष्य घडवण्यात मातृशक्ती म्हणजेच भारताच्या माता, बहिणी आणि मुली - यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. लोकमाता अहिल्याबाईंच्या प्रेरणेसह राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, राणी कमलापती, अवंतीबाई लोधी, कित्तूर राणी चेन्नम्मा, राणी गायदिन्लू, वेळू नाचियार आणि सावित्रीबाई फुले अशा महान महिला नेत्यांच्या वारशाचे पंतप्रधानांनी स्मरण केले. या प्रत्येक मातेचे नाव उच्चारताच देशाचे ऊर अभिमानाने भरून येते, असे ते म्हणाले. लोकमाता अहिल्याबाईंची 300 वी जयंती येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. येणारी शतकानुशतके सशक्त भारताचा पाया मजबूत करण्याचे आवाहन राष्ट्राला करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात भाग घेतला आणि लोकमाता देवी अहिल्याबाई यांना समर्पित एक विशेष टपाल तिकिट आणि एक विशेष नाणे प्रकाशित केले. 300 रुपयांच्या या नाण्यावरही अहिल्याबाई होळकर यांचे चित्र असेल. आदिवासी, लोककला आणि पारंपारिक कलांमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांनी एका महिला कलाकाराला राष्ट्रीय देवी अहिल्याबाई पुरस्कार देखील प्रदान केला.

देशाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या हवाई संपर्काला मोठी चालना देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधानांनी दातिया आणि सतना विमानतळांचे उद्घाटन केले. या विमानतळामुळे विंध्य प्रदेशात उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्यसेवेसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

 

शहरांमध्ये प्रवासाच्या पायाभूत सुविधा सुधारण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधानांनी इंदूर मेट्रोच्या यलो लाईनच्या सुपर प्रायोरिटी कॉरिडॉरवर प्रवासी सेवांचे उद्घाटन केले. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासी वाहतूक उपलब्ध होईल आणि प्रदूषण कमी होईल अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधानांनी 480 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 1,271 अटल ग्राम सुशासन भवनांच्या बांधकामासाठीचा पहिला हप्ता वितरित केला. या इमारती ग्रामपंचायतींना कायमस्वरूपी पायाभूत सुविधा प्रदान करतील. या इमारतींमुळे ग्रामपंचायतींना प्रशासकीय कामे व्यवस्थापित करण्यात, बैठका आयोजित करण्यात आणि अधिक चांगल्या प्रकारे नोंदी राखण्यात मदत होईल.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi urges people to take 9 pledges on health, saving water, others

Media Coverage

PM Modi urges people to take 9 pledges on health, saving water, others
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister receives phone call from President Emmanuel Macron, discusses situation in West Asia and maritime security
April 16, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, received a phone call from the President of France, Emmanuel Macron.

During the conversation, the two leaders discussed the prevailing situation in West Asia. They agreed on the urgent need to restore safety and ensure freedom of navigation in the Strait of Hormuz.

Both leaders reiterated their commitment to continue close cooperation in advancing peace and stability in the region and beyond.

The Prime Minister wrote on X;

“Received a phone call from my dear friend President Emmanuel Macron. We discussed the situation in West Asia and agreed on the need to urgently restore safety and freedom of navigation in the Strait of Hormuz.

We will continue our close cooperation to advance peace and stability in the region and beyond.

@EmmanuelMacron”