पंतप्रधानांनी जगातील सर्वात उंच रेल्वे आर्क पूल असलेला चिनाब पूल आणि भारताचा पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल असलेल्या अंजी पुलाचे केले उद्घाटन
आज उद्घाटन करण्यात आलेले भव्य पायाभूत सुविधा प्रकल्प जम्मू आणि काश्मीरच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल - पंतप्रधान
आपण भारत मातेचे वर्णन नेहमीच श्रद्धापूर्वक काश्मीर ते कन्याकुमारी असे केले, आज आपल्या रेल्वे नेटवर्कमध्येही हे वास्तव बनले आहे: पंतप्रधान
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग प्रकल्प हा नवीन, सक्षम जम्मू-काश्मीरचे प्रतीक असून ही भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा जयघोष आहे - पंतप्रधान
चिनाब आणि अंजी पूल जम्मू-काश्मीरच्या समृद्धीचे प्रवेशद्वार म्हणून काम करतील: पंतप्रधान
जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे : पंतप्रधान
दहशतवादापुढे भारत झुकणार नाही, जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांनी आता दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे: पंतप्रधान
पाकिस्तान जेव्हा ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकेल, तेव्हा त्याला आपल्या लज्जास्पद पराभवाचे स्मरण होईल : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 46,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. शूर वीर जोरावर सिंग यांच्या भूमीला अभिवादन करताना ते म्हणाले की आजचा कार्यक्रम हा भारताची एकता आणि दृढनिश्चयाचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णो देवीच्या आशीर्वादाने, काश्मीर खोरे आता भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे, असे मोदी म्हणाले. “आपण नेहमीच काश्मीर ते कन्याकुमारी, असे भारत मातेचे वर्णन केले आहे, आपल्या रेल्वे नेटवर्कमध्येही हे वास्तव बनले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लाईन प्रकल्प हे केवळ एक नाव नसून, जम्मू आणि काश्मीरच्या नवीन सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि भारताच्या वाढत्या क्षमतेचा पुरावा आहे, यावर त्यांनी भर दिला. या भागात रेल्वे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, त्यांनी चिनाब आणि अंजी रेल्वे पुलांचे उद्घाटन केले आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढेल.

याव्यतिरिक्त, मोदी यांनी जम्मूमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी देखील केली, ज्यामुळे या प्रदेशातील आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला पुष्टी मिळाली. 46,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये विकासाला गती मिळेल, प्रगती आणि समृद्धी वाढेल असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी विकास आणि परिवर्तनाच्या या नवीन युगासाठी शुभेच्छा दिल्या आणि जनतेचे अभिनंदन केले.

जम्मू-काश्मीरमधील अनेक पिढ्यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न पाहिले होते, हे अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, आज ते स्वप्न खरे झाले आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, सातवी-आठवीतील विद्यार्थी असल्यापासून अब्दुल्ला  हा प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत होते. . या बहुप्रतिक्षित आकांक्षेची पूर्तता जम्मू आणि काश्मीरमधील लाखो लोकांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे, जो कनेक्टिव्हिटी मधील सुधारणा आणि प्रगतीचा मार्ग प्रशस्त  करतो, असे मोदी यांनी नमूद केले.

 

आपल्या सरकारसाठी ही सन्मानाची गोष्ट आहे, कारण त्यांच्या कार्यकाळात या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली आणि आता तो यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे, असे सांगून, कठीण भूप्रदेश, अत्यंत प्रतिकूल हवामानाची स्थिती आणि पर्वतांमध्ये कोसळणाऱ्या दरडी,  यासारख्या संकटांमुळे हा प्रकल्प अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक बनल्याचे ते म्हणाले. मात्र, आपल्या सरकारने सातत्याने आव्हानांना तोंड देणे आणि त्यावर निर्धाराने मात करणे पसंत केल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेले सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करू शकतील असे असंख्य पायाभूत सुविधा प्रकल्प या वचनबद्धतेचे उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी नुकतेच उद्घाटन केलेला सोनमर्ग बोगदा आणि चिनाब पूल आणि अंजी पुलावरून प्रवास करण्याचा आपला अनुभव उल्लेखनीय टप्पा होता, असे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी भारतातील अभियंते आणि कामगारांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे आणि अढळ समर्पणाची प्रशंसा केली, आणि  जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज, चिनाब ब्रिज, भारताच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक असल्याचे नमूद केले . आयफेल टॉवर पाहण्यासाठी लोक पॅरिसला जात असले तरी चिनाब पुलाच्या  उंचीने त्याला मागे टाकले आहे, त्यामुळे हे केवळ पायाभूत सुविधांचे मोठे यश नसून, पर्यटनाचे नवे  आकर्षण केंद्र देखील बनले आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्याचप्रमाणे, पंतप्रधानांनी अंजी पुलाचे वर्णन अभियांत्रिकी चमत्कार म्हणून केले, जो भारतातील पहिला केबल-समर्थित रेल्वे पूल आहे. या वास्तू केवळ स्टील आणि काँक्रीट नसून, खडकाळ पीर पंजाल पर्वतांमध्ये उभे असलेले भारताच्या सामर्थ्याचे जिवंत प्रतीक आहेत, असे त्यांनी सांगितले.

हे यश भारताच्या विकसित देशासाठीच्या दूरदृष्टीचे प्रतिनिधित्व करते असे घोषित करून पंतप्रधान मोदी म्हणाले की यातून हेच सिद्ध होते की भारताचे प्रगतीचे स्वप्न जेवढे भव्य आहे तेवढीच त्याची लवचिकता, कर्तुत्व आणि निर्धार देखील भव्य आहे. इतर सर्वांसह, शुद्ध  हेतू आणि अथक समर्पण हीच भारताच्या परिवर्तनामागील प्रेरक शक्ती आहे यावर त्यांनी  अधिक भर दिला.

चिनाब पूल आणि अंजी पूल हे दोन्ही जम्मू आणि काश्मीरच्या भरभराटीसाठीचे उत्प्रेरक म्हणून काम करतील यावर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले, “हे महत्त्वपूर्ण प्रकल्प येथील पर्यटनाला चालना देण्यासोबतच व्यवसाय आणि उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण करून अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांसाठी देखील लाभदायक ठरतील.” जम्मू आणि काश्मीर यांच्यातील सुधारित रेल्वे सुविधेमुळे स्थानिक उद्योजकांसाठी नवी कवाडे खुली होऊन आर्थिक वृद्धीला चालना मिळेल ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की आता काश्मीरची सफरचंदे भारतभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कमी खर्चात पोहोचू शकतील आणि त्यातून व्यापार उदीम अधिक कार्यक्षम होईल. तसेच, सुका मेवा आणि काश्मीरच्या सुप्रसिध्द पश्मिना शाली आणि इतर पारंपरिक हस्तकलेच्या वस्तू आता देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सहजपणे पाठवता येतील आणि त्यायोगे या भागातील कारागीरांच्या उद्योगाला अधिक बळकटी मिळेल. पंतप्रधान म्हणाले की सुधारलेल्या संपर्क सुविधांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील जनतेसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि त्यांना भारताच्या विविध भागांमध्ये पोहोचण्यासाठी अधिक सुलभतेने प्रवास करता येईल.

 

पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी संगल्दनमधील विद्यार्थ्याने केलेली एक हृदयस्पर्शी टिप्पणी सामायिक केली. या विद्यार्थ्याने सांगितले की आतापर्यंत फक्त जे लोक त्यांच्या गावाबाहेर प्रवास करून आले होते त्यांनीच खऱ्या आयुष्यात रेल्वे गाडी पाहिली होती. बहुतांश गावकऱ्यांनी व्हिडिओमध्येच रेल्वे पाहिली असून आता लवकरच खरी रेल्वेगाडी त्यांच्या डोळ्यांसमोरून धावणार यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. येथील अनेक रहिवासी नवीन कनेक्टीव्हीटीबद्दल उत्सुक असून त्यांनी गाडीचे वेळापत्रक पाठ करायला सुरुवात केली आहे हे देखील पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. आता यापुढे रस्ते खुले असतील की बंद राहतील याचा निर्णय हवामानावर अवलंबून नसेल असे सांगणाऱ्या तरुणीची मार्मिक  टिप्पणी त्यांनी अधोरेखित केली. ही नवी रेल्वे सेवा लोकांना सर्व मोसमांमध्ये मदत करेल. “भारतमातेचा मुकुट असलेला जम्मू आणि काश्मीर हा भाग या प्रदेशाची प्रचंड ताकद आणि सौंदर्य यांचे प्रतीक ठरणाऱ्या लखलखत्या हिऱ्यांनी सजला आहे असे वर्णन करत पंतप्रधान मोदी यांनी तेथील प्राचीन संस्कृती, परंपरा, अध्यात्मिक जाणीव, रोमहर्षक निसर्गदृश्ये, औषधी वनस्पती, फुललेल्या बागा आणि चैतन्यमय तरुण प्रतिभा यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की हे सर्व घटक भारताच्या मुकुटातील मौल्यवान हिऱ्यांसारखे चमकत आहेत. गेली अनेक दशके जम्मू आणि काश्मीरला भेट देत असलेल्या पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या क्षमतेविषयी त्यांना असलेल्या सखोल ज्ञानाला दुजोरा दिला आणि जम्मू आणि काश्मीरच्या जनतेची भरभराट सुनिश्चित करत या भागाच्या सातत्यपूर्ण विकासासाठी आणि उत्थानाप्रति  त्यांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

“जम्मू आणि काश्मीर हा दीर्घकाळापासून भारताच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक वारशाचा आधारस्तंभ आहे,” असे पंतप्रधान ठामपणे म्हणाले. भारत स्वतःला जागतिक पातळीवरील ज्ञानाचे केंद्र म्हणून प्रस्थापित करत असताना, या परिवर्तनात जम्मू आणि काश्मीरच्या वाढत्या योगदानाला मोठे महत्त्व आहे असे ते पुढे म्हणाले. केंद्रीय विद्यापीठांसह, या भागातील शैक्षणिक उत्कृष्टतेला मजबूत करणाऱ्या आयआयटी, आयआयएमएस, एम्स आणि एनआयटी सारख्या प्रमुख संस्थांच्या जम्मू आणि श्रीनगरमधील उपस्थितीकडे त्यांनी निर्देश केला. तसेच तेथील नवोन्मेष आणि शिक्षणाच्या संधींमध्ये भर घालणाऱ्या संशोधन परिसंस्थेचा विस्तार देखील त्यांनी लक्षात घेतला.

पंतप्रधानांनी या भागात आरोग्य सुविधा क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीवर अधिक भर देत अलीकडच्या वर्षांमध्ये स्थापन झालेल्या दोन राज्यस्तरीय कर्करोग उपचार संस्थांचा उल्लेख केला. गेल्या 5 वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली असून रुग्ण तसेच वैद्यकीय क्षेत्रातील होतकरू विद्यार्थी अशा दोन्हींना त्यांचा मोठा फायदा झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा 500 वरुन वाढवून 1,300 करण्यात आल्या असून वैद्यकीय शिक्षण अधिक सुलभतेने उपलब्ध होण्याची खात्री झाली आहे. त्याबरोबरच, रियासी जिल्ह्यात आता एक नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होत असून त्यामुळे त्या भागातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ होणार आहे असे ते म्हणाले. श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय उत्कृष्टता संस्था हे केवळ एक आधुनिक रुग्णालय नसून लोककल्याणाच्या समृध्द भारतीय परंपरेचे मूर्त रूप आहे अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी या संस्थेचे कौतुक केले. भारतभरातील भाविकांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करत ते म्हणाले की त्यांच्या देणग्यांमुळे ही संस्था स्थापन करणे शक्य झाले.  या उदात्त  उपक्रमासाठी समर्पित पद्धतीने केलेल्या प्रयत्नाबद्दल मोदी यांनी श्री माता वैष्णोदेवी  देवस्थान मंडळाचे अभिनंदन केले. सदर रुग्णालयाची सध्याची 300 खाटांची क्षमता वाढवून 500 खाटांची व्यवस्था करून वैद्यकीय सेवेत सुधारणा घडवली जाईल अशी घोषणा देखील पंतप्रधानांनी यावेळी केली.  या घडामोडीमुळे कटरा येथे माता वैष्णोदेवी देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांची अधिक सोय होईल याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

 

त्यांच्या सरकारने 11 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे हे अधोरेखित करत आणि हा कालावधी गरिबांच्या उत्थानासाठी तसेच नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित करत पंतप्रधानांनी या काळात लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या महत्त्वाच्या कल्याणकारी उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख केला, ज्यामुळे 4 कोटी गरीब कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. उज्ज्वला योजनेमुळे 10 कोटी घरांची चुलीच्या धुरापासून सुटका झाली आणि महिला, लहान मुलांचे आरोग्य सुरक्षित झाले. आयुष्मान भारत योजनेमुळे 50 कोटी गरीब नागरिकांना रु.5 लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवा मिळाली. ते पुढे म्हणाले, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे प्रत्येक ताटात पोषणयुक्त अन्न वाढणे शक्य झाले व अन्नसुरक्षा सुनिश्चित झाली; तर जनधन योजनेमुळे 50 कोटींहून अधिक गरीब नागरिकांना बँकिंग सेवेशी जोडून घेत त्यांचा आर्थिक व्यवस्थेत समावेश करणे शक्य झाले. पंतप्रधानांनी सौभाग्य योजनेचा उल्लेख केला, या योजनेमुळे अंधारात राहणाऱ्या 2.5 कोटी कुटुंबांना वीज मिळाली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12 कोटी शौचालये बांधून उघड्यावर शौचाची समस्या दूर करण्यात आली. जल जीवन मिशनमुळे 12कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले, त्यामुळे महिलांवरील ताण कमी झाला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे 10 कोटी लहान शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळून ग्रामीण भारत मजबूत झाला.

मोदी म्हणाले की गेल्या 11 वर्षांत 25 कोटींहून अधिक लोकांनी गरिबीवर मात करत नव-मध्यमवर्गात प्रवेश केला आहे. सरकार गरीब आणि नवोदित मध्यमवर्गाला आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधानांनी ‘वन रँक, वन पेन्शन’,  रु.12 लाखांपर्यंतच्या पगारावर करसवलत, गृहखरेदीसाठी आर्थिक सहाय्य, तसेच परवडणाऱ्या हवाई प्रवासासाठी मदत आदी उपक्रमांचा उल्लेख करत सांगितले की सरकार लोकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे असून सर्वांचा विकास साधण्यास वचनबद्ध आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच प्रामाणिक करदाता मध्यमवर्गासाठी सरकारने काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकार तरुणांसाठी सातत्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी पर्यटनाला आर्थिक वाढीचे व दळणवळणाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून अधोरेखित केले. पर्यटन रोजगार निर्मिती करत असून लोकांमध्ये ऐक्य वाढवते, असे ते म्हणाले. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या विघातक प्रयत्नांचा निषेध करत पंतप्रधान म्हणाले की हे मानवतेच्या, सामाजिक सलोख्याच्या व आर्थिक समृद्धीच्या विरोधात आहे. 22एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या घटनेचा उल्लेख करत मोदी यांनी सांगितले की पाकिस्तानने काश्मिरियत आणि मानवतेवर हल्ला केला, भारतात हिंसाचार भडकवण्याचा व कश्मिरी लोकांची उपजीविका उद्ध्वस्त करण्याचा हेतू त्यामागे होता. गेल्या काही वर्षांत विक्रमी पर्यटक संख्या अनुभवत असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील प्रगतीशील पर्यटन क्षेत्राला खीळ घालण्यासाठी हा पर्यटकांवर केलेला हेतुपुरस्सर हल्ला होता. पाकिस्तानच्या या विघातक कृतीमुळे स्थानिक घोडेस्वार, पोर्टर, गाईड, गेस्ट हाऊस मालक व दुकानदार यांच्यावर प्रत्यक्ष परिणाम झाला, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या कुटुंबासाठी प्रामाणिक श्रम करणाऱ्या आणि दहशतवाद्यांशी झुंज देतानाप्राण गमावलेल्या तरुण आदिलच्या शौर्याची त्यांनी स्तुती केली. मोदींनी सांगितले की सरकार जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि या प्रदेशाच्या प्रगतीत दहशतवाद कधीही अडथळा निर्माण करू शकणार नाही.

 

पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरच्या जनतेच्या धैर्याची प्रशंसा केली आणि सांगितले की पाकिस्तानच्या कटकारस्थानांविरोधात त्यांची ठाम भूमिका हा एक मजबूत संदेश आहे. आज जम्मू आणि काश्मीरचे तरुण दहशतवादाचा थेट सामना करण्यासाठी सज्ज आहेत, असे ते म्हणाले. मोदींनी दहशतवादाच्या विध्वंसक परिणामांचा निषेध केला. यामुळे शाळा जळाल्या, रुग्णालये उद्ध्वस्त झाली, अनेक पिढ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  दहशतवादामुळे मुक्त व पारदर्शक निवडणुका हे देखील मोठे आव्हान बनले, लोकांचे प्रतिनिधी निवडण्याचे अधिकार हिरावले गेले, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितले की जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने दाखवलेले सामर्थ्य व निर्धार हे महत्त्वाचे वळण आहे, हे शांतता, प्रगती व उज्ज्वल भविष्याच्या दिशेने जाण्याच्या त्यांच्या निश्चयाचे द्योतक आहे.

वर्षानुवर्षे जम्मू आणि काश्मीरने दहशतवाद सहन केला, अनेकांनी आपली स्वप्ने सोडून दिली आणि हिंसेला आपले नशिब मानले. पण आपल्या सरकारने ही परिस्थिती बदलली असून, आज काश्मीरचा तरुण पुन्हा स्वप्ने पाहू लागला आहे आणि ती पूर्णही करू लागला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज काश्मीरच्या तरुणांना गजबजलेली बाजारपेठ, झगमगणारे मॉल आणि गर्दीने फुललेली सिनेमागृहे पाहून आनंद होतो, असे सांगून ते म्हणाले की स्थानिक लोक जम्मू आणि काश्मीरला चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रमुख  स्थळ बनविण्यासाठी आणि क्रीडाक्षेत्राचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी इच्छुक आहेत.

पंतप्रधान मोदींनी माता खीर भवानी यात्रेचा उल्लेख केला. या यात्रेसाठी जमलेले हजारो भाविक जम्मू आणि काश्मीरचा नवीन, आशावादी चेहरा प्रतिबिंबित करत होते, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आगामी अमरनाथ यात्रेबाबतचा उत्साह तसेच ईदच्या  उल्हासावरही प्रकाश टाकला. हा उत्सवाचा उत्साह या प्रदेशाची पून्हा उठून उभे राहण्याची क्षमता आणि प्रगती दर्शवितो, असे पंतप्रधान म्हणाले. पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांमुळे जम्मू आणि काश्मीरच्या विकासाची गती डळमळीत होणार नाही असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. या प्रदेशाच्या विकासात कसलाही अडथळा येणार नाही, असे आश्वासन पंतप्रधानांनी जनतेला दिले. जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांच्या स्वप्नांना धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही अडथळ्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

एक महिन्यापूर्वी, आजच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या छावण्या ध्वस्त केल्या होत्या, यांचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले, “ भविष्यात जेव्हा जेव्हा पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल तेव्हा त्याला त्याच्या अपमानास्पद पराभवाची आठवण येईल”. भारत काही धाडसी निर्णय घेईल  अशी पाकिस्तानच्या लष्करी आणि दहशतवादी नेटवर्कला कधीच अपेक्षा नव्हती. मात्र पाकिस्ताननं अनेक दशकांच्या कालावधीत उभारलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधा भारताने केवळ काही मिनिटांतच जमीनदोस्त केल्या, असे पंतप्रधान म्हणाले. पाकिस्तानला याचा धक्का बसला आणि त्याचा राग त्यांनी  जम्मू, पूंछ आणि इतर जिल्ह्यांमध्ये निष्पाप नागरिकांना लक्ष्य करून काढला  असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या क्रूर हल्ल्यांचा निषेध केला. आणि पाकिस्तानने घरे कशी उद्ध्वस्त केली, शाळा आणि रुग्णालयांवर कसे बॉम्ब हल्ले केले तसेच मंदिरे, मशिदी आणि गुरुद्वाऱ्यांवर कसा गोळीबार केला, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील जनतेच्या सहनशीलतेचे कौतुक केले. पाकिस्तानच्या आक्रमकतेचा सामना करण्याचे येथील जनतेचे धाडस प्रत्येक भारतीयाने पाहिले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. सरकार पूर्ण ताकदीने प्रत्येक पीडित नागरिकाच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहिल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी देशवासीयांना दिला जाणारा निरंतर सहयोग आणि एकता याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांना सरकारी मदतीची नियुक्ती पत्रे आधीच मिळाली आहेत अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या 2000 हून अधिक कुटुंबांना झालेल्या त्रासाची जाणीव असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या लोकांचे दुःख हे देशाचे दुःख आहे, असे त्यांनी सांगितले. पूर्वी घरांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत दिली जात होती, ज्यामुळे गोळीबारामुळे प्रभावित झालेल्यांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने आता ही   मदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे प्रभावित कुटुंबांना अधिक मदत दिली जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे ज्या कुटुंबांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांच्यासाठी पंतप्रधानांनी अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर केली. गंभीर नुकसान झालेल्या कुटुंबांना आता आधी देण्यात आलेल्या मदतीव्यतिरिक्त 2 लाख रुपये तर अंशतः नुकसान झालेल्या घरांना 1 लाख रुपये अतिरिक्त मदत दिली जाईल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी बाधित कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याची, निरंतर मदत मिळत राहील याची खात्री करण्याची तसेच या लोकांची घरे पून्हा बांधण्यासाठी आणि जीवन सुरळीत करण्यास मदत करण्याची त्यांच्या सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.

 

"सरकार सीमावर्ती भागात राहणाऱ्या रहिवाशांना देशाचे आघाडीचे रक्षक म्हणून संबोधते", असे पंतप्रधानांनी सांगितले. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये विकास आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी गेल्या दशकात अभूतपूर्व प्रयत्न केले गेले आहेत असे ते म्हणाले. यातील प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की ऑपरेशन सिंदूर नंतर सुमारे‌10,000 नवीन बंकर बांधण्यात आले आहेत.या बंकर्सनी नागरिकांचे जीव वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर विभागासाठी दोन नवीन बॉर्डर  बटालियनची स्थापना करण्याची घोषणा केली. या बटालियनमुळे या प्रदेशाची सुरक्षा आणखी मजबूत होईल, असेही ते म्हणाले. याव्यतिरिक्त, दोन समर्पित महिला बटालियनची देखील यशस्वीरित्या स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे देशाची संरक्षण क्षमता बळकट झाली आहेत आणि सशस्त्र दलात महिला सक्षम बनल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात, विशेषतः आव्हानात्मक भूभागांमध्ये होत असलेल्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या विकासावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. या भागात संपर्क सुविधा आणि सुरक्षा सुधारण्यासाठी शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. कठुआ-जम्मू महामार्ग सहा पदरी द्रुतगती महामार्गात रुपांतरीत केला जात आहे, तर सुखकर प्रवास व्हावा यासाठी अखनूर-पूंछ महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले. व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमा अंतर्गत, सीमावर्ती गावांमध्ये विकास उपक्रमांना गती देण्यात आल्याने रहिवाशांसाठी चांगले राहणीमान आणि संधी सुनिश्चित झाल्या आहेत, असे उद्गार त्यांनी काढले. मोदी यांनी नमूद केले की जम्मू आणि काश्मीरमधील 400 गावे ज्यांच्याशी पूर्वी सर्व ऋतुत संपर्क साधणे कठीण होते आता ती गावे 1,800 किलोमीटर लांबीच्या नव्याने बांधलेल्या रस्त्यांनी जोडली जात आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. सरकार या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 4,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप करत आहे, जेणेकरून सीमावर्ती भागात आर्थिक वाढ आणि प्रादेशिक विकासाला चालना मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना विशेष आवाहन केले, की त्यांनी भारताच्या उत्पादन क्रांतीमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे. ऑपरेशन सिंदूरने आत्मनिर्भर भारताची ताकद जगाला दाखवली आणि आज जगभरात  भारताच्या संरक्षण परिसंस्थेची चर्चा होत  आहे, असेही ते म्हणाले.

या यशाचे श्रेय सशस्त्र दलांच्या 'मेक इन इंडिया'वरील विश्वासाला देत, प्रत्येक भारतीयाने आता त्यांच्या वचनबद्धतेचे अनुकरण केले पाहिजे असे ते म्हणाले.  पंतप्रधानांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या 'मिशन मॅन्युफॅक्चरिंग' उपक्रमाचा उल्लेख केला.  या उपक्रमाचा उद्देश भारताच्या उत्पादन क्षेत्राला गती देणे हा आहे.

 

त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील तरुण नवोन्मेषक आणि उद्योजकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकास वाढविण्यासाठी भारताला तरुणांच्या आधुनिक विचारसरणी, नवोन्मेष, कल्पना आणि कौशल्यांची आवश्यकता आहे. गेल्या दशकात भारत एक आघाडीचा संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास आला आहे आणि पुढील ध्येय म्हणजे भारताला जगातील आघाडीच्या  संरक्षण निर्यातदारांमध्ये स्थान मिळवून देणे हे आहे, असे  मोदी यांनी नमूद केले. भारत जितक्या वेगाने या उद्दिष्टाकडे वाटचाल करेल तितक्या जास्त रोजगाराच्या संधी देशभर निर्माण होतील आणि लाखो लोकांना त्याचा फायदा होईल असे ते म्हणाले .

प्रत्येक भारतीयाने भारतात बनवलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचे आवाहन करताना, मोदी यांनी या वस्तू देशबांधवांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे खरे प्रतिबिंब आहेत यावर भर दिला.  भारतीय बनावटीची उत्पादने निवडणे हीच देशाची खरी सेवा आहे. यामुळे  अर्थव्यवस्था मजबूत होते आणि कामगारांना सक्षम करता येते असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे देश आपल्या सशस्त्र दलांचा सीमेवर सन्मान करतो, त्याचप्रमाणे बाजारपेठेत 'मेड इन इंडिया'चा अभिमानही कायम ठेवला पाहिजे, जेणेकरून संरक्षण आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रात भारताची ताकद प्रतिबिंबित होईल असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार विकासासाठी एकत्र काम करत असल्याने जम्मू आणि काश्मीरचे भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. शांतता आणि समृद्धी या प्रवासाचा पाया राहील याची खात्री देत  त्यांनी सहकार्य आणि प्रगतीच्या भावनेवर भर दिला. माता वैष्णोदेवींच्या आशीर्वादाने प्रेरित  विकासाच्या मार्गाला बळकटी देण्याचा अढळ निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि विकसित जम्मू-काश्मीरप्रति  वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.  दृढनिश्चय आणि एकतेने हे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे ते म्हणाले. प्रगतीच्या भावनेचा उत्सव साजरा करत या उल्लेखनीय प्रकल्पांसाठी जनतेचे मनापासून अभिनंदन करून   मोदी यांनी भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमात जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, व्ही. सोमन्ना आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

चिनाब आणि अंजी रेल्वे पूल

नदीपासून 359  मीटर उंचीवर  वास्तुशिल्पाची अद्भुत रचना असलेला चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. हा 1,315 मीटर लांबीचा स्टील आर्च ब्रिज आहे जो भूकंप आणि सोसाट्याचा वारा या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केला गेला आहे. या पुलाचा एक महत्त्वाचा लाभ जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यात होईल. पुलावरून जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनद्वारे, कटरा आणि श्रीनगर दरम्यान प्रवास करण्यासाठी फक्त 3  तास लागतील, ज्यामुळे सध्याचा प्रवास वेळ 2-3 तासांनी कमी होईल.

अंजी ब्रिज हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे ब्रिज आहे जो आव्हानात्मक प्रदेशात  देशाची सेवा करेल.

कनेक्टिव्हिटी प्रकल्प आणि इतर विकास उपक्रम

पंतप्रधानांनी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL ) प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. सुमारे 43,780 कोटी रुपये खर्चाच्या या 272  किमी लांबीच्या USBRL प्रकल्पात 36  बोगदे (119 किमी लांबीचे) आणि 943  पूल समाविष्ट आहेत. हा प्रकल्प काश्मीर खोरे आणि देशाच्या उर्वरित भागांमध्ये सर्व हवामानात, अखंड रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण करतो. याचा उद्देश प्रादेशिक गतिशीलतेत परिवर्तन घडवणे आणि सामाजिक-आर्थिक एकात्मता वाढवणे हा आहे.

पंतप्रधानांनी श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर आणि परत येण्यासाठी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वे सेवा रहिवासी, पर्यटक, यात्रेकरू आणि इतरांसाठी जलद, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवास पर्याय प्रदान करतील.

सीमावर्ती भागात शेवटच्या मैलापर्यंत दळण वळणाला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधानांनी विविध रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग-701 वरील रफियाबाद ते कुपवाडा पर्यंतच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाची आणि राष्ट्रीय महामार्ग-444 वरील शोपियान बायपास रस्त्याच्या बांधकामाची पायाभरणी केली.  याचा खर्च 1,952 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

त्यांनी श्रीनगरमधील राष्ट्रीय महामार्ग-1 वरील संग्राम जंक्शन आणि राष्ट्रीय महामार्ग-44 वरील बेमिना जंक्शन येथे दोन उड्डाणपूल प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांसाठी वाहतूक सुरळीत होईल.

पंतप्रधानांनी कटरा येथे 350  कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  श्री माता वैष्णोदेवी वैद्यकीय उत्कृष्टता संस्थेची पायाभरणी देखील केली. हे रियासी जिल्ह्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय असेल जे या प्रदेशातील आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे योगदान देईल.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin

Media Coverage

Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister announces fast-track courts for paper leak cases to safeguard the future of youth
July 23, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today emphasized that nothing is more important than the welfare and future of the youth.

The Prime Minister stated that the government has decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Shri Modi noted that he has directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard, adding that this continues a series of measures aimed at safeguarding the interests of students.

The Prime Minister firmly asserted that those who try to harm the future of the youth will not be spared.

In a post on X, the Prime Minister shared:

"Nothing is more important than the welfare and future of our youth!

We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard. This continues our series of steps for safeguarding the interests of students.

Those who try to harm the future of our youth will not be spared.

देश के युवाओं का हित और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।

पेपर लीक के सभी मामलों में दोषियों को जल्द से जल्द कठोर दंड देने के लिए, केस के त्वरित निस्तारण के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स का गठन किया जाएगा। इस संबंध में निर्देश दे दिए गए हैं कि संबंधित विभाग आवश्यक कार्रवाई सुनिश्चित करें।

विद्यार्थियों के हितों को सुरक्षित करने के लिए, सरकार द्वारा लिए जा रहे निर्णयों की श्रृंखला में ये एक महत्वपूर्ण कदम है।

युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा।"