आजचा दिवस देशासाठी, विशेषतः मिझोरमच्या लोकांसाठी ऐतिहासिक - आजपासून आयझॉल भारताच्या रेल्वे नकाशावर : पंतप्रधान
ईशान्येकडील राज्ये भारताचे विकास इंजिन बनत आहे : पंतप्रधान
आमच्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणात आणि उदयोन्मुख ईशान्य आर्थिक कॉरिडॉरमध्ये मिझोरमची प्रमुख भूमिका : पंतप्रधान
‘नेक्स्ट जेन जीएसटी’ मुळे अनेक उत्पादनांवरील कर कमी, परिणामी कुटुंबांचे जीवन सुलभ बनले : पंतप्रधान
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरममधील आयझॉल येथे 9,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा यासह अनेक क्षेत्रांना गती देतील. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी निळ्या पर्वतांच्या सुंदर भूमीचे रक्षण करणाऱ्या सर्वोच्च देव पाथियनला नमन केले. मिझोरमच्या लेंगपुई विमानतळावर उपस्थित असूनही खराब हवामानामुळे ते आयझॉल येथे पोहचू शकले नाहीत,  याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. तरीही या माध्यमातून लोकांचे प्रेम आणि आपुलकी अनुभवू शकत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

मिझोरामच्या जनतेने स्वातंत्र्यलढा असो किंवा राष्ट्रनिर्मिती, सदैव पुढाकार घेतल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. लालनू रोपूईलियानी आणि पासाल्था खुआंगचेरा यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचे आदर्श आजही देशाला प्रेरणा देतात, असे ते म्हणाले. बलिदान आणि सेवा, शौर्य तसेच करुणा या मूल्यांचा मिजो समाजाच्या रक्तात ठसा उमटलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "आज मिझोराम भारताच्या विकास प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे," असे पंतप्रधान म्हणाले.

देशासाठी, विशेषतः मिझोरमच्या लोकांसाठी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून, मोदी म्हणाले, “आजपासून आयझॉल भारताच्या रेल्वे नकाशावर येईल”. भूतकाळाची आठवण करून देत, पंतप्रधानांनी नमूद केले की, त्यांना काही वर्षांपूर्वीच आयझॉल रेल मार्गाची पायाभरणी करण्याची संधी मिळाली होती. आपण अभिमानाने हा रेल मार्ग देशातील लोकांना समर्पित करत असल्याचे ते म्हणाले.अत्यंत दुर्गम भूप्रदेशासह अनेक आव्हानांना पार करून हे काम केले आणि आता बैराबी-सैरंग रेल मार्ग वास्तवात आला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी अभियंत्यांच्या कौशल्याचे आणि कामगारांच्या मेहनतीचे कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे, असे ते म्हणाले.

 

जनतेच्या आणि राष्ट्राच्या हृदयांचे नाते नेहमीच थेट जोडले गेले असल्याचे सांगून पंतप्रधानांनी म्हणाले की प्रथमच मिझोराममधील सैरांगला दिल्लीशी राजधानी एक्स्प्रेसने जोडले जाणार आहे. ही केवळ रेल्वे जोडणी नसून जीवन परिवर्तनाची जीवनरेषा आहे, जी मिझोरामच्या जनतेच्या जीवनात आणि उपजीविकेत क्रांती घडवेल, असे ते म्हणाले. आता मिझोरामचे शेतकरी आणि व्यापारी देशभरातील अधिकाधिक बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतील, लोकांना शिक्षण आणि आरोग्याच्या अधिक सुविधा मिळतील तसेच पर्यटन, वाहतूक आणि आदरातिथ्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

काही राजकीय पक्षांनी देशात दीर्घकाळ मतपेटीच्या राजकारणावर भर दिला आणि जिथे जास्त मते आणि जागा आहेत त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. त्यामुळे मिझोरामसह ईशान्य भारतातील राज्यांना मोठा फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. आज मात्र स्थिती पूर्णपणे बदलली असून ज्यांना कधीकाळी दुर्लक्षित केले गेले ते आता अग्रभागी आले आहेत आणि मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. मागील 11 वर्षांपासून केंद्र सरकार सातत्याने ईशान्य भारताच्या विकासासाठी काम करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हा प्रदेश भारताचे विकास इंजिन बनत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मागील काही वर्षांत ईशान्येतील अनेक राज्यांना प्रथमच भारताच्या रेल्वे नकाशावर स्थान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने ग्रामीण भागातील रस्ते आणि महामार्ग, मोबाईल आणि इंटरनेट सुविधा, वीज, नळाद्वारे पाणी आणि एलपीजी जोडणी यासारख्या सर्व प्रकारच्या जोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर काम केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मिझोरामलाही उडान योजनेचा लाभ मिळेल आणि लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मिझोरामच्या दुर्गम भागांशी संपर्क मोठ्या प्रमाणावर सुधारेल, असे ते म्हणाले.

“"अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि उदयोन्मुख ईशान्य आर्थिक कॉरिडॉरमध्ये मिझोरामची महत्त्वाची भूमिका आहे", असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. कलादान मल्टी-मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आणि सैरंग-ह्माँगबुचुआह रेल मार्गिकेमुळे मिझोराम आग्नेय आशियातून बंगालच्या उपसागराशी जोडला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे बोलताना भर दिला की,या कनेक्टिव्हिटीमुळे ईशान्य भारत आणि आग्नेय आशियामध्ये व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल.

 

मिझोरामला प्रतिभावान तरुणांचे वरदान लाभले आहे हे अधोरेखित करून, पंतप्रधान   मोदी यांनी सरकारचे ध्येय त्यांना सक्षम करणे आहे, यावर भर दिला. मिझोराममध्ये 11 एकलव्य निवासी शाळा आधीच स्थापन झाल्या आहेत आणि आणखी 6 शाळा सुरू करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी ईशान्य भारत हे स्टार्ट-अप्ससाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे यावर प्रकाश टाकला. या प्रदेशात सध्या सुमारे 4,500 स्टार्ट-अप्स आणि 25 इन्क्यूबेटर कार्यरत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मिझोरममधील तरुण या चळवळीत सक्रियपणे सहभागी होत आहेत आणि स्वतःसाठी आणि इतरांसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

जागतिक क्रीडा क्षेत्रासाठी भारत वेगाने एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की ही वाढ देशात क्रीडा अर्थव्यवस्थेलाही चालना देत आहे. त्यांनी मिझोरामच्या क्रीडा क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा मागोवा घेत, फुटबॉल आणि इतर विषयांमध्ये अनेक विजेते निर्माण करण्यात मिझोरामच्या योगदानाचा उल्लेख केला.

सरकारच्या क्रीडा धोरणांचा मिझोरामलाही फायदा होत आहे, असे त्यांनी सांगितले. खेलो इंडिया योजनेअंतर्गत,   मोदी म्हणाले की, आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सहकार्य  केले जात आहे. सरकारने अलीकडेच राष्ट्रीय क्रीडा धोरण - खेलो इंडिया खेल नीति - सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमामुळे मिझोरामच्या तरुणांसाठी संधीची नवी दारे उघडतील यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी ईशान्येकडील संस्कृतीने , देशात आणि परदेशात, राजदूताची भूमिका बजावल्याबद्दल  आनंद व्यक्त केला. ईशान्येकडील क्षमता प्रदर्शित करणाऱ्या व्यासपीठांना प्रोत्साहन देण्याच्या महत्त्वाबद्दल त्यांनी उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या अष्ट लक्ष्मी महोत्सवातील त्यांच्या सहभागाची आठवण करून देताना, मोदी यांनी नमूद केले की या महोत्सवात ईशान्येकडील कापड, हस्तकला, जीआय-टॅग उत्पादने आणि पर्यटन क्षमता प्रदर्शित करण्यात आली. रायझिंग ईस्ट समिटमध्ये, पंतप्रधानांनी गुंतवणूकदारांना या प्रदेशातील विशाल क्षमतेचा फायदा घेण्यास प्रोत्साह.  ही शिखर परिषद मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि प्रकल्पांसाठी मार्ग मोकळा करत आहे असेही त्यांनी सांगितले.

मिझोरममधील बांबू उत्पादने, सेंद्रिय आले, हळद आणि केळी हे सुप्रसिद्ध आहेत यावर भर देऊन मोदींनी पुढे सांगितले की व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा ईशान्येकडील कारागीर आणि शेतकऱ्यांना लाभ होतो आहे.

सरकार राहणीमान आणि व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे हे अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, “पुढील पिढीतील/ नेक्स्टजेन जीएसटी सुधारणा अलिकडेच लागू करण्यात आल्या आहेत यामुळे अनेक उत्पादनांवरील कर कमी झाला असून त्यामुळे कुटुंबांचे जीवन सोपे होणार आहे”. त्यांनी आठवण करून दिली की 2014 र्वी टूथपेस्ट, साबण आणि तेल यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरही 27 % कर आकारला जात होता. आज, त्यांनी नमूद केले की या वस्तूंवर फक्त 5% जीएसटी लागू आहे. मोदींनी असे म्हटले की विरोधी पक्षाच्या राजवटीत औषधे, चाचणी किट आणि विमा पॉलिसींवर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आला होता. त्यांनी सांगितले की यामुळे आरोग्यसेवा महाग झाली आणि सामान्य कुटुंबांसाठी विमा उपलब्ध नव्हता. त्यांनी याकडे देखील लक्ष वेधले की आज या सर्व सेवा आणि उत्पादने परवडणारी झाली आहेत.

 

पंतप्रधानांनी असेही सांगितले की, नवीन जीएसटी दरांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील औषधे देखील स्वस्त होतील. 22 सप्टेंबरनंतर सिमेंट आणि बांधकाम साहित्य देखील स्वस्त होईल अशी माहिती त्यांनी दिली. स्कूटर आणि कार बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी आधीच किमती कमी केल्या आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. आगामी सणांचा हंगाम देशभरात आणखी उत्साही असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी सांगितले की, सुधारणांचा एक भाग म्हणून, बहुतेक हॉटेल्सवरील जीएसटी फक्त 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यांनी असे नमूद केले की विविध ठिकाणी प्रवास करणे, हॉटेलमध्ये राहणे आणि बाहेर खाणे आता अधिक परवडणारे होईल. यामुळे अधिकाधिक लोकांना देशाच्या विविध भागात प्रवास करण्यास, एक्सप्लोर करण्यास आणि आनंद घेण्यास प्रोत्साहन मिळेल यावर मोदींनी भर दिला. त्यांनी नमूद केले की ईशान्येकडील पर्यटन केंद्रांना या बदलाचा विशेष फायदा होईल.

"2025-26 च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेत 7.8 % वाढ झाली आहे. याचा अर्थ भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे", असे उद्गार काढत मोदी म्हणाले की, मेक इन इंडिया आणि निर्यातीतही देशात मोठी वाढ होत आहे. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी कसा धडा शिकवला हे देशाने पाहिले. संपूर्ण देश सशस्त्र दलांविषयी  अभिमानाच्या भावनेने  भरलेला असल्याचे ते म्हणाले. या ऑपरेशन दरम्यान देशाचे रक्षण करण्यात मेड-इन-इंडिया शस्त्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, भारताच्या अर्थव्यवस्थेची आणि उत्पादन क्षेत्राची वाढ राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे.

प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक प्रदेशाच्या कल्याणासाठी सरकारच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा अधोरेखित करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. त्यांनी सांगितले की विकसित भारताची उभारणी तेथील लोकांच्या सक्षमीकरणातून होईल आणि या प्रवासात मिझोरामचे लोक महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी आयझॉलला भारताच्या रेल्वे  नकाशावर स्थान मिळाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि स्वागत केले.  हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे आयझॉलला प्रत्यक्ष भेट देता आली नसली तरी लवकरच भेट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मिझोरामचे राज्यपाल जनरल व्ही के सिंह, मिझोरामचे मुख्यमंत्री  लालदुहोमा, केंद्रीय मंत्री  अश्विनी वैष्णव तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारी सुविधा देण्याच्या आपल्या संकल्पनुसार पंतप्रधानांनी  8,070 कोटी खर्चाच्या बैराबी-सैरंग नवी रेल मार्गाचे उद्घाटन केले. यामुळे मिजोरमची राजधानी पहिल्यांदाच भारतीय रेल्वे जाळ्याशी जोडली गेली आहे. आव्हानात्मक डोंगराळ भागातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये 45 बोगदे, 55 मोठे पूल व 88 लहान पूल समाविष्ट आहेत. या रेल्वे मार्गामुळे मिजोरमला देशाच्या इतर भागांशी थेट, सुरक्षित, किफायतशीर आणि कार्यक्षम वाहतूक सुविधा मिळणार असून धान्य, खते आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा वेळेवर आणि विश्वासार्ह पुरवठा सुनिश्चित होईल. पंतप्रधानांनी याच प्रसंगी सैरंग (आयझॉल)-दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) राजधानी एक्सप्रेस, सैरंग-गुवाहाटी एक्सप्रेस आणि सैरंग-कोलकाता  या तीन नव्या  गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. आयझॉल आता राजधानी एक्सप्रेसमार्गे दिल्लीशी थेट जोडले गेले आहे. गुवाहाटी एक्सप्रेस मिजोरम–आसाम दरम्यान सोयीस्कर वाहतूक करेल, तर कोलकाता एक्सप्रेसमुळे मिजोरम थेट कोलकात्याशी जोडले जाईल. या वाढीव रेल्वे संपर्कामुळे शिक्षण, आरोग्यसेवा, बाजारपेठा, सांस्कृतिक व आर्थिक संबंध दृढ होतील तसेच रोजगारनिर्मिती आणि पर्यटनालाही चालना मिळेल.

 

पंतप्रधान ईशान्य क्षेत्र विकास उपक्रम (पीएम-डेव्हिन) योजनेअंतर्गत पंतप्रधानांनी अनेक रस्ते प्रकल्पांचीही पायाभरणी केली. 45 किमी लांबीचा आयझॉल बायपास रोड हा महामार्ग  500 कोटी रुपये  खर्चून उभारला जाणार असून यामुळे आयझॉल शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि लुंगलेई, सियाहा, लॉंगटलाई, लेंगपुई विमानतळ आणि सैरांग रेल्वे स्टेशन या ठिकाणांशी वाहतूक होईल. दक्षिण जिल्ह्यांहून आयझॉलला जाणाऱ्या प्रवासाचा वेळ 1.5 तासांनी  कमी होणार आहे. थेंझॉल-सियालसुक मार्ग हा ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत बांधला जाणार असून बागायती शेतकरी, ड्रॅगन फ्रुट उत्पादक, भात उत्पादक आणि आलं प्रक्रिया उद्योगांना याचा थेट लाभ होईल, तसेच ऐझॉल-थेंझॉल-लुंगलेई महामार्गावरची वाहतूक सुधारेल. ईशान्य विशेष पायाभूत सुविधा विकास योजने अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या खानकॉन-रोंगुरा रस्त्यामुळे  शेरचीप जिल्ह्यातल्या  बाजारपेठेपर्यंत सहज पोहोचता येईल आणि आले प्रक्रिया केंद्राला  मदत होईल.  याशिवाय पंतप्रधानांनी लॉंगटलाई-सियाहा रस्त्यावरील छिमतुईपुई नदी पुलाची पायाभरणी देखील केली. यामुळे सर्व हवामानात वाहतूक करता येणार असून प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होईल. कलादान मल्टीमॉडल ट्रान्झिट फ्रेमवर्क अंतर्गत हा पूल सीमापार व्यापारालाही चालना देईल.

तुईकुअल येथे खेळो इंडिया अंतर्गत बहुउद्देशीय इनडोअर क्रीडागृहाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. या क्रीडागृहामुळे मिजोरमच्या युवकांना दर्जेदार सुविधा मिळणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांची क्षमता वृद्धिंगत होईल. ऊर्जा क्षेत्रात मिजोरमला स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी आयझॉल येथील मुआलकांग येथे 30 टीएमटीपीए क्षमतेच्या एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी केली. यामुळे स्वच्छ इंधनाचा स्थिर पुरवठा तर होईलच, पण स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी देखील निर्माण होईल. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अंतर्गत आकांक्षी मामित जिल्ह्यातील कौरथाह येथे निवासी शाळेचे उद्घाटन केले. या शाळेत आधुनिक शिक्षण सुविधा, वसतिगृह आणि कृत्रिम फुटबॉल मैदान असून 10,000 पेक्षा अधिक मुलांना याचा लाभ मिळेल. ज्यामुळे दीर्घकालीन सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा पाया रचला जाईल.  याशिवाय त्लांगनुआम येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेचेही उद्घाटन झाले. या शाळेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीचे प्रमाण वाढणार असून शाळा सोडण्याचे प्रमाण घटेल आणि सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीस चालना मिळेल.

 

Click here to read full text speech

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Centre Earns Rs 800 Crore From Selling Scrap Last Month, More Than Chandrayaan-3 Cost

Media Coverage

Centre Earns Rs 800 Crore From Selling Scrap Last Month, More Than Chandrayaan-3 Cost
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM appreciates the people and leadership of Bhutan for the reverent welcome to the sacred relics of Lord Buddha
November 09, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has extended heartfelt appreciation to the people and leadership of Bhutan for the reverent welcome accorded to the Sacred Relics of Lord Buddha from India. Shri Modi stated that these relics symbolise the timeless message of peace, compassion and harmony. "The teachings of Lord Buddha are a sacred link between our two nations’ shared spiritual heritage", Shri Modi said.

The Prime Minister posted on X:

"Heartfelt appreciation to the people and leadership of Bhutan for the reverent welcome accorded to the Sacred Relics of Lord Buddha from India.

These relics symbolise the timeless message of peace, compassion and harmony. The teachings of Lord Buddha are a sacred link between our two nations’ shared spiritual heritage."

https://facebook.com/share/p/16kev8w8rv/?mibextid=wwXIfr

@tsheringtobgay