“राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घडवत आहेत भारताच्या असामान्य क्रीडा सामर्थ्याचे दर्शन”
“भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गुणवत्ता भरली आहे. म्हणूनच 2014 नंतर आम्ही क्रीडा संस्कृतीला चालना देण्याची राष्ट्रीय वचनबद्धता स्वीकारली”
“गोव्याचे तेजोवलय तुलनेच्या पलीकडे आहे”
“भारताचे क्रीडाविश्वातील अलीकडच्या काळातील यश प्रत्येक युवा क्रीडापटूसाठी अतिशय मोठी प्रेरणा आहे”
“खेलो इंडियाच्या माध्यमातून गुणवत्तेचा शोध घ्या, तिची जोपासना करा आणि त्यांना ऑलिंपिक्स पोडियम फिनिशसाठी टॉप्सच्या माध्यमातून प्रशिक्षण द्या आणि विजेतेपदाची मानसिकता तयार करा हा आमचा आराखडा आहे”
“भारत विविध क्षेत्रात आगेकूच करत आहे आणि आज अभूतपूर्व मापदंड प्रस्थापित करत आहे”
“भारताची गती आणि व्याप्ती यांची बरोबरी करणे अवघड आहे”
“माझा भारत, भारताच्या युवा शक्तीचे रुपांतर विकसित भारताच्या युवा शक्तीमध्ये करण्याचे माध्यम असेल”
“2030 मध्ये युवा ऑलिंपिक्सचे आणि 2036 मध्ये ऑलिंपिक्सचे आयोजन करण्याची भारताची तयारी आहे. ऑलिंपिक्सचे आयोजन करण्याची आमची आकांक्षा केवळ भावनांपुरती मर्यादित नाही, त्यामागे काही ठोस कारणे देखील आहेत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यामध्ये मडगाव येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन केले. 26 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत या क्रीडा स्पर्धा होणार असून यामध्ये 28 स्थानांवर होणाऱ्या 43 क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील दहा हजार पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गोव्यामध्ये भारतीय खेळांच्या महाकुंभाचा प्रवास सुरू झाला आहे आणि संपूर्ण वातावरण विविध रंग, लहरी, उत्साह आणि साहसाने भरून गेले आहे. गोव्याच्या तेजोवलयासारखे दुसरे काहीच असू शकत नाही असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी गोव्याच्या जनतेचे अभिनंदन केले आणि 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये गोव्याचे योगदान अधोरेखित केले आणि गोव्याच्या फुटबॉल प्रेमाचा दाखला दिला. क्रीडाप्रेमी गोव्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणे हीच मुळी एक उत्साहाची बाब आहे असे त्यांनी नमूद केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब अधोरेखित केली की क्रीडा विश्वामध्ये देश नवी शिखरे सर करत असताना या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सत्तर वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढून मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला आणि सध्या सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये 70 पेक्षा जास्त पदकांसह यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले जात असल्याचे सांगितले. अलीकडेच संपलेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने इतिहास रचला याचा देखील त्यांनी उल्लेख केला. क्रीडा विश्वामध्ये अलीकडच्या काळात भारताला मिळत असलेले यश हे प्रत्येक युवा क्रीडापटूसाठी खूप मोठी प्रेरणा आहे असे मोदी म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या प्रत्येक युवा खेळाडूला भावी काळात यशाच्या शिखराकडे नेणारा एक भक्कम मंच आहे असे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्यासमोर असलेल्या अनेक संधी अधोरेखित केल्या आणि आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले.

भारतात प्रतिभेची कमतरता नाही आणि अनास्था असतानाही देशाने चॅम्पियन घडवले आहेत, तरीही पदकतालिकेतील खराब कामगिरी देशवासियांना नेहमीच डाचत राहिली आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी क्रीडा पायाभूत सुविधा, निवड प्रक्रिया, खेळाडूंसाठी आर्थिक सहाय्य योजना, प्रशिक्षण योजना आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये 2014 नंतर झालेल्या बदलांचा उल्लेख केला , ज्याद्वारे क्रीडा परिसंस्थेच्या मार्गातील अडथळे एकेक करून दूर होत आहेत. सरकारने नैपुण्य शोधण्यापासून ते त्यांना ऑलिम्पिकच्या मैदानापर्यंत नेण्यापर्यंतचा आराखडा बनवला आहे.

 

या वर्षीची क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद नऊ वर्षांपूर्वीच्या क्रीडा क्षेत्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा तिप्पट असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. ते म्हणाले की खेलो इंडिया आणि टॉप्स सारख्या उपक्रमांची नवीन परिसंस्था शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून प्रतिभावान खेळाडू शोधत आहे. ते म्हणाले की टॉप्समध्ये अव्वल खेळाडूंना जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण मिळते आणि खेलो इंडियामध्ये 3000 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. खेळाडूंना वर्षाला 6 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळत आहे. खेलो इंडिया अंतर्गत निवडलेल्या सुमारे 125 खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि 36 पदके पटकावली. “खेलो इंडियाच्या माध्यमातून निपुण खेळाडू शोधून, त्यांना स्पर्धेसाठी घडवून टॉप्स द्वारे ऑलिम्पिक खेळाचे मैदान गाजवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आणि मनोधैर्य वाढवणे हा आमचा आराखडा आहे,” असेही ते म्हणाले.

“कोणत्याही देशाच्या क्रीडा क्षेत्राची प्रगती थेट त्याच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीशी निगडीत असते”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी निदर्शनास आणले की देशातील नकारात्मक वातावरण क्रीडा क्षेत्र तसेच दैनंदिन जीवनात आढळते, तर भारताचे क्रीडा क्षेत्रातील अलीकडील यश त्याच्या एकूण यशोगाथेसारखे प्रतीत होते. भारत नवनवीन विक्रम मोडत असून प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. “भारताचा वेग आणि व्याप्ती जुळणे कठीण आहे” यावर  त्यांनी भर दिला. गेल्या 30 दिवसांतील भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की, जर देश त्याच प्रमाणात आणि वेगाने पुढे जात राहिला तर मोदीच तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्याची हमी देऊ शकतात. उदाहरणे देताना, पंतप्रधानांनी नारी शक्ती वंदन अधिनियम, गगनयानची यशस्वी चाचणी, भारतातील पहिल्या रॅपिड रेल्वे 'नमो भारत'चे उद्घाटन, बेंगळुरू मेट्रोचा विस्तार, जम्मू-काश्मीरची पहिली व्हिस्टा डोम ट्रेन सेवा, दिल्ली-वडोदरा द्रुतगती मार्ग, जी 20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन, 6 लाख कोटी रुपये किमतीचे करार झालेली जागतिक सागरी शिखर परिषद, इस्रायलमधून भारतीयांची सुटका केलेले ऑपरेशन अजय, भारत आणि श्रीलंका दरम्यान फेरी सेवांची सुरुवात, 5G वापरकर्त्यांच्या यादीत सर्वोच्च 3 मध्ये भारताचा समावेश, अॅपलनंतर स्मार्टफोन बनवण्याची गुगलची नुकतीच घोषणा आणि देशात फळ आणि भाजीपाला उत्पादनात नवा विक्रम याचा उल्लेख केला. "ही फक्त अर्धी यादी आहे" असे  त्यांनी अधोरेखित केले.

 

पंतप्रधान म्हणाले की, देशात सुरू असलेल्या सर्व कामांच्या केंद्रस्थानी  देशाचा तरुण आहे. त्यांनी ‘माय भारत’ या नवीन प्लॅटफॉर्म बद्दल सांगितले जे युवकांना आपापसात आणि देशाच्या योजनांशी जोडण्यासाठी वन-स्टॉप केंद्र असेल जेणेकरून त्यांना त्यांची क्षमता जोखण्याची आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याची जास्तीत जास्त संधी मिळेल. भारताच्या युवा शक्तीला विकसित भारताची युवा शक्ती बनवण्याचे हे माध्यम असेल”, असे ते म्हणाले. आगामी एकता दिवसानिमित्त पंतप्रधान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. त्यादिवशी रन फॉर युनिटी अर्थात एकता दौड चा भव्य कार्यक्रम व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज जेव्हा भारताचा संकल्प आणि प्रयत्न दोन्ही मोठ्या उंचीवर आहेत, तेव्हा भारताच्या आकांक्षा मोठ्या असणे स्वाभाविक आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्रादरम्यान मी 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा सर्वांसमोर मांडल्या. मी ऑलिम्पिकच्या सर्वोच्च समितीला खात्री दिली की,  2030 मध्ये युवा ऑलिम्पिक आणि 2036 मध्ये ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्याची भारताची तयारी आहे. ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्याची आपली आकांक्षा केवळ भावनांपुरती मर्यादित नाही. उलट यामागे काही ठोस कारणे आहेत.” पंतप्रधान म्हणाले की 2036 मध्ये भारताची अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा ऑलिम्पिकचे सहज आयोजन करण्यासाठी सक्षम असतील. “आपले राष्ट्रीय खेळ देखील एक भारत, श्रेष्ठ भारताचे प्रतीक आहेत”, यावर भर देत, हे खेळ भारतातील प्रत्येक राज्याला आपली क्षमता दाखविण्याचे उत्तम माध्यम असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. गोवा सरकार आणि गोव्यातील जनतेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी केलेल्या तयारीची त्यांनी प्रशंसा केली. येथे निर्माण झालेल्या क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत सुविधा गोव्यातील तरुणांना पुढील अनेक दशकांसाठी उपयोगी  ठरतील आणि या भूमीतून देशासाठी अनेक नवे खेळाडू निर्माण होतील, तसेच या पायाभूत सुविधांचा उपयोग भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी केला जाईल, असे ते म्हणाले. “गेल्या काही वर्षांत गोव्यात दळणवळणाशी संबंधित आधुनिक पायाभूत सुविधाही निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे गोव्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल”, असेही ते म्हणाले.

 

गोवा ही उत्सवांची भूमी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उल्लेख करून, आंतरराष्ट्रीय परिषदा आणि शिखर संमेलनांचे केंद्र म्हणून राज्याचे वाढते महत्व त्यांनी अधोरेखित केले.

2016 ची ब्रिक्स (BRICS) परिषद आणि अनेक G20 परिषदांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी G20 ने ‘शाश्वत पर्यटनासाठी गोव्याचा पथदर्शक आराखडा’ स्वीकारल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत, क्षेत्रात कोणतेही आव्हान समोर आले, तरी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले. “आपण ही संधी गमावता कामा नये. या आवाहनासह, मी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाल्याचे घोषित करतो. सर्व खेळाडूंना पुन्हा खूप खूप शुभेच्छा. गोवा सज्ज आहे”, ते म्हणाले.

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर, आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉ पी टी उषा यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशातील क्रीडा संस्कृतीत मोठा बदल झाला आहे. केंद्र सरकारच्या सातत्त्यपूर्ण मदतीमुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि खेळांची लोकप्रियता वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाचे महत्त्व ओळखून, देशात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.

 

गोव्यामध्ये प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत या क्रीडा स्पर्धा होणार आहेत.  देशभरातील 10,000 पेक्षा अधिक खेळाडू  या स्पर्धेत सहभागी होत आहे. विविध  28 ठिकाणी आयोजित केलेल्या 43 हून अधिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांमध्‍ये हे खेळाडू सहभागी होतील.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi distributes 6.5 million 'Svamitva property' cards across 10 states

Media Coverage

PM Modi distributes 6.5 million 'Svamitva property' cards across 10 states
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi salutes the brave personnel of the National Disaster Response Force on its Raising Day
January 19, 2025

Lauding the the courage, dedication and selfless service of the brave personnel of the National Disaster Response Force, the Prime Minister Shri Narendra Modi today greeted them on the occasion of its Raising Day.

In a post on X, he wrote:

“On this special occasion of the Raising Day of the National Disaster Response Force (NDRF), we salute the courage, dedication and selfless service of the brave personnel who are a shield in times of adversity. Their unwavering commitment to saving lives, responding to disasters and ensuring safety during emergencies is truly commendable. The NDRF has also set global standards in disaster response and management.

@NDRFHQ”