पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासोबत दूरध्वनीवरून संयुक्त चर्चा केली.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही शक्ती म्हणून, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात विश्वास, सामायिक मूल्ये आणि भविष्याचा समान दृष्टिकोन या आधारावर बांधलेले मजबूत आणि घनिष्ठ नाते संबंध आहेत. नेत्यांनी भारत युरोपियन युनियन धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले, यामुळे जागतिक समस्यांना संयुक्तपणे तोंड देणे, स्थिरता वाढवणे आणि परस्पर समृद्धीसाठी नियम-आधारित व्यवस्थेला प्रोत्साहन देणे शक्य होईल.
नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, नवोन्मेष, शाश्वतता, संरक्षण, सुरक्षा आणि पुरवठा साखळी स्थिरता यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचे स्वागत केले आणि भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्यासाठी तसेच आयएमईईसी कॉरिडॉरची अंमलबजावणी व्हावी यासाठीची सामायिक बांधिलकी पुन्हा दृढ केली.
फेब्रुवारीमध्ये युरोपियन युनियन कॉलेज ऑफ कमिशनर्सच्या भारत भेटीच्या ऐतिहासिक आधारावर, पुढील भारत युरोपियन युनियन शिखर परिषदेचे आयोजन भारतात परस्पर सोयीच्या तारखेला लवकरात लवकर करण्याबद्दल नेत्यांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी या शिखर परिषदेसाठी दोन्ही नेत्यांना भारतात आमंत्रित केले.
नेत्यांनी युक्रेनमधील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांसह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली. पंतप्रधान मोदींनी संघर्षाचे शांततापूर्ण मार्गाने समाधान आणि लवकरच शांतता आणि स्थिरता पुनर्स्थापित करण्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.
सातत्याने संपर्कात राहण्यावर या नेत्यांनी सहमती दर्शवली.


