सन्माननीय महोदय, पंतप्रधान डोनाल्ड टस्क

उभय देशांचे प्रतिनिधी,

प्रसार माध्यमातील सहकारी,

 

नमस्कार!

वॉर्सासारख्या सुंदर शहरामध्ये अतिशय उत्साहात केलेले स्वागत, भव्य आदरातिथ्य, सत्कार आणि मित्रत्वाच्या नात्याने भारलेले शब्द, यासाठी मी पंतप्रधान टस्क यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो.

 

आपण खूप प्रदीर्घ काळापासून भारताचे अतिशय चांगले मित्र आहात. भारत आणि पोलंड यांच्यातील मैत्री  अधिक मजबूत करण्यामध्ये आपले खूप मोठे योगदान आहे.

मित्रांनो,

आजच्या दिवशी   भारत आणि पोलंड यांच्यातील संबंधांच्याबाबतीत  विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज 35 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानाने पोलंडचा दौरा केला आहे.

माझ्या तिस-या कार्यकाळाच्या प्रारंभीच मला पोलंडला  येण्याचे सद्भाग्य मिळाले आहे. याप्रसंगी मी पोलंडचे सरकार आणि इथल्या लोकांचे मी विशेष आभार मानतो.

आपण, 2022 मध्ये युक्रेन युद्ध संघर्षामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी पोहोचविताना ज्या प्रकारची उदारता दाखवली, या गोष्टीचे आम्हां भारतवासीयांना कधीही  विस्मरण होणार नाही.

मित्रांनो,

या वर्षी आपण आपल्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापनदिन साजरा करीत आहोत. याप्रसंगी आम्ही आपल्या संबंधांचे ‘धोरणात्मक भागिदारी’मध्‍ये  रूपांतर  करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि पोलंड यांच्यातील संबंध लोकशाही आणि कायद्याचे राज्य यासारख्या सामायिक मूल्यांवर आधारित आहे.

आज आम्ही उभय राष्ट्रातील संबंधांना एक नवीन दिशा  देण्यासाठी पुढाकार घेत असल्याची  ओळख पटवली आहे.

दोन लोकशाहीवादी देश या स्वरूपामध्ये आमच्या संसदीय प्रणालीमध्‍ये  आदान -प्रदान करण्यासाठी  प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.

आर्थिक  सहकार्याला व्यापक स्वरूप प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्रांना जोडण्याचे काम करण्यात येईल.

अन्न प्रक्रियेच्या क्षेत्रामध्ये पोलंड  जागतिक नेता आहे.

आमची इच्छा आहे की, भारतामध्ये सुरू  असलेल्या मेगा फूड पार्कच्या कामाबरोबर पोलंडच्या कंपन्याही जोडल्या जाव्यात.

भारतामध्ये वेगाने शहरीकरण होत आहे,  त्यामुळे जल प्रक्रिया , घन कचरा व्यवस्थापन, शहरी पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या सहयोगाने नवीन संधींचा मार्ग मोकळा होत आहे.

स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, या क्षेत्राही सहकार्य करण्यास आम्ही प्राधान्य देत आहे.

आम्ही पोलंडच्या कंपन्यांना ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फार द वर्ल्ड’ या उपक्रमामध्ये  सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहोत.

फिन टेक, औषध निर्मिती, अंतराळ अशा क्षेत्रामध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी  केली आहे.

या क्षेत्रातील आमचा अनुभव पोलंडबरोबर सामायिक करण्यास आम्हाला आनंद वाटेल. 

संरक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य करणे म्हणजे आपल्यातील सखोल विश्वासाचे प्रतीक आहे.

या क्षेत्रामध्ये एकमेकांना केले  जाणारे सहकार्य आपल्यातील संबंध अधिक सुदृढ करणारे ठरतील.

नवोन्मेषी संकल्पना आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी म्हणजे आमच्या देशातील युवाशक्तीचा परिचय आहे.

कुशल कार्यदलाच्या कल्याणासाठी, कुशल कामगारांच्या भल्यासाठी आणि ‘मोबोलिटी‘ला प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशांमध्ये समाजिक सुरक्षा करारावर सहमती झाली आहे.

 

मित्रांनो,

भारत आणि पोलंड आंतरराष्ट्रीय मंचावरही जवळीकतेने एकमेकांशी संतुलन साधत पुढे जात आहेत.

उभय देशांनी वर्तमान काळाची मागणी ओळखून वैश्विक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये  सुधारणा करण्यावर सहमती दर्शवली आहे.

आपल्यासाठी दहशतवादाचे एक खूप मोठे आव्हान आहे.

मानवतेवर विश्वास असलेल्या भारत आणि पोलंडसारख्या देशांनी या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अधिक सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

त्याचप्रमाणे हवामान परिवर्तन आमच्यादृष्‍टीने  सहयोग करण्यासाठी प्राधान्य असलेला विषय आहे.

आम्ही उभय देश एकत्रित  येवून  आपल्या क्षमता दुप्पट करून हरित भविष्यासाठी काम करू.

जानेवारी 2025 मध्ये पोलंड युरोपीय संघाचे अध्यक्षपद सांभाळणार आहे.

मला विश्वास आहे की, आपल्या सहकार्याने भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. 

मित्रांनो,

युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आपल्या सर्वांसाठी अतिशय चिंतेचा विषय आहे.

भारताचा दृढ विश्वास आहे की, कोणत्याही समस्येवर तोडगा रणभूमीवर निघू शकत नाही.

कोणत्याही संकटामध्ये निष्पाप लोकांच्या जीविताची हानी  होणे, हे संपूर्ण मानवतेसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे.

आम्ही शांती आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित व्हावे, यासाठी संवाद आणि राजनैतिक चर्चेचे समर्थन करीत आहे.

यासाठी  भारत आपल्या मित्र देशाबरोबर मिळून सर्वतोपरी सहकार्य करण्यास सिद्ध आहे. 

मित्रांनो,

पोलंडमध्ये ‘इंडोलॉजी‘ आणि संस्कृत यांची खूप प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे.

भारतीय संस्कृती आणि भाषा यांच्याविषयी सखोल आवड हा  आपल्या संबंधांचा मजबूत पाया आहे.

आपल्यातील थेट लोकांमध्ये -लोकांशी असलेला ऋणानुबंध याचे प्रत्यक्ष आणि जीवंत उदाहरण मी काल पाहिले.

‘इंडियन पोल्स’ येथील  दोबरे महाराजा, आणि कोल्हापूरच्या महाराजांच्या स्मरणार्थ बनविण्यात आलेल्या स्मृतिस्थळावर मला श्रद्धांजली अर्पण करण्याचे सद्भाग्य मिळाले.

मला आनंद वाटतो की, पोलंडचे  लोक त्यांच्या परोपकारी वृत्तीचा आणि औदार्याचा सन्मान करीत आहेत.

त्यांच्या स्मृती अमर करण्यासाठी  आम्ही भारत आणि पोलंड यांच्या दरम्यान ‘जाम साहेब ऑफ नवानगर युथ एक्सचेंज प्रोग्रॅम’ प्रारंभ करीत आहोत.

या कार्यक्रमाअंतर्गत दर वर्षी पोलंडचे 20 युवक भारताच्या दौ-यावर येतील.

मित्रांनो,

मी पुन्हा एकदा   पंतप्रधान टस्क यांचे आणि त्यांच्या मैत्रीसाठी आभार व्यक्त करतो. आणि आपल्यातील संबंधांना नवीन स्तरावर घेवून जाण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार करतो.

खूप खूप धन्यवाद !!

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India among top nations on CEOs confidence on investment plans: PwC survey

Media Coverage

India among top nations on CEOs confidence on investment plans: PwC survey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जानेवारी 2025
January 21, 2025

Appreciation for PM Modi’s Effort Celebrating Culture and Technology