पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
पंतप्रधानांनी दोहा येथील हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि कतार राज्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा निषेध केला. गाझामध्ये युद्धबंदी आणि सर्व ओलिसांची सुटका करण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नांसह प्रादेशिक शांतता आणि स्थिरता वाढविण्यात कतारने बजावलेल्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
तणाव वाढू न देता संवाद आणि कूटनीतीद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी पाठिंबा देण्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारत या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेच्या समर्थनात आणि त्याच्या सर्व स्वरूपातील आणि प्रकटीकरणातील दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शेख तमीम यांनी कतारच्या जनतेशी आणि राज्यासोबत ऐक्यभाव व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी भारत-कतार धोरणात्मक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
घनिष्ट संपर्क प्रस्थापित करण्यास त्यांनी सहमती दर्शवली.


