नरेंद्र मोदी

‘वसुधैव कुटुंबकम्’- या दोन शब्दांमध्ये सखोल तत्वज्ञान सामावलेले आहे. याचा अर्थ आहे ‘ हे जग म्हणजे एक कुटुंब आहे.’ हा एक सर्वसमावेशक विचार आहे जो आपल्याला सीमा, भाषा आणि विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन एक सार्वत्रिक कुटुंब म्हणून प्रगती करण्यासाठी प्रेरित करतो. भारताच्या जी20 अध्यक्षतेच्या काळात याचे रुपांतर मानवकेंद्री विकासाच्या आवाहनात झाले आहे. एक पृथ्वी म्हणून आपण सर्व आपल्या ग्रहाचे संवर्धन करण्यासाठी एकत्र येत आहोत. एक कुटुंब म्हणून आपण परस्परांना विकासासाठी पाठबळ देत आहोत. आणि आपण सर्व एका सामाईक भवितव्याच्या दिशेने- एका भविष्याच्या दिशेने एकत्र वाटचाल करत आहोत; जे या परस्पर-संलग्नतेच्या काळात एक सर्वमान्य सत्य आहे.

महामारी-पश्चात जगामधील देशांची स्थिती महामारीपूर्व काळापेक्षा खूपच वेगळी आहे. यामध्ये इतर बदलांबरोबरच तीन महत्त्वाचे बदल झाले आहेत.

सर्वात पहिला बदल म्हणजे आता जगाच्या जीडीपी- केंद्रित दृष्टीकोनापेक्षा मानव-केंद्रित दृष्टीकोनाकडे वळण्याची गरज असल्याची भावना वाढीला लागत आहे.

दुसरा बदल म्हणजे जागतिक पुरवठा साखळीच्या चिवटपणाचे आणि विश्वासार्हतेचे महत्त्व जगाला पटू लागले आहे.

तिसरा बदल म्हणजे, जागतिक संस्थांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून बहुपक्षवादाला चालना देण्याचा सामूहिक सूर व्यक्त होऊ लागला आहे.

या सर्व बदलांमध्ये आमच्या जी20 अध्यक्षतेने एका उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे.

डिसेंबर 2022 मध्ये ज्यावेळी आम्ही इंडोनेशियाकडून अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तेव्हा मी लिहिले होते की मानसिकतेमधील बदलाला जी20 ने चालना देण्याची गरज आहे. ग्लोबल साऊथ आणि आफ्रिकेतील विकसनशील देशांच्या आकांक्षांना मुख्य प्रवाहात आणण्या संदर्भात याची विशेषत्वाने गरज होती. 125 देशांचा सहभाग असलेल्या ग्लोबल साऊथ शिखर परिषदेमधून घुमलेला आवाज, हा आमच्या जी20 अध्यक्षतेखालील उपक्रमांमधील एक महत्त्वाचा उपक्रम होता. ग्लोबल साऊथ देशांचे अभिप्राय आणि त्यांच्या संकल्पना, त्यांचे विचार जाणून घेण्याच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम होता.

तसेच भारताच्या अध्यक्षतेच्या कालावधीत जी-20 मध्ये आफ्रिकी देशांकडून आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला, एवढेच नव्हे तर आफ्रिकी संघातील देशांचा जी-20 चे स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्याची मागणी देखील अधिक ठामपणे मांडण्यात आली.

एकमेकांशी जोडले गेलेले आपले जग म्हणजे विविध क्षेत्रांतील आपली आव्हाने देखील एकमेकांशी जोडलेली असणे आहे.वर्ष 2030 साठीच्या कार्यक्रमपत्रिकेतील उद्दिष्टांचा अर्धा प्रवास पूर्ण करण्याचे हे वर्ष आहे आणि अनेकांना अशी चिंता सतावते आहे की शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (एसडीजी)प्रगतीचा मार्ग काहीसा भरकटला आहे. एसडीजी साध्य करण्याच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठीची जी-20 2023 कृती योजना यापुढील काळात एसडीजीच्या अंमलबजावणीच्या दिशेने जी-20 ची दिशा निश्चित करेल.

भारतात, निसर्गाशी एकरूप होऊन जगणे ही प्राचीन काळापासूनची सामान्य जीवनपद्धती आहे आणि आपण आधुनिक काळात देखील हवामान बदल विषयक कृतीमधील योगदानाचा आपला वाटा उचलत आहोत.

ग्लोबल साउथमधील अनेक देश सध्या विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि म्हणूनच हवामानबदल विषयक कृती त्यांना राबविण्यासाठी अनुकूल असली पाहिजे. हवामान बदल विषयक कृतीच्या आकांक्षा आपल्या हवामानबदल विषयक वित्तपुरवठा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण यांच्या कृतीशी जुळल्या पाहिजेत.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय करायला नको याबाबतीतील निव्वळ निर्बंधात्मक वृत्तीपासून दूर जाऊन, काय केले पाहिजे त्यावर लक्ष केंद्रित करुन अधिक रचनात्मक वृत्ती स्वीकारण्याची गरज आहे यावर आमचा विश्वास आहे.

शाश्वत तसेच लवचिक नील अर्थव्यवस्थेसाठी चेन्नई एचएलपीएस मध्ये आपले महासागर अधिक निरोगी राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

आपल्या अध्यक्षतेतून हरित हायड्रोजन नवोन्मेष केंद्रासह, स्वच्छ आणि हरित हायड्रोजनसाठीची जागतिक परिसंस्था उदयाला येईल.

वर्ष 2015 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली. आता, जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून आपण चक्राकार अर्थव्यवस्थेच्या फायद्याशी सुसंगत असणारे उर्जा स्थित्यंतर शक्य होण्यासाठी जगाला मदत करत आहोत.

हवामान बदल विषयक कृतीचे लोकशाहीकरण करणे हा चळवळीला गती देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्याप्रमाणे व्यक्ती आपल्या दीर्घकालीन आरोग्याचा विचार करून दैनंदिन निर्णय घेतात, त्याचप्रमाणे ग्रहाच्या दीर्घकालीन आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून ते जीवनशैलीचे निर्णय घेऊ शकतात. ज्याप्रमाणे निरामयतेसाठी योग एक जागतिक लोकचळवळ झाली आहे, त्याचप्रमाणे आपण शाश्वत पर्यावरणासाठी जीवनशैली (LiFE) ने जगाला प्रेरित केले आहे.

हवामान बदलाच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वपूर्ण ठरते. मिलेट्स अर्थात भरडधान्ये किंवा श्री अन्न , क्लायमेट -स्मार्ट शेतीला चालना देत यासाठी साहाय्यकारी ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षात, भरडधान्यांना आपण जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अन्न सुरक्षा आणि पोषण विषयक आव्हानांवर कृती सांगणारी 'डेक्कन हाय लेव्हल प्रिन्सिपल्स ऑन फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन' ही तत्त्वेदेखील या दिशेने उपयुक्त आहेत.

तंत्रज्ञान परिवर्तनकारी आहे पण ते सर्वसमावेशक बनवायला हवे. भूतकाळात, तांत्रिक प्रगतीचे फायदे समाजातील सर्व घटकांना समान रीतीने लाभले नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर विषमता रुंदावण्याऐवजी त्या कमी करण्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो, हे भारताने गेल्या काही वर्षांमध्ये दाखवून दिले आहे

उदाहरणार्थ, जगभरातील अब्जावधी लोक जे बँक सेवेपासून वंचित राहतात किंवा ज्यांना डिजिटल ओळख नसते, अशा लोकांसाठी , डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेद्वारे (DPI) वित्तीय समावेशन करणे शक्य आहे. आपण आपल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून तयार केलेल्या उपायांची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. आता, जी 20 च्या माध्यमातून, आम्ही विकसनशील देशांना सर्वसमावेशक विकासाची शक्ती जागृत करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी अनुकूलनशीलता, निर्माण आणि उंचावण्यात साहाय्य करू.

भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, हा योगायोग नाही. आपल्या साध्या, मोठा आवाका असलेल्या आणि शाश्वत उपायांनी समाजाच्या असुरक्षित आणि उपेक्षित घटकाला आपली विकासाची गाथा पुढे नेण्यासाठी सक्षम केले आहे. अवकाश क्षेत्रापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते उद्योजकतेपर्यंत, भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यांनी महिलांचा विकास, या संकल्पनेला महिलांच्या नेतृत्वाखालील विकासामध्ये परिवर्तीत केले आहे. भारताच्या जी20 अध्यक्षपदा अंतर्गत आपण लिंग आधारित डिजिटल तफावत दूर करण्याचा, कामगारांच्या सहभागामधील तफावत कमी करण्याचा आणि महिलांचा नेतृव आणि निर्णय प्रक्रियेमधील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.

भारतासाठी, जी20 अध्यक्षपद हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही. लोकशाहीची जननी आणि विविधतेचे मॉडेल म्हणून आम्ही या अनुभवाची कवाडे जगासाठी खुली केली आहेत.

आज, मोठ्या प्रमाणावर उद्दिष्टे पूर्ण करणे हा एक गुण समजला जातो, आणि तो भारताशी संबंधित आहे. जी20 चे अध्यक्षपद, यासाठी अपवाद नाही. ही एक लोक-नेतृत्वाखालील चळवळ बनली आहे. भारताच्या विशाल भूभागावर, 60 शहरांमध्ये 200 पेक्षा जास्त बैठका आयोजित करण्यात आल्या असून, आपल्या कार्यकाळात 125 पेक्षा जास्त देशांच्या जवळजवळ 100,000 प्रतिनिधींनी या बैठकींना हजेरी लावली. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या जी 20 अध्यक्षपदा अंतर्गत एवढा विशाल आणि वैविध्यपूर्ण भूभाग व्यापला गेला नाही.

भारताची लोकसंख्या, लोकशाही, विविधता आणि विकास याविषयी दुसऱ्याकडून ऐकणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे पूर्णपणे वेगळे आहे. मला खात्री आहे की जी 20 परिषदेत सहभागी व्हायला आलेले प्रतिनिधी याला नक्की दुजोरा देतील.

आपले जी 20 अध्यक्षपद एकमेकांना जोडण्याचा, अडथळे दूर करण्याचा, आणि जगाचे पोषण करणाऱ्या सहकार्याची बीजे रोवण्याचा प्रयत्न करते, जिथे एकता विसंवादावर विजय मिळवते, जिथे सामायिक नियती एकाकीपण दूर करते.

जी 20 चे अध्यक्ष या नात्याने आपण प्रत्येक आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येक देशाचे योगदान राहील, याची खात्री करून जागतिक अवकाश विस्तारण्याची प्रतिज्ञा केली. आपण आपल्या प्रतिज्ञेला कृती आणि परिणामांची जोड दिली, याबद्दल मी आशावादी आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin

Media Coverage

Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताच्या एकात्मतेसाठी आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन
July 06, 2026

आज सहा जुलै, राष्ट्रवाद आणि निस्वार्थ सेवेचा आदर्श मानणाऱ्या, त्यांची जपणूक करणाऱ्या सर्व लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती आहे. भारत मातेच्या सेवेप्रती कटिबद्धता आणि धैर्य यांचे ते कालातीत मूर्तिमंत उदाहरण आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात, असे अगदी कमी लोक आहेत, ज्यांच्यात बुद्धीमत्ता, सार्वजनिक सेवाभाव आणि नैतिक दृढनिश्चय यांचा संगम आढळतो, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्यापैकीच एक आहेत.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म अशा परिस्थितीत झाला होता, जिथे, त्यांना सहज एक आरामदायी आणि सुरक्षित आयुष्य मिळू शकले असते. त्यांचे पिता, सर आशुतोष मुखर्जी, त्या काळातील एक आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर बुद्धिवादी होते. नियतीने त्यांना, एक अत्यंत उच्चभ्रू, सुखासीन आयुष्य दिले असले, तरी त्यांच्यातील विवेकाने, त्यांना देशसेवा आणि त्यागाचा मार्ग दाखवला. त्या काळातील अत्यंत अस्थिर परिस्थितीत आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असा कौल त्यांच्या मनाने त्यांना दिला. मग ती वसाहतवादी शक्तींशी लढाई असो, जातीवाद, धर्मभेद किंवा मग मानवतेसमोरची आव्हाने असोत, अथवा इतर काही. त्यांच्या या प्रवासात त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे, दु:खाचा सामना करावा लागला, यात अगदी त्यांचं बाळ आणि नंतर त्यांच्या पत्नीचे झालेले देहावसान, अशा अपार दु:खाच्या प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागला. मात्र अशा सगळ्या दु:खांनी, त्यांचा दृढनिश्चय अधिक वाढवला आणि देशाची सेवा करण्याची कटिबद्धता अधिक दृढ केली.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या सार्वजनिक जीवनातील एक आदर्श, जो या सगळ्या गुणांच्या वर होता, असे सांगायचे झाले, तर तो आदर्श गुण ठरेल, अखंड भारताप्रती त्यांची निष्ठा! फाळणीच्या गदारोळात, हिंसाचारातही, पश्चिम बंगाल हा भारताचा अविभाज्य घटक राहील, यासाठी ते पाय घट्ट रोवून उभे राहिले. काही वर्षांनी, त्यांच्या याच अखंडतेच्या ध्यासाने, ते जम्मू आणि काश्मीरला गेले. तिथे झालेला तुरुंगवास ही त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करु शकला नाही. मात्र, याच तुरुंगवासात त्यांचा अकाली मृत्यू झाला. तुरुंगावासात, अशा ठिकाणी..एकटेपणात.. ज्या लाखो लोकांचं आयुष्य त्यांनी स्वतःचे आयुष्य बनवले होते, अशा सगळ्या मोलाच्या माणसांपसून दूर. इतिहासात असे काही क्षण येतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सर्वोच्च बलिदानामुळे ती व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे जाते आणि त्यांचे कर्तव्य, एका राष्ट्रीय स्मृती ठरतात. आचार्य विनोबा भावे एकदा असे म्हणाले होते की, ज्या तत्वावर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा दृढविश्वास होता, त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःचे बलिदान दिले. या घटनेनंतर अनेक वर्षांनी, कलम 370 आणि अनुच्छेद 35 (अ) हटवणे (2019 चा कायदा), ही त्यांच्या बलिदानाला दिलेली सर्वोच्च मानवंदना होती.

डॉ. मुखर्जी यांनी, कायमच भारताला आणि भारतीय मूल्यांना प्रथमस्थानी ठेवले. त्यासाठी त्यांनी त्या काळातील प्रचलित विचारसरणींना छेद देणाऱ्या संस्था उभारून आणि सक्षम व्यवस्था घडवून हे सिद्ध केले. ते कलकत्ता विद्यापीठाचे सर्वांत तरुण कुलगुरू बनले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीद्वारे त्यांनी देशभक्तीची प्रेरणा देणारे आणि भविष्याची दृष्टी असलेले सकारात्मक बदल घडवून आणले. शिक्षणतज्ज्ञांच्या एका परिषदेला संबोधित करताना डॉ. मुखर्जी यांनी अतिशय समर्पक शब्दांत म्हटले होते की, शैक्षणिक संस्थांकडे संभाव्य कारकून आणि अल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी तयार करणारे कारखाने म्हणून पाहणे चुकीचे आहे. नगरपालिका, प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळे यांसारख्या आपल्या स्वशासित संस्थांना नेतृत्व देण्यास सक्षम असलेले, तसेच वित्तीय, व्यापारी आणि औद्योगिक अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांतील कामकाजाचे संचालन करू शकणारे विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता विद्यापीठाने ग्रंथालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, विज्ञान विषयातील संशोधनाला चालना देणे, पुरावस्तूंच्या अध्ययनाला प्रोत्साहन देणे तसेच कृषी विषयातील अभ्यासक्रम सुरू करणे, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. त्यांनी क्रीडा, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी कल्याण यांसारख्या क्षेत्रांकडेही विशेष लक्ष वेधले. विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी 24 जानेवारी हा दिवस विद्यापीठाचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. विद्यापीठासाठी गीत रचण्याची विनंती त्यांनी थेट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनाच केली होती.

त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, त्यातूनही हीच भावना दिसून येते. त्या काळात काँग्रेस पक्षाचे सगळीकडे वर्चस्व असताना, भारताच्या प्रगतीसाठी आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहून पर्यायी आवाज उभा राहणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांना वाटत होते. कदाचित म्हणूनच त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मातीचा दिवा होते. एक दिवा दिसायला साधा वाटू शकतो; मात्र स्वतःच्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक अंधार दूर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. जनसंघाने आपल्या कार्यरत असलेल्या काळात आणि त्यानंतरही नेमके हेच कार्य केले.

भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा कार्यकाळ हा विकासाविषयी अत्यंत व्यापक आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या एका नेत्याचे दर्शन घडवतो. नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राचा सन्मान, संधी आणि आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याचे साधन म्हणून त्यांनी उद्योगांकडे पाहिले. संपत्तीची निर्मिती आणि मूल्यवर्धन यांचा त्यांनी आदर केला. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, सिंद्री खत प्रकल्प आणि भक्कम औद्योगिक धोरण यांसारख्या अग्रणी उपक्रमांद्वारे आधुनिक औद्योगिक भारताचा पाया रचत असतानाच, भारताच्या पारंपरिक सामर्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही त्यांनी खात्री केली. हातमाग, कुटीर उद्योग, कारागीर आणि वस्त्रोद्योगातील कामगार यांनाही त्यांच्यामध्ये तितकाच कटिबद्ध पुरस्कर्ता लाभला.

याठिकाणी मला एक वैयक्तिक अनुभव सांगायचा आहे. आत्मनिर्भरतेच्या स्पष्ट दृष्टिकोनातून डॉ. मुखर्जी यांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या सिंद्री खत प्रकल्पाकडे अनेक दशके देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मला याचा अभिमान वाटतो की, आमच्या सरकारला या परंपरेच्या पुनरुज्जीवनात योगदान देण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात उपस्थित राहणे हा खरोखरच सर्वात विशेष क्षणांपैकी एक होता.

भारताच्या सांस्कृतिक परंपरेने फार पूर्वीपासून संवाद आणि चर्चांना महत्त्व दिले आहे. डॉ. मुखर्जी यांनी याच लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व केले होते. सुरुवातीच्या काळात राष्ट्र उभारणीचे कार्य राजकीय मतभेदांच्या पलीकडचे आहे, असा विश्वास बाळगून ते पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात सामील झाले. त्यांनी प्रामाणिकपणे आणि विधायक भावनेने काम केले; परंतु जेव्हा त्यांना वाटले की राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांसाठी वेगळ्या मार्गाची आवश्यकता आहे, तेव्हा त्यांनी सन्मानाने पदाचा त्याग केला आणि राष्ट्राला आवश्यक असलेल्या राजकीय कार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.

75 वर्षांपूर्वी, पंडित नेहरूंनी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणारे होते. डॉ. मुखर्जी हे त्याच्या सर्वात कट्टर विरोधकांपैकी एक होते. काँग्रेस काय करू शकते, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आणि पुढील घडामोडींनी त्यांची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध केले. ज्यांनी 75 वर्षांपूर्वी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, त्यांनीच 1975 मध्ये आणीबाणी लादली आणि त्यानंतर 50 वर्षांपूर्वी 42वी घटनादुरुस्ती करून उदारमतवादी लोकशाही मूल्यांच्या मुळावरच घाव घातला.

डॉ. मुखर्जी त्यांचा मानवतावादी कार्यासाठीही ओळखले जातात. 1943 मध्ये जेव्हा बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला, तेव्हा डॉ. मुखर्जींनी स्वतःला पीडितांच्या सेवेत झोकून दिले. लोकांना अन्न मिळावे, यासाठी त्यांनी अनेक उपहारगृहे आणि मदत केंद्रे उघडली जातील याची खात्री केली. एकीकडे ते आपल्या लोकांच्या दुर्दशेने अत्यंत व्यथित झाले होते, तर दुसरीकडे वसाहतवादी शासकांच्या असंवेदनशीलतेमुळे ते व्यथित झाले होते. त्यांनी ‘पंचशेर मनवंतर’ नावाचे एक पुस्तकही लिहिले, ज्यात त्यांनी आपली व्यथा मांडली. 1942 मध्ये जेव्हा मेदिनीपूरला महाचक्रीवादळाचा तडाखा बसला, तेव्हा परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा झाली.

कोलकाता येथील एका महाविद्यालयात बोलताना डॉ. मुखर्जी यांनी तरुणांना आवाहन केले, “तुम्ही जे काही काम हाती घ्याल, ते गांभीर्याने, सखोलपणे आणि उत्तमरित्या करा; ते कधीही अर्धवट किंवा अपूर्ण सोडू नका, आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान देत नाही, तोपर्यंत समाधानी राहू नका.”

भारत देश ‘विकसित भारता’च्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, त्यांनी ज्या मजबूत, एकसंध, आत्मविश्वासी आणि करुणामय भारतावर दृढ विश्वास ठेवला होता, तो घडवण्यासाठी दररोज प्रयत्न करणे, हीच त्यांच्या स्मृतीला वाहीलेली सर्वोत्तम आदरांजली आहे. आजच्या तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते या आवाहनाला समर्थन देतील.