"100 कोटी लसींच्या मात्रा केवळ आकडा नाही तर देशाच्या सामूहिक शक्तीचे प्रतिबिंब"
"हे भारताचे यश, आणि प्रत्येक भारतीयाचे यश"
"जर आजार भेदभाव करत नाही, तर लसीकरणातही कुठलाच भेदभाव नको.म्हणूनच लसीकरण मोहिमेत व्हीआयपी संस्कृती असणार नाही, हे आम्ही सुनिश्चित केले."
'औषधनिर्मितीचे केंद्र' अशी भारताची जगभरात ओळख यामुळे अधिकच दृढ झाली आहे.
"महामारीविरुद्धच्या देशाच्या लढ्यात,केंद्र सरकारने लोकसहभाग ही संरक्षणाची पहिली ढाल बनवली"
"भारताची संपूर्ण लसीकरण मोहीम विज्ञान-मूलक, विज्ञानप्राणित आणि विज्ञानाधिष्ठित आहे.
"आज भारतीय कंपन्यांमध्ये विक्रमी गुंतवणूक तर येत आहेच, शिवाय युवांसाठी रोजगाराच्या नव्या संधीदेखील निर्माण होत आहेत. स्टार्ट-अप्स मधल्या विक्रमी गुंतवणुकीतून युनिकॉर्न्स उदयास येत आहेत."
"जशी स्वच्छ भारत अभियान एक लोकचळवळ आहे, तशाचप्रकारे, भारतात निर्मित वस्तू, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू विकत घेणे, व्होकल फॉर लोकल होणे हे देखील प्रत्यक्षात आचरणात आणणे महत्त्वाचे,"
"सुरक्षा कवच कितीही उत्तम असले,आधुनिक शस्त्रास्त्रे सुरक्षिततेची पूर्ण हमी देणारी असली तरीही जोवर युद्ध सुरु आहे, तोवर कोणीही शस्त्रे खाली ठेवत नाही, निष्काळजी होण्याची गरज नाही, आपले सर्व सणवार संपूर्ण काळजी घेऊनच साजरे करा"

नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो!

आज मी आपल्या भाषणाचा प्रारंभ वेदामधल्या एका उधृताने करू इच्छितो.

कृतम् मे दक्षिणे हस्ते,

जयो मे सव्य आहितः।

या श्लोकाकडे भारताच्या संदर्भातून आपण पाहिले तर त्याचा अतिशय सोपा आणि साधा, सरळ अर्थ असा आहे की, आपल्या देशाने एकीकडे कर्तव्याचे पालन केले तर दुसऱ्या बाजूला त्याला खूप मोठे यशही मिळाले. लसीच्या एक अब्ज म्हणजेच 100 कोटी मात्रा देण्याचे कठिण तरीही असामान्य लक्ष्य, भारताने काल 21 ऑक्टोबर रोजी  प्राप्त केले आहे. या यशामागे 130 कोटी देशवासियांची कर्तव्यशक्ती पणाला लागली आहे, म्हणूनच हे यश संपूर्ण भारताचे यश आहे. प्रत्येक देशवासियाचे यश आहे. यासाठी मी सर्व देशवासियांचे अगदी मनापासून- हृदयापासून अभिनंदन करतो.

मित्रांनो,

100 कोटी लसीच्या मात्रा देणे, हा केवळ एक आकडा नाही. हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. इतिहासाच्या नवीन अध्यायाची रचना आहे. अतिशय अवघड वाटणारे लक्ष्य निर्धारित करून त्याची प्राप्ती करणा-या या नवीन भारताचे हे एकप्रकारे छायाचित्र आहे. हा नवा भारत आपल्या संकल्पांना सिद्धीस नेण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करतोय.

मित्रांनो,

आज अनेक लोक भारतात राबविलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची तुलना जगातल्या इतर देशांबरोबर करीत आहेत. भारताने ज्या वेगाने 100 कोटी मात्रा देण्याचा आकडा पार केला आहे, त्याचे कौतुकही होत आहे. परंतु यासंबंधीच्या विश्लेषणामध्ये एक गोष्ठ सामान्यपणे दुर्लक्षित होते, ती म्हणजे आपण सुरुवात कुठून केली आहे? जगातल्या इतर मोठ्या देशांना लस निर्मितीसाठी संशोधन करणे, लसीचा शोध लावणे, अशा गोष्टींचा अनेक दशकांपासून अनुभव आहे, ही  कौशल्ये त्यांच्याकडे आहेत, यासाठी त्यांच्याकडे तज्ञ मंडळी आहेत. या देशांनी बनविलेल्या लसींवरच भारत अवलंबून होता. आपण लस बाहेरून मागवत होतो. याच कारणामुळे ज्यावेळी 100 वर्षांतली सर्वात मोठी महामारी आली, त्यावेळी भारताविषयी अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. भारत या महामारीच्या विरोधात लढू शकेल?  दुस-या देशांकडून लसी खरेदी करण्यासाठी भारत इतका प्रचंड पैसा कुठून आणणार? भारताला लस कधी मिळणार? भारतातल्या लोकांना लस मिळेल की नाही? महामारीचा प्रसार रोखण्यासाठी भारत आपल्या देशातल्या इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या सर्व लोकांना लस देवू शकणार का? असे अनेक प्रकारचे  वेगवेगळे प्रश्न होते. परंतु आज लसीच्या 100 कोटी मात्रा देऊन भारताने प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले आहे. भारताने आपल्या नागरिकांना लसीच्या 100 कोटी मात्रा दिल्या आहेत आणि महत्वाचे म्हणजे त्याही मोफत! पैसे न घेता.

मित्रांनो,

100 कोटी लसीकरण मात्रांचा एक प्रभाव हा देखील असेल की जग आता भारताला कोरोना पेक्षा अधिक सुरक्षित मानेल. एक फार्मा हब म्हणून भारताला जगात जी मान्यता मिळाली आहे, तिला अधिक बळ मिळेल. संपूर्ण जग आज भारताच्या या सामर्थ्याकडे पहात आहे.

मित्रांनो,

भारताचे लसीकरण अभियान सबका साथ , सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याचे जिवंत उदाहरण आहे. कोरोना महामारी च्या सुरुवातीपासून भीती व्यक्त केली जात होती की भारतासारख्या लोकशाही देशात या महामारी विरुद्ध लढणे किती कठीण असेल. भारतासाठी भारताच्या लोकांसाठी असेही म्हटले जात होते की तेवढा संयम, एवढी शिस्त इथे कशी चालेल मात्र आपल्यासाठी लोकशाहीचा अर्थ आहे सबका साथ. सर्वांना बरोबर घेऊन देशाने सर्वांना लस, मोफत लसीचे अभियान सुरू केले. गरीब -श्रीमंत, गाव - शहर, देशाचा एकच मंत्र राहिला, हा आजार जर कुठलाही भेदभाव करत नाही तर लसीकरणातही भेदभाव होऊ शकत नाही. म्हणूनच हे सुनिश्चित करण्यात आले की लसीकरण अभियानावर व्हीआयपी संस्कृतीचे वर्चस्व चालणार नाही. कोणी कितीही मोठ्या पदावर का असेना, कितीही श्रीमंत का असेना, त्याला लस सामान्य नागरिकांप्रमाणेच मिळेल.

मित्रांनो,

आपल्या देशासाठी असे म्हटले जात होते की इथे बहुतांश लोक लस टोचून घेण्यासाठी येणार नाहीत. जगातील अनेक मोठ्या विकसित देशांमध्ये आजही लास घेण्याबाबत संकोच एक मोठे आव्हान बनले आहे, मात्र भारताच्या लोकांनी शंभर कोटी लसींच्या मात्रा घेऊन अशा लोकांना निरुत्तर केले आहे.

मित्रांनो,

कोणत्याही अभियानात जेव्हा सर्वांचे प्रयत्न जोडले जातात तेव्हा अद्भुत परिणाम दिसून येतो. आपण महामारी विरोधात देशाच्या लढाईत लोकसहभागाला आपली पहिली ताकद बनवले. पहिला सुरक्षात्मक उपाय बनवला.  देशाने आपल्या एकजूटतेला ऊर्जा देण्यासाठी टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, दिवे पेटवले. तेव्हा काही लोकांनी म्हटले होतं, यामुळे आजार पळून जाईल, मात्र आपण सर्वांनी त्यात देशाची एकता दाखवली, सामूहिक शक्ती जागरण दाखवले. याच सामर्थ्यामुळे कोविड लसीकरणात आज देशाने एवढ्या कमी वेळेत शंभर कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. कितीतरी वेळा आपल्या देशाने एका दिवसात एक कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे. हे खूप मोठे सामर्थ्य आहे, व्यवस्थापन कौशल्य आहे, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आहे, जो आज मोठमोठ्या देशांकडे नाही.

मित्रांनो,

भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम विज्ञानाच्या कुशीतून जन्माला आला आहे. शास्त्राच्या आधारे तो बहरला आहे आणि वैज्ञानिक पद्धतीनेच तो चोहोबाजूंना-सर्व दिशांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही एक अभिमानाची गोष्ट आहे की, भारताचा संपूर्ण लसीकरणाचा कार्यक्रम विज्ञानातून जन्मलेला, वैज्ञानिक पद्धतीने राबविलेला आणि विज्ञानाधारित आहे. लस बनविण्याआधीपासून आणि लस टोचण्यापर्यंत या संपूर्ण अभियानामध्ये प्रत्येक ठिकाणी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला आहे. आपल्या समोर लस निर्मितीपासून आव्हान होते तसेच लस उत्पादनाच्या प्रमाणाचेही आव्हान होते. इतका मोठा देश आणि इतकी प्रचंड लोकसंख्या! त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये दूर-अतिदुर्गम भागांमध्ये वेळेवर लस पोहोचवणे! हे काम काही भगीरथाच्या कार्यापेक्षा सोपे, कमी किंवा सहज नव्हते. परंतु वैज्ञानिक पद्धतीने आणि नवनवीन संशोधनांमुळे देशाने या आव्हानांना, प्रश्नांना उत्तरे शोधली. असामान्य वेगाने स्त्रोतांचा ओघ वाढवण्यात आला. कोणत्या राज्याला लसीच्या किती मात्रा कधी मिळाल्या पाहिजेत, कोणत्या भागामध्ये किती लशी पोहोचल्या पाहिजेत, यासाठीही वैज्ञानिक समीकरणांच्या मदतीने काम करण्यात आले. आपल्या देशाने ‘कोविन प्लॅटफॉर्म’ जी व्यवस्था बनवली आहे, ती सुद्धा संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्र बनली आहे. भारतामध्ये बनलेल्या कोविन प्लॅटफॉर्मने केवळ सामान्य लोकांची सुविधा झाली असे नाही तर आपल्या वैद्यकीय कर्मचारी वर्गाचे काम सुकर, सोपे केले.

मित्रांनो,

आज सगळीकडे विश्वास व्यक्त होत आहे, उत्साह आहे, उमंग आहे. समाजापासून ते आर्थिक क्षेत्रापर्यंत प्रत्येक स्तरावर पाहिले तर आशावाद, आशावाद, आशावाद नजरेस पडतोय. तज्ञ आणि देश-विदेशातल्या अनेक संस्था भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी अतिशय सकारात्मक आहेत. आज भारतीय कंपन्यांमध्ये फक्त केवळ विक्रमी गुंतवणूक होत आहे असे नाही तर युवावर्गासाठी रोजगाराच्या नव नवीन संधीही निर्माण होत आहेत. स्टार्टअप्समध्ये विक्रमी गुंतवणुकीबरोबरच विक्रमी स्टार्टअप्स, युनिकॉर्न बनत आहेत. गृहनिर्माण क्षेत्रामध्येही नवीन चैतन्य दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे आणि गती शक्तीपासून ते नवीन ड्रोन धोरणापर्यंत अनेक गोष्टींमध्ये पूढाकार घेतला गेला आहे.  हे कार्य भारताची अर्थव्यवस्था अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी मोठी आणि महत्वाची भूमिका बजावणार आहे. कोरोना काळामध्ये कृषी क्षेत्राने आपल्या अर्थव्यवस्थेला मजबुतीने सांभाळले. आज विक्रमी स्तरावर अन्नधान्याची सरकारी खरेदी होत आहे. शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. लसीकरणाचे प्रमाण वाढण्याबरोबरच आर्थिक-सामाजिक कार्यक्रम असो, क्रीडा क्षेत्र असो, पर्यटन असो, मनोरंजन असो, सर्व क्षेत्रात, सगळीकडे आता सकारात्मक कामांना वेग आला आहे. येणा-या सण-उत्सवांच्या काळामध्ये या सर्व गोष्टींना आणखी वेग मिळेल आणि बळकटीही मिळेल.

मित्रांनो,

एक काळ असा होता की, मेड इन... अमूक एक देश, मेड इन तमूक एक देश... अशी जणू ‘क्रेझ’ असायची. मात्र आज, प्रत्येक देशवासी आता प्रत्यक्ष अनुभव घेत आहे की, ‘मेड इन इंडिया’ची ताकद खूप मोठी आहे. आणि म्हणूनच, आज मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की, एखादी गोष्ट बनविण्यासाठी कोणा एका भारतवासियाने घाम गाळला आहे, तीच वस्तू खरेदी करण्यावर आपण भर दिला पाहिजे. आणि ही गोष्ट सर्वांच्या प्रयत्नानेच शक्य होणार आहे. ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियान, एक जन-आंदोलन बनले, तसेच भारतामध्ये बनविण्यात आलेली वस्तू खरेदी करणे, भारतीयांनी तयार केलेली गोष्टच विकत घेणे, व्होकल फॉर लोकल आपण झाले पाहिजे. ही गोष्ट आपण नित्याच्या व्यवहारामध्ये आणली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की, सर्वांच्या प्रयत्नांने आपण हेसुद्धा करूनच दाखवू. आपण मागच्या दिवाळीच्या आठवण केली तर लक्षात येईल, त्या दिवाळीला प्रत्येकाच्या मनात-डोक्यात एक प्रकारचा तणाव होता. मात्र या दिवाळीमध्ये 100 कोटी लसीच्या मात्रांमुळे सर्वांच्या मनात एक विश्वासाचा भाव निर्माण झाला आहे. जर माझ्या देशाची लस मला संरक्षण देऊ शकते, तर मग माझ्या देशाचे उत्पादन, माझ्या देशात बनलेली वस्तू, सामान, माझी दिवाळी आणखी जास्त भव्य बनवू शकते. दिवाळीच्या काळात होणारी विक्री एका बाजूला आणि संपूर्ण वर्षामध्ये होणारी विक्री एका बाजूला असते. आपल्याकडे दिवाळीच्या काळात, सणांच्या काळात विक्री एकदम वाढते. लसीच्या 100 कोटी मात्रा, आपल्या लहान-लहान दुकानदारांना, आपल्या छोट्या-छोट्या उद्योजकांना, आपल्या पदपथावरील विक्रेत्यांना, हातगाडीवर सामान विकणा-या बंधू भगिनींना, अशा सर्व लोकांसाठी आशेचा किरण बनून आली आहे.

मित्रांनो,

आज आपल्या समोर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संकल्प आहे, त्यामुळे आपल्याला हे यश एक नवीन आत्मविश्वास देणारे आहे. आपण आज असे म्हणू शकतो की, देश मोठे लक्ष्य निश्चित करणे आणि ते साध्य करणे अतिशय चांगल्या पद्धतीने जाणून आहे. मात्र यासाठी आपल्याला सतत दक्ष राहण्याची गरज आहे. आपल्याला निष्काळजी राहून चालणार नाही. कवच कितीही उत्तम असो, कवच कितीही आधुनिक असो, कवच आहे म्हणून सुरक्षेची संपूर्ण हमी असो, तरीही जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत हत्यार, शस्त्र खाली ठेवून चालणार नाही. माझा आग्रह असा आहे की, आपण सर्वांनी आपले सर्व सण-समारंभ संपूर्णपणे सतर्क राहून साजरे करावेत. आणि आता मास्कविषयी प्रश्न येईल. कधी-कधी थोडा वेळ... परंतु आता तर डिझाईनच्या दुनियेत मास्कनेही प्रवेश केलाच आहे. म्हणून माझे म्हणणे इतकेच आहे की, ज्याप्रमाणे आपण पायामध्ये चप्पल- पादत्राणे घालूनच बाहेर पडतो- ही आपल्याला सवय लागली आहे.  मग अगदी त्याचप्रमाणे मास्क लावणे हा एक आपला सहज स्वभाव बनविला पाहिजे. ज्यांनी आत्तापर्यंत लस घेतली नाही, त्यांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य  द्यावे. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांनी इतरांनी लस घ्यावी, म्हणून प्रोत्साहन द्यावे. मला संपूर्ण विश्वास आहे की, आपण सर्वजण मिळून प्रयत्न केला तर, कोरोनाला आणखी लवकर हरवणे शक्य होईल. आपणा सर्वांना आगामी सण-उत्सवांनिमित्त पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Since 2019, a total of 1,106 left wing extremists have been 'neutralised': MHA

Media Coverage

Since 2019, a total of 1,106 left wing extremists have been 'neutralised': MHA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Welcomes Release of Commemorative Stamp Honouring Emperor Perumbidugu Mutharaiyar II
December 14, 2025

Prime Minister Shri Narendra Modi expressed delight at the release of a commemorative postal stamp in honour of Emperor Perumbidugu Mutharaiyar II (Suvaran Maran) by the Vice President of India, Thiru C.P. Radhakrishnan today.

Shri Modi noted that Emperor Perumbidugu Mutharaiyar II was a formidable administrator endowed with remarkable vision, foresight and strategic brilliance. He highlighted the Emperor’s unwavering commitment to justice and his distinguished role as a great patron of Tamil culture.

The Prime Minister called upon the nation—especially the youth—to learn more about the extraordinary life and legacy of the revered Emperor, whose contributions continue to inspire generations.

In separate posts on X, Shri Modi stated:

“Glad that the Vice President, Thiru CP Radhakrishnan Ji, released a stamp in honour of Emperor Perumbidugu Mutharaiyar II (Suvaran Maran). He was a formidable administrator blessed with remarkable vision, foresight and strategic brilliance. He was known for his commitment to justice. He was a great patron of Tamil culture as well. I call upon more youngsters to read about his extraordinary life.

@VPIndia

@CPR_VP”

“பேரரசர் இரண்டாம் பெரும்பிடுகு முத்தரையரை (சுவரன் மாறன்) கௌரவிக்கும் வகையில் சிறப்பு அஞ்சல் தலையைக் குடியரசு துணைத்தலைவர் திரு சி.பி. ராதாகிருஷ்ணன் அவர்கள் வெளியிட்டது மகிழ்ச்சி அளிக்கிறது. ஆற்றல்மிக்க நிர்வாகியான அவருக்குப் போற்றத்தக்க தொலைநோக்குப் பார்வையும், முன்னுணரும் திறனும், போர்த்தந்திர ஞானமும் இருந்தன. நீதியை நிலைநாட்டுவதில் அவர் உறுதியுடன் செயல்பட்டவர். அதேபோல் தமிழ் கலாச்சாரத்திற்கும் அவர் ஒரு மகத்தான பாதுகாவலராக இருந்தார். அவரது அசாதாரண வாழ்க்கையைப் பற்றி அதிகமான இளைஞர்கள் படிக்க வேண்டும் என்று நான் கேட்டுக்கொள்கிறேன்.

@VPIndia

@CPR_VP”