विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांशी संपर्क साधला पाहिजे आणि ते कशा प्रकारे काम करतात हे समजून घेतले पाहिजे: पंतप्रधान
अभ्यास आणि कला यांकडे वेगळे म्हणून पाहू नका: पंतप्रधान
अभ्यासाचा ताण आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही कलेचा वापर करू शकता: पंतप्रधान
पंतप्रधानांनी नागरिकांना रस्त्यावर कचरा न टाकण्याचे किंवा न थुंकण्याचे, लाल सिग्नलवर थांबण्याचे आणि अन्नाची नासाडी न करण्याचे आवाहन केले आहे
प्रत्येक लहान पाऊल विकसित भारत @ 2047 ची निर्मिती करेल: पंतप्रधान
शिस्त ही गुरुकिल्ली आहे, प्रेरणा केवळ त्यात भर घालते: पंतप्रधान
तंत्रज्ञानाचे गुलाम बनू नका: पंतप्रधान
तंत्रज्ञान हा एक उत्तम शिक्षक आहे, त्याचा स्वीकार करा: पंतप्रधान
केवळ ठिकाणे पाहण्यासाठी प्रवास करू नका, तर एका विद्यार्थ्याप्रमाणे ती समजून घेण्यासाठी प्रवास करा: पंतप्रधान
भारत अतुलनीय आहे - प्रवास करा आणि शोध घ्या: पंतप्रधान
तुम्ही जे काही अभ्यासता ते कधीही वाया जात नाही, ते तुमच्या मनात साठलेले राहते: पंतप्रधान
अभ्यासात मागे असलेल्यांसोबत मैत्री करा आणि त्यांना शिकण्यास मदत करा: पंतप्रधान
खेळांना जीवनाचा भाग बनवणे महत्त्वाचे आहे: पंतप्रधान
एक नेता बनण्यासाठी, पुढाकार घेण्याची मानसिकता विकसित करा: पंतप्रधान
एका चांगल्या नेत्याने आपले विचार स्पष्टपणे आणि प्रभावीपणे मांडले पाहिजेत: पंतप्रधान
भक्कम पायाभूत सुविधा हा दीर्घकालीन विकासाचा पाया आहे: पंतप्रधान
केवळ वाचन करू नका, तर लिहून सराव करा: पंतप्रधान
केवळ यशाने प्रभावित होऊ नका, तर महान लोकांच्या सामान्य प्रारंभापासून शिका: पंतप्रधान
भारताची प्रगती त्याच्या आदिवासी समुदायांमुळे समृद्ध आहे: पंतप्रधान
जीवनात कधीही एका जागी थबकून राहू नका, अधिकाधिक मिळवण्यासाठी झटत रहाः पंतप्रधान
आपले आत्मपरीक्षण करणे महत्त्वाचे आहेः पंतप्रधान
प्रत्येकाने दिवसातून किमान एकदा तरी श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत
तुलनेच्या दबावाखाली न येता, शिकण्याचा आणि अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा: पंतप्रधान PM
पालकांनी घरात तुलनेचे वातावरण निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊ नये: पंतप्रधान
तुमच्यापेक्षा सरस असलेल्या लोकांकडून शिका: पंतप्रधान
नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा: पंतप्रधान

पंतप्रधान - माझ्या प्रिय मित्रांनो, 'परीक्षा पे चर्चा' च्या या महत्त्वपूर्ण भागात तुमचे स्वागत आहे. यावेळचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम काहीतरी वेगळा आहे, काहीतरी खास आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला सूचना पाठवल्या होत्या की देशाच्या वेगवेगळ्या भागांतही परीक्षा पे चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून यावेळी मी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्यार्थ्यांसोबत बसून परीक्षा पे चर्चा केली आहे. या विशेष भागात तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे. तर चला प्रथम तामिळनाडूतील कोइम्बतूरला जाऊया. तामिळनाडूतील विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि उत्सुकता पाहून मी खूप प्रभावित झालो. चला, पाहूया.

प्रधानमंत्री - वणक्कम !

विद्यार्थी - वणक्कम सर !

पंतप्रधान - तर तुम्हाला काही खायला - प्यायला मिळालं की नाही?

विद्यार्थी - नाही सर, आम्ही खाल्लं.

पंतप्रधान - तुम्हाला काय मिळालं?

विद्यार्थी - आम्ही घरून आणलं होतं.

पंतप्रधान - घरून आणलं होतं? खूप छान.

विद्यार्थी - जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.

विद्यार्थी - पहिल्यांदा मला एक वैशिष्ट्यपूर्ण, नाट्यमय प्रवेश अपेक्षित होता कारण ते शेवटी पंतप्रधान आहेत, पण ते खूप साधे, नम्र आणि जमिनीवर पाय असणारे निघाले.

विद्यार्थी - ते आत येत होते तेव्हा माझ्या अंगावर काटा येऊ लागला. ते खरोखरच महान आहेत.

पंतप्रधान - असं आहे की मी गेल्या अनेक वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात बोलत आलो आहे आणि मी त्यांच्याशी काहीतरी शिकण्यासाठी बोलतो, माझ्यासाठी हा एक मोठा शिकण्याचा कार्यक्रम आहे, शिकवण्याचा नाही, म्हणून आज मी तामिळनाडूच्या तरुणांना भेटत आहे कारण मला काहीतरी शिकायचं आहे म्हणून जर तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल, तुमचे विचार सांगायचे असतील तर मला ऐकायचे आहेत. कोण सुरुवात करेल?

विद्यार्थी - माझे नाव छवि जैन आहे. मला स्टार्टअप सुरू करायचं आहे. तर मला कोणकोणते विषय माहीत असण्याची आवश्यकता आहे आणि शैक्षणिक स्तरावर मला काय करावे लागेल, ज्यामुळे मला स्टार्ट अपसाठी मदत मिळू शकेल?

पंतप्रधान - अगदी बरोबर आहे तुमचं, मी देखील आजकाल जेव्हा जेव्हा तरुणांना भेटतो तेव्हा ते लगेच म्हणतात "स्टार्टअप". तुमचे पहिले लक्ष, तुम्हाला काय करायचे आहे यावर असले पाहिजे. काही स्टार्टअप्स फक्त तंत्रज्ञानातील नवोपक्रमांबद्दल असतात. काहींना वाटते की त्यांनी ड्रोन बनवावेत, काहींना वाटते की त्यांनी घरी विजेची अशी व्यवस्था उभी करावी, तुम्हाला कदाचित तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेले चार मित्र किंवा कदाचित वित्त क्षेत्रात तज्ज्ञ असलेले मित्र माहित असतील. चला चार जणांचा गट तयार करूया आणि बाजूला आपले स्वतःचं स्टार्टअप सुरू करूया. स्टार्टअप सुरू करण्यासाठी तुम्हाला 25 वर्षांचे असण्याची गरज नाही; तुम्ही कधीही सुरुवात करू शकता. छोट्या-छोट्या स्टार्टअप्सपासूनही काम सुरू होऊ शकते. म्हणून मला वाटतं की तुम्हाला रस असेल तर ही एक चांगली कल्पना आहे. कोणी स्टार्टअप्स चालवत असतील, त्यांना भेटायला जाणं आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं. आणि त्यांना सांगणं महत्त्वाचं आहे की मी शाळेतून आलो आहे आणि शाळेतील प्रकल्प करत आहे, मग ते लपवणार नाहीत; ते तुम्हाला सांगतील. हळूहळू, तुम्हाला ते कसं करायचं याचं ज्ञान मिळेल.

विद्यार्थी - सर, मला नेहमीच ही भीती वाटते की जर मी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रीत केले तर माझ्या आवडीकडे दुर्लक्ष होईल. जर मी माझ्या आवडीवर जास्त लक्ष केंद्रीत केलं तर माझा अभ्यास चुकेल. मी या दोघांमध्ये संतुलन कसं राखू?

पंतप्रधान - हे पहा, पहिले म्हणजे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे तुम्ही का मानता? दोन्ही उपयुक्त आहेत, उदाहरणार्थ, समजा तुम्हाला कलेची आवड आहे आणि तुम्ही काही विज्ञान विषयाचा अभ्यास केला आहे आणि त्यात एखाद्या प्रयोगशाळेबद्दल चर्चा आहे आणि काही रसायने मिसळण्याबद्दल चर्चा आहे, तर तुम्ही असे करा, कागद घ्या, एक प्रयोगशाळा बनवा, कागदावर रंगकाम करा, एक प्रयोगशाळा बनवा, नंतर तुम्हाला ज्या रसायनांचा अभ्यास करायचा होता त्यांची नावं प्रत्येक बाटलीवर लिहा.

मग तुम्ही वाचलं असेल की हे रसायन या रसायनात मिसळल्याने असा रंग तयार होतो, म्हणून दुसरे चित्र बनवा, त्या भांड्यात तो रंग, मग तुमचं चित्रकलेचं कामही झाले आणि तुम्हाला तो धडाही लक्षात राहील म्हणजे तुम्ही एकाच वेळी दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकता. तुमचा थकवा दूर करायलाही एका अर्थानं ही कला, जी काही हस्तकला शिकण्याची तुमची इच्छा आहे, ती मदत करू शकते. दररोज किंवा आठवड्यातून दोनदा, अर्धा तास यासाठी देता येईल. समाजजीवनात आवश्यक असणारे शिक्षण तर तुम्ही घेतलंच पाहिजे, परंतु वैयक्तिक जीवनात उपयोगी असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर देखील करू शकता.

विद्यार्थी - आपला देश देखील 2047 मध्ये विकसित राष्ट्रांमध्ये सामील होणार आहे, म्हणून माझा प्रश्न असा आहे की आम्ही नवयुवक हे साध्य करण्यासाठी काय करू शकतो?

पंतप्रधान - मला आनंद झाला की माझ्या देशातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थीही 2047 च्या विकसित भारताचे स्वप्न पाहतात. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, याचा अर्थ आज मला मजा येईल. व्वा! बघा, अशी गोष्ट आहे ना की 2047 मध्ये विकसित भारत म्हणजे काय? तुम्ही सिंगापूरबद्दल ऐकले असेलच. सिंगापूर एकेकाळी मच्छिमारांचे छोटेसे गाव होते, तेथून ते आज इतके मोठे झाले आहे. म्हणून ली कुआन यू म्हणायचे की जर आपल्याला विकसित देश व्हायचे असेल तर आपल्याला विकसित देशांतील लोकांच्या सवयींसारख्या आपल्या सवयी बनवाव्या लागतील. तिसऱ्या जगातील देशांप्रमाणे आपण कुठेही कचरा टाकतो, कुठेही थुंकतो, हे नाही‌ चालणार, आपल्याला फक्त कुठेतरी जायचे आहे, इथे लाल सिग्नल आहे तर मला माझी स्कूटर तिथे उभी केली पाहिजे. आता ही एक छोटीशी गोष्ट आहे की आपण कुटुंबात ठरवू की आपल्या घरात जेवण झाल्यावर आपण काहीही शिळे उरवणार नाही, मला सांगा की जर प्रत्येकाने असे केले तर किती अन्न वाचेल, किती मोठा फायदा होईल!

 

तर एक नागरिक म्हणून जर मी माझ्या आयुष्यात या गोष्टी योग्यरीत्या पाळल्या तर याचा अर्थ मी विकसित भारतासाठी योगदान देत आहे. आता, जसे व्होकल फॉर लोकल, मी माझ्या देशातील उत्पादने खरेदी करेन, मी भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करेन, जसे मी म्हणतो, भारतात विवाह समारंभ साजरा करा.‌ आता काही श्रीमंत लोकांना वाटते की दुबईला जाऊन लग्न करावं, भारतात काय कमतरता आहे, भाऊ? देशातील आपण सर्व नागरिकांनी लहान-लहान गोष्टी केल्या पाहिजेत, आपण भारताला विकसित करण्यातील आपली जबाबदारी निश्चितपणे पार पाडू शकतो, आपण योगदान देऊ शकतो.

विद्यार्थी - आम्हाला धक्का बसला, अरे देवा, विद्यार्थी खरोखर याबद्दल चिंतेत आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मोठं पाऊल महत्त्वाचं नाही तर लहान पाऊल महत्त्वाचं आहे.

विद्यार्थी - माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की कोणताही विद्यार्थी किंवा कोणताही माणूस आयुष्यात पुढे जाताना अनेक आव्हानांना तोंड देतो. जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा जीवन जगण्याची आपली प्रेरणा कमी होते. तर, अशा परिस्थितीत, यश मिळविण्यासाठी आपल्याला प्रेरणा किंवा शिस्तीची आवश्यकता आहे का?

पंतप्रधान - जीवनात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर शिस्तच नसेल, तर कितीही प्रेरणा असली तरी तिचा काय उपयोग? समजा एक शेतकरी आहे, त्याला प्रेरणा मिळतेय, त्याच्या बाजूचा शेतकरी खूप चांगले पीक घेतोय. ही प्रेरणा आहे की, 'अरे व्वा! त्याची फक्त एक एकर जमीन आहे आणि माझी चार एकर, तरीही तो जास्त कमावतोय आणि मी कमी.' त्याला तिथून प्रेरणा तर मिळते, पण पावसाळ्यापूर्वी शेत नांगरायला हवे, याचा तो विचारच करत नाही. तो म्हणतो 'बघूया, आता एका आठवड्यानंतर करू.' जर त्याने शेत नांगरले नाही आणि पाऊस आला, तर मग तो काहीही करो, त्याची अवस्था वाईटच राहणार. कारण त्याच्याकडे ती शिस्त नव्हती. प्रेरणा तर होती की त्याच्यासारखी कमाई करावी, पण शिस्त नव्हती की मला वेळेपूर्वी शेत नांगरून ठेवायला हवे, बियाणं आणून ठेवायला हवे, बियाणं तयार करायला हवेत. जीवनात शिस्त खूप अनिवार्य आहे, ती प्रेरणेमध्ये 'दुधात साखर' म्हणून काम करते. जर शिस्त नसेल, तर कितीही प्रेरणा का असेना, ती ओझे बनते आणि निराशा निर्माण करते.

विद्यार्थी - मी जेव्हा माझा प्रश्न विचारला, तो असा प्रश्न होता जो अनेक वर्षांपासून माझ्या मनात घोळत होता. आता अखेर माझ्या आदर्श व्यक्तीकडून त्यावर स्पष्ट उत्तर मिळाल्यामुळे मला अत्यंत समाधान आणि अभिमान वाटत आहे.

विद्यार्थी - सर, आजच्या काळात एआय चा प्रभाव वाढतच चालला आहे. आपण पाहतोय की अनेक कंपन्यांमध्ये माणसं नाही तर एआय कर्मचारी देखील असतात, तर माझा प्रश्न असा आहे की, आपण एआय ला घाबरायला हवे का? आणि भविष्यातील व्यवसाय मार्ग निवडताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

पंतप्रधान - पहा, प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञानाची चर्चा होते - उदा. जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हाही चर्चा झाली की आता काय होणार? तर हा प्रत्येक युगातील चर्चेचा विषय राहिला आहे. आपण कोणत्याही गोष्टीला घाबरायला नको. आपला प्रयत्न हा असावा की, एक तर आपण त्याचे गुलाम बनता कामा नये. माझ्या जीवनात मीच निर्णायक असेन, ते तंत्रज्ञान माझे मालक बनणार नाही. जसे काही मुलांचं झालंय, मोबाईल त्यांचा मालक बनला आहे. जर मोबाईल नसेल तर ते जेवू शकत नाहीत, टीव्ही नसेल तर जगू शकत नाहीत. याचा अर्थ तुम्ही त्यांचे गुलाम बनलात. मी गुलाम बनणार नाही, हे एकदा मनात पक्कं करा. प्रत्येक तंत्रज्ञानाचा आपण अधिक चांगला उपयोग करू शकतो. जर मी एआय ला विचारलं की मला हे पुस्तक कुठून मिळेल, कोणते आहे, या विषयावरचे चांगले पुस्तक कोणते आहे, तर कदाचित ते मला मार्गदर्शन करेल. ते तुमच्या कामाला येईल. पण तुम्ही म्हणाल की मी वाचणार नाही, तूच मला सांग यात काय आहे, तर मग गडबड आहे. नोकरीचे स्वरूप नेहमीच बदलत असते. तेव्हा त्यासंबंधित कामे आणि कौशल्यांची गरज होती. आज विमानप्रवासाचा काळ आहे, त्यामुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या, कौशल्ये आणि संधी निर्माण झाल्या आहेत. पण जीवन तर चालतच राहते. त्यामुळे मला वाटते, आपण तंत्रज्ञान समजून घेतले पाहिजे, स्वतःचा विस्तार केला पाहिजे आणि त्या तंत्रज्ञानाची ताकत स्वतःमध्ये मिळवली पाहिजे. आपल्या कामात व्हॅल्यू ॲडिशन केले पाहिजे. जर हे झाले, तर माझे ठाम मत आहे की, कितीही उत्तम तंत्रज्ञान आले तरी ते आपल्या उपयोगाचेच ठरणार आहे, आपल्याला घाबरण्याची गरज नाही.

 

विद्यार्थी - पंतप्रधान महोदयांसोबत अशा सन्माननीय प्रसंगासाठी माझी निवड होईल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती.

विद्यार्थी - हा खरोखरच एक खूप छान अनुभव होता, मी पूर्णपणे भारावून गेलो आहे आणि हे सर्व स्वप्नवत वाटत आहे.

विद्यार्थी - ते पंतप्रधानांपेक्षा कुटुंबातील सदस्यासारखेच वाटले.

पंतप्रधान - मित्रांनो, कोईम्बतूरचे आपले तरुण मित्र अभ्यासासोबतच एआय, स्टार्टअप आणि भविष्यातील तंत्रज्ञानाबाबत खूप जागरूक आहेत आणि मी म्हणू शकतो की, हीच तर 'युवा भारताची युवा विचारसरणी' आहे, जी 'विकसित भारत 2047' च्या संकल्पाला नवनवीन बळ देत आहे.

मित्रांनो,

'परीक्षा पे चर्चा'चा अर्थच हा आहे की, एकत्र बसून बोलणं आणि एकमेकांकडून शिकणं. आणि हाच अखंड क्रम पुढे नेत आपली चर्चा काही आठवड्यांनंतर कोईम्बतूरहून निघून छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचली. तिथेही मुलांशी माझ्या खूप रंजक गप्पा झाल्या आणि मी सांगू शकतो की फक्त गप्पाच नाही, तर खूप चविष्ट पदार्थ खाण्याची संधीही मिळाली. तुम्ही सुद्धा याचा आनंद घ्या.

विद्यार्थी - जय जोहार सर.

पंतप्रधान - जय जोहार.

पंतप्रधान - काही खाऊ-पिऊ घातलं की नाही?

विद्यार्थी - हो सर.

विद्यार्थी - सर, तुम्ही सुद्धा खूप साऱ्या भेटीगाठी-बैठका घेऊन आला आहात. तुम्हाला सुद्धा आमच्याकडे येऊन जेवायला आवडेल का?

पंतप्रधान - हे कसं बनतं?

विद्यार्थी - सर, हे बेसनाचे गोल-गोळे करुन तळतात.

पंतप्रधान - अच्छा, आणि?

विद्यार्थी - हे खारट असतं.

पंतप्रधान - मग हे लोक कधी खातात?

विद्यार्थी - सर, हे दिवाळीच्या वेळी.

पंतप्रधान - दिवाळीच्या वेळी खातात.

विद्यार्थी - जास्तीत जास्त दिवाळीच्या वेळीच बनतं.

पंतप्रधान - महाराष्ट्रात याला काय म्हणतात?

विद्यार्थी - माहीत नाही.

पंतप्रधान - महाराष्ट्रात असंच बनतं, याला 'चकली' म्हणतात.

विद्यार्थी - हो सर.

पंतप्रधान - हे काय आहे?

विद्यार्थी - सर, ही 'खुरमी' आहे.

पंतप्रधान - हो.

विद्यार्थी - ही गुळापासून बनते, पिठापासून बनते आणि रव्यापासून बनते.

पंतप्रधान - तर छान खाऊ घातल्याबद्दल धन्यवाद बेटा.

विद्यार्थी - तिथे त्यांना 'खुरमी' मिळाली, तेव्हा त्यांनी स्वतःच्या हाताने सर्वांना एक-एक खुरमी भरवली आणि ते खरोखरच खूप विलक्षण अप्रतिम होते.

पंतप्रधान - तुमच्या मनातही काही प्रश्न येत असतील, आज तुम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आहे, तर?

विद्यार्थी - हो सर.

पंतप्रधान - सांगा?

विद्यार्थी - आम्हा विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षांनंतर सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याची खूप इच्छा असते. तर तुम्ही भारतातील अशा कोणत्या पाच जागा सांगू शकता का, जिथे आम्ही जाऊ शकतो?

पंतप्रधान - तुम्ही ज्या तालुक्यातून आहात… तुझा तालुका कोणता आहे?

विद्यार्थी - सर, मी रायपूरचा…

पंतप्रधान - रायपूरचा… रायपूर तालुक्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, याची जरा यादी बनव. एक तास लागेल, दोन तास लागतील, तिथे जाईन. मग यादी बनव की जिल्ह्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पाहिल्या नाहीत. मग ठरव की राज्यात कोणत्या आहेत. छत्तीसगडमध्ये अशी कोणती जागा आहे जिथे मी गेलो नाही. आपण कुठेही जाऊया, 'विद्यार्थी' म्हणून गेले पाहिजे, तेव्हाच पर्यटनाची मजा येते. रेल्वेच्या डब्यातून प्रवास करा आणि सोबत स्वतःचे जेवणही घेऊन जा. अनुभव घ्या की कसं वाटतं, गर्दी असते, काय होतं, लोक काय बोलतात. याचा एक वेगळाच आनंद असतो, जीवनात खूप काही शिकायला मिळते. भारत इतक्या विविधतेने भरलेला आहे की, तो पाहण्यासाठी एक आयुष्यही कमी पडेल.

विद्यार्थी - सर, माझा प्रश्न असा आहे की, कधीकधी परीक्षेच्या काळात आपण उजळणी करू शकत नाही, आणि मग त्यामुळे आपले मन अस्वस्थ होते. तर सर, आपण आपले मन शांत कसे करावे? परीक्षेच्या काळातही आणि परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वीही?

पंतप्रधान - परीक्षेपूर्वीचा एक आठवडा नीट निरखून पहा, तुम्ही सर्व गोष्टींची जुळवाजुळव केलीच असेल. तुम्ही जे काही ऐकले आहे, जे वाचले आहे ते वाया गेलेले नाही, हे लक्षात ठेवा, ते कुठे ना कुठे साठवलेले आहेच. तुम्ही शांत डोक्याने विचार करा, काळजी करू नका, जसा पेपर येईल तसा पाहून घ्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला चांगला विद्यार्थी बनायचे आहे ना, मग तुमची त्या विषयावर पकड असायला हवी ना, तरच तुम्ही चांगले विद्यार्थी बनाल. विषयावर पकड कशी घेता येईल? एक चांगला खेळाडू, उत्तम खेळाडू कसा बनतो?

विद्यार्थी - सराव केल्याने, सातत्य असल्याने, शिस्तीत राहिल्याने आणि दिनचर्या पाळल्यामुळे.

पंतप्रधान - सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सतत स्पर्धा करत असतो, पडतो, धडपडतो, हरतो, जिंकतो, प्रयत्न करतो. त्यातूनच तो खेळाडू बनतो, बरोबर? तुम्हाला मी एक सल्ला देतो, तो अंमलात आणून पहा. तुमच्या वर्गात असे काही विद्यार्थी असतील, जे अभ्यासात थोडे कच्चे आहेत असे तुम्हाला वाटते. अशा एखाद्याला आपला मित्र बनवा. हे तंत्र तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्याला सांगा की माझी आज तुला गणित शिकवण्याची इच्छा आहे. आता त्याला गणित शिकवण्यासाठी तुम्ही जे परिश्रम घ्याल, मन एकाग्र कराल, त्याने तुमचे गणित पक्के होईल की नाही?

विद्यार्थी - होईल सर.

विद्यार्थिनी - मी तायक्वांडो खेळते आणि मला पुढे जाऊन व्यावसायिक खेळाडू बनायचे आहे. माझा अभ्यास आणि खेळ यांचा समतोल मी कसा राखू शकते?

पंतप्रधान - शिक्षणाची गरज आयुष्यातही आहे आणि समाज जीवनातही, त्याला कधीही कमी लेखू नका. मी खेळात खूप चांगला आहे, म्हणून मला शिकण्याची गरज नाही असा चुकीचा विचार कधीही करू नका. मात्र केवळ शिक्षणानेच सर्व काही होईल असेही नाही. तुमच्यात जी जिद्द आहे, त्याचा विकास केला पाहिजे. खेळाडू बनण्यासाठी खेळणे हा एक मुद्दा झाला, पण जीवनात खेळ असावा, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आयुष्याचा खेळ होऊ द्यायचा नसेल, तर आयुष्यात खेळ असायला हवा. खेळायचे पण आहे, खेळलो तरच खुलेन, आणि शिकायचे देखील आहे, जेणेकरून लोक असे म्हणणार नाहीत की याला लिहिता वाचता काही येत नाही, म्हणून हा सतत मैदानातच असतो. मात्र तसे नाही, मी अभ्यासातही समर्थ आहे आणि बराचसा खेळातही…

विद्यार्थिनी - त्यांनी जे काही सांगितले ते मी माझ्या आयुष्यात अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन आणि आज जे काही घडले, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

विद्यार्थी - सर, माझा प्रश्न असा आहे की, काही वर्षांपूर्वी आपण स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली होती, आमचे नवीन रायपूर देखील विकासाकडे झेप घेत आहे, तर एक विद्यार्थी म्हणून आम्ही त्या विकासासाठी किंवा पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी काय योगदान देऊ शकतो?

 

पंतप्रधान - नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे हे आपल्या स्वभावात असायला हवे आणि या कार्यात हळूहळू आपण लोकांना जोडले पाहिजे; जेव्हा आपण लोकांना जोडत राहतो, तेव्हा परिवर्तन घडायला सुरुवात होते. जर आपण स्वतःच्या जीवनात काही नियमांचे पालन केले, जसे की पाणी, समजा मी दात घासत आहे आणि पाणी वाहून चालले आहे, जर तुम्ही दात घासत असाल तर पाणी तरी बंद करा, जेव्हा तोंड धुवाल तेव्हाच पाणी घ्या. या लहान सहान गोष्टी असतात. एकदा मी एका गावाच्या दौऱ्यावर होतो, लांबून मला एक जागा जंगलासारखी हिरवीगार दिसली. मी विचारले हे काय आहे, ते म्हणाले, ही तर शाळा आहे. सगळीकडे कोरडे असताना इथे इतकी हिरवळ कशी? तिथे एक शिक्षक होते, ते पेट्रोल पंपावरील तेलाचे रिकामे डबे गोळा करायचे आणि मुलांना सांगायचे की, तुमच्या घरी जे पाणी असते, ज्यात अन्नाचे काही अंश असतात, ते बाटलीत भरून रोज शाळेत येताना घेऊन या. सर्व मुले ती बाटली किंवा डबा भरून आणायची आणि त्यांनी तिथे झाडे लावली होती. प्रत्येक मुलाला एक झाड दिले होते, तो जे पाणी आणायचा ते त्या झाडाला घालायचे. ते पाणी खताचेही काम करायचे. यामुळे ती संपूर्ण शाळा चहूबाजूंनी हिरवीगार झाली होती. एका शिक्षकाने इतका मोठा बदल घडवून आणला. मानवी दृष्टिकोनातून जर आपण वागलो, तर परिवर्तन सुरू होते. या छोट्या गोष्टी आपण सहज करू शकतो. सामाजिक जबाबदारी आपल्या स्वभावातून प्रतीत व्हायला हवी.

विद्यार्थी - आपण इतकी वर्षे देश सांभाळत आहात, देशाचे नेते आहात, तर भविष्यातील पिढीकडून, आमच्याकडून आपण अशा कोणत्या गुणांची अपेक्षा करता जे एक नेता म्हणून आमच्यात असायला हवेत?

पंतप्रधान - तुम्हाला असला लीडर बनायचे आहे की निडर बनायचे आहे'?

विद्यार्थी - दोन्ही बनायचे आहे.

पंतप्रधान - हे बघा, आधी निर्भय बना.

विद्यार्थी - यस सर.

पंतप्रधान - जे काम आहे ते मनात पक्के करा; कोणी करो किंवा न करो मी करेन, जेव्हा ही भावना मनात येईल की मी स्वतःपासून सुरुवात करेन तेव्हा तुमच्यामध्ये आपोआप नेतृत्वगुण निर्माण व्हायला लागतील. समजा इथे कचरा पडला आहे, तुम्ही जाता जाता तो उचलला, तर तुमच्यासोबत चालणाऱ्या इतर चार लोकांनाही वाटेल की आपणही उचलला पाहिजे. म्हणजे तुम्ही नेते बनलात की नाही? ही चांगली गोष्ट आहे, आपण स्वतःला नेहमी नेतृत्वाच्या भूमिकेसाठी तयार केले पाहिजे, हा विश्वास आणि विचार दोन्ही चांगले आहेत. पण नेता म्हणजे फक्त निवडणूक लढवणे, राजकीय पक्ष काढणे किंवा मोठी भाषणे करणे असे नाही. नेतृत्वामध्ये एक गुण असणे अत्यंत आवश्यक आहे, तो म्हणजे तुम्ही 10 लोकांना तुमचे मुद्दे समजावून सांगू शकला पाहिजेत. विचार लादायचे नाहीत, तर समजावून सांगायचे आहेत. समजावून सांगण्यासाठी आधी समोरच्याला समजून घेणे गरजेचे आहे. जो इतरांना समजून घेतो, तोच त्यांना समजावून सांगू शकतो. जो कोणाला समजून घेऊ शकत नाही, तो काहीही समजावून सांगू शकत नाही. म्हणूनच आपला प्रयत्न इतरांना समजून घेण्याचा असला पाहिजे.

विद्यार्थी - त्यांनी खूप छान सांगितले की, जर कोणी एखाद्या गोष्टीची जबाबदारी घेत असेल, तर त्याच्यात नेतृत्वगुण असतात. जर मला या संपूर्ण अनुभवाचे वर्णन करायचे असेल तर मी एक स्वप्न असा याचा उल्लेख करेन.

विद्यार्थिनी - मी पंतप्रधानांना भेटले.

विद्यार्थी - मी खूप भाग्यवान आहे.

विद्यार्थी - हा अनुभव खूप छान होता, म्हणजे असा अनुभव आयुष्यात फार कमी लोकांना मिळतो.

पंतप्रधान - परीक्षेच्या तयारीचे अनुभव, परीक्षेच्या वेळी येणारे विचार, ताण आणि लोकांच्या अपेक्षांशी संबंधित अनेक प्रश्न कायम चर्चेचा भाग असतात आणि परीक्षा पे चर्चा चा उद्देशच हा आहे की आपल्या तरुण मित्रांनी यावर मनमोकळेपणाने बोलावे. परीक्षा पे चर्चा केवळ बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीपुरती मर्यादित नाही. जेव्हा मी तुमचे प्रश्न ऐकतो, तेव्हा स्वाभाविकपणे ते माझ्या मनाला स्पर्श करतात. जीवनाच्या अनेक पैलूंशी संबंधित गोष्टी आपल्या तरुण मित्रांच्या मनात सतत सुरु असतात, याचा मला अंदाज बांधता येतो. मी आता तुम्हाला गुजरातला घेऊन जाणार आहे, तिथल्या मुलांनी आणि विशेषतः आदिवासी भागातील माझ्या आदिवासी मुलांनी जे प्रश्न विचारले, त्यांनी मला खरोखरच आश्चर्यचकित केले होते.

विद्यार्थी - नमस्ते सर. देवमोगरा गावात आपले स्वागत आहे.

पंतप्रधान - वाह. मला तर सांगण्यात आलं होतं की आज सर्वांना हिंदीत बोलायचं आहे...

विद्यार्थी - हो सर.

पंतप्रधान - चला.

विद्यार्थी - सर जेव्हा आले तेव्हा आम्ही पाहिलं की त्यांनी एक सदरा घातला आहे ज्यावर वारली कलाकुसर आहे, तर आमच्या आदिवासी समाजात वारली कलेला खूप महत्त्व आहे, तर आम्हाला हे पाहून खूप छान वाटलं.

विद्यार्थी - आम्ही खूप उत्सुक होतो, तुम्हाला भेटण्यासाठी. इतर कोणत्याही मुलांकडे तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी कितीतरी प्रश्न असतात. पण आम्ही इतके नशीबवान आहोत की जे तुमच्याशी बोलायला मिळतेय.

पंतप्रधान - तुम्ही किती लांबून आला आहात?

विद्यार्थी - आम्ही इथे डेडियापाडा इथून.

पंतप्रधान - डेडियापाडा इथूनच आला आहात. छान.

विद्यार्थी - आम्ही मांडवीवरून सर.

पंतप्रधान - मांडवी, छान, काय नाव?

विद्यार्थी - जय.

पंतप्रधान - जय आणि अभी. इतके मोठे झालात तुम्ही लोक? ओळखतलंत, यांना सांगितलं का माझी तुमच्याशी ओळख कशी आहे?

विद्यार्थी - हो.

पंतप्रधान - यांच्याकडची हिंमत आली की नाही आली सर्वांकडे?

विद्यार्थी - आली सर आली.

पंतप्रधान - हे मला आधीही एकदा भेटायला आले होते.

पंतप्रधान - चला सांगा तुम्ही लोक काय विचारू इच्छिता, काय जाणून घेऊ इच्छिता सांगा?

विद्यार्थी - सर आमच्या आई-वडिलांनी हे सांगितलं की आधी काही आदिवासी भाग होते, जे खूपच मागासलेले होते. तर त्यांनी हे देखील सांगितलं की तुमचा गुजरातच्या आदिवासी भागांशी खूप जिव्हाळा आहे, आणि तुम्ही तिथे बदलही केला, तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला या गोष्टीची प्रेरणा कुठून मिळाली?

पंतप्रधान - तुम्हाला पाल-चितरियाची घटना माहित आहे?

विद्यार्थी - हो.

पंतप्रधान - तिथे आदिवासी समाजाने स्वातंत्र्याचा खूप मोठा लढा लढला होता. एकदा खूप भीषण दुष्काळ पडला होता. तर त्या वेळी मी त्या क्षेत्रात बरेच दिवस राहून काम करायचो. तर त्या वेळी वाटायचं की इथं शिक्षणावर लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा मला संधी मिळाली, मुख्यमंत्री झालो तर मी लक्ष देऊ लागलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल एक काळ असा होता की उमरगावपासून अंबाजीपर्यंत, एकही विज्ञान शाळा नव्हती. तर नंतर तुम्ही तर पाहिलं आता तर दोन विद्यापीठं आहेत, विज्ञान शाळा आहेत, अभियांत्रिकी आयटीआय आहे, खूप सारे बदल घडले आहेत. त्याचा खूप मोठा लाभ होत आहे.

विद्यार्थी - हो सर.

पंतप्रधान - आजही तुम्हाला माहित असेल एक मी पीएम जनमन योजना बनवली आहे. आदिवासींमध्येही काही भाग आणि काही लोक आहेत समाज, ते अजून मागे राहिले आहेत. तर मला मग त्यांच्यासाठी वेगळी योजना बनवावी लागली, वेगळा अर्थसंकल्प बनवावा लागला. तर मला तेव्हापासून वाटायचं की आपण शिक्षणावर जितका जास्त भर देऊ, तितका खूप वेगाने विकास होईल. दुसरं माझ्या मनात होतं, संपूर्ण आदिवासी भागात उमरगावपासून अंबाजीपर्यंत पूर्ण महामार्ग बनवला आहे तिथे, तर विकासासाठी पायाभूत सुविधांची खूप गरज असते, लोकही येणे-जाणे सुरू करतात, तर त्या दिशेने लक्ष दिलं.

विद्यार्थी - माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की पहलगाम हल्ल्यानंतर आमच्या घरात सर्व चर्चा करत होते की आता पुढे काय होईल? पूर्ण देश तुमच्याकडे पाहत होता. मग ऑपरेशन सिंदूर झालं आणि आपल्या देशाच्या सैन्याने विजय मिळवला. तर अशा प्रसंगी तुम्ही तुमच्या ताणाचे नियोजन कसे केले? आम्ही तर फक्त परीक्षेच्या ताणाने.

पंतप्रधान - तुम्हा लोकांना परीक्षेचा ताण येतो.

विद्यार्थी - हो, हो सर.

पंतप्रधान - जेव्हा तुम्ही जुन्या परीक्षेचे दिवस आठवून पहा, जर जुन्या परीक्षा आठवाल तर तुम्हाला वाटेल हो यार जेव्हा गेलो होतो तेव्हा तर दडपण होतं, पण जेव्हा देऊन आलो तर काहीच नव्हतं.

विद्यार्थी - हो सर.

पंतप्रधान - असं होतं की नाही?

विद्यार्थी - होतं सर.

पंतप्रधान - परीक्षेसाठी सर्वात चांगली गोष्ट असते की तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय लावा, लिहिण्याची. बहुतेक लोक काय करतात? वाचतात.

विद्यार्थी - हो. यस सर.

पंतप्रधान - जर स्वतः या प्रकारे तुम्ही सराव करत राहिलात, तर मला ठाम विश्वास आहे की तुम्हाला कधीही ताण येणार नाही.

विद्यार्थी - हो सर.

पंतप्रधान - आपम काय करतो, पूर्ण दिवस पुस्तक, अरे कधी हसा. दूसरी सर्वात मोठी गोष्ट आहे जी आज लोकांच्या लक्षात नाही, ती आहे झोप. चांगली झोप घेतलीच पाहिजे. तुम्हाला वाटेल हा असा कसा पंतप्रधान आहे, जो झोपण्याबद्दल बोलायला आला, आम्ही तर परीक्षेबद्दल विचारत होतो. पण जर झोप इतकी पूर्ण घेतली, तर उरलेला वेळ तुमचा खूपच ताजातवाना नवीन विचार, नवीन कल्पना, मन खूप प्रफुल्लित राहतं.

विद्यार्थी - हो सर. आम्ही डॉक्टर किंवा कधी अभियंता किंवा कधी अधिकारी बनू इच्छितो, तर आम्हाला पुढे जाऊन, आपली कारकीर्द कशी ठरवली पाहिजे सर?

पंतप्रधान - जर तुम्ही एका महिन्यात 10 गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या तर घरचे काय म्हणतील? याचं तर काही पत्ताच नाही. ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला कोणाला तरी पाहून वाटलं, मीही असा बनलो असतो तर काय झालं असतं? जर हे आपल्याला करायचं आहे, जी व्यक्ती खूप मोठी बनली आहे, ती मोठी बनण्याची इच्छा असणं वाईट नाही, पण ती मोठी बनली आहे त्याच्याशी स्वतःला जोडू नका. कुठून सुरुवात केली होती? जर तुमचं लक्ष त्यावर असेल तर मग पुढे हो, हो यार इथून चला मी सुरुवात करतो. कोणी म्हणेल की मी क्रिकेटपटू बनलो, पण जेव्हा मी आठवीत होतो तेव्हा सकाळी 4-00 वाजता उठून, सायकल चालवून, क्रीडांगणापर्यंत जायचो.

आणि मग मी दोन तास सराव करायचो, तर मग मी म्हटलं अच्छा इतकी मेहनत करावी लागते. चला मी सुरुवात करतो, आता तर काय वाटतं हो पहा यार शतक ठोकलं, फोटो छापून आला, तर स्वप्नांसाठी जगायला शिका, स्वप्नांना साजेसं आयुष्य बनवा. पण जर आवाज केलात तर यशाचा आवाज झाला पाहिजे.

विद्यार्थी - हो.

पंतप्रधान - जसे तुम्ही प्रथम क्रमांकावर याल तर यश आवाज करेल की नाही करणार?

विद्यार्थी - करणार.

पंतप्रधान - पूर्ण शाळेला समजेल की नाही समजणार?

विद्यार्थी - समजणार.

पंतप्रधान - पूर्ण गावाला समजेल की नाही समजणार?

विद्यार्थी - समजणार.

पंतप्रधान - तर आपला प्रयत्न हा असायला हवा.

विद्यार्थी - सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या ज्या मी ऐकल्या त्या सर्व मी आपल्या जगण्यात पुढे जाण्यासाठी आणि पुढे जाऊन काहीतरी बनण्यासाठी, सर्व स्वतःसाठी विचार केला.

पंतप्रधान - या.

विद्यार्थी - सर आता आपण जाऊया आमच्या संस्कृतीशी संबंधित काही गोष्टी दाखवण्यासाठी. सर ही आहे वारली चित्रे जी एका पुठ्ठ्यावर बनवतात, त्यावर अशी चित्रकला साकारतात. या सर्व त्या गोष्टी आहेत ज्या आमच्या संस्कृतीशी संबंधित आहेत. सर आम्ही आदिवासी भागातून जे आदिवासी आहेत, त्यांच्या कलाकृतीही मांडल्या आहेत. जसं की चित्रकला आहे, ही आहे लिप्पन कला. ही जी मी बनवली ही आहे पिठोरा कला.

 

पंतप्रधान - स्वतः बनवली आहेस?

विद्यार्थी - हो सर. तुमच्यासाठी हे बनवलं आहे.

पंतप्रधान - काय नाव आहे तुझं?

विद्यार्थी - किशन आहे.

पंतप्रधान - हे तुझं हस्ताक्षर आहे?

विद्यार्थी - हो सर.

पंतप्रधान – अरे वा!

विद्यार्थी – धन्यवाद सर.

पंतप्रधान – किती छान आहे रे!

विद्यार्थी – हे आम्ही घराच्या भिंतींवर काढले आहे आणि त्यांची पूजा देखील करतो.

पंतप्रधान – वा! म्हणजे तुम्ही तर मोठे कलाकार झालात हो.

विद्यार्थी – हो सर. मला खूप छान वाटत आहे की आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांनी माझी चित्रे स्वीकारली. सर आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलले की जणू आम्ही आमच्या मित्रांशी बोलत आहोत, असे वाटत होते.

विद्यार्थी – मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या आयुष्यात शिक्षकांची काय भूमिका होती?

पंतप्रधान – खूप मोठी भूमिका होती. जसे मी सांगितले, माझे शिक्षक आम्हाला दररोज सांगायचे की ग्रंथालयात जा, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ मधील संपादकीयातील एक वाक्य लिहून आणा आणि दुसऱ्या दिवशी त्यावर चर्चा करा. अशा अनेक गोष्टींमुळे शिस्त लागली. माझ्या प्राथमिक शाळेत परमार सर होते. ते शारीरिक तंदुरुस्तीबाबत खूप आग्रही होते. ते योग शिकवायचे, मल्लखांब शिकवायचे. आम्ही खेळाडू झालो नाही, पण शरीरासाठी ते किती आवश्यक आहे हे समजले. जगातील कितीही महान व्यक्तीला भेटा, त्यांच्या आयुष्यात दोन गोष्टी नक्की आढळतील—एक म्हणजे आईची मोठी भूमिका आणि दुसरी म्हणजे शिक्षकांची मोठी भूमिका.

विद्यार्थी – हो.

पंतप्रधान – दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जण म्हणेल की माझ्या आयुष्यात माझ्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे.

विद्यार्थी – प्रत्येक क्षेत्रात आपला देश पुढे जात आहे. तर आदिवासी समाज देशाला पुढे नेण्यात काय योगदान देऊ शकतो? ते कृपया सांगाल का.

पंतप्रधान – खूप मोठे योगदान! आज देश पुढे गेला आहे तो आदिवासी समाजामुळेच. देशाचे पर्यावरण टिकून आहे ते त्यांच्यामुळेच! ते निसर्गाची पूजा करतात आणि ते निसर्गाचे रक्षण करतात. आज आपल्या सैन्यातही मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजातील मुला-मुली सेवा बजावत आहेत. आज देशाच्या कोणत्याही क्षेत्रात कसलाच भेदभाव असू नये. क्रीडा क्षेत्रात आपल्या आदिवासी मुलांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांचा विकास झाला म्हणजेच देशाचे नाव उज्वल होईल. अलीकडेच महिला क्रिकेट संघ जिंकून आला, माहिती आहे ना?

विद्यार्थी – हो सर.

पंतप्रधान – मध्यप्रदेशातील क्रांती गोड नावाची आदिवासी मुलगी त्या संघात आहे. तिने क्रीडाक्षेत्रात नाव कमावले आहे. तसेच आपल्या देशातील अनेक खेळाडू आदिवासी समाजातून येतात आणि त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तुमच्याकडेही मोठी कला आहे. जर तुम्ही तंत्रज्ञान शिकलात, तर ही क्षमता आणखी वृद्धिंगत होईल.

विद्यार्थी – हो सर.

पंतप्रधान – आयुष्य केवळ नोकरीसाठी जगायचे नसते.

विद्यार्थी – नाही.

पंतप्रधान – स्वप्न असे असावे की मला अशी एक जीवनशैली जगायची आहे आणि त्यासाठी मी आयुष्य घडवेन. तसे केले तर मोठा फायदा होईल. चला, एखादे गाणे गा.

विद्यार्थी – “जंगलू रेनारी तूं पाहाडू रेनारी...” (पूर्ण गाणे स्पष्ट नाही.)

विद्यार्थी – आम्ही सर्वांनी मिळून ‘मोगी माता’ यांच्यावर आधारित गाणे गायले. त्या कुठे राहतात, कशा राहतात, हे सगळे त्या गाण्यात होते.

विद्यार्थी – सरांशी खूप चर्चा झाली—जीवनात नेहमी आनंदी कसे राहावे, ताण कसा दूर करावा, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे आणि परीक्षेची भीती न बाळगता अभ्यास कसा करावा, याबाबत चर्चा झाली.

विद्यार्थी – सुरुवातीला माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की पंतप्रधान आमच्यासमोर आहेत. वेळ कसा गेला कळलेच नाही.

पंतप्रधान – ‘परीक्षा पे चर्चा’चा चर्चासत्राचा प्रवास अष्टलक्ष्मी म्हणजेच ईशान्य भारतातही पोहोचला. गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीत आणि तेही नदीच्या प्रवाहात नौकाविहार करत करत ‘परीक्षा पे चर्चा’ झाली.

विद्यार्थी – नमस्कार सर.

पंतप्रधान – बसा, बसा.

विद्यार्थी – प्रणाम माननीय पंतप्रधानजी. आम्ही सर्वजण तुम्हाला गमछा अर्पण करू इच्छितो.

पंतप्रधान – नक्कीच. आसाममध्ये येऊन गमछा नसेल तर कसे चालेल? वा!

विद्यार्थी – त्यांची उपस्थिती खूप शांत करणारी होती. जी भीतीची भावना होती ती देखील बसल्यानंतर निघून गेली. आम्ही खूप गप्पा मारल्या.

पंतप्रधान – अच्छा, तुम्ही यापूर्वी कधी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम टीव्हीवर पाहिला आहे का?

विद्यार्थी – हो सर.

पंतप्रधान – ‘एग्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक पाहिले आहे का?

विद्यार्थी – हो सर.

पंतप्रधान – मग त्यानंतर तुम्ही पूर्वी जसा विचार करत होतात, परीक्षेच्या पूर्वी आणि परीक्षेच्या नंतर त्यामध्ये काय फरक पडला. पुस्तक वाचल्यानंतर किंवा कार्यक्रम पाहिल्यानंतर परीक्षेबद्दल तुमच्या विचारांत काय फरक पडला?

विद्यार्थी – आता परीक्षेची इतकी भीती वाटत नाही. तुम्ही सांगितलेले मंत्र—जसे परीक्षा हा एक उत्सव आहे असे मानणे—यामुळे भीती कमी झाली आहे.

पंतप्रधान – पण घरचे लोकच जास्त घाबरवतात ना?

विद्यार्थी – हो सर.

विद्यार्थी – एक गुण कमी का आला, एक गुण का कापला गेला? असे विचारतात.

पंतप्रधान – आयुष्यात समाधान वाटले, “बस झाले”, असे वाटले तर प्रगती थांबते. जिंकण्याची भावना मनात असली पाहिजे.

विद्यार्थी – हो सर.

पंतप्रधान – जिंकण्याचे विचार तर मनात राहिलेच पाहिजेत.पण मी त्यासाठी एक मंत्र सांगितला आहे.

विद्यार्थी – सर, आपण इतरांशी स्पर्धा करू नये.

पंतप्रधान – शाब्बास! मी सांगितले होते की सतत स्वतःशी स्पर्धा करायला हवी. 99 गुण मिळाले आणि एक कमी का मिळाला, हे इतरांनी विचारले तर ठीक आहे; पण स्वतःलाही विचारले पाहिजे की ही उणीव का राहिली? अच्छा, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर जरूर विचारा.

विद्यार्थी – माझ्या ऐकण्यात आले आहे की तंदुरुस्त राहण्यासाठी आपण रोजच्या जीवनात विशिष्ट प्रकारचा आहार घेता. आम्हा विद्यार्थ्यांनी ऊर्जावान आणि एकाग्र राहण्यासाठी तसेच परीक्षेमध्ये आम्ही सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करू शकू यासाठी कोणते ‘मॅजिकल डाएट’ अमलात आणावे?

पंतप्रधान – खरे म्हणजे माझी ठराविक आहार पद्धती नाही, कारण पूर्वी मी वेगवेगळ्या कुटुंबांत जेवत असे. मी शाकाहारी असल्याने जे काही शाकाहारी जेवण उपलब्ध असे ते खात असे. कधी स्वतःलाही स्वयंपाक करावा लागे— मग कधी खिचडी बनवत असे. तुम्ही खिचडी खाता ना?

विद्यार्थी – हो सर.

पंतप्रधान –जेवण तुमच्या पसंतीचे असायला हवे. म्हणजे असे नाही औषधाप्रमाणे जेवू नका. ठरवा, तुम्हाला पोटभर जेवायचे आहे की मनापासून खायचे आहे.

विद्यार्थी – मनापासून खायचे आहे.

पंतप्रधान – आणि बहुतांश लोकांसोबत काय घडते की खाऊ नका असे सांगेपर्यंत ते खात राहतात . धान्य पोटभर खातात,मात्र छाती फुलवून खोल श्वास घेत नाहीत. हे उलटे करायचे आहे. दिवसभरात जेव्हा केव्हा संधी मिळेल , तेव्हा पूर्ण शरीर भरेल इतका श्वास घ्यायला हवा. शक्य झाले तर काही क्षण तो रोखायला हवा आणि मग हळूहळू सोडायचा. आपण काय करतो, जेवतो, म्हणजे इतर 50 कामांमध्ये शरीराला सर्वात शेवटी प्राधान्य देतो. एकदम शेवटचे प्राधान्य. बरं , तुमच्यापैकी किती लोक आहेत ज्यांनी नियम बनवला की आम्ही सूर्योदय पाहणार म्हणजे पाहणार. असे किती आहेत ?

पंतप्रधान – सनराइज

विद्यार्थी –सर, पाहू !

पंतप्रधान – या गोष्टी आपल्या शरीराला ताजेतवाने करतात , एक प्रकारची ऊर्जा देतात. आपण तो सवयीचा भाग बनवायला हवा. शरीराला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे.

विद्यार्थी – सर, अनेकदा आपले आई-वडील आमच्या मित्रांशी आमची तुलना करतात. पण त्याहूनही जास्त दबाव तेव्हा पडतो , जेव्हा आमच्या कुटुंबातील सदस्यांशी किंवा भावंडांशी तुलना केली जाते. तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही काय करायला हवं ?

पंतप्रधान – समजा, वडील म्हणाले की बघ तुझ्या बहिणीचं अक्षर किती छान आहे. तिचं हस्ताक्षर किती सुंदर आहे. त्यावर चांगली व्यक्ती काय म्हणेल? तो त्या बहिणीला म्हणेल, ताई मला शिकव ना, मी माझं हस्ताक्षर कसं सुधारू. दुसरा काय करेल ? तसंही , आई आणि बाबांना माझी बहीणच आवडते. त्यांना तिचे हस्ताक्षर आवडतं . मी इतकी मेहनत घेत आहे हे त्यांना दिसत नाही. जर कुटुंबात एखाद्याच्या चांगुलपणाची चर्चा होत असेल, तर आपण त्या भावाच्या किंवा बहिणीतले चांगले गुण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आईवडिलांना सांगायला हवं की तुम्ही चांगली गोष्ट सांगितली आहे. हा गोष्ट माझ्यात नाही. मला सांगा मी ते कसे आत्मसात करू? तर, आईवडिलांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट नसतो. तो नाराज होत नाही. तो त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो. पालकांनी तुलना करणं टाळावं . आणि मी प्रत्येक पालकांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या कुटुंबातील कुणाही समोर इतकी प्रशंसा करू नये, जेणेकरून मुलाच्या सवयी बिघडतील .एका मुलाचं इतकं कौतुक करू नका की दुसऱ्या मुलाला वाटेल की दरवेळी ते सर्वांसमोर त्याचंच कौतुक करतात, माझ्याबद्दल काही सांगत नाहीत. जर कुटुंबात तुमच्या जवळचं कुणी तुमच्यापेक्षा चांगलं असेल तर तुम्ही मनातल्या मनात त्याला गुरु मानायला हवं . त्याला समजायला नको की तुम्ही त्याला गुरु मानता. आता त्याला म्हणा , "अरे, तू बॅडमिंटन खूप छान खेळतोस. माझं काय चुकतं ? मला शिकव." तेव्हा तो देखील स्वतःला मोठं समजणार नाही. तो म्हणेल याला तर माझ्याकडून शिकायचं आहे. तो स्वतःला बरोबरीचा मानेल.

विद्यार्थी – ताण तर नक्कीच होता, पण त्याच बरोबर मला खूप उत्साही देखील वाटत होतं खूप आनंद झाला होता की मी मोदीजींना भेटणार आहे. म्हणजे मला असं कशी वाटलं नव्हतं की माझ्यासोबत असं कधी घडेल. पण जेव्हा घडलं तेव्हा खूप आनंद झाला.

विद्यार्थी – बऱ्याचदा विद्यार्थ्यांना स्टेजवर किंवा लोकांसमोर बोलणे कठीण जाते. यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही आम्हाला काय सल्ला द्याल?

पंतप्रधान – जर तुला त्यांना सल्ला द्यायचा आहे तर काय देशील? सर्वजण पुढे या, माझ्याजवळ या. जर तुम्हाला एखाद्याला एक, दोन, तीन मध्ये सांगायचे असेल तर ते कसे सांगाल?

विद्यार्थी – सर , आत्मविश्वास असायला हवा. हो.

पंतप्रधान – हा आत्मविश्वास जो आहे ना, त्यात दोन शब्द आहेत. ते दोन शब्द कोणते आहेत ?

विद्यार्थी – आत्मा आणि विश्वास.

पंतप्रधान - ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, त्यांना कधीच भीती वाटत नाही. तुमचा स्वतःवर विश्वास आहे का?

विद्यार्थी – हो , सर आहे.

पंतप्रधान - जर तुमचा स्वतःवर विश्वास आहे , तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करू शकता. ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो तो काय करतो ? संपूर्ण परिस्थितीचा मनातल्या मनात अभ्यास करतो. तुम्ही वाचलंय का, स्वामी विवेकानंद जी यांनी एक पत्र लिहिलं होतं जेव्हा त्यांचं शिकागोमध्ये भाषण झालं होतं , जे अतिशय प्रसिद्ध भाषण आहे.

विद्यार्थी – हो सर.

पंतप्रधान – आणि विवेकानंदजींचे खूप कौतुक देखील केले जाते.

विद्यार्थी – हो सर.

पंतप्रधान – पण त्यांनी आपल्या एका शिष्याला पत्र लिहिले की जेव्हा मला शिकागोमध्ये भाषण द्यायचे होते, तेव्हा मी खूप घाबरलो होतो , जगातील इतके मोठमोठे विद्वान, वयाने इतके मोठे लोक, इतके तपस्वी लोक, मी काय बोलणार , त्यांनी त्याला लिहिले की मी खूप घाबरलो होतो, आणि मग म्हणाले, मी मनातल्या मनात सरस्वती मातेला प्रार्थना केली की आई, माझ्यात जेवढी शक्ती आहे ती जागृत कर , जे काही मी शिकलो आहे, ते सगळे माझ्या तोंडी येउदे. म्हणाले, मी अशी प्रार्थना केली आणि मी मंचावर गेलो, आणि मी सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हणताच दोन मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला. बस, ते एक निर्णायक वळण ठरलं. विश्वास मिळाला, नाही, नाही, मला वाटलं होतं तसा मी नाही आहे. माझ्यातही काही आहे. आत्मविश्वास याला. तर प्रत्येकाच्या जीवनात , आज कोणी कितीही चांगला वक्ता का असेना, कितीही चांगला खेळाडू असो, तुम्ही पाहिले असेल सचिन तेंडुलकर कधी शून्यावर बाद झाला नाही का ?

विद्यार्थी – झाला आहे.

पंतप्रधान – मग तो निराश होऊन बसून राहिला का ?

विद्यार्थी – नाही सर.

पंतप्रधान – याचा अर्थ असा की आपण जी स्थिती आहे तिचे निरीक्षण केले पाहिजे, आपण एकदा परिस्थिती समजून घेतली पाहिजे की हे असं घडलं आहे, आता तुम्हाला वाटेल की हो, ठीक आहे, मी करेन. आत्मविश्वास हा जो शब्द आहे ना, जीवनात तो खऱ्या अर्थाने समजून घेणे हे आत्म्याचे काम आहे , स्वतःच ए करायचं आहे, कुणीही ते करून देत नाही, ते आपल्यालाच करावे लागते.

विद्यार्थी – मला तुमच्यासमोर गाणे सादर करायचं आहे.

पंतप्रधान –अच्छा, गाणं ऐकवणार आहेस.

विद्यार्थी – हो, डॉक्टर भूपेन हजारिका यांचं.

पंतप्रधान – अरे वाह, ऐकव.

विद्यार्थी – गाणे .. (आसामी भाषेत )

पंतप्रधान – वाह.

विद्यार्थी – आमच्या गावात आमच्या घराजवळ ..... (नाव स्पष्ट नाही ) चहाचे मळे आहेत. तिथे माझी आई गेली आठ वर्षं चहाची पाने तोडण्याचे काम पाहते.

पंतप्रधान – अच्छा, म्हणजे तू चहाच्या बागेतील आहेस.

विद्यार्थी – हो.

पंतप्रधान – तू चांगला अभ्यास करतेस , तुझी आई तुला शिकवते आणि चहाच्या बागेतही काम करते. मग तू काय आणले आहेस?

विद्यार्थी – मी तुमच्यासाठी चहा पत्ती आणली आहे.

पंतप्रधान - आता मला चहा बनवावा लागेल. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तुझ्या आईला माझा नमस्कार सांग.

विद्यार्थी – मी कधी विचारच केला नव्हता की चहाच्या बागेतील एक मुलगा, मी पंतप्रधानांना भेटू शकेन. माझा विश्वासच बसत नाहीये की मी पंतप्रधानांना भेटलो आहे.

विद्यार्थी –वयात एवढे अंतर असूनही, ते आमचे म्हणणे समजून घेत होते, खूप छान वाटलं.

पंतप्रधान – तुम्ही पाहिले की परीक्षेबाबत तर चर्चा झाली, त्याचबरोबर स्थानिक संगीत, आसामचा चहा हा देखील परीक्षा पे चर्चाचा संस्मरणीय भाग बनला. परीक्षा ही अशी एक संधी आहे आणि परीक्षेसाठी निकोप स्पर्धेची भावना आपली तयारी अधिक चांगली बनवते. या सर्व चर्चांची ठिकाणे वेगळी होती, विद्यार्थी वेगवेगळे होते, अनुभव वेगळे होते. मात्र प्रत्येक चर्चेचा उद्देश एकच होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे म्हणणे ऐकणे, समजून घेणं आणि एकत्र काही ना काही शिकणं . तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद .

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Renewed Sense Of Responsibility': IIT Delhi Graduates Call PM Modi's Address 'Inspirational'

Media Coverage

'Renewed Sense Of Responsibility': IIT Delhi Graduates Call PM Modi's Address 'Inspirational'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to brave participants of the Quit India Movement
August 09, 2026

Prime Minister Shri Narendra Modi has remembered all those who participated in the historic Quit India Movement and paid tribute to their courage and determination in India’s freedom struggle. Shri Modi said that inspired by the leadership of Mahatma Gandhi, the clarion call of the Quit India Movement infused new energy into the freedom struggle and reflected the unwavering resolve of the people of India to break free from colonial rule.

The Prime Minister posted on X:

Remembering all those who participated in the historic Quit India Movement. Their courage will always remain an inspiration for every Indian. Inspired by the leadership of Mahatma Gandhi Ji, the clarion call of Quit India infused new energy into our freedom struggle and reflected the unwavering determination of our people to break free from colonial rule.