विकसित भारत अर्थसंकल्प विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी देतो: पंतप्रधान
या अर्थसंकल्पात सातत्य राखण्याचा विश्वास आहे
हा अर्थसंकल्प युवा भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे
आम्ही एक मोठे ध्येय ठेवले, ते साध्य केले आणि नंतर स्वतःसाठी आणखी मोठे ध्येय ठेवले
हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देतो: पंतप्रधान

माझ्या प्रिय देशवासियांनो,
 
आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सातत्य राखण्याचा विश्वास आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या युवा, गरीब, महिला आणि शेतकरी, या सर्व चार स्तंभांना सक्षम करेल. निर्मलाजींचा हा अर्थसंकल्प देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प 2047 सालच्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी देणारा आहे. मी निर्मला जी आणि त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन करतो.
 
मित्रहो,
 
या अर्थसंकल्पात युवा भारताच्या युवा आकांक्षांचे, भारताच्या युवा आकांक्षित वर्गाचे प्रतिबिंब आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवोपक्रमासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअपसाठी उपलब्ध कर सवलतीचा विस्तारसुद्धा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
 

मित्रहो,
 
या अर्थसंकल्पात वित्तीय तूट नियंत्रणात ठेवताना; भांडवली खर्चासाठी 11 लाख 11 हजार 111 कोटी रुपयांची ऐतिहासिक उच्चांकी तरतूद ठेवण्यात आली आहे. अर्थतज्ज्ञांच्या भाषेत सांगायचे तर हा एक प्रकारचा sweet spot आहे. यामुळे भारतामध्ये 21 व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीबरोबरच युवा वर्गासाठी नवीन रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. अर्थसंकल्पात वंदे भारत दर्जाच्या चाळीस हजार आधुनिक बोगी बनवून त्या सामान्य प्रवासी गाड्यांमध्ये बसवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे देशातील विविध रेल्वे मार्गावरील कोट्यवधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल.
 
मित्रहो,
 
आम्ही एक मोठे ध्येय उराशी बाळगतो, ते साध्य करतो आणि मग स्वतःसाठी आणखी मोठे ध्येय निर्धारित करतो. गरिबांसाठी आम्ही गावांमध्ये आणि शहरांमध्ये 4 कोटीपेक्षा जास्त घरे बांधली आहेत. आता आम्ही आणखी 2 कोटी नवीन घरे बांधण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. दोन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आम्ही निर्धारित केले होते. आता हे उद्दिष्ट तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे करण्यात आले आहे. आयुष्मान भारत योजनेने गरिबांची खूप मदत केली आहे. आता अंगणवाडी आणि आशा सेविका, अशा सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 

मित्रहो,
 
या अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणावर आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. रुफटॉप सोलर मोहिमेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना सोलर रूफ टॉपच्या माध्यमातून मोफत वीज मिळणार आहे. इतकेच नाही तर जास्तीची वीज सरकारला विकून लोकांना वर्षाला पंधरा ते वीस हजार रुपयांचे उत्पन्न सुद्धा मिळेल आणि प्रत्येक कुटुंबाला हे प्राप्त होईल.
 
मित्रहो,
 
आज जाहीर करण्यात आलेल्या आयकर माफी योजनेमुळे मध्यमवर्गातील सुमारे एक कोटी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागच्या सरकारांनी गेली अनेक दशके सर्वसामान्यांच्या डोक्यावर ही प्रचंड मोठी टांगती तलवार लटकवून ठेवली होती. आज या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नॅनो डीएपीचा वापर असो, जनावरांसाठी नवीन योजना असो, पीएम मत्स्य संपदा योजनेचा विस्तार असो आणि आत्मनिर्भर तेलबिया अभियान असो, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाबद्दल मी पुन्हा एकदा सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A big deal: The India-EU partnership will open up new opportunities

Media Coverage

A big deal: The India-EU partnership will open up new opportunities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जानेवारी 2026
January 28, 2026

India-EU 'Mother of All Deals' Ushers in a New Era of Prosperity and Global Influence Under PM Modi