सियावर राम चंद्र की जय !
सियावर राम चंद्र की जय !
जय सियाराम !
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य महंत नृत्य गोपाल दास जी, पूज्य संत समुदाय, येथे उपस्थित सर्व भक्तगण, देश आणि जगातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत असलेले कोट्यवधी रामभक्त, स्त्री-पुरुषहो!
आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका उत्कर्ष बिंदूची साक्षीदार बनत आहे. आज संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय झाले आहे. प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात अद्वितीय समाधान आहे, असीम कृतज्ञता आहे, अपार अलौकिक आनंद आहे. शतकानुशतके झालेल्या जखमा आता भरत आहेत, शतकांच्या वेदना आज शांत होत आहेत, शतकांच्या संकल्पाची आज सिद्धी होत आहे. आज त्या यज्ञाची पूर्णाहुती आहे, ज्याचा अग्नी 500 वर्षांपर्यंत प्रज्वलित राहिला. जो यज्ञ एका क्षणाकरिताही श्रद्धेपासून ढळला नाही, एका क्षणाकरिताही विश्वास कमी झाला नाही. आज, भगवान श्री राम यांच्या गर्भगृहाची अनंत ऊर्जा, श्री राम परिवाराचे दिव्य तेज, या धर्म ध्वजाच्या रूपात, या परम दिव्य, भव्यतम मंदिरात प्रतिष्ठापित झाले आहे.
आणि मित्रहो,
हा धर्म ध्वज केवळ एक ध्वज नाही, तर तो भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. याचा भगवा रंग, यावर कोरलेली सूर्यवंशाची ख्याती, चित्रित केलेला 'ओम' शब्द आणि त्यावर अंकित कोविदार वृक्ष रामराज्याच्या कीर्तीचे प्रतिनिधित्व करतो. हा ध्वज संकल्प आहे, हा ध्वज यश आहे. हा ध्वज संघर्षातून झालेल्या सृजनाची गाथा आहे, हा ध्वज शतकांपासून चालत आलेल्या स्वप्नांचे साकार झालेले स्वरूप आहे. हा ध्वज संतांची साधना आणि समाजाच्या सहभागाची सार्थ परिणती आहे.

मित्रहो,
येणाऱ्या शतकांपर्यंत आणि हजारो वर्षांपर्यंत, हा धर्म ध्वज प्रभू रामांच्या आदर्शांचा आणि सिद्धांतांचा उद्घोष करेल. हा धर्म ध्वज सत्यमेव जयते नानृतं! म्हणजे, विजय सत्याचाच होतो, असत्याचा नाही; असे आवाहन करेल. हा धर्म ध्वज, सत्यम्-एकपदं ब्रह्म सत्ये धर्मः प्रतिष्ठितः। म्हणजेच, सत्य हेच ब्रह्माचे स्वरूप आहे, सत्यामध्येच धर्म स्थापित आहे; असा उद्घोष करेल. हा धर्म ध्वज प्राण जाए पर वचन न जाहीं। म्हणजेच, जे बोलले जाईल, तेच केले जाईल; अशी प्रेरणा बनेल. हा धर्म ध्वज कर्म प्रधान विश्व रचि राखा! म्हणजेच, जगात कर्म आणि कर्तव्यालाच प्रधानता असावी; असा संदेश देईल. हा धर्म ध्वज बैर न बिग्रह आस न त्रासा। सुखमय ताहि सदा सब आसा॥ म्हणजे, भेदभाव, पीडा-समस्यांपासून मुक्ती, समाजात शांती आणि सुख असावे; अशी कामना करेल. हा धर्म ध्वज आपल्याला नहिं दरिद्र कोउ दुखी न दीना। म्हणजेच, आपण असा समाज निर्माण करूया, जिथे गरिबी नसेल, कोणी दुःखी किंवा लाचार नसेल; असा संकल्प करायला लावेल.
मित्रहो,
आपल्या ग्रंथांमध्ये सांगितले आहे- आरोपितं ध्वजं दृष्ट्वा, ये अभिनन्दन्ति धार्मिकाः। ते अपि सर्वे प्रमुच्यन्ते, महा पातक कोटिभिः॥ म्हणजे, जे लोक काही कारणास्तव मंदिरात येऊ शकत नाहीत, आणि दूरून मंदिराच्या ध्वजाला प्रणाम करतात, त्यांनाही तेवढेच पुण्य प्राप्त होते.
मित्रहो,
हा धर्म ध्वज देखील या मंदिराच्या ध्येयाचे प्रतीक आहे. हा ध्वज दूरूनच रामललांच्या जन्मभूमीचे दर्शन घडवेल. आणि, युगायुगांपर्यंत प्रभू श्रीरामांचे आदेश आणि प्रेरणा मानवापर्यंत पोहोचवत राहील.
मित्रहो,
मी संपूर्ण जगातील कोट्यवधी रामभक्तांना या अविस्मरणीय क्षणाच्या, या अद्वितीय प्रसंगाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज त्या सर्व भक्तांनाही प्रणाम करतो, प्रत्येक दानशूर व्यक्तीचेही आभार व्यक्त करतो, ज्यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी आपले सहकार्य दिले. मी राम मंदिराच्या बांधकामाशी जोडलेला प्रत्येक श्रमवीर, प्रत्येक कारागीर, प्रत्येक योजनाकार, प्रत्येक वास्तुविशारद, या सर्वांचे अभिनंदन करतो.
मित्रहो,
अयोध्या ती भूमी आहे, जिथे आदर्शांचे रुपांतर आचरणात होते. हीच ती नगरी आहे, जिथून श्रीराम यांनी आपला जीवन-मार्ग सुरू केला होता. याच अयोध्येने जगाला सांगितले की एक व्यक्ती समाजाच्या शक्तीने, त्याच्या संस्कारांनी, पुरुषोत्तम कशी बनते. जेव्हा श्रीराम अयोध्येतून वनवासाला गेले, तेव्हा ते युवराज राम होते, परंतु जेव्हा परतले, तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम बनून आले. आणि त्यांचे मर्यादा पुरुषोत्तम बनण्यात महर्षी वसिष्ठांचे ज्ञान, महर्षी विश्वामित्रांची दीक्षा, महर्षी अगस्ती यांचे मार्गदर्शन, निषादराजाची मैत्री, माता शबरीची ममता, भक्त हनुमानाचे समर्पण, या सर्वांची, तसेच अशा असंख्य लोकांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
मित्रहो,
विकसित भारत बनवण्यासाठी समाजाच्या याच सामूहिक शक्तीची आवश्यकता आहे. मला खूप आनंद आहे की राम मंदिराचे हे दिव्य आवार, भारताच्या सामूहिक सामर्थ्याचे चेतना स्थळ देखील बनत आहे. येथे सप्तमंदिरे बांधली गेली आहेत. येथे माता शबरी यांचे मंदिर बांधले गेले आहे, ज्या आदिवासी समाजाचा प्रेमभाव आणि आतिथ्य परंपरेच्या प्रतिमूर्ती आहेत. येथे निषादराजाचे मंदिर बांधले गेले आहे, जे त्या मैत्रीचे साक्षीदार आहे, जी साधनांना नाही, तर ध्येयाला आणि त्यातील भावनेला पूजते. येथे एकाच ठिकाणी माता अहिल्या आहेत, महर्षी वाल्मीकी आहेत, महर्षी वसिष्ठ आहेत, महर्षी विश्वामित्र आहेत, महर्षी अगस्ती आहेत आणि संत तुलसीदास आहेत. रामललांसोबतच या सर्व ऋषींचे दर्शनही इथेच होते. इथे जटायूजी आणि खारीच्या मूर्ती देखील आहेत, जे मोठ्या संकल्पांच्या सिद्धीसाठी प्रत्येक लहान प्रयत्नाचे महत्त्व दर्शवतात. मी आज प्रत्येक देशवासीयाला सांगेन की ते जेव्हा कधी राम मंदिरात येतील, त्यावेळी त्यांनी सप्त मंदिरांचे दर्शनही अवश्य करावे. ही मंदिरे आपल्या श्रद्धेसोबतच, मैत्री, कर्तव्य आणि सामाजिक सद्भावनेच्या मूल्यांनाही शक्ती देतात.
मित्रहो,
आपल्या सर्वांना माहीत आहे, आपले राम भेदभावातून नाही, तर भावनेतून जोडले जातात. त्यांच्यासाठी व्यक्तीचे कूळ नाही, तर त्याची भक्ती महत्त्वाची आहे. त्यांना वंश नाही, तर मूल्ये प्रिय आहेत. त्यांना शक्ती नाही, तर सहकार्य महान वाटते. आज आम्हीही हीच भावना बाळगून वाटचाल करत आहोत. गेल्या 11 वर्षात महिला,दलित,मागास,अति मागास,आदिवासी,वंचित, श्रमिक,युवा अशा प्रत्येक वर्गाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. जेव्हा देशातली प्रत्येक व्यक्ती,प्रत्येक वर्ग,प्रत्येक क्षेत्र सशक्त होईल तेव्हा संकल्प साकारण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांचे योगदान लाभेल. 2047 मध्ये देश जेव्हा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा 2047 पर्यंत सर्वांच्या प्रयत्नातूनच विकसित भारत आपल्याला साकारायचाच आहे.

मित्रहो,
रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मी राम ते राष्ट्र संकल्पाची चर्चा केली होती. येत्या एक हजार वर्षांसाठी भारताचा भक्कम पाया आपल्याला घालायचा आहे असे मी म्हटले होते. जे केवळ वर्तमान काळासाठी विचार करतात ते भावी पिढीवर अन्याय करतात हे आपण लक्षात ठेवायचे आहे. वर्तमानाबरोबरच आपल्याला भावी पिढ्यांबाबतही विचार करायचा आहे.कारण आपण जेव्हा नव्हतो तेव्हाही हा देश होता, आपण जेव्हा इथे नसू तेव्हाही देश राहणार आहे.आपण एक सचेत समाज आहोत,आपल्याला दूरदृष्टीने काम करावे लागेल.येती दशके, येती शतके आपल्याला लक्षात घ्यावी लागतील.
आणि मित्रहो,
यासाठी आपल्याला प्रभू राम यांच्याकडून शिकावे लागेल. त्यांचे व्यक्तित्व समजून घ्यावे लागेल, त्यांचे आचरण आत्मसात करावे लागेल,राम म्हणजे आदर्श,राम म्हणजे मर्यादा,राम म्हणजे जीवनाचे सर्वोच्च चरित्र हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.राम म्हणजे सत्य आणि पराक्रम यांचा संगम, “दिव्यगुणैः शक्रसमो रामः सत्यपराक्रमः।” राम म्हणजे धर्मपथावर चालणारे व्यक्तित्व, “रामः सत्पुरुषो लोके सत्यः सत्यपरायणः।”राम म्हणजे जनतेच्या सुखाला सर्वोच्च स्थान, प्रजा सुखत्वे चंद्रस्य। राम म्हणजे धैर्य आणि क्षमा यांचा सागर, “वसुधायाः क्षमागुणैः”राम म्हणजे ज्ञान आणि विवेक यांची पराकाष्ठा, बुद्धया बृहस्पते: तुल्यः। राम म्हणजे कोमलतेत दृढता,, “मृदुपूर्वं च भाषते”.राम म्हणजे कृतज्ञतेचे सर्वोच्च उदाहरण, “कदाचन नोपकारेण, कृतिनैकेन तुष्यति।” राम म्हणजे श्रेष्ठ संगत निवड,शील वृद्धै: ज्ञान वृद्धै: वयो वृद्धै: च सज्जनैःराम म्हणजे विनम्रतेमधले सामर्थ्य, वीर्यवान्न च वीर्येण, महता स्वेन विस्मितः,राम म्हणजे सत्याचा अढळ संकल्प,“न च अनृत कथो विद्वान्”,राम म्हणजे जागरूक,शिस्तबद्ध आणि निष्कपट मन , “निस्तन्द्रिः अप्रमत्तः च, स्व दोष पर दोष वित्।”
मित्रहो,
राम केवळ एक व्यक्ती नव्हे तर राम एक मूल्य आहे, एक मर्यादा आहे,एक दिशा आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश म्हणून घडवायचे असेल, समाजाला सामर्थ्यवान करायचे असेल तर आपल्याला अंतरात्म्यामधला राम जागृत करावा लागेल.आपल्यामधल्या रामाची प्राणप्रतिष्ठा करावी लागेल आणि या संकल्पासाठी आजच्यापेक्षा उत्तम दिवस कोणता असू शकेल ?
मित्रहो,
25 नोव्हेंबरचा हा ऐतिहासिक दिवस आपल्या संस्कृतीच्या अभिमानाचा एक आणखी अद्भुत क्षण घेऊन आला आहे.त्याचे कारण आहे,धर्म ध्वजावरचे रक्त कांचन वृक्ष चिन्ह . हा रक्त कांचन वृक्ष म्हणजे याचे उदाहरण आहे की आपण आपल्या मुळांपासून तुटलो तर आपले वैभव इतिहासाच्या पानांतच राहील.
मित्रहो,
भरत जेव्हा आपले सैन्य घेऊन चित्रकूट वर पोहोचला तेव्हा लक्ष्मणाने अयोध्येचे सैन्य लांबूनच ओळखले. याचे वर्णन वाल्मिकी जी यांनी केले आहे आणि वाल्मिकी जी यांनी काय वर्णन केले आहे ? त्यांनी म्हटले आहे- - विराजति उद्गत स्कन्धम्, कोविदार ध्वजः रथे।। लक्ष्मणाने म्हटले आहे – हे राम समोर तेजस्वी प्रकाशात विशाल वृक्षासारखा ध्वज दिसत आहे तो अयोध्येच्या सैन्याचा ध्वज आहे, त्यावर रक्त कांचनाचे शुभ चिन्ह झळकत आहे.
मित्रहो,
आज राम मंदिर परिसरात रक्त कांचन वृक्ष पुन्हा स्थापित होत आहे,हे केवळ एका वृक्षाचे पुनर्स्थापन नव्हे तर आपल्या स्मृती परतल्या आहेत, आपल्या अस्मितेचे पुनर्जागरण आहे,आपल्या स्वाभिमानी संस्कृतीचा पुन्हा उद्घोष आहे. आपण आपली ओळख विसरतो तेव्हा स्वतःलाच हरवून बसतो याचे स्मरण रक्त कांचन वृक्ष आपल्याला करून देतो आणि जेव्हा ओळख परत येते तेव्हा राष्ट्राचा आत्मविश्वासही पुन्हा येतो आणि म्हणूनच मी म्हणतो, देशाला आगेकूच करायची असेल तर आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा लागेल.

मित्रहो,
आपल्या वारशाचा अभिमान बाळगतानाच आणखी एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे गुलामीच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्तता. 190 वर्षांपूर्वी 1835 मध्ये मॅकॉले या इंग्रजाने भारताला मुळापासून उपटून टाकण्याचे बीज पेरले होते.त्याने मानसिक गुलामगिरीचा पाया रचला होता. दहा वर्षानंतर म्हणजे 2035 मध्ये, त्या अपवित्र घटनेला दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रमात पुढील दहा वर्षे भारताला या मानसिकतेपासून मुक्त करण्याचे लक्ष्य घेऊन वाटचाल करावी अशी आग्रही भूमिका मी मांडली होती.
मित्रहो,
सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे मॅकॉलेच्या विचारांचा खूप मोठा परिणाम झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु न्यूनगंडातून मुक्तता मिळाली नाही. परदेशची प्रत्येक बाब ,प्रत्येक व्यवस्था सर्व श्रेष्ठ मानण्याची तर आपल्या स्वतःच्या गोष्टींमध्ये केवळ दोष मानण्याची विकृती आपल्यात निर्माण झाली
मित्रहो,
गुलामगिरीच्या मानसिकतेने सतत या समजाला बळकटी दिली की भारताने लोकशाहीची संकल्पना परदेशातून घेतली आहे आणि संविधानदेखील परदेशापासून प्रेरित आहे. मात्र सत्य हे आहे की भारत लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाही आपल्या डीएनएमध्ये आहे.
मित्रहो,
आपण तामिळनाडूमध्ये गेलात तर तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागात उत्तिरमेरूर गाव आहे.तिथे हजारो वर्षांपूर्वीचा एक शिलालेख आहे. त्या काळातही लोकशाही पद्धतीने शासन कसे चालवले जात होते, लोक त्यांचे शासक कसे निवडत असत,याचा उल्लेख शिलालेखात आहे.मात्र आपल्याकडे तर मॅग्ना कार्टाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली गेली.आपले भगवान बसवण्णा,त्यांच्या अनुभव मंटपाविषयीचे ज्ञान मर्यादित ठेवण्यात आले. अनुभव मंटप म्हणजे जिथे सामाजिक, धार्मिक , आर्थिक विषयांवर खुली चर्चा होत असे. जिथे सामुहिक सहमतीने निर्णय घेतले जात असत. मात्र, गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे, भारतातील कितीतरी पिढ्यांना ही माहिती देखील देण्यात आली नव्हती.
मित्रांनो,
आपल्या संपूर्ण व्यवस्थेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गुलामीच्या या मानसिकतेने ठाण मांडले होते. तुम्ही आठवून बघा, आपल्या भारतीय नौदलाचा ध्वज, वर्षानुवर्षे या ध्वजावर अशी चिन्हे अंकित होती ज्यांचा आपली संस्कृती, आपले सामर्थ्य आणि आपल्या वारशाशी कोणताही संबंध नव्हता.आता आम्ही नौदलाच्या ध्वजावरून गुलामीचे प्रत्येक चिन्ह काढून टाकले आहे.आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारशाला तेथे स्थान दिले आहे. आणि हा केवळ रचनेतील बदल नव्हता तर हा मानसिकता बदलण्याचा क्षण होता. भारत आता स्वतःचे सामर्थ्य दुसऱ्या कोणाच्या वारशापासून नव्हे तर स्वतःच्या प्रतीकांसह परिभाषित करेल हे जगजाहीर करण्याचा तो क्षण होता.

आणि मित्रांनो,
हेच परिवर्तन आज अयोध्येत देखील दिसून येत आहे.
मित्रांनो,
इतकी वर्ष रामत्व नाकारणे ही गुलामीचीच मानसिकता आहे. भगवान राम हे स्वतःच एक संपूर्ण मूल्य प्रणाली आहेत. ओरछामधील राजा रामापासून रामेश्वरमच्या भक्त रामापर्यंत, आणि शबरीच्या प्रभू रामांपासून मिथिलेच्या पाहुण रामजी यांच्यापर्यंत सर्व स्वरूपांमध्ये राम देशातील प्रत्येक घरात, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि भारताच्या प्रत्येक कणाकणात वसलेला आहे. तरीही तेव्हा गुलामीची मानसिकता इतकी वरचढ झाली की भगवान रामालादेखील काल्पनिक व्यक्तिरेखा म्हणून घोषित केले जाऊ लागले.
मित्रांनो,
जर आपण येत्या 10 वर्षांत गुलामीच्या मानसिकतेमधून स्वतःला संपूर्णपणे मुक्त करू शकलो तर अशा ज्वाला उजळतील, इतका आत्मविश्वास वाढेल की ज्यांतून 2047 पर्यंत विकसित भारत उभारण्याचे स्वप्न साकारण्यापासून भारताला कोणीही रोखू शकणार नाही. मॅकॉलेचे मानसिक गुलामगिरीचे साम्राज्य आपण येत्या 10 वर्षांत संपूर्णपणे उध्वस्त करून दाखवूया, तेव्हाच येणाऱ्या हजार वर्षांमध्ये भारताचा पाया मजबूत होईल.
मित्रांनो,
अयोध्या धाम येथील रामलल्ला मंदीर परिसर दिवसेंदिवस अधिकाधिक भव्य होत जात आहे आणि सोबतच अयोध्या नगरीच्या सौंदर्यीकरणाचे कार्य वेगाने सुरु आहे. अयोध्या ही पुन्हा एकदा अशी नगरी म्हणून आकाराला येत आहे जी जगासाठी एक उदाहरण म्हणून काम करेल. त्रेतायुगात अयोध्येने मानवतेला एक आदर्श नीती दिली, आता 21 व्या शतकात अयोध्या मानवतेला विकासाचे एक नवे मॉडेल देऊ करत आहे. एकेकाळी अयोध्या ही मर्यादेचे केंद्र होती आणि आताची अयोध्या विकसित भारताचा कणा बनून उदयाला येत आहे.
मित्रांनो,
भविष्यातील अयोध्येमध्ये पौराणिकता आणि नाविन्य यांचा संगम झालेला असेल. शरयू नदीचा अमृत प्रवाह आणि विकासाचा ओघ एकत्रितपणे वाहतील. येथे अध्यात्मिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या दरम्यान सुसंवादाचे दर्शन घडेल. राम पथ, भक्ती पथ आणि जन्मभूमी पथ यांच्याद्वारे नव्या अयोध्येचे दर्शन घडते. अयोध्येत भव्य विमानतळ आहे, आज अयोध्येत आकर्षक रेल्वे स्थानक आहे. वंदे भारत आणि अमृत भारत एक्स्प्रेस सारख्या गाड्या अयोध्येला देशाशी जोडत आहेत. अयोध्येतील जनतेला सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी सातत्याने काम सुरु आहे.
मित्रांनो,
या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून सुमारे 45 कोटी भाविक येथे दर्शनासाठी आले. येथे पंचेचाळीस कोटी लोकांची पायधूळ लागली आहे. आणि त्यामुळे अयोध्या शहर आणि परिसरातील लोकांच्या उत्पन्नात आर्थिक परिवर्तन घडून आले आहे, वाढ झाली आहे. एकेकाळी अयोध्या हे शहर विकासविषयक निकषांच्या बाबतीत फार मागे पडलेले होते मात्र आज ही नगरी उत्तर प्रदेशातील अग्रगण्य शहरांमध्ये स्थान मिळवत आहे.
मित्रांनो,
21 व्या शतकाचा आगामी काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 70 वर्षे झाल्यानंतर भारत हा जगातील 11 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला, 70 वर्षांत 11 वा...पण केवळ गेल्या 11 वर्षांत भारत पाचव्या क्रमांकाची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. जेव्हा भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला असेल तो दिवस आता फार दूर नाही. आगामी काळ हा नव्या संधी आणि नव्या शक्यतांचा आहे. आणि या महत्त्वाच्या कालावधीत भगवान रामाचे विचारच आपल्याला प्रेरणा देत राहतील. जेव्हा श्रीरामांच्या समोर रावणावर विजय मिळवण्यासारखे उदात्त उद्दिष्ट होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते - सौरज धीरज तेहि रथ चाका। सत्य सील दृढ़ ध्वजा पताका।। बल बिबेक दम परहित घोरे। छमा कृपा समता रजु जोरे।। म्हणजेच रावणावर विजय मिळवण्यासाठी असा रथ हवा ज्याची चाके शौर्य आणि धैर्य असतील, या रथाची ध्वजा सत्य आणि उत्तम आचरणाची असेल, सामर्थ्य, विवेक, संयम आणि परोपकार हे या रथाचे घोडे असतील. या रथाला क्षमा, दया आणि समतेचे लगाम असतील आणि ते या रथाला योग्य मार्गावर ठेवतील.
मित्रांनो,
विकसित भारताच्या प्रवासाला वेग देण्यासाठी असाच रथ हवा आहे, एक असा रथ ज्याची चाके शौर्य आणि धैर्य असतील. म्हणजे आव्हानांना भिडण्याचे शौर्यदेखील असेल आणि परिणाम साध्य होईपर्यंत दृढपणे धीर धरण्याचे धैर्य देखील असेल. हा एक असा रथ असेल ज्याचा ध्वज सत्य आणि सर्वोत्तम आचरण असेल म्हणजेच नीती, नियत आणि नैतिकता यांच्याशी कधीही तडजोड नसेल. सामर्थ्य, विवेक, संयम आणि परोपकार हे या रथाचे घोडे असतील म्हणजेच शक्ती, बुध्दी, शिस्त आणि दुसऱ्यांचे हित करण्याची भावनादेखील असेल. हा असा रथ असेल ज्याचे लगाम क्षमा, दयाळूपणा आणि समभाव असतील, म्हणजे यशाचा अहंकार नाही आणि अपयश आले तरी दुसऱ्यांच्या प्रती सन्मान कायम असेल. आणि म्हणून मी आदराने हे सांगू इच्छितो की हा खांद्याला खांदा लावून काम करण्याचा, अधिक वेगाने काम करण्याचा क्षण आहे. आपल्याला रामराज्याकडून प्रेरणा घेतलेला भारत उभारायचा आहे. आणि जेव्हा स्वतःच्या कल्याणापूर्वी देशाच्या कल्याणाचा विचार येईल तेव्हाच हे शक्य आहे. जेव्हा देश सर्वप्रथम असेल तेव्हा हे घडेल. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
जय सियाराम !
जय सियाराम !
जय सियाराम !


