जो बोले सो निहाल, सत श्री अकाल!
हरियाणाचे राज्यपाल असीम घोषजी, लोकप्रिय मुख्यमंत्री नायब सिंग सैनीजी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मनोहर लालजी, राव इंद्रजित सिंगजी, कृष्णपालजी, हरियाणा एसजीपीसीचे अध्यक्ष जगदीश सिंग झिंडाजी, इतर मान्यवर, भगिनींनो आणि बांधवांनो,
आजचा दिवस भारताच्या परंपरेचा एक अद्भुत संगम ठरला आहे. आज सकाळी मी रामायणाची नगरी अयोध्येत होतो आणि आता मी इथे गीतेची नगरी कुरुक्षेत्रात आलो आहे. आपण सर्व श्री गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या बलिदानदिनानिमित्त त्यांना वंदन करत आहोत. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व संतमहंतांना आणि उपस्थित मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार.
मित्रांनो,
5-6 वर्षांपूर्वी एक अनोखा संगम घडला होता, त्याचा उल्लेख मी नक्की करू इच्छितो. 2019 साली 9 नोव्हेंबरला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरावरील ऐतिहासिक निर्णय दिला, त्याच दिवशी मी डेरा बाबा नानक येथे करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन करत होतो. त्या दिवशी मी मनोभावे प्रार्थना करत होतो की, राम मंदिर निर्मितीचा मार्ग खुला व्हावा, करोडो रामभक्तांची भावना साकार व्हावी. आणि आमची प्रार्थना सफल झाली, त्याच दिवशी निर्णय राम मंदिराच्या बाजूने लागला. आज अयोध्येत धर्मध्वजाची स्थापना झाल्याच्या या प्रसंगी मला पुन्हा एकदा सिख बांधवांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे.
मित्रांनो,
आत्ता काही वेळापूर्वी कुरुक्षेत्रच्या भूमीवर पांचजन्य स्मारकाचे लोकार्पण सुद्धा झाले. कुरुक्षेत्रच्या या पवित्र भूमीवर उभे राहून भगवान श्रीकृष्णांनी सत्य आणि न्यायाच्या रक्षणाला सर्वश्रेष्ठ धर्म म्हटले, “स्वधर्मे निधनं श्रेयः " असे त्यांनी सांगितले. म्हणजेच आपल्या धर्मासाठी प्राण देणे देखील श्रेष्ठ आहे. श्री गुरु तेग बहादुरजींनीही हेच दाखवून दिले की सत्य, न्याय आणि आस्थेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणे हेच खरे धर्माचं पालन आहे. या ऐतिहासिक प्रसंगी भारत सरकारला श्री गुरु तेग बहादुरजींच्या चरणी एक स्मारक टपाल तिकीट आणि विशेष नाणे अर्पण करण्याचे सौभाग्य लाभले आहे. आमचे सरकार गुरु परंपरेची अशीच सतत सेवा करत राहो, अशी माझी अशी इच्छा आहे.

मित्रांनो,
कुरुक्षेत्र ही पवित्र भूमी सिख परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. जवळजवळ सर्व सिख गुरूंनी आपल्या यात्रेदरम्यान या भूमीचा स्पर्श केला होता. नववे पातशाही श्री गुरु तेग बहादुरजी जेव्हा येथे आले, त्यांनी आपल्या तपश्चर्येची आणि निर्भयतेची अमिट छाप यावर सोडली. गुरु तेग बहादुरजी सारखी व्यक्तिमत्त्वे इतिहासात मोजकीच पाहायला मिळतात. त्यांचे आयुष्य, त्यांचा त्याग आणि त्यांच्या चरित्रातून मोठी प्रेरणा मिळते. मुघल अत्याचारांच्या काळात त्यांनी अद्वितीय शौर्याचे उदाहरण दिले. त्या काळात काश्मीरी हिंदूंवर जबरदस्ती धर्मांतर लादले जात होते. या संकटग्रस्त लोकांनी जेव्हा गुरूजींचा आश्रय घेतला, तेव्हा गुरूंनी त्यांना सांगितले की औरंगजेबसोबत स्पष्ट बोला, जर गुरु तेग बहादुरजींनी इस्लाम स्विकारला, तरच आम्ही सारे इस्लाम स्विकारू. या शब्दांत गुरूजींचे अद्वितीय धैर्य दिसून येते. मग औरंगजेबाने त्यांना कैद करण्याचा आदेश दिला. प्रलोभने दिली, धमक्या दिल्या, पण गुरु बहादूर अढळ राहिले, त्यांनी धर्म आणि तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांचे तीन शिष्य भाई दयालाजी, भाई सतीदासजी आणि भाई मतिदासजी यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांनी धर्माचा त्याग केला नाही. शेवटी, तपोभूमीतील स्थितप्रज्ञ अवस्थेत त्यांनी आपले मस्तक धर्मरक्षणासाठी अर्पण केले.
मित्रांनो,
मुघल इतक्यावरही थांबले नाहीत; त्यांनी गुरु महाराजांच्या मस्तकाचा अपमान करण्याचाही प्रयत्न केला. पण त्या काळात भाई जैताजींनी आपल्या शौर्य आणि त्यागाच्या बलावर ते मस्तक सुरक्षित ठेवून आनंदपूर साहिब येथे पोचवले. म्हणूनच गुरु गोविंद सिंह जींनी गौरवाने लिहिले की, धर्माचा तिलक राखणारा जर कोणी असेल, तर ते तेग बहादुर आहेत; त्यांनी जे केले, ते दुसऱ्या कुणी केले नाही. धर्माचे रक्षण, श्रद्धेचे संरक्षण यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले.
मित्रांनो,
आज ज्या भूमीवर गुरु साहिबांनी बलिदान दिले, त्या भूमीचे प्रतीक म्हणून दिल्लीतील शीशगंज गुरुद्वारा आपल्यासाठी प्रेरणेचे एक जिवंत केंद्र बनून उभा आहे. हिंदुस्तानाच्या आजच्या स्वरूपामध्ये गुरु साहिबांसारख्या युगपुरुषांचा त्याग आणि समर्पण खोलवर गुंफलेले आहे. आनंदपूर साहिबचे हे तीर्थ आपल्या राष्ट्रीय चेतनेची शक्तिभूमी आहे, आणि याच त्यागामुळे श्री गुरु तेग बहादुर साहिबांना ‘हिंद दी चादर’ म्हणून वंदन केले जाते.

मित्रांनो,
आपल्या गुरूंची परंपरा ही आपल्या राष्ट्राच्या चारित्र्याची, आपल्या संस्कृतीची आणि आपल्या मूलभावनेची भक्कम पायाभरणी आहे. गेल्या अकरा वर्षांत आपल्या सरकारने या पवित्र परंपरांना अशा पद्धतीने मान दिला आहे की, सिख परंपरेशी संबंधित प्रत्येक उत्सव हा राष्ट्रीय उत्सव म्हणूनही साजरा होऊ लागला आहे. आपल्या सरकारला श्री गुरु नानक देवजींच्या 550 व्या प्रकाश पर्वाचा, श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या 400 व्या प्रकाश पर्वाचा आणि श्री गुरुगोविंद सिंहजींच्या 350 व्या प्रकाश पर्वाचा उत्सव भारताच्या एकता आणि अखंडतेचा सोहळा म्हणून साजरा करण्याचा मान लाभला. संपूर्ण भारतभर, विविध विचारसरणी, परंपरा आणि श्रद्धा असलेल्या लोकांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये आपली विविधता बाजूला ठेवून, एकजुटीने सहभाग घेतला आहे.
गेल्या दहा वर्षांत अनेक असे प्रसंग आलेत, जेव्हा मला स्वतः गुरु परंपरेशी जोडलेल्या कार्यक्रमांचा भाग होण्याचा मान मिळाला. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमधून गुरु ग्रंथ साहिब यांचे तीन मूळ प्रति जेव्हा भारतात आल्या, तेव्हा तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा होता.
मित्रांनो,
आपल्या सरकारने गुरूंशी संबंधित प्रत्येक पवित्र स्थळाला आधुनिक भारताशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. करतारपूर कॉरिडॉर पूर्ण करणं असो, हेमकुंड साहिबसाठी रोप-वे तयार करणं असो, किंवा आनंदपूर साहिबमधील विरासत-ए-खालसा संग्रहालयाचा विस्तार असो, आम्ही गुरु परंपरेला आदर्श मानत या कामांना संपूर्ण श्रद्धेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रांनो,
आपण सर्व जाणतो की मुघलांनी वीर साहिबजादे यांना किती क्रूर वागणूक दिली होती. त्या छोट्या वयातही साहिबजाद्यांनी भिंतीत जिवंत बंद केलं जाणं स्वीकारलं, पण धर्म आणि कर्तव्याचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या या बलिदानाच्या सन्मानासाठी आपण दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करतो.
आपण शीख परंपरेचा इतिहास आणि गुरूंच्या शिकवणीचा समावेश राष्ट्रीय अभ्यासक्रमातही केला आहे, जेणेकरून सेवा, साहस आणि सत्य या मूल्यांना पुढची पिढी स्वीकारेल.
माझा विश्वास आहे की तुम्हा सर्वांना ‘जोड़ा साहिब’ यांच्या पवित्र दर्शनाबद्दल माहिती असेल. मला आठवतंय, जेव्हा एका बैठकीत हरदीप सिंह पुरी यांनी पहिल्यांदा याबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाने गुरु गोविंद सिंह आणि माता साहिब कौर यांचे ‘जोड़ा साहिब’ जवळपास 300 वर्षांपासून जपून ठेवले आहेत. आणि आता ते हा अमूल्य वारसा शीख समाजाला समर्पित करू इच्छितात.
यानंतर या ‘जोड़ा साहिब’चा आदरपूर्वक वैज्ञानिक तपास करण्यात आला, जेणेकरून ते पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवता येतील. सर्व बाबींचा विचार करून आम्ही ठरवलं की हे ‘जोड़ा साहिब’ तख्त श्री पटना साहिब येथे समर्पित केले जातील. जिथे गुरु महाराजांनी आपल्या बालपणीचं बरंच आयुष्य घालवलं होतं. गेल्या महिन्यात ही पवित्र धरोहर दिल्लीहून पटना साहिब येथे धार्मिक यात्रेद्वारे नेण्यात आली आणि तिथे मला देखील नतमस्तक होण्याचा योग आला. ही माझ्यासाठी गुरूंची शुभकृपा आहे असे मी मानतो.

मित्रांनो,
गुरु तेग बहादुर साहिब यांच्या स्मृती आपल्याला सांगतात की भारताची संस्कृती किती विशाल, उदार आणि मानवतेवर केंद्रित आहे. सरबत दा भला हा संदेश त्यांनी शब्दांनी नाही तर आयुष्याने सिद्ध केला.
आजचा हा सोहळा फक्त आठवणींचा नाही, ही आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी प्रेरणा आहे. गुरु साहिबांनी शिकवलं आहे,
“जो नर दुख में दुख नाही मानै, सोई पूरन ज्ञानी”
म्हणजे जो विपरीत परिस्थितीतही स्थिर राहतो, तोच खरा ज्ञानी, तोच साधक
ह्याच प्रेरणेने आपण प्रत्येक आव्हानाला सामोरं गेलं पाहिजे आणि भारताला विकसित भविष्याकडे घेऊन जायला हवं
गुरु साहिबांची आणखी एक महत्त्वाची शिकवण म्हणजे
“भय काहू को देत नहि, नहि भय मानत आन”
म्हणजे आपण ना कोणाला घाबरवावं आणि ना कोणापासून घाबरून जगावं
आज भारत ह्याच तत्त्वावर चालतो.जगाला बंधुतेचा संदेश देतो आणि स्वतःची रक्षा करण्याची ताकदही दाखवतो. ऑपरेशन सिंदूर याचं स्पष्ट उदाहरण आहे. जगानं पाहिलं आहे, आजचा भारत ना घाबरतो, ना थांबतो आणि ना दहशतवादासमोर झुकतो.

मित्रांनो,
आज मी आपल्या समाजाशी,विशेषतः युवांशी एका गंभीर विषयावर बोलू इच्छितो. या विषयाची चिंता गुरु साहिबांनाही होती..... ती म्हणजे नशा, मादक पदार्थांचं व्यसन.
अनेक तरुणांच्या स्वप्नांना मादक पदार्थांनी उद्ध्वस्त केलं आहे. सरकार ही समस्या संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण ही लढाई समाजाची, कुटुंबाची आणि प्रत्येक तरुणाचीही आहे.
गुरु साहिबांनी आनंदपूर साहिब मधून प्रवास सुरू केला तेव्हा त्यांनी अनेक गावांना जोडून लोकांचा जीवनमार्ग बदलला. गुरूंच्या प्रेरणेने लोकांनी मादक पदार्थांची शेती सोडून सदाचाराचा मार्ग स्वीकारला. आजही आपण तेच केलं. समाज, कुटुंब आणि युवा हे एकत्र नशेच्या विरोधात उभं राहिले,तर ही समस्या कायमची संपेल.

मित्रांनो,
गुरूंच्या शिकवणी आपल्यात शांती, धोरणांत संतुलन आणि समाजात विश्वास निर्माण करो, हाच आजच्या दिवसाचा संदेश आहे. आज देशभरात गुरु तेग बहादुर साहिब यांचा शहादत दिवस ज्या श्रद्धेने साजरा होतो आहे, त्यावरून सिद्ध होतं की गुरूंची शिकवण आजही आपल्या हृदयात जिवंत आहे.
या भावनेने,
की हे सर्व कार्यक्रम आपल्याला आणि आपल्या तरुण पिढीला दिशादर्शक ठरतील.
मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
वाहेगुरू जी दा खालसा, वाहेगुरू जी दी फतेह।


