Quoteपंतप्रधानांच्या ह्स्ते सिक्कीममधील विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन
Quoteसिक्कीम हा देशाचा अभिमान आहे: पंतप्रधान
Quoteगेल्या दशकभरापासून आमच्या सरकारने ईशान्य प्रदेशाला भारताच्या विकासात्मक वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवले आहे: पंतप्रधान
Quoteआम्ही ‘अॅक्ट फास्ट’ च्या उर्जेसह ‘अॅक्ट इस्ट धोरण पुढे नेत आहोत: पंतप्रधान
Quoteसिक्कीम आणि संपूर्ण ईशान्य प्रदेश भारताच्या प्रगतीमधील एक झळाळता अध्याय म्हणून उदयाला येत आहे: पंतप्रधान
Quoteसिक्कीमला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत: पंतप्रधान
Quoteयेत्या काही वर्षांमध्ये, भारत जागतिक क्रीडाक्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयाला येण्याच्या तयारीत आहे, आणि हे स्वप्न सत्यात साकार करण्यात ईशान्य भारत आणि सिक्कीम यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल: पंतप्रधान
Quoteसिक्कीमला केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठीच आदर्श हरित राज्य म्हणून घडवणे हे आमचे स्वप्न आहे: पंतप्रधान

सिक्किमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर जी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, माझे मित्र प्रेमसिंह तमांग जी, खासदार  दोरजी शेरिंग लेप्चा जी, डॉ. इंद्रा हांग सुब्बा जी, इतर उपस्थित लोकप्रतिनिधी, स्त्री-पुरूष सज्जनहो, कांचनजंगाच्या शीतल छायेत वसलेल्या आपल्या प्रिय सिक्किम मधील मातापिता, बंधू-भगिनी, सर्वांना राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजचा दिवस विशेष आहे; हा दिवस सिक्किमच्या लोकशाही प्रवासाच्या सुवर्ण महोत्सवाचा आहे. आपल्या सर्वांसोबत  उपस्थित राहून या उत्सवाचा, या आनंदाचा, 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा साक्षीदार होण्‍याची माी इच्छा होती. मलाही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या उत्सवाचा भाग व्हायचे होते. मी पहाटे पहाटे दिल्लीहून लवकर निघून, बागडोगराला तर पोहोचलो, मला आपल्या दारापर्यंत पोहोचता आले, पुढे मात्र  खराब  हवामानामुळे जाऊ शकलो नाही. त्यामुळे आपली प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. पण, मी हे दृश्य पहात आहे…. असे भव्य दृश्य माझ्यासमोर आहे…. समोर लोकांची गर्दी दिसत आहे, किती सुंदर दृश्य आहे! किती छान झाले असते, मी ही आपल्या सोबत असतो, पण मी पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. पण, मुख्यमंत्रीजींनी मला निमंत्रण दिलं आहे, मी आपल्याला विश्वास देतो, राज्य सरकार जेव्हा ठरवेल, तेव्हा मी सिक्किमला नक्की येईन, आपल्याला भेटेन आणि या 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा मीही साक्षीदार होईन. आजचा दिवस मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा करण्याचा आहे आणि आपण उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला आहे. मुख्यमंत्रीजींनी या कार्यक्रमाला संस्मरणीय बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. दिल्लीमध्येही त्यांनी दोन वेळा येऊन मला निमंत्रण दिले. मी सर्वांना सिक्किम राज्य स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल  हार्दिक शुभेच्छा देतो.

मित्रहो, सिक्किमने 50 वर्षांपूर्वी आपल्या भविष्यासाठी  लोकशाही मार्ग निवडला होता. सिक्किमच्या लोकांची मने केवळ भौगोलिकदृष्ट्या भारताशी जोडलेली नव्हती, तर ती भारताच्या आत्म्याशीही एकरूप झालेली होती. जेव्हा सगळ्यांची मते विचारात घेतली  जातील,सर्वांचे हक्क सुरक्षित असतील, तेव्हा विकासाच्या समान संधी मिळतील,असा एक विश्वास होता. आज मी ठामपणे सांगू शकतो की,  सिक्किममधील प्रत्येक कुटुंबाचा हा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेला आहे…आणि देशाने या विश्वासाचे फलित सिक्किमच्या प्रगतीच्या स्वरूपात पाहिले आहे. सिक्किम राज्य आज भारताच्या अभिमानाचा विषय बनले आहे. गेल्या 50 वर्षांत सिक्किमने निसर्गासोबत समतोल राखत विकासाचा एक आदर्श घालून दिला   आहे.

 

|

जैवविविधतेचा एक विशाल बगिचा येथे उभा राहिला आहे.

संपूर्णत: सेंद्रीय शेती करणारे (100 % सेंद्रीय) राज्य म्हणून सिक्किम ओळखले जाऊ लागले आहे. ते आपल्या संस्कृती आणि वारशाच्या समृद्धतेचे प्रतीक म्हणून पुढे आले आहे. आज सिक्किम हे देशातील अशा काही राज्यांपैकी एक आहे जिथे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. हे सर्व यश मिळवण्यामागे सिक्किमच्या जनतेचे सामर्थ्य, कष्ट आणि जिद्द आहे.  या 50 वर्षांत सिक्किममधून असे अनेक तारे (गौरवशाली व्यक्तिमत्वे) तळपले आहेत, ज्यांनी भारताचे आकाश उजळवले आहे. येथे प्रत्येक समाजाने सिक्किमच्या संस्कृती आणि समृद्धीत आपले मोलाचे योगदान दिले आहे.

मित्रांनो,

2014 मध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर, मी म्हटले होते – 'सबका साथ, सबका विकास' (सर्वांचा सहभाग, सर्वांचा विकास). भारताला एक विकसित देश बनवण्यासाठी देशाचा संतुलित विकास अत्यंत आवश्यक आहे. असे होऊ नये की, केवळ काही विशिष्ट भागांपर्यंतच विकास पोहोचेल आणि इतर भाग मागेच राहतील. भारताच्या प्रत्येक राज्याला, प्रत्येक भागाला आपली एक वेगळी ओळख, वैशिष्ट्य आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन गेल्या दशकात आमच्या सरकारने ईशान्य भारत (North East) भागाला विकासाच्या केंद्रस्थानी आणले आहे. आम्ही ‘Act East’ (पूर्वेला प्राधान्य) या संकल्पनेवर ‘Act Fast’ (जलद कृती) या दृष्टिकोनातून काम करत आहोत. अलीकडेच दिल्लीमध्ये ईशान्‍य भारत गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  या परिषदेमध्ये देशातील मोठे उद्योजक आणि गुंतवणूकदार सहभागी झाले होते. त्यांनी सिक्किमसह संपूर्ण ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे लवकरच सिक्कीम आणि ईशान्य भारतामधील तरुणाईसाठी स्थानिक पातळीवरच अनेक मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

मित्रांनो,

आजच्या या कार्यक्रमामध्येही सिक्कीमच्या भविष्यातील प्रवासाची एक झलक दिसून येते. आज येथे सिक्कीमच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे सिक्कीममध्ये आरोग्यसेवा, पर्यटन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील सुविधा विस्तारतील. मी आपणा सर्वांना या सर्व प्रकल्पांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य भारत हा नव्या भारताच्या विकासगाथेतील एक तेजस्वी अध्याय बनत आहे. जिथे पूर्वी दिल्लीपासून खूप दूर असणे, विकासाच्या मार्गातील अडथळा ठरत होते, आता तिथेच नव्या संधींचे दरवाजे उघडत आहेत. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे — इथल्या दळणवळण - संपर्क व्यवस्थेमध्ये घडून आलेले परविर्तन  आणि तुम्ही हे बदल स्वतः पाहिले आहेत. एक काळ असा होता की शिकण्यासाठी, उपचारांसाठी, किंवा रोजगारासाठी कुठेही प्रवास करणे खूप मोठे आव्हान होते. पण गेल्या दहा वर्षांत इथल्या परिस्थितीत खूप मोठा बदल झाला आहे. या काळात सिक्कीममध्ये सुमारे 400 किलोमीटर नव्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती झाली आहे.  गावांमध्ये शेकडो किलोमीटर लांब नव्या रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. अटल सेतू तयार झाल्यामुळे सिक्कीम आणि दार्जिलिंग यांच्यातला संपर्क अधिक चांगला झाला आहे. सिक्कीमला कालिम्पोंगशी जोडणाऱ्या रस्त्याचं कामही वेगाने  सुरू आहे.

 

|

आता तर बागडोगरा-गंगटोक दृतगती महामार्गामुळे सिक्कीममध्ये येणे-जाणे अधिक सोपे होणार आहे. इतकेच नव्हे तर, भविष्यात हे महामार्ग गोरखपूर-सिलीगुडी दृतगती महामार्गाशीही जोडण्यात येणार आहेत.

मित्रांनो,

आज ईशान्य भारतातील प्रत्येक राज्याची राजधानी रेल्वेमार्गाशी जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. सेवोक-रांगपो रेल्वेमार्ग, सिक्कीमलाही देशाच्या रेल्वे जाळ्याशी  जोडणार आहे. आमचा प्रयत्न आहे की, जिथे रस्ते बांधणे शक्य नाही, तिथे रोपवे (लोह रज्जू प्रवास  प्रणाली) उभारला जावा. काही वेळापूर्वीच अशाच काही रोपवे प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे.

यामुळे सिक्कीममधील लोकांच्या दैनंदिन प्रवासात आणखी सुलभता निर्माण होईल.

मित्रांनो,

मागील दशकात भारताने अनेक नवीन संकल्पांनिशी प्रगतीचा मार्ग धरला आहे आणि यामध्ये उत्तम आरोग्यसेवा पुरवणे ही आमच्या सरकारची एक मोठी प्राधान्याची बाब ठरली आहे. गेल्या 10-11 वर्षांत देशातील प्रत्येक राज्यात मोठी रुग्णालये उभी राहिली आहेत. एम्स-AIIMS ( अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आज येथेही 500 खाटांचे एक मोठे रुग्णालय जनतेच्या सेवेस अर्पण करण्यात आले आहे. हे रुग्णालय अगदी गरीबांनाही दर्जेदार उपचारांची हमी देईल.

मित्रांनो,

आमचे सरकार एकीकडे देशभरात नवीन रुग्णालये उभी करत आहे, तर दुसरीकडे स्वस्त आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठीही काम करत आहे. आयुष्मान भारत योजने अंतर्गत, सिक्कीममधील 25,000 हून अधिक नागरिकांना मोफत उपचार मिळाले आहेत. आता संपूर्ण देशात 70 वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

त्यामुळे सिक्कीममधील कोणत्याही कुटुंबाला आता आपल्या वडीलधाऱ्यांची  चिंता उरणार नाही. त्यांच्या उपचारांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे.

मित्रांनो,

विकसित भारताची निर्मिती चार मजबूत स्तंभांवर होणार आहे. हे स्तंभ आहेत - गरीब, शेतकरी, महिला आणि नवयुवक. आज देशामध्ये या चारही स्तंभांना सातत्याने मजबूत करण्याचे काम केले जात आहे. याप्रसंगी मी सिक्कीमच्या शेतकरी बंधू -भगिनींचे अगदी मनापासून कौतुक करतो. आज देश, कृषी क्षेत्रातील ज्या नवीन प्रवाहाच्या दिशेने पुढे जात आहे, त्यामध्ये सिक्कीम सर्वात आघाडीवर आहे. सिक्कीमच्या  सेंद्रीय उत्पादनांची निर्यातही वाढत आहे. अलिकडेच इथली  प्रसिद्ध डैले खुरसानी मिरची पहिल्यांदाच निर्यात करण्यास प्रारंभ झाला आहे. मार्च महिन्यामध्ये पहिली  खेप  परदेशामध्ये पोहोचली आहे. आगामी काळामध्ये अशा  अनेक उत्पादनांची इथून  परदेशामध्ये निर्यात होईल. राज्य सरकारच्या प्रत्येक प्रयत्नात  केंद्र सरकार खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत आहे.

 

|

मित्रांनो,

सिक्कीमची  सेंद्रीय  अन्नधान्यात वैविध्य आणून   ते अधिक समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. इथल्या सोरेंग जिल्ह्यामध्ये देशातील पहिले सेंद्रीय मत्स्योत्पादन ‘क्लस्टर’ बनविण्यात येत आहे. यामुळे सिक्कीमला देशात आणि अवघ्या दुनियेमध्ये नवीन ओळख प्राप्त होईल. सेंद्रीय शेतीबरोबरच सिक्कीम सेंद्रीय मत्स्यत्पोदनासाठीही प्रसिद्ध होईल. संपूर्ण जगामध्ये सेंद्रीय मासे आणि मत्स्य उत्पादने यांना खूप मागणी आहे. यामुळे इथल्या नवयुवकांना मत्स्य पालन क्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण होतील.

मित्रांनो,

अलिकडेच काही दिवसांपूर्ण दिल्ली येथे नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये  मी म्हणालो की, प्रत्येक राज्याने स्वतःचे असे वेगळे, पर्यटकांना  आकर्षित करण्यासाठी एक नवीन स्थान विकसित केले पाहिजे. या स्थानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख बनवली पाहिजे. आता अशी वेळ आली आहे की, सिक्कीम फक्त एक पर्वतीय- थंड हवेचे ठिकाण राहून चालणार नाही, तर या स्थानाला वैश्विक पातळीवरचे पर्यटन स्थान बनवले पाहिजे. सिक्कीमच्या सामर्थ्याला तोड नाही. सिक्कीम एक पर्यटनाचे संपूर्ण पॅकेज आहे. इथे निसर्ग आहे, अध्यात्मही आहे. इथे सरोवर आहेत, झुळझुळ वाहणारे पाण्याचे झरे आहेत, डोंगरमाथा आहे आणि शांत छायेमध्ये वसलेले बौद्ध मठही  आहेत. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान, युनेस्कोने घोषित केलेला जागतिक वारसा स्थान आहे, सिक्कीमच्या या वारशाचा  फक्त भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला अभिमान वाटतो. आज ज्यावेळी इथे नवीन स्कायवॉक् बनत आहे, सुवर्ण जयंती प्रकल्पांचे लोकार्पण केले जात आहे, अटलजींच्या पुतळ्यांचे अनावरण केले जात आहे, हे सर्व प्रकल्प म्हणजे सिक्कीमने घेतलेल्या नवीन उंच भरारीचे प्रतीक आहेत.

मित्रांनो,

सिक्कीममध्ये साहसी आणि क्रीडा पर्यटन केंद्र बनविण्याच्या दृष्टीने भरपूर क्षमता आहे. पर्वतारोहण, माउंटन बायकिंग,  अतिउच्च स्थानी प्रशिक्षण केंद्र  असे अनेक प्रकार येथे सहजपणे केले जावू शकतात. आमचे स्वप्न आहे की, सिक्कीम हे बैठका, परिषदा, चांगल्या आरोग्यासाठी-  निरामय पर्यटन आणि सभा, मोठ्या कार्यक्रमासाठीचे, पर्यटनाचे केंद्र ठरले पाहिजे. स्वर्ण जयंती कन्वेन्शन सेंटर, हा या भविष्याच्या सज्जतेचा भाग आहे. मला असे वाटते की, जगातल्या  मोठ-मोठ्या  कलाकारांनी   या गंगटोकच्या दरी-खो-यांमध्ये येवून आपली कला सादर करावी आणि संपूर्ण जगाने असे म्हणावे की, ‘‘ निसर्ग आणि संस्कृती हातात-हात घालून जिथे नांदतात, ते राज्य म्हणजे आपले सिक्कीम आहे.‘‘

मित्रांनो,

जी-20 शिखर परिषदेच्या अनेक बैठका आम्ही ईशान्य भारतामध्ये घेतल्या. त्यामुळे संपूर्ण दुनियेला या डोंगराळ प्रदेशामध्ये किती प्रचंड क्षमता आहे, हे दिसले. इथे काय-काय होवू शकते यांच्या   शक्यतांविषयी  सर्वांना माहिती झाली पाहिजे, असा त्यामागे विचार होता. मला आनंद वाटतो की, सिक्कीमचे एनडीए सरकार हाच दृष्टिकोन समोर ठेवून अतिशय वेगाने तो वास्तवात सकारात आहे. 

 

|

मित्रांनो,

आज भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. आगामी काळामध्ये  भारत क्रीडा जगतामध्येही महान शक्ती बनेल. आणि या स्वप्नांना साकार  करण्यामध्‍ये  ईशान्य भारत आणि सिक्कीमच्या युवा शक्तीची खूप मोठी, महत्वाची भूमिका आहे. ज्यांनी आपल्याला बायचुंग भुतिया यांच्यासारखा फूटबॉलपटू दिला, अशी ही भूमी आहे. या सिक्कीममधून तरूणदीप राय याच्यासारखे ऑलिपिंकपटू उदयास आले आहेत. जसलाल प्रधानसारख्या क्रीडापटूने भारताला गौरव मिळवून दिला. आता आमचे लक्ष्य असे आहे की, सिक्कीमच्या प्रत्येक गावांमधून, प्रत्येक गल्लीमधून नवे विजेते खेळाडू तयार झाले पाहिजेत. क्रीडा क्षेत्रात भागीदारीच नाही तर विजयाचाही संकल्प असला पाहिजे. गंगटोकमध्ये जे नवीन क्रीडा संकूल बनविण्यात आहे, ते आगामी दशकांमध्ये विजेत्यांची जन्मभूमी बनेल. ‘खेलो इंडिया‘ योजनेअंतर्गत सिक्कीमला विशेष प्राधान्य दिले गेले आहे. क्रीडा प्रतिभा ओळखणे, त्यांना प्रशिक्षण देणे, खेळाचे तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष स्पर्धा खेळणे, यासाठी प्रत्येक स्तरावर मदत केली जात आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, सिक्कीमच्या युवकांमध्ये ही जी ऊर्जा आहे, उत्साह आहे, तो पाहून  मला वाटते हा उत्साहच भारताला ऑलिंपिकच्या पोडियमपर्यंत पाहोचण्याचे काम करणार आहे.

मित्रांनो,

सिक्कीमचे तुम्ही सर्व लोक पर्यटनाची शक्ती किती प्रचंड  आहे, हे चांगले जाणून आहात. पर्यटन म्हणजे काही फक्त मनोरंजन नाही, तर हा  वैविध्याचा उत्सव आहे. परंतु दहशतवाद्यांनी पहलगामध्ये  जे कृत्य केले, ते कृत्य म्हणजे फक्त भारतीयांवर हल्ला नव्हता, तो मानवतेच्या आत्म्यावर केलेला प्रहार होता. बंधुत्वाच्या भावनेवर केलेला हा हल्ला होता. दहशतवाद्यांनी आपल्या अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. त्यांनी आपल्या भारतीयांमध्ये फूट पाडण्याचाही कट केला. परंतु आज संपूर्ण जग  पहात आहे की, भारत पहिल्यापेक्षा आता खूप जास्त एकजूट झाला आहे. आपण एकजूट होवून दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणा-यांना स्पष्ट संदेश  दिला आहे. त्यांनी आपल्या लेकींच्या कपाळावरचे कुंकू पुसले, आणि त्यांचे जीवन ध्वस्त केले मात्र ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

मित्रांनो,

दहशतवादाचे तळ उद्ध्वस्त झाल्यामुळे हताश झालेल्या पाकिस्तानने आमच्या नागरिकांवर आणि सैनिकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्येही पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. आम्ही त्यांचे  अनेक हवाईतळ   जमीनदोस्त करत  भारत कधी, काय करू शकतो, भारत किती वेगाने करू  शकतो, भारत किती अचूक  हल्ले करू शकतो, हे शत्रूंला  आपण दाखवून दिले आहे.

मित्रांनो,

राज्य म्हणून  सिक्कीमने पार पाडलेला 50 वर्षांचा टप्पा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. विकासाचा हा प्रवास  आता अधिक वेगाने होणार आहे. आता आपल्यासमोर 2047 हे वर्ष आहे. या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होतील.

याच वेळी सिक्कीम राज्यस्थापनेला 75 वर्ष पूर्ण होतील. म्हणूनच आज आपल्याला एक लक्ष्य निश्चित करायचे आहे की, राज्याला ज्यावेळी 75 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळी आपले सिक्कीम राज्य कसे असेल? तुम्हा सर्वांना आपले राज्य म्हणून - सिक्कीम कसे असावे, असे वाटते? यासंदर्भात आपल्याला एक पथदर्शक आराखडा बनवावा लागेल. यासाठी समोर 25 वर्षांचा दृष्टिकोन समोर ठेवला पाहिजे. त्याचबरोबर पावला-पावलावर आपण कशा पद्धतीने पुढे जायचे आहे, हेही सुनिश्चित करावे लागेल. त्यानंतर अधून-मधून सर्व कामाची, ध्येयाची समीक्षा करावी  लागेल. याबरोबरच आपण निश्चित केलेल्या लक्ष्यापासून नेमके किती दूर आहोत? लक्ष्य नियोजित वेळेत गाठण्यासाठी किती वेगाने काम करावे लागेल, याचा आढावा वरचेवर घ्यावा लागेल. नवीन उत्साह, नवीन ऊर्जा आणि सर्वांना बरोबर घेवून आपल्याला सिक्कीमच्या अर्थव्यवस्थेला गती दिली पाहिजे. आपण प्रयत्न केला पाहिजे की, आपले सिक्कीम आरोग्याच्या दृष्‍टीने एक निरामय राज्य या स्वरूपामध्ये सर्वांसमोर येईल. यामुळेही विशेषत्वाने आपल्या नवयुवकांना जास्त संधी मिळतील. आपल्याला सिक्कीमच्या युवकांना स्थानिक गरजांबरोबर जगाची मागणी लक्षात घेऊन त्या दृष्टीनेही  सज्ज  करायचे आहे. जगामध्ये ज्या क्षेत्रात युवकांना मागणी आहे, त्यांच्यासाठी इथे कौशल्य विकासाच्या नवीन संधी आपल्याला तयार कराव्या लागतील.

मित्रांनो,

चला तर मग, आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया! आगामी 25 वर्षांमध्ये सिक्कीमला विकास, वारसा आणि वैश्विक ओळख यांच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याचा संकल्प करूया. आपले स्वप्न आहे - सिक्कीम, केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण विश्वातले ‘हरितदृष्ट्या आदर्श राज्य‘बनावे. एक असे राज्य, जिथे प्रत्येक नागरिकाला  पक्के  घरकूल असेल, एक असे राज्य जिथे प्रत्येक घरामध्ये सौर उर्जेव्दारे  वीज असेल, एक असे राज्य जे कृषी स्टार्टअप्स, पर्यटन स्टार्टअप्समध्ये नवीन विक्रम स्थापित करणारे ठरेल. एक असे राज्य- सेंद्रीय अन्नधान्य निर्यातीच्या क्षेत्रात अवघ्या जगामध्ये आपली ओळख निर्माण करेल. एक असे राज्य, जिथे प्रत्येक नागरिक डिजिटल व्यवहार करणारा असेल , तसेच असे राज्य कच-यातून संपत्ती निर्मिती करण्यामध्येही विक्रम स्‍थापन करेल.  आगामी 25 वर्षे  अशी अनेक लक्ष्ये गाठण्याची आहेत.  सिक्कीमला वैश्विक व्यासपीठावर नवीन विक्रमी उंचीवर नेण्याची  आहेत. चला तर, आपण याच भावनेने सर्वजण मिळून, सर्वांना बरोबर घेवून एकत्रित पुढे जावू या आणि आपला वारसाही असाच पुढे घेवून जावूया ! पुन्हा एकदा, सर्व सिक्कीमवासियांना या महत्वपूर्ण 50 वर्षाच्या प्रवासाबद्दल, या महत्वाच्या प्रसंगी सर्व देशवासियांच्यावतीने, आणि माझ्यावतीने खूप -खूप शुभेच्छा देतो. खूप -खूप धन्यवाद!!

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
'2,500 Political Parties In India, I Repeat...': PM Modi’s Remark Stuns Ghana Lawmakers

Media Coverage

'2,500 Political Parties In India, I Repeat...': PM Modi’s Remark Stuns Ghana Lawmakers
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
List of Outcomes: Prime Minister's State Visit to Trinidad & Tobago
July 04, 2025

A) MoUs / Agreement signed:

i. MoU on Indian Pharmacopoeia
ii. Agreement on Indian Grant Assistance for Implementation of Quick Impact Projects (QIPs)
iii. Programme of Cultural Exchanges for the period 2025-2028
iv. MoU on Cooperation in Sports
v. MoU on Co-operation in Diplomatic Training
vi. MoU on the re-establishment of two ICCR Chairs of Hindi and Indian Studies at the University of West Indies (UWI), Trinidad and Tobago.

B) Announcements made by Hon’ble PM:

i. Extension of OCI card facility upto 6th generation of Indian Diaspora members in Trinidad and Tobago (T&T): Earlier, this facility was available upto 4th generation of Indian Diaspora members in T&T
ii. Gifting of 2000 laptops to school students in T&T
iii. Formal handing over of agro-processing machinery (USD 1 million) to NAMDEVCO
iv. Holding of Artificial Limb Fitment Camp (poster-launch) in T&T for 50 days for 800 people
v. Under ‘Heal in India’ program specialized medical treatment will be offered in India
vi. Gift of twenty (20) Hemodialysis Units and two (02) Sea ambulances to T&T to assist in the provision of healthcare
vii. Solarisation of the headquarters of T&T’s Ministry of Foreign and Caricom Affairs by providing rooftop photovoltaic solar panels
viii. Celebration of Geeta Mahotsav at Mahatma Gandhi Institute for Cultural Cooperation in Port of Spain, coinciding with the Geeta Mahotsav celebrations in India
ix. Training of Pandits of T&T and Caribbean region in India

C) Other Outcomes:

T&T announced that it is joining India’s global initiatives: the Coalition of Disaster Resilient Infrastructure (CDRI) and Global Biofuel Alliance (GBA).