शेअर करा
 
Comments
सुदृढ भारताच्या दिशेने सरकार चार सूत्री धोरणासह काम करत आहे: पंतप्रधान
भारताच्या आरोग्य क्षेत्राने दाखवलेले सामर्थ्य आणि लवचिकतेचे जगभरातून कौतुक : पंतप्रधान
भारताने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी कच्च्या मालाची आयात कमी करण्याच्या दिशेने काम केले पाहिजेः पंतप्रधान

नमस्कार!

हा कार्यक्रम आपल्याला थोडा विशेष वाटत असेल, यावेळी अर्थसंकल्पानंतर आम्ही निश्चित केले होते की, अंदाजपत्रकामध्ये ज्या काही नवीन गोष्टी करण्यात आल्या आहेत, त्यांच्याविषयी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचा अर्थसंकल्पामधल्या तरतुदींशी थेट संबंध आहे, त्यांच्याबरोबर विस्तारपूर्वक चर्चा करायची आणि एक एप्रिलपासून ज्यावेळी नवीन अंदाजपत्रक लागू होईल, त्या दिवसापासून सर्व योजनाही लागू करायच्या. सर्व योजनांचे काम वेगाने पुढे जावे आणि फेब्रुवारी तसेच मार्चमधल्या दिवसांचा भरपूर उपयोग करून योजनांच्या कामाची पूर्ण तयारी केली जावी.

आम्ही अंदाजपत्रक सादर करण्याची तारीख आधीच्या तुलनेत एक महिना अलिकडे आणली आहे. त्यामुळे आपल्या हातात दोन महिन्यांचा काळ आहे. त्याचा कमाल लाभ आपण कसा घेऊ शकतो हे पाहिले पाहिजे म्हणूनच त्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर चर्चा करण्यात येत आहे. कधी पायाभूत सुविधांविषयी सर्वांबरोबर चर्चा झाली, कधी संरक्षण क्षेत्राविषयी संबंधित लोकांबरोबर चर्चा झाली. आज मला आरोग्य क्षेत्रातल्या लोकांबरोबर बोलण्याची संधी मिळाली आहे.

यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी जेवढी तरतूद करण्यात आली आहे, ती अभूतपूर्व आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, याचे प्रतीक म्हणजे अंदाजपत्रकातल्या आरोग्य विषयक तरतुदी आहेत. गेल्या वर्षभराचा काळ म्हणजे एक प्रकारे देशासाठी, दुनियेसाठी, संपूर्ण मानवजतीसाठी आणि विशेष करून आरोग्य क्षेत्रासाठी एक प्रकारे अग्निपरीक्षेचा काळ होता.

आपण सर्वजण, देशाचे आरोग्य क्षेत्र, या अग्निपरीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत, याचा मला आनंद आहे. अनेकांचे प्राण वाचविण्यामध्ये आपल्याला यश मिळाले आहे. काही महिन्यांच्या आतच ज्या पद्धतीने देशाने जवळपास 2500 प्रयोगशाळांचे जाळे निर्माण केले, काही डझन चाचण्यांपासून ते आज आपण जवळपास 21 कोटी चाचण्यांच्या टप्प्यांपर्यंत पोहोचलो आहोत. हे सर्वकाही सरकार आणि खाजगी क्षेत्राने मिळून काम केल्यामुळेच शक्य झाले आहे.

 

मित्रांनो,

कोरोनाने आपल्याला धडा शिकवला आहे की, आपण फक्त आजच महामारीच्याविरोधात लढायचे नाही तर भविष्यामध्ये उद्भवणा-या अशा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशाला सज्ज करायचे आहे. म्हणूनच आरोग्य सुविधा या क्षेत्राला मजबूत करणेही तितकेच आवश्यक आहे. वैद्यकीय उपकरणांपासून ते औषधांपर्यंत, व्हँटिलेटर्सपासून ते लसीपर्यंत, वैज्ञानिक संशोधनापासून ते दक्षता घेण्यासाठी गरजेच्या पायाभूत सुविधांपर्यंत, डॉक्टर्सपासून साथीच्या आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत, सर्व गोष्टींकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे, यामुळे देशामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक आपत्ती आली तर त्या संकटाला आपण चांगल्या पद्धतीने तोंड देण्यास सज्ज असणार आहोत.

पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेच्या मागे मूळात हीच प्रेरणा आहे. या योजनेअंतर्गत संशोधनापासून ते चाचणी आणि औषधोपचारापर्यंत देशामध्येच एक आधुनिक परिसंस्था विकसित करण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना, प्रत्येक दृष्टीकोनातून आपल्या क्षमतांमध्ये वाढ करणारी आहे. 15 व्या वित्त आयोगाने यासंबंधीच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर आपल्या ज्या स्थानिक प्रशासन संस्था आहेत, त्यांना आरोग्य सेवांच्या व्यवस्थेसाठी 70 हजार कोटी रूपयांपेक्षाही जास्त निधी मिळणार आहे. म्हणजेच सरकारचा भर फक्त आरोग्य सुविधांमध्ये गुंतवणूक व्हावी, म्हणून नाही तर देशातल्या दुर्गम-अति दुर्गम प्रदेशांमध्येही आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा, असा आग्रह आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आरोग्य क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक आरोग्य सेवा देते असे नाही तर रोजगाराच्या संधीही निर्माण करीत असते.

 

मित्रांनो,

कोरोनाकाळामध्ये भारताच्या आरोग्य क्षेत्राने जी मजबुती दाखवली, आपण सर्वांनी जे अनुभव घेतले आणि आपल्या शक्तीचे जे प्रदर्शन केले, त्याची संपूर्ण जगाने अगदी बारकाईने नोंद घेतली आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये भारताच्या आरोग्य क्षेत्राची प्रतिष्ठा वाढली आहे आणि भारताच्या आरोग्य क्षेत्राविषयी भरवसा निर्माण झाला असून त्याचे महत्व एक नवीन स्तरावर पोहोचले आहे. आपल्याला हा विश्वास ध्यानात ठेवून आपल्या क्षेत्रामध्ये अधिक तयारी करायची आहे. आगामी काळामध्ये भारतीय डॉक्टरांना संपूर्ण विश्वामधून आणखी जास्त मागणी वाढणार आहे आणि याचे कारण म्हणजे हा विश्वास, भरवसा आहे. आगामी काळामध्ये भारतीय परिचारिका, भारतीय निमवैद्यकीय कर्मचारी यांना असलेली मागणी संपूर्ण दुनियेतून वाढणार आहे, ही गोष्ट तुम्ही सर्वांनी अगदी लिहून-नोंदवून ठेवावी. या काळामध्ये भारतीय औषधे आणि भारतीय लस यांनी एक नवीन विश्वास प्राप्त केला आहे. त्यांना असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठीही आपल्याला तयारी करायची आहे. आपल्या वैद्यकीय शिक्षण प्रणालीकडेही स्वाभाविक रूपाने लोकांचे लक्ष जाणार आहे, त्या शिक्षणावरही विश्वास वाढणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये जगातल्या इतर देशांमधूनही अनेक विद्यार्थी भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येण्याची शक्यता वाढली आहे. आणि आपल्याला यासाठीही प्रोत्साहन दिले पाहिजे.

कोरोनाकाळामध्ये आम्ही व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय सामुग्री बनविण्याचे कौशल्य हस्तगत केले आहे. या सामुग्रीला संपूर्ण जगामधून असलेली मागणी पूर्ण करण्यासाठीही भारताला वेगाने काम करावे लागणार आहे. जगाला ज्या ज्या आधुनिक वैद्यकीय सामुग्रीची आवश्यकता आहे, ती सर्व सामुग्री कमीतकमी, सर्वांना परवडणा-या दरामध्ये बनवता येईल, असे स्वप्न भारत पाहू शकेल का? भारत वैश्विक पुरवठादार बनू शकेल? भारताची सर्वांना परवडणारी व्यवस्था असेल, शाश्वत व्यवस्था असेल, भारत वापरकर्ता-स्नेही तंत्रज्ञान वापरेल. अशा सर्व गोष्टींचा विचार केला तर मला पक्की खात्री आहे की, संपूर्ण दुनियेची नजर भारताकडे लागणार आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये तर जरूर भारत सर्वांचे लक्ष वेधून घेईल.

मित्रांनो,

सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे एक विशिष्ट अंदाज असतो. मात्र ज्यावेळी आपण सर्वजण मिळून काम करू, त्याचवेळी तो अंदाज खरा ठरणार आहे.

 

मित्रांनो,

आरोग्य विषयाबाबत आमच्या सरकारचा दृष्टिकोन आणि आधीच्या सरकारांचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. या अर्थसंकल्पानंतर निर्माण झालेले प्रश्न आपणही सर्वजण जाणता. या अंदाजपत्रकामध्ये स्वच्छतेविषयी चर्चा आहे, पोषणाविषयी चर्चा आहे, आरोग्य कल्याणाविषयी आयुषचे आरोग्य नियोजन असेल. या सर्व गोष्टींविषयी एक सर्वंसमावेशी दृष्टिकोन निश्चित करून आम्ही पुढे जात आहोत. आधी आरोग्य क्षेत्राचा विचार करताना सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या विभागांचा, तुकड्या-तुकड्याने विचार केला जात होता. तुकड्यांचा विचार करूनच या विषयाची हाताळणी केली जात होती.

आमच्या सरकारने आरोग्य विषयाला तुकड्यांऐवजी सर्वंकष पद्धतीने, एकत्रित- एकात्मिक दृष्टिकोनातून पाहिले आणि त्याप्रमाणे लक्ष केंद्रीत करून काम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी आम्ही देशामध्ये फक्त औषधोपचारच नाही तर ‘वेलनेस’ म्हणजे कल्याणकारी योजनांवर लक्ष्य केंद्रीत करण्यास प्रारंभ केला आहे. आम्ही प्रतिबंधात्मक उपाय योजनांपासून ते रूग्ण बरा होईपर्यंत सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवला आहे. भारताला आरोग्यदायी ठेवण्यासाठी आम्ही एकाचवेळी चार आघाड्यांवर एकत्रितपणे काम करीत आहोत.

पहिली आघाडी आहे, आजारांना रोखणे! म्हणजे आजार होऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणे. आणि त्याचबरोबर आरोग्य कल्याणाला प्रोत्साहन देणे. स्वच्छ भारत अभियान असेल, योग या विषयावर लक्ष केंद्रीत असेल, पोषणाविषयी गर्भवती आणि लहान मुलांची योग्य काळात काळजी घेणे आणि त्यांच्यावर औषधोपचार करणे असो, शुद्ध पेयजल पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न असो, अशा प्रत्येक उपाय योजना पहिल्या आघाडीमध्ये केल्या जात आहेत.

दुसरी आघाडी, गरीबातल्या गरीबाला स्वस्त आणि प्रभावी औषधोपचार देण्याची आहे. आयुष्मान भारत योजना आणि प्रधानमंत्री जनौषधी केंद्र यासारख्या योजना यामध्ये कार्यरत आहेत.

तिसरी आघाडी आहे, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य दक्षता व्यावसायिकांमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करणे. गेल्या सहा वर्षांमध्ये एम्स आणि याच स्तरावरच्या इतर संस्थांचा विस्तार देशातल्या दुर्गम-अतिदुर्गम राज्यांपर्यंत करण्यात येत आहे. देशामध्ये जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करण्यामागे हाच विचार आहे.

चौथी आघाडी आहे, समस्यांना पार करण्यासाठी मिशन मोडवर, लक्ष्य केंद्रीत करून आणि निश्चित कालावधीमध्ये आपल्याला काम करायचे आहे. मिशन इंद्रधनुषचा विस्तार देशातल्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागापर्यंत करण्यात आला आहे.

देशामधून क्षयरोगाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी जो लढा सुरू केला आहे, त्यासाठी संपूर्ण विश्वाने 2030 चे लक्ष्य निश्चित केले आहे. मात्र भारताने हे काम 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. भारतातून क्षयरोग निर्मूलनासाठी जी मोहीम सुरू केली आहे, त्याविषयी मला सांगायचे आहे की, क्षयरोग हा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या मुखातून, नाकांतून जे बारीक-बारीक तुषार बाहेर पडतात, त्यांच्यामुळे हा आजार पसरतो. क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठीही मास्क लावणे, वेळीच निदान करणे या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत.

अशातच कोरोना काळामध्ये आपल्याला जो अनुभव आला आहे, तो अनुभव एक प्रकारे हिंदुस्तानच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत आता पोहोचला आहे. आता आपल्याला झालेल्या सरावामुळे आपण क्षयरोग हद्दपारीसाठी त्या दृष्टीने काम करू शकतो. क्षयरोगाच्या विरोधात आपल्याला जो लढा द्यायचा आहे, तो आता आपण सहजतेने देऊ शकतो आणि जिंकूही शकतो. आणि म्हणूनच कोरोना काळाचा अनुभव, कोरोनामुळे जन-सामान्यांमध्ये निर्माण झालेली जागृती उपयोगी ठरणार आहे. आजारापासून बचाव करण्यासाठी भारतातल्या सामान्य नागरिकांनी जे योगदान दिले आहे, त्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर असे वाटते की, या मॉडेलमध्येच आवश्यक सुधारणा करून, काही त्यामध्ये नवीन भर घालून आपण जर क्षयरोग निर्मूलनासाठी वापरले तर 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनविण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते.

त्याचप्रमाणे तुम्हाला आठवत असेल, आपल्याकडे विशेषतः उत्‍तर प्रदेशमध्ये गोरखपुर वगैरे जो भाग आहे ज्याला पूर्वांचल असेही म्हणतात , त्या पूर्वांचलमध्ये मेंदूज्वरामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येने मुलांचे दुःखद मृत्यू झाले होते. संसदेत देखील त्यावर चर्चा झाली होती. एकदा तर या विषयावर चर्चा करताना आपले उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्‍यमंत्री योगीजी त्या मुलांची स्थिती पाहून खूप रडले होते. मात्र जेव्हापासून ते तिथले मुख्‍यमंत्री बनले आहेत , त्यांनी एक प्रकारे केंद्रित कार्य केले आहे. पूर्ण जोमाने काम केले आहे. आज आपल्याला अतिशय आशादायी परिणाम मिळत आहेत. आम्ही मेंदूज्वरचा प्रसार रोखण्यावर भर दिला, उपचार सुविधा वाढवल्या, त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत.

 

मित्रहो,

कोरोना काळात आयुषसंबंधित आपल्या नेटवर्कने देखील खूप उत्तम काम केले आहे. केवळ मनुष्य संसाधनांच्या बाबतीतच नाही तर प्रतिकार शक्ती आणि वैज्ञानिक संशोधनाच्या बाबतीतही आपल्या आयुषच्या पायाभूत सुविधा देशासाठी उपयुक्त ठरल्या.

भारताची औषधे आणि लसींबरोबरच आपले मसाले, आपले काढे यांचेही किती मोठे योगदान आहे याचा आज जगाला अनुभव येत आहे. आपल्या पारंपरिक औषधांनी जागतिक मनावर आपले एक स्थान निर्माण केले आहे. जे पारंपरिक औषधांशी निगडित लोक आहेत, जे त्यांच्या उत्पादनाशी जोडलेले लोक आहेत , जे आयुर्वेदिक परंपरांशी परिचित लोक आहेत अशा लोकांचा भर देखील जागतिक असायला हवा.

जग ज्याप्रकारे योगाभ्यासाला सहजपणे स्वीकारत आहे, तसेच जग आता सर्वंकष आरोग्यसेवेकडे वळले आहे. दुष्परिणांपासून मुक्‍त आरोग्यसेवेकडे जगाचे लक्ष गेले आहे. त्यात भारताची पारंपरिक औषधे खूप उपयोगी ठरतील. भारताची जी पारंपरिक औषधे आहेत ती मुख्‍यत्वे वनौषधी आधारित आहेत आणि त्यामुळे जगात त्याचे आकर्षण खूप वेगाने वाढू शकते. त्यातून इजा होण्याच्या बाबतीत लोक निश्चिन्त असतात कारण त्यात अपाय होईल असे काही नाही. त्याकडेही आपण लक्ष केंद्रित करू शकतो का ? आपल्या आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीतून आणि या क्षेत्रात काम करणारे लोक मिळून काही करू शकतात का ?

कोरोना काळात आपल्या पारंपरिक औषधांची ताकद पाहिल्यानंतर आपल्यासाठी आनंदाचा विषय आहे आणि आयुर्वेदमध्ये पारंपरिक औषधांवर विश्वास ठेवणारे सर्व तसेच वैद्यकीय व्यवसायाशी निगडित लोकांसाठी अभिमानाची बाब आहे की जागतिक आरोग्य केंद्र - WHO, भारतात आपले पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र सुरु करणार आहे. त्यांनी याची घोषणा देखील केली आहे. भारत सरकार त्याची प्रक्रिया देखील पार पाडत आहे. हा जो मान-सम्‍मान मिळाला आहे , तो जगभरात पोहचवणे आपली जबाबदारी आहे.

 

मित्रहो,

सुगम्यता आणि किफायतशीर यांना आता पुढील स्तरावर नेण्याची वेळ आली आहे . म्हणूनच आता आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जात आहे. डिजिटल आरोग्य अभियान देशातील सामान्य नागरिकांना वेळेवर , सोयीनुसार प्रभावी उपचार पुरवण्यात खूप मदत करेल.

 

मित्रहो,

मागील वर्षांचा आणखी एक दृष्टिकोन बदलण्याचे काम वेगाने करण्यात आले आहे. हा बदल आत्मनिर्भर भारतासाठी खूप आवश्यक आहे . आज आपण जगाची फार्मसी बनल्याचा अभिमान बाळगतो आजही अनेक गोष्टींसाठी जो कच्चा माल आहे , त्यासाठी आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत.

औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या कच्च्या मालासाठी देशाचे अन्य देशांवर अवलंबत्व , अन्य देशांवर गुजराण करणे आपल्या उद्योगांसाठी किती वाईट अनुभव आहे हे आपण पाहिले आहे. हे योग्य नाही. म्हणूनच गरीबांना स्वस्त औषधे आणि उपकरण देण्यात यामुळे मोठी अडचण निर्माण होते . आपल्याला यावर मार्ग शोधावाच लागेल. आपल्याला या क्षेत्रात भारताला आत्‍मनिर्भर बनवावेच लागेल. यासाठी चार विशेष योजना सध्या सुरु केल्या आहेत. अर्थसंकल्पातही त्याचा उल्‍लेख आहे , तुम्हीही अभ्यास केला असेल.

या अंतर्गत देशातच औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे औषधे आणि वैद्यकीय उपकरणे बनवण्यासाठी मेगा पार्क्स उभारण्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

मित्रहो,

देशाला केवळ शेवटच्या ठिकाणापर्यंत आरोग्य सुविधा पुरवायच्या नाहीत तर भारताच्या कानाकोपऱ्यात , दुर्गम भागात .. जसे आपल्याकडे निवडणुका असतात तेव्हा बातमी येते कि एक मतदार होता तरीही तिथे मतदान केंद्र उभारण्यात आले, मला वाटते की आरोग्य क्षेत्रातही आणि शिक्षण क्षेत्रातही याची अंमलबजावणी व्हावी. जिथे एक नागरिक असेल, तिथेही आपण पोहचू. हा आपला स्वभाव असायला हवा आणि आपल्याला यावर भर द्यायचा आहे . त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणूनच सर्वच क्षेत्रांमध्ये आरोग्य सुगम्यतेवर आपल्याला भर द्यायचा आहे . देशाला निरोगी केंद्र हवी आहेत, देशाला जिल्हा रुग्णालये हवी आहेत, देशाला गंभीर आजारांसाठी उपचार केंद्र हवी आहेत, आरोग्य देखरेखीसाठी पायाभूत सुविधा, आधुनिक प्रयोगशाळा आणि टेलिमेडिसिन हवे आहे. आपल्याला प्रत्येक स्तरावर काम करायचे आहे , प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन द्यायचे आहे.

आपल्याला हे सुनिश्चित करायचे आहे कि देशातील लोक, मग ते गरीब असतील, दुर्गम भागात राहणारे असले तरीही त्यांना उत्तम उपचार मिळावेत आणि वेळेवर मिळावेत . आणि यासाठी केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारे आणि देशातील स्थानिक संस्था , खासगी क्षेत्र यांनी एकत्र येऊन काम केले तर उत्तम परिणाम देखील मिळतील.

खासगी क्षेत्र पीएमजेएवाय मध्ये भागीदारीसह सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांचे जाळे तयार करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलना मदत करू शकेल . राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, नागरिकांच्या डिजिटल आरोग्य नोंदी आणि इतर अद्ययावत तंत्रज्ञानामध्येही भागीदारी करता येईल.

मला विश्वास आहे की आपण सर्वजण मिळून एक मजबूत भागीदारीचे मार्ग शोधू शकू, निरोगी आणि समर्थ भारतासाठी आत्मनिर्भर उपाय शोधू शकू. माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की आपण जी हितधारकांसोबत , या विषयांचे जे ज्ञाता लोक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत आहोत ...अर्थसंकल्प जो यायचा होता तो आला. तुमच्या अनेक अपेक्षा असतील , त्या कदाचित यात नसतील. मात्र त्यासाठी हा काही शेवटचा अर्थसंकल्प नाही ...पुढील अर्थसंकल्पात बघू. आज जो अर्थसंकल्प सादर झाला आहे त्याची आपण सर्व मिळून जलद गतीने जास्तीत जास्त कशी अंमलबजावणी करायची, व्‍यवस्‍था कशा विकसित करायच्या, सामान्‍य माणसापर्यंत आपण वेगाने कसे पोहचू. माझी इच्छा आहे की तुमचे अनुभव, तुमचे मुद्दे सांगा. आम्ही संसदेत तर चर्चा करत असतो. प्रथमच अर्थसंकल्पावरची चर्चा संबंधित लोकांशी आम्ही करत आहोत. अर्थसंकल्पपूर्व चर्चा करतो, तेव्हा सूचना मागवल्या जातात ...अर्थसंकल्पानंतर चर्चा करतो तेव्हा उपायांवर चर्चा होते.

आणि म्हणूनच आपण सर्वजण मिळून उपाय शोधू , आपण सर्वजण मिळून जलद गतीने पुढे जाऊ आणि आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ. सरकार आणि तुम्ही वेगळे नाही. सरकार देखील तुमचेच आहे आणि तुम्ही देखील देशासाठीच आहात. आपण सर्वजण मिळून देशातील गरीब व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून आरोग्य क्षेत्राचे उज्‍ज्‍वल भविष्‍य, तंदुरूस्‍त भारतासाठी आपण पुढे वाटचाल करू. तुम्ही सर्वानी वेळ काढलात. तुमचे मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरेल. तुमची सक्रिय भागीदारी खूप उपयुक्त ठरेल.

मी पुन्हा एकदा ...तुम्ही वेळ काढलात यासाठी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या मौल्यवान सूचना आम्हाला पुढे जाण्यासाठी खूप उपयोगी ठरतील. तुम्ही सूचनाही द्या, भागीदारही व्हा. तुम्ही अपेक्षा देखील कराल , जबाबदारीही घ्याल . याच विश्वासासह ...

 

खूप-खूप धन्यवाद !

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
'Foreign investment in India at historic high, streak to continue': Piyush Goyal

Media Coverage

'Foreign investment in India at historic high, streak to continue': Piyush Goyal
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 जुलै 2021
July 25, 2021
शेअर करा
 
Comments

PM Narendra Modi’s Mann Ki Baat strikes a chord with the nation

India is on the move and growing everyday under the leadership of Modi Govt