सोमनाथ... हा शब्द उच्चारताच आपल्या मनात आणि हृदयात अभिमानाची भावना जागृत होते. हे भारताच्या आत्म्याचे शाश्वत प्रकटीकरण आहे. हे भव्य मंदिर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरात राज्यातील 'प्रभास पाटण' येथे स्थित आहे. 'द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रा'मध्ये भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. या स्तोत्राची सुरुवातच “सौराष्ट्रे सोमनाथं च..” ने होते, जे पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या रूपात सोमनाथचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते.

असेही म्हटले जाते की:
सोमलिङ्गं नरो दृष्ट्वा सर्वपापैः प्रमुच्यते।
लभते फलं मनोवाञ्छितं मृतः स्वर्गं समाश्रयेत्॥

याचा अर्थ हा आहे की: केवळ सोमनाथ शिवलिंगाच्या दर्शनाने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो, त्याला मनोवांछित फळ प्राप्त होते आणि मृत्यूनंतर तो स्वर्गात स्थान मिळवतो.

दुर्दैवाने, ज्या सोमनाथावर कोट्यवधी लोकांची श्रद्धा होती आणि ज्याची ते प्रार्थना करत असत, त्याच मंदिरावर परकीय आक्रमकांनी हल्ले केले; ज्यांचा हेतू भक्ती नसून विध्वंस हाच होता.

सोमनाथ मंदिरासाठी 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. या महान तीर्थक्षेत्रावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला आता 1,000 वर्षे पूर्ण होत आहेत. जानेवारी 1026 मध्येच महमूद गझनवीने या मंदिरावर हल्ला केला होता. एका हिंसक आणि रानटी आक्रमणाद्वारे श्रद्धा आणि नागरी संस्कृतीचे हे महान प्रतीक नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न होता.

तरीही, एक हजार वर्षांनंतरही हे मंदिर आजही तितक्याच वैभवात उभे आहे, कारण सोमनाथच्या वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले गेले. अशाच एका महत्त्वपूर्ण टप्प्याला 2026 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 11 मे 1951 रोजी या जीर्णोद्धार झालेल्या मंदिराचे दरवाजे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीत एका सोहळ्याद्वारे भक्तांसाठी उघडण्यात आली होती.

एक हजार वर्षांपूर्वी 1026 मध्ये सोमनाथवर झालेले पहिले आक्रमण, त्यावेळच्या नगरवासीयांवर ओढवलेल्या क्रौर्याचे आणि मंदिराची झालेली प्रचंड नासधूस यांचे वर्णन विविध ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सविस्तरपणे आले आहे. जेव्हा आपण ते वाचतो, तेव्हा हृदय हेलावून जाते. प्रत्येक ओळ दुःख, क्रौर्य आणि काळाच्या ओघातही न पुसल्या जाणाऱ्या वेदनांनी भरलेली आहे.

याचा भारतावर आणि लोकांच्या मनोबलावर काय परिणाम झाला असेल, याची कल्पना करा. शेवटी, सोमनाथला मोठे आध्यात्मिक महत्त्व होते. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या समाजाला ते बळ देत असे, ज्यांचे समुद्रमार्गाने व्यापार करणारे व्यापारी आणि दर्यावर्दी या मंदिराच्या वैभवाच्या गाथा दूरदूरपर्यंत कथन करत असत.

तरीही, मी आज पूर्ण अभिमानाने आणि निःसंदिग्धपणे हे सांगू इच्छितो की, सोमनाथवर पहिल्यांदा झालेल्या आक्रमणाला एक हजार वर्षे उलटून गेल्यानंतरही आजचा इतिहास त्या विनाशासाठी ओळखला जात नाही, तर हा इतिहास भारतमातेच्या कोट्यवधी पुत्रांच्या अभेद्य साहसासाठी आणि धैर्यासाठी ओळखला जातो.

सुमारे एक हजार वर्षांपूर्वी, 1026 मध्ये मध्ययुगीन काळात पाशवी वृत्तीचा उदय झाल्यापासून, त्यांनी इतरांना सोमनाथवर वारंवार आक्रमणे 'प्रेरित' केले होते. एका अर्थाने ती आपल्या संस्कृतीला आणि लोकांना गुलाम बनवण्याच्या प्रयत्नांची सुरुवातच होती. मात्र, ज्या ज्या वेळी या मंदिरावर हल्ले झाले, त्या त्या वेळी त्याचे रक्षण करण्यासाठी महान स्त्री-पुरुष उभे ठाकले आणि प्रसंगी त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही दिले. पिढ्यानपिढ्या आपल्या महान संस्कृतीतील लोकांनी स्वतःला सावरले आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्बांधणी करून त्याचा जीर्णोद्धारही केला. ज्या भूमीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वांना घडवले, त्याच भूमीत जन्म घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. भाविकांना सोमनाथमध्ये पुन्हा प्रार्थना करता यावी, यासाठी अहिल्याबाई यांनीच अतिशय उदात्त भावनेने प्रयत्न केले होते.

1890 च्या दशकात स्वामी विवेकानंद यांनी सोमनाथला भेट दिली होती, या भेटीतील अनुभवाने त्यांना अंतर्मूख केले होते. 1897 मध्ये ते जेव्हा चेन्नईत एका व्याख्यानासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी या भेटीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. दक्षिण भारतातील काही प्राचीन मंदिरे आणि गुजरातचे सोमनाथ मंदिर आपल्याला शहाणपणाची अगाध शिकवण देतील. कोणत्याही पुस्तकांपेक्षा ही मंदिरे आपल्याला आपल्या इतिहासाची अधिक सखोलपणे जाणीव करून देतील. या मंदिरांवर झालेल्या शेकडो आक्रमणांच्या खुणा आणि त्यानंतर झालेले शेकडो पुनरुज्जीवन काळजीपूर्वक अनुभवा. ही मंदिरे सातत्याने उद्ध्वस्त केली गेली, तरीही प्रत्येक वेळी आपल्या अवशेषांमधून ती फिनिक्स पक्षाप्रमाणे ताकदीने पुन्हा उभी राहिली! हीच आपली राष्ट्रीय मानसिकता आहे, हाच आपला राष्ट्रीय जीवनप्रवाह आहे. याचे अनुकरण करा, हाच मार्ग तुम्हाला वैभवाकडे नेईल. जर तुम्ही हा मार्ग सोडलात तर तुमचा विनाश निश्चित आहे, ज्या क्षणी तुम्ही या जीवनप्रवाहातून बाहेर पडाल, त्या क्षणी तुमच्या पदरी केवळ मृत्यू आणि सर्वनाशाच असेल, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या.
स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचे पवित्र कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या सक्षम व्यक्तिमत्वाच्या हाती आले. 1947 मध्ये दिवाळी सणाच्या काळात सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथला भेट दिली होती, त्यावेळी ते तेथील परिस्थिती पाहून इतके हेलावले की, त्यांनी तिथल्या तिथेच मंदिराच्या पुनर्बांधणीची घोषणा केली. अखेर, 11 मे 1951 रोजी सोमनाथमधील भव्य मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले गेले आणि त्या ऐतिहासिक प्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद स्वतः उपस्थितही होते. दुर्दैवाने हा ऐतिहासिक दिवस पाहण्यासाठी महान सरदार वल्लभभाई पटेल साहेब हयात नव्हते, परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, आणि आज ते एका भव्य मंदिराच्या रूपात खंबीरपणे संपूर्ण देशासमोर आहे.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना या घडामोडीबद्दल फारशी आस्था नव्हती. माननीय राष्ट्रपती किंवा कोणत्याही मंत्र्यांनी या विशेष समारंभात सहभागी होऊ नये असे त्यांना वाटत होते. या समारंभामुळे भारताबद्दलचे मत वाईट होते आहे असे ते म्हणाले. परंतु डॉ. राजेंद्र प्रसाद आपल्या मतावर ठाम राहिले आणि पुढे जे झाले तो इतिहास सर्वज्ञात आहे. सरदार पटेलांना भरघोस पाठिंबा देणाऱ्या कन्हय्यालाल मुन्शी यांचा उल्लेख केल्याशिवाय सोमनाथ मंदिराचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी सोमनाथ मंदिराबद्दल लिहिलेले पुस्तक ‘सोमनाथ - द श्राइन इटर्नल' हे अतिशय माहितीपूर्ण लेखन आहे.

मुंशीजींच्या पुस्तकाचे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. आपल्या संस्कृतीत आत्म्याचे आणि चिरंतन विचारांचे अमरत्व मान्य केले आहे. जे चिरंतन आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही अशी आपली ठाम मान्यता आहे. गीतेत म्हटलेच आहे, “नैनं छिन्दन्ति शस्त्राणि…”. सोमनाथ मंदिर काळाशी व अनेक संकटांशी झुंज देऊन आज तेजस्वीपणे तळपत उभे आहे. आपल्या संस्कृतीच्या अविनाशी आत्म्याचे, चैतन्याचे सोमनाथ मंदिराहून समर्पक दुसरे कोणते उदाहरण असू शकते?

आपला देश शतकानुशतकांच्या आक्रमणांवर, वसाहतवादी लुटालुटीमधून आलेल्या दैन्यावर मात करून आज जगभरात प्रगतीचे प्रतीक मानला जात आहे, आणि त्याच्या मुळाशी हेच चैतन्य आहे. आपली जीवनमूल्ये आणि जनतेचा दृढनिश्चय यामुळेच भारत आज सर्व जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सर्व जग भारताकडे आशा आणि आकांक्षेने पाहत आहे. आपल्या नवोन्मेषशाली तरुणाईमध्ये त्यांना उद्याची आशा दिसते आहे. आपली कला, संस्कृती, संगीत व वैविध्यपूर्ण सण जगभरात लोकप्रिय होत आहेत. निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेल्या योग आणि आयुर्वेदाचा प्रभाव सर्व जगात वाढत आहे. जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे उपाय भारताकडून मिळत आहेत.

अनादिकाळापासून सोमनाथाने विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणले आहे. शतकांपूर्वी, आदरणीय जैन भिक्षु कलिकाल सर्वज्ञ हेमचंद्राचार्य हे सोमनाथ येथे आले होते. असे सांगितले जाते की तेथे प्रार्थना केल्यानंतर त्यांनी पुढील श्लोकाचे पठण केले —“भवबीजाङ्कुरजनना रागाद्याः क्षयमुपगता यस्य ।”. याचा अर्थ असा की परमात्म्याला नमस्कार, ज्याच्यामध्ये सांसारिक अस्तित्वाची बीजे लोप पावली आहेत, ज्याच्यामध्ये वासना आणि सर्व दुःखाचे मूळ नष्ट झाले आहे. आजही, सोमनाथला मन आणि आत्मा यांच्या आत गहन जागृती करण्याची क्षमता आहे.

1026 मधील पहिल्या आक्रमणानंतर हजारो वर्षांनंतरही, सोमनाथच्या समुद्राची गाज आजही तशीच आहे, जशी ती तेव्हा होती. आजही सोमनाथच्या किनाऱ्याला धडकणाऱ्या लाटा एक कथा सांगतात. काहीही होवो, त्या लाटांप्रमाणे पुन्हा पुन्हा त्याचे तरंग उठतात.

विनाश या शब्दांना समानार्थी असणारे गतकाळातील आक्रमणकर्ते आता हवेत विरून गेले आहेत. इतिहासाच्या पानांवरील तळटीपांप्रमाणे ते उरले आहेत, दुसरीकडे सोमनाथ तळपत क्षितिजापार आपले तेज पसरवत, आपल्याला 1026 मध्ये झालेल्या आक्रमणानेही क्षीण न झालेल्या शाश्वत आत्म्याचे स्मरण करून देतो आहे. सोमनाथ एक आशेचे गाणे आहे, जे आपल्याला सांगते की एका क्षणासाठी विनाश करण्याचे सामर्थ्य द्वेष आणि कट्टरतेमध्ये असेल मात्र चांगुलपणावरील श्रद्धा आणि दृढ विश्वास यांच्या सामर्थ्यामध्ये अनंतकाळासाठी निर्मिती क्षमता आहे.

हजारो वर्षांपुर्वी सोमनाथ मंदिरावर आक्रमण झाले आणि सातत्याने हल्ले होऊनही सोमनाथ मंदिर पुन्हा उभे राहू शकत असेल तर आपणही आपल्या महान राष्ट्राला आक्रमणांपुर्वी असलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या वैभवापर्यंत निश्चितच पुन्हा पोहोचवू शकतो. श्री सोमनाथ महादेवांच्या आशीर्वादाने, एक विकसित भारत घडवण्याच्या नव्या संकल्पाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, जिथे आपले सांस्कृतिक शहाणीव संपूर्ण जगाच्या कल्याण्यासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन मिळेल.

जय सोमनाथ!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Smartphone PLI plan exceeds targets, value addition quadruples': Industry informs govt

Media Coverage

'Smartphone PLI plan exceeds targets, value addition quadruples': Industry informs govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताच्या एकात्मतेसाठी आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन
July 06, 2026

आज सहा जुलै, राष्ट्रवाद आणि निस्वार्थ सेवेचा आदर्श मानणाऱ्या, त्यांची जपणूक करणाऱ्या सर्व लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती आहे. भारत मातेच्या सेवेप्रती कटिबद्धता आणि धैर्य यांचे ते कालातीत मूर्तिमंत उदाहरण आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात, असे अगदी कमी लोक आहेत, ज्यांच्यात बुद्धीमत्ता, सार्वजनिक सेवाभाव आणि नैतिक दृढनिश्चय यांचा संगम आढळतो, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्यापैकीच एक आहेत.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म अशा परिस्थितीत झाला होता, जिथे, त्यांना सहज एक आरामदायी आणि सुरक्षित आयुष्य मिळू शकले असते. त्यांचे पिता, सर आशुतोष मुखर्जी, त्या काळातील एक आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर बुद्धिवादी होते. नियतीने त्यांना, एक अत्यंत उच्चभ्रू, सुखासीन आयुष्य दिले असले, तरी त्यांच्यातील विवेकाने, त्यांना देशसेवा आणि त्यागाचा मार्ग दाखवला. त्या काळातील अत्यंत अस्थिर परिस्थितीत आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असा कौल त्यांच्या मनाने त्यांना दिला. मग ती वसाहतवादी शक्तींशी लढाई असो, जातीवाद, धर्मभेद किंवा मग मानवतेसमोरची आव्हाने असोत, अथवा इतर काही. त्यांच्या या प्रवासात त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे, दु:खाचा सामना करावा लागला, यात अगदी त्यांचं बाळ आणि नंतर त्यांच्या पत्नीचे झालेले देहावसान, अशा अपार दु:खाच्या प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागला. मात्र अशा सगळ्या दु:खांनी, त्यांचा दृढनिश्चय अधिक वाढवला आणि देशाची सेवा करण्याची कटिबद्धता अधिक दृढ केली.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या सार्वजनिक जीवनातील एक आदर्श, जो या सगळ्या गुणांच्या वर होता, असे सांगायचे झाले, तर तो आदर्श गुण ठरेल, अखंड भारताप्रती त्यांची निष्ठा! फाळणीच्या गदारोळात, हिंसाचारातही, पश्चिम बंगाल हा भारताचा अविभाज्य घटक राहील, यासाठी ते पाय घट्ट रोवून उभे राहिले. काही वर्षांनी, त्यांच्या याच अखंडतेच्या ध्यासाने, ते जम्मू आणि काश्मीरला गेले. तिथे झालेला तुरुंगवास ही त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करु शकला नाही. मात्र, याच तुरुंगवासात त्यांचा अकाली मृत्यू झाला. तुरुंगावासात, अशा ठिकाणी..एकटेपणात.. ज्या लाखो लोकांचं आयुष्य त्यांनी स्वतःचे आयुष्य बनवले होते, अशा सगळ्या मोलाच्या माणसांपसून दूर. इतिहासात असे काही क्षण येतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सर्वोच्च बलिदानामुळे ती व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे जाते आणि त्यांचे कर्तव्य, एका राष्ट्रीय स्मृती ठरतात. आचार्य विनोबा भावे एकदा असे म्हणाले होते की, ज्या तत्वावर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा दृढविश्वास होता, त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःचे बलिदान दिले. या घटनेनंतर अनेक वर्षांनी, कलम 370 आणि अनुच्छेद 35 (अ) हटवणे (2019 चा कायदा), ही त्यांच्या बलिदानाला दिलेली सर्वोच्च मानवंदना होती.

डॉ. मुखर्जी यांनी, कायमच भारताला आणि भारतीय मूल्यांना प्रथमस्थानी ठेवले. त्यासाठी त्यांनी त्या काळातील प्रचलित विचारसरणींना छेद देणाऱ्या संस्था उभारून आणि सक्षम व्यवस्था घडवून हे सिद्ध केले. ते कलकत्ता विद्यापीठाचे सर्वांत तरुण कुलगुरू बनले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीद्वारे त्यांनी देशभक्तीची प्रेरणा देणारे आणि भविष्याची दृष्टी असलेले सकारात्मक बदल घडवून आणले. शिक्षणतज्ज्ञांच्या एका परिषदेला संबोधित करताना डॉ. मुखर्जी यांनी अतिशय समर्पक शब्दांत म्हटले होते की, शैक्षणिक संस्थांकडे संभाव्य कारकून आणि अल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी तयार करणारे कारखाने म्हणून पाहणे चुकीचे आहे. नगरपालिका, प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळे यांसारख्या आपल्या स्वशासित संस्थांना नेतृत्व देण्यास सक्षम असलेले, तसेच वित्तीय, व्यापारी आणि औद्योगिक अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांतील कामकाजाचे संचालन करू शकणारे विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता विद्यापीठाने ग्रंथालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, विज्ञान विषयातील संशोधनाला चालना देणे, पुरावस्तूंच्या अध्ययनाला प्रोत्साहन देणे तसेच कृषी विषयातील अभ्यासक्रम सुरू करणे, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. त्यांनी क्रीडा, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी कल्याण यांसारख्या क्षेत्रांकडेही विशेष लक्ष वेधले. विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी 24 जानेवारी हा दिवस विद्यापीठाचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. विद्यापीठासाठी गीत रचण्याची विनंती त्यांनी थेट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनाच केली होती.

त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, त्यातूनही हीच भावना दिसून येते. त्या काळात काँग्रेस पक्षाचे सगळीकडे वर्चस्व असताना, भारताच्या प्रगतीसाठी आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहून पर्यायी आवाज उभा राहणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांना वाटत होते. कदाचित म्हणूनच त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मातीचा दिवा होते. एक दिवा दिसायला साधा वाटू शकतो; मात्र स्वतःच्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक अंधार दूर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. जनसंघाने आपल्या कार्यरत असलेल्या काळात आणि त्यानंतरही नेमके हेच कार्य केले.

भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा कार्यकाळ हा विकासाविषयी अत्यंत व्यापक आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या एका नेत्याचे दर्शन घडवतो. नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राचा सन्मान, संधी आणि आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याचे साधन म्हणून त्यांनी उद्योगांकडे पाहिले. संपत्तीची निर्मिती आणि मूल्यवर्धन यांचा त्यांनी आदर केला. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, सिंद्री खत प्रकल्प आणि भक्कम औद्योगिक धोरण यांसारख्या अग्रणी उपक्रमांद्वारे आधुनिक औद्योगिक भारताचा पाया रचत असतानाच, भारताच्या पारंपरिक सामर्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही त्यांनी खात्री केली. हातमाग, कुटीर उद्योग, कारागीर आणि वस्त्रोद्योगातील कामगार यांनाही त्यांच्यामध्ये तितकाच कटिबद्ध पुरस्कर्ता लाभला.

याठिकाणी मला एक वैयक्तिक अनुभव सांगायचा आहे. आत्मनिर्भरतेच्या स्पष्ट दृष्टिकोनातून डॉ. मुखर्जी यांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या सिंद्री खत प्रकल्पाकडे अनेक दशके देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मला याचा अभिमान वाटतो की, आमच्या सरकारला या परंपरेच्या पुनरुज्जीवनात योगदान देण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात उपस्थित राहणे हा खरोखरच सर्वात विशेष क्षणांपैकी एक होता.

भारताच्या सांस्कृतिक परंपरेने फार पूर्वीपासून संवाद आणि चर्चांना महत्त्व दिले आहे. डॉ. मुखर्जी यांनी याच लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व केले होते. सुरुवातीच्या काळात राष्ट्र उभारणीचे कार्य राजकीय मतभेदांच्या पलीकडचे आहे, असा विश्वास बाळगून ते पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात सामील झाले. त्यांनी प्रामाणिकपणे आणि विधायक भावनेने काम केले; परंतु जेव्हा त्यांना वाटले की राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांसाठी वेगळ्या मार्गाची आवश्यकता आहे, तेव्हा त्यांनी सन्मानाने पदाचा त्याग केला आणि राष्ट्राला आवश्यक असलेल्या राजकीय कार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.

75 वर्षांपूर्वी, पंडित नेहरूंनी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणारे होते. डॉ. मुखर्जी हे त्याच्या सर्वात कट्टर विरोधकांपैकी एक होते. काँग्रेस काय करू शकते, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आणि पुढील घडामोडींनी त्यांची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध केले. ज्यांनी 75 वर्षांपूर्वी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, त्यांनीच 1975 मध्ये आणीबाणी लादली आणि त्यानंतर 50 वर्षांपूर्वी 42वी घटनादुरुस्ती करून उदारमतवादी लोकशाही मूल्यांच्या मुळावरच घाव घातला.

डॉ. मुखर्जी त्यांचा मानवतावादी कार्यासाठीही ओळखले जातात. 1943 मध्ये जेव्हा बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला, तेव्हा डॉ. मुखर्जींनी स्वतःला पीडितांच्या सेवेत झोकून दिले. लोकांना अन्न मिळावे, यासाठी त्यांनी अनेक उपहारगृहे आणि मदत केंद्रे उघडली जातील याची खात्री केली. एकीकडे ते आपल्या लोकांच्या दुर्दशेने अत्यंत व्यथित झाले होते, तर दुसरीकडे वसाहतवादी शासकांच्या असंवेदनशीलतेमुळे ते व्यथित झाले होते. त्यांनी ‘पंचशेर मनवंतर’ नावाचे एक पुस्तकही लिहिले, ज्यात त्यांनी आपली व्यथा मांडली. 1942 मध्ये जेव्हा मेदिनीपूरला महाचक्रीवादळाचा तडाखा बसला, तेव्हा परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा झाली.

कोलकाता येथील एका महाविद्यालयात बोलताना डॉ. मुखर्जी यांनी तरुणांना आवाहन केले, “तुम्ही जे काही काम हाती घ्याल, ते गांभीर्याने, सखोलपणे आणि उत्तमरित्या करा; ते कधीही अर्धवट किंवा अपूर्ण सोडू नका, आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान देत नाही, तोपर्यंत समाधानी राहू नका.”

भारत देश ‘विकसित भारता’च्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, त्यांनी ज्या मजबूत, एकसंध, आत्मविश्वासी आणि करुणामय भारतावर दृढ विश्वास ठेवला होता, तो घडवण्यासाठी दररोज प्रयत्न करणे, हीच त्यांच्या स्मृतीला वाहीलेली सर्वोत्तम आदरांजली आहे. आजच्या तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते या आवाहनाला समर्थन देतील.