आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी त्यांचे धैर्य आणि अचूकता प्रशंसनीय आहे: पंतप्रधान
‘भारत माता की जय’ हा केवळ जयघोष नव्हे तर आपल्या देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे: पंतप्रधान
ऑपरेशन सिंदूर ही भारताचे धोरण, उद्देश आणि निर्णायक क्षमता यांची त्रिसूत्री आहे : पंतप्रधान
ज्यावेळी आपल्या भगिनी आणि कन्यांचे कुंकू पुसण्यात आले, आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांमध्येच चिरडले : पंतप्रधान
भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले तर केवळ विनाश होईल, याची जाणीव आता दहशतवादाच्या सूत्रधारांना झाली आहे : पंतप्रधान
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे केवळ तळ आणि हवाई तळच उद्ध्वस्त झाले नाहीत तर त्यांचे विकृत हेतू आणि दुःसाहस देखील धुळीला मिळाले : पंतप्रधान
दहशतवादाविरोधातील भारताची लक्ष्मणरेखा आता अतिशय सुस्पष्ट आहे, जर पुन्हा एखादा दहशतवादी हल्ला झाला, तर भारत त्याचे प्रत्युत्तर देईल आणि हे प्रत्युत्तर निर्णायक असेल : पंतप्रधान
ऑपरेशन सिंदूरचा प्रत्येक क्षण हा भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा पुरावा आहे : पंतप्रधान
जर पाकिस्तानने आणखी एखादे दहशतवादी कृत्य केले किंवा लष्करी आगळीक केली तर आम्ही त्याचे निर्णायक उत्तर देऊ,हे प्रत्युत्तर आमच्या अटींवर, आमच्या पद्धतीने असेल :पंतप्रधान
हा नवा भारत आहे! या भारताला शांततेची आस आहे, पण मानवतेवर हल्ला झाला तर आपल्या शत्रूला युद्धभूमीत कसे चिरडायचे हे देखील भारताला ठाऊक आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळाला भेट दिली आणि या तळावरील शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी संवाद साधला.त्यांना संबोधित करताना, त्यांनी 'भारत माता की जय' या जयघोषाचे  सामर्थ्य अधोरेखित केले. जगाने नुकतेच याचे  सामर्थ्य अनुभवले आहे यावर  त्यांनी भर दिला. हा  केवळ जयजयकार  नसून, भारतमातेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या प्रत्येक सैनिकाची ही एक पवित्र शपथ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही घोषणा म्हणजे, राष्ट्रहितासाठी जगण्याची आणि अर्थपूर्ण योगदान देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.‘भारत माता की जय’ हा जयघोष युद्धभूमी  आणि महत्त्वाच्या मोहिमा  अशा दोन्ही ठिकाणी घुमतो, असे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की जेव्हा भारतीय सैनिक ‘भारत माता की जय’ चा जयघोष करतात, तेव्हा शत्रूच्या मनात धडकी भरते. त्यांनी भारताच्या लष्करी सामर्थ्यावर भर दिला आणि सांगितले की जेव्हा भारतीय ड्रोन शत्रूच्या तटबंदी उद्ध्वस्त करतात आणि क्षेपणास्त्रे अचूकतेने हल्ला करतात, तेव्हा शत्रूला फक्त एकच वाक्य ऐकू येते—‘भारत माता की जय’. पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की अंधाऱ्या रात्रीतही, भारताकडे आकाश उजळून टाकण्याची क्षमता आहे, ज्यामुळे शत्रूला देशाच्या अदम्य भावनेचे दर्शन घडते. त्यांनी सांगितले की ज्यावेळी भारताचे सैन्य अणुबॉम्बच्या धमक्या मोडून काढते, तेव्हा आकाशात आणि पाताळात एकच संदेश घुमतो—‘भारत माता की जय’!

भारताच्या सशस्त्र दलांच्या धाडसाचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक करत   त्यांनी   लाखो भारतीयांचा  उर अभिमानाने भरला असून  त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि ऐतिहासिक कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.शूर वीरांना भेटणे खरोखरच एक मोठे भाग्य आहे, अशा भावना व्यक्त करताना त्यांनी अभिमानाने सांगितले की भविष्यात  देशाच्या शौर्याची चर्चा केली जाईल तेव्हा या मोहिमेचे नेतृत्व करणारे सैनिक चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.केवळ वर्तमानासाठीच नव्हे तर भविष्यातील पिढ्यांसाठी देखील ते प्रेरणास्थान बनले आहेत,असे पंतप्रधान मोदी म्हणाले.शूर योद्ध्यांच्या भूमीतील सशस्त्र दलांना संबोधित करताना त्यांनी हवाई दल, नौदल, लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या  (बीएसएफ) धाडसी जवानांना सलाम केला. त्यांनी त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि ऑपरेशन सिंदूरच्या जयघोषाचा निनाद देशभरात उमटत असल्याचे सांगितले. कारवाईदरम्यान, प्रत्येक भारतीय सैनिकांसोबत खंबीरपणे उभा राहिला, प्रार्थना केली आणि अढळ पाठिंबा दिला, असे त्यांनी नमूद केले.आपल्या जवानांच्या त्यागाला  वंदन करत त्यांच्याप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संपूर्ण देशाकडून अत्यंत हृद्य कृतज्ञता मोदी यांनी व्यक्त केली.

"ऑपरेशन सिंदूर ही एक सामान्य लष्करी मोहीम नाही तर भारताच्या धोरण, हेतू आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी  आहे",असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत ही बुद्ध आणि गुरू गोविंद सिंह यांची भूमी आहे.  गुरू गोविंद सिंह यांनी घोषित केले होते,"मी एका योद्ध्याला 125,000 विरुद्ध लढायला लावीन...मी चिमण्यांना ससाण्यांना  पराभूत करायला लावेन ...तरच मला गुरू गोविंद सिंह म्हटले जाईल." धर्माच्या  स्थापनेसाठी अधर्माविरुद्ध शस्त्र उचलणे ही नेहमीच भारताची परंपरा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.जेव्हा दहशतवाद्यांनी भारताच्या लेकींवर हल्ला करण्याचे आणि त्यांना हानी पोहोचवण्याचे धाडस केले तेव्हा भारतीय सैन्याने त्यांना त्यांच्याच आश्रयस्थानी नेस्तनाबूत केले, हे हल्लेखोर भ्याडपणे  लपतछपत आले होते, ते हे विसरले की  त्यांनी ज्यांना आव्हान दिले ती बलाढ्य भारतीय सेना आहे, असे सांगून पंतप्रधानांनी  भारतीय सैनिकांच्या शौर्याचे कौतुक केले. त्यांनी थेट हल्ला केला आणि प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. नऊ दहशतवादी तळ  नष्ट करण्यात आले आणि  100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. पंतप्रधान म्हणाले की,दहशतवादाच्या सूत्रधारांना आता भारताला आव्हान  देण्याचा अटळ परिणाम समजला आहे - संपूर्ण विनाश. भारतात निष्पापांचे रक्त सांडण्याच्या  कोणत्याही प्रयत्नाचे रूपांतर केवळ विनाशातच होईल  असे प्रतिपादन करून, त्यांनी अधोरेखित केले की या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचा भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने निर्णायक पराभव केला आहे. "भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश पाठवला आहे - दहशतवाद्यांसाठी कोणतेही सुरक्षित आश्रयस्थान शिल्लक नाही", असे पंतप्रधान म्हणाले.  भारत त्यांच्याच हद्दीत त्यांच्यावर हल्ला करेल आणि त्यातून सुटण्याची एकही संधी शिल्लक ठेवणार नाही  असे पंतप्रधानांनी खणखणीतपणे सांगितले. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे अशी भीती निर्माण झाली आहे की केवळ त्यांच्या विचारानेही पाकिस्तानला पुढले कित्येक दिवस झोप लागणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रसिद्ध घोड्याबद्दल, चेतकबद्दल लिहिलेल्या ओळी उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले,  हे शब्द आता भारताच्या प्रगत आधुनिक शस्त्रास्त्रांशी पूर्णपणे जुळतात.

सशस्त्र दलांच्या असामान्य कामगिरीची प्रशंसा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,ऑपरेशन सिंदूरच्या यशाने देशाचा संकल्प दृढ केला आहे, देशाला एकत्र आणले आहे, भारताच्या सीमांचे रक्षण केले आहे आणि भारताचा अभिमान नव्या उंचीवर नेला आहे. त्यांची कामगिरी असामान्य आणि उल्लेखनीय होती, असे ते म्हणाले.

भारतीय हवाई दलाने केलेले हल्ले अचूक होते, आणि त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांचे यशस्वीपणे लक्ष्य साधले, असे पंतप्रधान म्हणाले. अवघ्या 20 ते 25 मिनिटांत भारतीय सेना दलाने सीमेपलीकडून होणारे हल्ले अचूकपणे परतवले आणि लक्ष्यभेद केला, असे मोदी म्हणाले. अशा प्रकारच्या कारवाया केवळ आधुनिक, तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि अत्यंत व्यावसायिक सुरक्षा दलाकडूनच होतात, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी भारतीय लष्कराच्या वेगाची आणि अचूकतेची प्रशंसा केली, आणि ते म्हणाले की त्यांच्या वेगवान आणि निर्णायक कारवाईने शत्रूला थक्क केले. ते म्हणाले की शत्रूला आपला बालेकिल्ला कधी कोसळून पडला, हे समजलेच नाही.
 
पाकिस्तानच्या भूमीत घुसून दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले करणे आणि प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे भारताचे उद्दिष्ट असल्याचे अधोरेखित करून,नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करून पाकिस्तानने आपल्या कारवाया लपवायचा प्रयत्न केला, तरी भारतीय सैन्याने अत्यंत सावधगिरीने आणि अचूकतेने त्याला प्रत्युत्तर दिले, असे पंतप्रधान म्हणाले. दक्षता बाळगत आणि जबाबदारी सांभाळत आपले मिशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी सशस्त्र दलांची प्रशंसा केली. भारतीय जवानांनी आपले उद्दिष्ट पूर्ण अचूकतेने आणि निर्धाराने पूर्ण केले, असे त्यांनी अभिमानाने घोषित केले. या कारवाईमुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ आणि हवाई तळ उद्ध्वस्त तर झालेच, शिवाय त्यांचा दुष्ट हेतू आणि बेदरकार धाडसही हाणून पाडले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरनंतर हताश होऊन,शत्रूने भारताच्या अनेक हवाईतळांना लक्ष्य करण्याचा वारंवार प्रयत्न केला.मात्र,पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रत्येक प्रयत्न निर्णायकपणे हाणून पाडण्यात आला. भारताच्या शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणेसमोर पाकिस्तानी ड्रोन,यूएव्ही, विमाने आणि क्षेपणास्त्रे पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताची सज्जता आणि तांत्रिक सामर्थ्याने शत्रूच्या हल्ल्यांना पूर्णपणे निष्प्रभ ठरवले, यावर त्यांनी भर दिला. देशाच्या हवाई तळांवर देखरेख ठेवणाऱ्या नेतृत्वाची आणि भारतीय हवाई दलाच्या प्रत्येक हवाई योद्ध्याची त्यांनी मनःपूर्वक प्रशंसा केली. त्यांची अतुलनीय कामगिरी आणि देशाच्या रक्षणासाठी केलेले अजोड समर्पण, याची त्यांनी प्रशंसा केली.

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका आता स्पष्ट झाल्याचे नमूद करून, भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला, तर देश निर्णायक आणि जोरदार प्रत्युत्तर देईल, असे पंतप्रधानांनी घोषित केले. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक यासारख्या भारताने यापूर्वी केलेल्या कठोर कारवायांचा उल्लेख करून ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ने हे सिद्ध केले आहे की, देश कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. काल रात्री देशाला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणामधील तीन प्रमुख तत्त्वांचा त्यांनी पुनरुच्चार केला. पहिले, यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर त्याचे प्रत्युत्तर भारत स्वत:च्या अटी- शर्तींवरच देईल. दुसरे, भारत कोणत्याही स्वरूपाचे आण्विक ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही. तिसरे म्हणजे, भारत यापुढे दहशतवादी मास्टरमाईंड आणि त्यांना आश्रय देणारी सरकारे यात फरक करणार नाही. "जगाला आता या नवीन आणि दृढ निश्चयी भारताची ओळख होत आहे, जो राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादा विरोधातील आपला ठाम दृष्टिकोन निश्चित करत आहे", पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

“ऑपरेशन सिंदूरच्या प्रत्येक क्षणात भारताच्या सशस्त्र दलांची ताकद आणि क्षमता अधोरेखित झाली,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील असामान्य समन्वयाचे कौतुक करताना सांगितले की, या तीन दलांतील एकत्रित कार्यप्रणाली दखलनीय होती. त्यांनी नौदलाच्या समुद्रावरील वर्चस्वाची, लष्कराच्या सीमेवरील ताकदीची आणि हवाई दलाच्या आक्रमण तसेच संरक्षण या दुहेरी भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इतर सुरक्षा दलांचेही उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तसेच, भारताच्या एकत्रित हवाई आणि स्थल युद्ध क्षमतेचा प्रभाव अधोरेखित करताना, अशी संयुक्त कारवाईची क्षमता ही आता भारताच्या सैन्य सामर्थ्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान मनुष्यबळ आणि प्रगत तंत्रज्ञान यातील विलक्षण समन्वय अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी सांगितले की भारताच्या पारंपरिक हवाई संरक्षण यंत्रणेला स्वदेशी 'आकाश' प्रणाली आणि S-400 सारख्या अत्याधुनिक प्रणालींची मजबूत जोड लाभली. त्यांनी स्पष्ट केले की भारताचे सुरक्षाकवच ही महत्त्वाची ताकद ठरली आहे. पाकिस्तानच्या वारंवार प्रयत्नांनंतरही भारताचे हवाई तळ आणि महत्त्वाची संरक्षण पायाभूत सुविधा पूर्णतः सुरक्षित राहिली. पंतप्रधानांनी यशाचे श्रेय सीमेवर तैनात प्रत्येक सैनिकाच्या समर्पण, शौर्य आणि या कारवाईमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिले. त्यांच्या बांधिलकीला पंतप्रधानांनी भारताच्या अखंड राष्ट्रीय सुरक्षेचा आधारस्तंभ म्हटले.

पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले की आता भारताकडे असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याची बरोबरी पाकिस्तान करू शकत नाही. गेल्या दशकात भारतीय हवाई दल व इतर सेना दलांना जगातील आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानांपैकी काही तंत्रज्ञान मिळाले आहे. मात्र, या नव्या तंत्रज्ञानासोबत मोठ्या आव्हानांनाही सामोरे जावे लागते, या क्लिष्ट प्रणालींचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी कौशल्य, अचूकता आणि सातत्य असावे लागते, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. भारताच्या सशस्त्र दलांनी युद्धकौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे सुरेख एकत्रीकरण करून आधुनिक युद्धनीतीत आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी जाहीर केले की भारतीय हवाई दल आता शस्त्रांसोबतच डेटा आणि ड्रोनच्या साहाय्यानेही शत्रूला सामोरे जाण्यात पारंगत झाले आहे.

पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने लष्करी कारवाई सध्या तात्पुरती स्थगित केली आहे,हे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की जर पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया किंवा फाजील लष्करी धाडस केले तर भारत त्याला संपूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल. भारताचे उत्तर केवळ स्वतःच्या अटीशर्तींनुसारच असेल,असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या ठाम भूमिकेचे श्रेय राष्ट्राच्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि जागरूकतेला दिले. सैनिकांनी आपला निर्धार, उत्कट प्रतिसाद आणि सज्जता कायम ठेवावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.ते म्हणाले की भारताने नेहमी सावध आणि सज्ज असले पाहिजे. हा नवा भारत आहे – असा भारत जो शांततेची इच्छा ठेवतो, पण जर मानवतेला धोका निर्माण झाला, तर शत्रूंना ठेचून टाकण्यास मुळीच मागे-पुढे पाहणार नाही, असे उद्गार त्यांनी या संबोधनाचा शेवट करताना काढले.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Make in India Electronics: Cos create 1.33 million job as PLI scheme boosts smartphone manufacturing & exports

Media Coverage

Make in India Electronics: Cos create 1.33 million job as PLI scheme boosts smartphone manufacturing & exports
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister chairs the National Conference of Chief Secretaries
December 27, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi attended the National Conference of Chief Secretaries at New Delhi, today. "Had insightful discussions on various issues relating to governance and reforms during the National Conference of Chief Secretaries being held in Delhi", Shri Modi stated.

The Prime Minister posted on X:

"Had insightful discussions on various issues relating to governance and reforms during the National Conference of Chief Secretaries being held in Delhi."