मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला पंतप्रधानांसह राष्ट्रपती भेट देणार
राष्ट्रपती आणि पंतप्रधान मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे ओदिशा सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार
रु. 47,600 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
ऊर्जा, औद्योगिक पायाभूत सुविधा, रस्ते जोडणी, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि सिंचन आदी महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून 2026 रोजी ओदिशाचा दौरा करणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानांसोबत या दौऱ्यात सहभागी होणार असून, ओदिशासाठी हा एक क्वचितच घडून येणारा महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे.

सकाळी सुमारे 11:15 वाजता राष्ट्रपती आणि पंतप्रधान मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. राष्ट्रपती आणि पंतप्रधान संथाली जहेरा आणि हो जहेरा या देवरायांमध्ये प्रार्थना करतील. तसेच, कौशल्य विकास केंद्र आणि पहाडपूर शाळेला भेट देतील. आदिवासी आणि ग्रामीण भागांमध्ये शैक्षणिक संधी, कौशल्य विकास आणि सामाजिक-आर्थिक बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी हा दौरा आहे.

दुपारी 1 च्या सुमारास राष्ट्रपती आणि पंतप्रधान मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे एका कार्यक्रमात सहभागी होतील. ओदिशा सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला असून "विकास रा धारा, ओदिशा सारा" अशी त्याची संकल्पना आहे. कार्यक्रमात रु. 47,600 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होईल. पंतप्रधान उपस्थित लोकसमुदायाला संबोधितही करतील.

उद्घाटन आणि पायाभरणी होणार असलेल्या प्रकल्पांमध्ये ऊर्जा, औद्योगिक पायाभूत सुविधा, रस्ते संपर्क, पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि सिंचन आदी महत्त्वाच्या क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधा बळकट होतील, संपर्क व्यवस्था सुधारेल, ऊर्जा सुरक्षा वाढेल आणि ओदिशामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. समावेशी आणि सर्वांगीण विकासाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेचे प्रतिबिंब असलेल्या या उपक्रमांमुळे आदिवासी आणि ग्रामीण भागांच्या विकासाला गती मिळेल. तसेच, राज्याच्या कानाकोपऱ्यात विकासाचे लाभ पोहोचण्यास मदत होईल.

पायाभरणी होणार असलेल्या प्रकल्पांमध्ये 600 मेगावॅट क्षमतेच्या अपर इंद्रावती पंप्ड स्टोरेज प्रकल्प तसेच आयबी औष्णिक वीज केंद्राच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार प्रकल्पाचा समावेश आहे. या विस्तार प्रकल्पांतर्गत प्रत्येकी 660 मेगावॅट क्षमतेची 2 नवीन वीज निर्मिती केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. हे प्रकल्प ओदिशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करतील आणि राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देतील. याशिवाय, झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथल्या भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड (बीसीजीसीएल) प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येईल. या प्रकल्पामुळे देशांतर्गत कोळशाच्या स्वच्छ वापराला प्रोत्साहन मिळेल, आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि या प्रदेशात उद्योग व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

इतर प्रकल्पांमध्ये भुवनेश्वर इथे महानगरपालिकेचा दररोज 300 टीपीडी क्षमतेचा स्रोतानुसार वर्गीकृत घनकचऱ्यावर आधारित बायोगॅस निर्मिती प्रकल्प, कट्टक आणि भुवनेश्वर यांना थेट जोडणारा कथाजोदी नदीवरील पूल, बौध जिल्ह्यातील धालपूर–हरभंगा रस्ता रुंदीकरण, नुआपादा ते घाटीपादा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 353 च्या एका भागाचे चौपदरीकरण, कुसुमदिही मेगालिफ्ट सिंचन प्रकल्प, रायरंगपूर इथे इग्नू (आयजीएनओयू) प्रादेशिक केंद्र आणि इमारती अंतर्गत बॅडमिंटन संकुलासह विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

बौध इथे 300 खाटांच्या जिल्हा मुख्यालय रुग्णालयाच्या नव्या इमारतीसह ओदिशातील विविध जिल्ह्यांमध्ये उभारलेली 24 अटल बस स्थानके आणि 9 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांचे उद्घाटन केले जाईल. या प्रकल्पांमुळे राज्यातील आरोग्य सेवा आणि सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा बळकट होतील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग 57 वरील नयागढ शहर बाह्यवळण मार्ग, कुसुमी स्मार्ट सिंचन प्रकल्पाच्या भूमिगत पाइपलाईन, जाखापुरा – जाजपूर किओंझार रस्ता –बैतरणी रस्ता बहुद्देशीय प्रकल्प, हिंदोल रस्ता – मेरामंडळी बहुद्देशीय प्रकल्प आणि रायरंगपूर इथल्या क्रीडा संकुल व आदिवासी संशोधन केंद्रासह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येईल. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending

Media Coverage

Centre releases Rs 1.09 lakh crore tax devolution; Uttar Pradesh gets biggest share to accelerate development spending
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026