पंतप्रधान एर्नाकुलम येथे सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कोची रिफायनरी येथे पॉलीप्रोपिलीन युनिटची पायाभरणी करणार
पंतप्रधान दोन प्रमुख महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करणार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-66 च्या थलापडी-चेंगळा विभागाचे सहा पदरीकरण आणि वेंगलम ते रामनट्टुकारा पर्यंत कोझिकोड बायपासचे सहा पदरीकरण
पंतप्रधान तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि हिरवा झेंडा दाखवणार
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा, ग्रामीण संपर्क, महामार्ग विकास आणि रेल्वे सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील प्रकल्पांचा समावेश
पंतप्रधान निलगिरी आणि इरोड जिल्ह्यांमध्ये बीपीसीएलच्या सिटी गॅस वितरण नेटवर्कची पायाभरणी करणार आणि चेन्नईमध्ये आयओसीएलचा ल्युब ब्लेंडिंग प्लांट राष्ट्राला समर्पित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2026 रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान केरळमधील एर्नाकुलम येथे सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि हिरवा झेंडा दाखवतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. त्यानंतर सायंकाळी 5:45वाजता पंतप्रधान तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधान एर्नाकुलममध्ये

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) कोची रिफायनरीमध्ये पॉलीप्रोपिलीन युनिटची पायाभरणी पंतप्रधान करतील. या प्रकल्पामधील गुंतवणूक ₹5,500 कोटींपेक्षा जास्त आहे. या पॉलीप्रोपिलीन युनिटची क्षमता प्रतिवर्षी 400 किलो टन आहे. पॉलीप्रोपिलीन हे पॅकेजिंग, ऑटोमोटिव्ह घटक, वैद्यकीय उपकरणे, कापड आणि घरगुती उत्पादनांमध्ये वापरले जाणारे एक आवश्यक साहित्य आहे. या सुविधेमुळे भारताची देशांतर्गत पॉलिमर उत्पादन क्षमता मजबूत होईल, आयात अवलंबित्व कमी होईल, औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि या प्रदेशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्रात पंतप्रधान दोन प्रमुख महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पहिला प्रकल्प म्हणजे राष्ट्रीय महामार्ग-66 च्या थलापडी-चेंगळा विभागाचा सहा पदरी प्रकल्प, जो 2,650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने बांधला गेला आहे. हा विभाग मुंबई-कन्याकुमारी आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. तो कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यांसह मंगळुरू आणि मुझापिलनगडसह शेजारच्या प्रदेशांमधील संपर्क मजबूत करेल.

या प्रकल्पामुळे कासारगोड, बेकल, पय्यानूर आणि कन्नूर यांसारख्या प्रमुख शहरांमधील संपर्क जोडणीत सुधारणा घडून येईल. यासोबतच या शहरांची अझिक्कल बंदरासोबतची जोडणीही अधिक सक्षम होईल, त्यामुळे इथल्या आणि व्यापाराला चालना मिळेल.

वेंगलम ते रामनट्टुकरा या कोझिकोड या बायपासचे सहा पदरीकरण हा याअंतर्गतचा दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2140 कोटी रुपये इतका खर्च केला गेला आहे. या प्रकल्पामुळे सध्याच्या दुपदरी रस्त्याचा विस्तार होऊन, तो सेवा रस्त्यांसह सहा पदरी महामार्गात रूपांतरीत झाला आहे. यामुळे इथली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, वाहतूक क्षमतेत सुधारणा घडून येईल आणि रस्ते सुरक्षेतही वाढ होणार आहे. या विस्तारानंतर या मार्गावरचा एका तासापेक्षा जास्तीचा प्रवासाचा वेळ कमी होऊन सुमारे 15 ते 20 मिनिटांवर येईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे कोझिकोड समुद्रकिनारा, बेपोर बंदर आणि कप्पड समुद्रकिनारा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांसोबतीच्या संपर्क जोडणीतही सुधारणा घेडून येईल. यामुळे या भागातील पर्यटन आणि व्यापारालाही मोठी चालना मिळणार आहे.

केरळममध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत उभारलेल्या 23 ग्रामीण रस्त्यांचेही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. या रस्त्यांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील संपर्क जोडणी व्यवस्थेत मोठी सुधारणा घडून येणार आहे. यामुळे इथल्या नागरिकांना बाजारपेठा, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधींचा सुलभतेने लाभ घेणे शक्य होणार आहे. यातून इथल्या ग्रामीण भागातील उपजीविकेलाही अधिक बळकटी मिळणार आहे.

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या शोरनूर जंक्शन, कुट्टीपुरम आणि चंगणसेरी या तीन रेल्वे स्थानकांचेही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. प्रवाशांसाठीच्या आधुनिक सुविधा आणि वावरसुलभतेच्या सोयी सुविधांनी या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाअंतर्गत प्रवाशांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अवकाश निर्माण करतानाच, या कामाला स्थानिक वास्तुशिल्पीय घटकांची जोडही दिली गेली आहे.

यावेळी पंतप्रधान शोरनूर-निलंबूर रोड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या प्रकल्पाचे राष्ट्रार्पणही करणार आहे. रेल्वे सेवेअंतर्गतच्या या महत्त्वाच्या पट्ट्याचे विद्युतीकरण केल्यामुळे शोरनूर इथे इंजिन बदलण्याची गरज संपुष्टात येईल, आणि रेल्वे वाहतुकीला वेगवान, अधिक कार्यक्षम आणि शाश्वत कार्यान्वयनाचे स्वरुप लाभू शकणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान पलक्कड आणि पोल्लाची दरम्यानच्या नवीन रेल्वे सेवेलाही हिरवा झेंडा दाखवतील. या सेवेमुळे केरळम आणि तामिळनाडू दरम्यानची रेल्वे जोडणी अधिक मजबूत होईल. दोन्ही राज्यांममधून प्रवास करणारे दैनंदिन प्रवासी, धार्मिक यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटकांना या सेवेचा लाभ होणार आहे.

पंतप्रधान केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील पश्चिम कल्लाडा येथे 50 मेगावॅट क्षमतेच्या तरंगत्या सौर प्रकल्पाची पायाभरणी देखील करणार आहेत. हा प्रकल्प भारताच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांना चालना देईल तसेच शाश्वत आणि कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या ऊर्जा भविष्यासाठी देशाच्या वचनबद्धतेला बळकटी देईल.

पंतप्रधानांचा तिरुचिरापल्ली येथील कार्यक्रम 

पंतप्रधान तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्राला समर्पण, पायाभरणी करतील आणि हिरवा झेंडाही दाखवतील. या प्रकल्पांमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पायाभूत सुविधा, वंगण उत्पादन, ग्रामीण संपर्क प्रणाली, महामार्ग विकास आणि रेल्वे सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.

पेट्रोलियम क्षेत्रात, पंतप्रधान भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नीलगिरी आणि इरोड जिल्ह्यात 3,680 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या शहर गॅस वितरण नेटवर्कची पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे 8.8 लाखांहून अधिक घरांना पीएनजी कनेक्शन उपलब्ध होतील, 200 हून अधिक व्यावसायिक आस्थापनांना गॅस पुरवठा होईल आणि 201 हून अधिक सीएनजी स्टेशन्स स्थापन होतील.

चेन्नईतील मनाली येथे उभारण्यात आलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या 672 हजार मेट्रिक टन प्रतिवर्षी ल्युब ब्लेंडिंग तयार करणारा प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. सुमारे 1,490 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेला हा प्रकल्प भारताच्या ल्युब्रिकंट उत्पादन क्षमतेला बळकटी देईल.

तामिळनाडूमध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निर्मित 370 किमी लांबीच्या 89 ग्रामीण रस्त्यांचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठा, शाळा आणि आरोग्य सुविधांशी संपर्क लक्षणीयरीत्या सुधारणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 81 वर गंगाईकोंडा चोलापुरम जवळ ग्रीनफील्ड बायपासची पायाभरणी करतील.

पंतप्रधान दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या, दोन एक्सप्रेस गाड्या आणि एक प्रवासी रेल्वे सेवेला देखील हिरवा झेंडा दाखवतील. यामुळे तमिळनाडू आणि तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि पूर्व भारतासह इतर प्रदेशांमधील रेल्वे संपर्क सुविधा मजबूत होईल. परिणामी, प्रवाशांना फायदा होईल आणि या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना मिळेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The Nari Shakti Decade: How 12 years of policy reforms under Modi govt transformed lives of women in Bharat

Media Coverage

The Nari Shakti Decade: How 12 years of policy reforms under Modi govt transformed lives of women in Bharat
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 जून 2026
June 07, 2026

India on the Rise: Celebrating Milestones from Grassroots to the Global Stage Under the Leadership of PM Modi