पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीमध्ये रोहिणी येथे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय आर्यन शिखर परिषदेत दुपारी पावणेतीन वाजता सहभागी होणार आहेत. ही परिषद महर्षी दयानंद सरस्वती जी यांची 200 वी जयंती आणि आर्य समाजाच्या सामाजिक सेवाकार्याची 150 वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित ज्ञानज्योती महोत्सवाचा भाग असणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांशी संवाद देखील साधतील.
आर्य समाजाच्या भारतभरात तसेच परदेशात असलेल्या शाखांचे प्रतिनिधी या शिखर परिषदेत सहभागी होणार असून महर्षी दयानंद यांचे सुधारणावादी आदर्श आणि संघटनेची जागतिक पोहोच यांचे दर्शन घडेल. आर्य समाजाने शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि अध्यात्मिक उन्नतीच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानातून या समाजाचा परिवर्तनकारी प्रवास प्रदर्शित करणारे “सेवाकार्याची 150 सोनेरी वर्षे” या शीर्षकाचे प्रदर्शन देखील या परिषदेत मांडण्यात येईल.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या सुधारणावादी आणि शैक्षणिक वारशाचा सन्मान करून आणि शिक्षण, समाज सुधारणा तसेच राष्ट्र उभारणीच्या क्षेत्रात आर्य समाजाने केलेल्या सेवेच्या 150 वर्षांचा गौरव करून विकसित भारत 2047 च्या संकल्पनेला अनुसरून वैदिक तत्वे आणि स्वदेशी मूल्यांबाबत जागतिक पातळीवर जागरूकतेला प्रेरित करणे हा या शिखर परिषदेच्या आयोजनाचा उद्देश आहे.


