पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचे (ईएसटीआयसी) 2025 चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील.
देशातील संशोधन आणि विकास परिसंस्थेला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान 1 लाख कोटी रुपयांचा संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधी सुरू करतील. देशात खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
ईएसटीआयसी 2025 हे 3 ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित केले जाईल. या परिषदेत शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधील 3,000 हून अधिक सहभागी, नोबेल पारितोषिक विजेते, प्रख्यात शास्त्रज्ञ, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते एकत्र येतील. प्रगत साहित्य आणि उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव-उत्पादन, ब्लू इकॉनॉमी, डिजिटल कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उत्पादन, उदयोन्मुख कृषी तंत्रज्ञान, ऊर्जा, पर्यावरण आणि हवामान, आरोग्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान, क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान यासह 11 प्रमुख विषयांवर विचारमंथन होईल.
ईएसटीआयसी 2025 मध्ये आघाडीच्या शास्त्रज्ञांचे संबोधन, पॅनेल चर्चा, सादरीकरणे आणि तंत्रज्ञान प्रदर्शने असतील, ज्यामुळे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमध्ये सहकार्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.


