प्रयागराजच्या पवित्र भूमीवर महाकुंभ यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. जेव्हा देशाची जाणीव जागृत होते, जेव्हा ती अधीनतेच्या शतकानुशतके जुन्या मानसिकतेच्या जोखडातून मोकळी होते, तेव्हा ती नव्या उर्जेने भरलेल्या ताज्या हवेत मोकळा श्वास घेते. याचाच परिणाम प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरु झालेल्या एकता का महाकुंभ म्हणजेच एकतेच्या महाकुंभमध्ये पाहायला मिळाला.

दिनांक 22 जानेवारी, 2024 रोजी, अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी मी देवभक्ती आणि देशभक्ती म्हणजेचे अनुक्रमे दैवी शक्तींची भक्ती आणि राष्ट्राची भक्ती याबाबत विचार मांडले होते. प्रयागराज येथील महाकुंभात देवी आणि देवता, संत, महिला, लहान मुले, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि जीवनाच्या सर्व स्तरांवरील लोक एकत्र आले. देशामध्ये जागृत झालेल्या जाणिवेचे दर्शन यावेळी घडले. या पवित्र पर्वासाठी सुमारे 140 कोटी भारतीयांच्या भावना एकाच जागी, एकाच वेळी एकवटल्या होत्या, असा हा एकतेचा महाकुंभ होता.

प्रयागराजच्या या पूजनीय प्रदेशात श्रुंगवेरपूर ही एकता, सुसंवाद आणि प्रेमाने भरलेली पवित्र भूमी आहे. श्रीराम आणि निषादराज येथेच परस्परांना भेटले असे म्हणतात. त्यांची ही भेट भक्ती आणि सद्भावनेचे प्रतीक मानली जाते. आजही, प्रयागराज याच भावनेसह आपल्याला प्रेरित करते.

या 45 दिवसांत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून कोट्यवधी लोक संगमावर येत होते. संगमाच्या जागी भावभक्तीच्या लाटा उसळत होत्या. प्रत्येक भाविक येथे एकाच उद्देशाने आला- संगमात स्नान करणे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा हा पवित्र संगम प्रत्येक यात्रेकरुचे मन उत्सुकता, उर्जा आणि विश्वासाने भरून टाकत होता.

प्रयागराज मधील महाकुंभ म्हणजे आधुनिक व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक, नियोजन आणि धोरण क्षेत्रातील तज्ञ यांच्यासाठी एक अभ्यासाचा विषय ठरला आहे. जगात या भव्यतेशी समांतर असेल किंवा त्याचे उदाहरण ठरेल असे आयोजन कुठेही झालेले नाही.

प्रयागराज येथे नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी, किनाऱ्यांवर कशा प्रकारे कोट्यवधी लोक गोळा झाले ते संपूर्ण जगाने आश्चर्यचकित होऊन पाहिले. या लोकांना कोणतेही औपचारिक निमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कधी-कुठे जायचे आहे यासंदर्भात त्यांच्यात आधी कोणताही संवाद झालेला नव्हता. तरीही, कोटीच्या कोटी लोक स्वतःच्या मर्जीने महाकुंभाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघाले आणि त्यांनी पवित्र जलात स्नान करण्याचे भाग्य अनुभवले.

या पवित्र स्नानानंतर अतीव आनंद आणि समाधानाने चमकणारे त्यांचे चेहरे मी विसरु शकत नाही. महिला, वयोवृध्द, आपले दिव्यांग बंधू-भगिनी अशा सर्वांनी संगमावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला.

या सोहोळ्यात भारतातील तरुणांचा प्रचंड प्रमाणातील सहभाग बघणे माझ्यासाठी विशेष हृदयस्पर्शी होते. महाकुंभासारख्या पर्वात तरुण पिढीचा सहभाग असा गहन संदेश देतो की भारतीय युवक आपल्या वैभवशाली संस्कृती आणि वारशाचे मशालवाहक असतील. ही संस्कृती आणि वारसा जपण्याची त्यांची जबाबदारी त्यांना माहित असून ती पुढे नेण्याप्रती ते कटिबद्ध आहेत.

महाकुंभात उपस्थित राहण्यासाठी प्रयागराजला आलेल्या लोकांच्या संख्येने निःसंशयपणे नवे विक्रम रचले आहेत. मात्र, प्रत्यक्ष तेथे हजर असलेल्या लोकांबरोबरच जे प्रयागराजला पोहोचू शकले नाहीत असे कोट्यवधी लोक देखील मनाने या सोहोळ्याशी घट्टपणे बांधले गेले होते.तेथे गेलेल्या भाविकांनी आणलेले पवित्र जल लाखो लोकांसाठी अध्यात्मिक आशीर्वादाचा स्त्रोत ठरले.महाकुंभाला उपस्थित राहून परतलेल्या अनेकांचे त्यांच्या गावांमध्ये आदराने स्वागत झाले, समाजाने त्यांचा गौरव केला.

गेल्या काही आठवड्यांत जे घडले, ते अभूतपूर्व असून, त्याने येणाऱ्या काही शतकांसाठी पाया रचला आहे.

प्रयागराजमध्ये कल्पनेपेक्षा अधिक भाविक दाखल झाले. कुंभमेळ्यातील मागील अनुभवांच्या आधारावर प्रशासनाने भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज बांधला होता.

या एकतेच्या महाकुंभात अमेरिकेच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दुप्पट संख्येने भाविक सहभागी झाले.

अध्यात्माच्या अभ्यासकांनी कोट्यवधी भारतीयांच्या या उत्साही सहभागाचे विश्लेषण केले, तर त्यांना असे दिसून येईल, की आपल्या वारशाचा अभिमान बाळगणारा भारत आता एका नव्या ऊर्जेने पुढे जात आहे. मला विश्वास आहे, की ही एका नवीन युगाची पहाट आहे, जी नव्या भारताचे भविष्य लिहिणार आहे.

हजारो वर्षांपासून या महाकुंभाने भारताची राष्ट्रीय जाणीव बळकट केली आहे. प्रत्येक पूर्णकुंभात संत, अभ्यासक आणि विचारवंत आपापल्या काळातील समाजाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी एकत्र येत होते. त्याचे प्रतिबिंब देशाला आणि समाजाला नवी दिशा देत होते. दर सहा वर्षांनी अर्धकुंभादरम्यान या कल्पनांचा आढावा घेतला जात असे. 144 वर्षांच्या 12 पूर्णकुंभ सोहळ्यानंतर, कालबाह्य परंपरांचा त्याग करण्यात आला, नवीन कल्पना आत्मसात करण्यात आल्या आणि काळा बरोबर पुढे जात नव्या परंपरा निर्माण करण्यात आल्या.

144 वर्षांनंतर यंदाच्या महाकुंभात आपल्या संतांनी पुन्हा एकदा भारताच्या विकासयात्रेसाठी नवा संदेश दिला आहे. तो संदेश म्हणजे, विकसित भारत.

या एकतेच्या महाकुंभात प्रत्येक भाविक, मग तो श्रीमंत असो वा गरीब, तरुण असो वा वृद्ध, खेड्यापाड्यातील असो वा शहरातील, भारतातील असो, अथवा परदेशी, पूर्वेकडील असो, की पश्चिमेकडील, उत्तरेकडील असो, की दक्षिणेकडील, जात, पात, विचारधारा यांचा विचार न करता या ठिकाणी सर्वजण एकत्र आले. कोट्यवधी लोकांमध्ये आत्मविश्वास जागवणाऱ्या 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेचे हे मूर्त रूप होते. विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आता आपण याच भावनेने एकत्र यायला हवे.

श्रीकृष्णाने बालपणी यशोदा मातेला आपल्या मुखात संपूर्ण विश्वाचे दर्शन घडवले होते, तो प्रसंग मला आठवतो. त्याचप्रमाणे या महाकुंभात भारताच्या सामूहिक सामर्थ्याची प्रचंड क्षमता भारतीयांनी आणि जगभरातील लोकांनी पाहिली. आपण आता याच आत्मविश्वासाने पुढे जायला हवे आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी स्वत:ला समर्पित करायला हवे.

यापूर्वी भक्ती चळवळीतील संतांनी भारतभरातील आपल्या सामूहिक संकल्पाची ताकद ओळखून त्याला प्रोत्साहन दिले होते. स्वामी विवेकानंदांपासून ते अरविंदांपर्यंत प्रत्येक थोर विचारवंताने आपल्याला सामूहिक संकल्पांच्या शक्तीची जाणीव करून दिली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनीही याचा अनुभव घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात जर या सामूहिक शक्तीची ताकद ओळखली गेली असती, आणि त्याचा उपयोग सर्वांच्या कल्याणासाठी झाला असता, तर नुकतेच स्वातंत्र्य प्राप्त केलेल्या आपल्या देशासाठी ती एक मोठी ताकद ठरली असती. दुर्दैवाने, हे यापूर्वी केले गेले नाही. विकसित भारतासाठी लोकांची ही सामूहिक शक्ती ज्या प्रकारे एकत्र येत आहे, ते पाहून मला आनंद वाटत आहे.

वेदांपासून ते विवेकानंदांपर्यंत, प्राचीन धर्मग्रंथांपासून ते आधुनिक उपग्रहांपर्यंत, भारताच्या महान परंपरेने हा देश घडवला आहे. एक नागरिक म्हणून मी प्रार्थना करतो की, आपण आपल्या पूर्वजांच्या आणि संतांच्या आठवणींमधून नवी प्रेरणा घ्यावी. हा एकतेचा महाकुंभ आपल्याला नवे संकल्प घेऊन पुढे जाण्यासाठी सहाय्य करेल. आपण एकतेला आपले मार्गदर्शक तत्त्व बनवूया. राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा आहे, या विचाराने आपण काम करूया.

काशी इथे निवडणूक प्रचार करत असताना मी म्हटले होते, की माता गंगेने मला बोलावणे धाडले आहे. हे केवळ एक भावनात्मक विधान नव्हते, तर तो आपल्या पवित्र नद्यांच्या स्वच्छतेच्या जबाबदारीप्रती प्रतिसाद होता. प्रयागराजमध्ये, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो, तिथे उपस्थित असताना तर माझा हा संकल्प अधिकच दृढ झाला. आपल्या नद्यांची स्वच्छता आपल्या स्वतःच्या जगण्याशी खूपच खोलवर जोडली गेलेली आहे. मोठ्या असोत किंवा लहान, आपल्या नद्यांना जीवनदायीनी प्रमाणे जपणे हीच आपली जबाबदारी आहे. या महाकुंभने आपल्याला आपल्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी सातत्याने काम करत राहण्याची प्रेरणा दिली आहे.

मला जाणीव आहे की, एवढ्या भव्य सोहळ्याचे आयोजन करणे हे काही सोप्पे काम नव्हते. मी माता गंगा, माता यमुना आणि माता सरस्वतीला प्रार्थना करतो की, आमच्या भक्तीत कोणतीही त्रुटी राहिली असेल, तर त्यांनी आम्हाला क्षमा करावी. मी जनता जनार्दनाला, लोकांना देवत्वाचे प्रतीक मानतो. त्यांची सेवा करण्याच्या प्रयत्नांमध्ये देखील जर कोणतीही उणीव राहिली असेल, तर जनतेनेही क्षमा करावी अशी मी प्रार्थना करतो.

कोट्यवधी लोक भक्तिभावाने या महाकुंभसाठी आले होते. त्यांची सेवा करणे ही एक जबाबदारी होती आणि तीही आम्ही त्याच भक्ती भावनेने पार पाडली. उत्तर प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारा संसदेतील सदस्य म्हणून मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, योगीजींच्या नेतृत्वाखाली इथल्या प्रशासनाने आणि जनतेने एकत्र येऊन हा एकतेचा महाकुंभ यशस्वी केला. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, इथे कुणीही शासक किंवा प्रशासक नव्हते, तर प्रत्येक जण म्हणजे समर्पण भावनेने काम करणारे सेवकच होते. स्वच्छता कर्मचारी, पोलीस, नावाडी, वाहनचालक, अन्नदानाची सेवा देणारे लोक – अशा प्रत्येकाने अथक परिश्रम घेतले. प्रयागराजच्या जनतेने त्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत असतानाही, ज्या उत्साहाने अंतःकरणापासून यात्रेकरूंचे स्वागत केले, ते तर विशेषत्वाने प्रेरणा देणारेच होते. याबद्दल मी त्यांचे आणि उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे कौतुकही करतो.

माझा आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यावर कायमच अढळ विश्वास राहिला आहे. या महाकुंभातून मिळालेल्या अनुभवाने तर हा विश्वास आता अनेक पटींनी वाढला आहे.

140 कोटी भारतीयांनी या एकतेच्या महाकुंभला ज्या रितीने जागतिक स्तरावरील एका भव्य सोहळ्याचे स्वरुप मिळवून दिले ते खरोखरच अद्भुत आहे. आपल्या लोकांच्या समर्पण भावनेने, त्यांच्यातील भक्तीभावाने आणि प्रयत्नांनी प्रेरित होऊन मी लवकरच 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या श्री सोमनाथ इथे भेट देणार आहे, तिथे मी या सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नांचे फलित त्यांना अर्पण करणार आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रार्थनाही करणार आहे.

एक आयोजन म्हणून महाकुंभच्या या सोहळ्याचा महाशिवरात्रीला यशस्वी समारोप झाला असला, तरी देखील ज्याप्रमाणे गंगेचा प्रवाह जसा अनंत आहे, त्याचप्रमाणे या महाकुंभने जागृत केलेली आध्यात्मिक शक्ती, राष्ट्रीय जाणीवा आणि ऐक्याची भावना भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहणार आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's fertiliser exports rise 52% in three years from FY24 to FY26

Media Coverage

India's fertiliser exports rise 52% in three years from FY24 to FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताच्या एकात्मतेसाठी आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन
July 06, 2026

आज सहा जुलै, राष्ट्रवाद आणि निस्वार्थ सेवेचा आदर्श मानणाऱ्या, त्यांची जपणूक करणाऱ्या सर्व लोकांसाठी आजचा दिवस विशेष आहे. आज डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती आहे. भारत मातेच्या सेवेप्रती कटिबद्धता आणि धैर्य यांचे ते कालातीत मूर्तिमंत उदाहरण आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासात, असे अगदी कमी लोक आहेत, ज्यांच्यात बुद्धीमत्ता, सार्वजनिक सेवाभाव आणि नैतिक दृढनिश्चय यांचा संगम आढळतो, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्यापैकीच एक आहेत.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म अशा परिस्थितीत झाला होता, जिथे, त्यांना सहज एक आरामदायी आणि सुरक्षित आयुष्य मिळू शकले असते. त्यांचे पिता, सर आशुतोष मुखर्जी, त्या काळातील एक आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ आणि प्रखर बुद्धिवादी होते. नियतीने त्यांना, एक अत्यंत उच्चभ्रू, सुखासीन आयुष्य दिले असले, तरी त्यांच्यातील विवेकाने, त्यांना देशसेवा आणि त्यागाचा मार्ग दाखवला. त्या काळातील अत्यंत अस्थिर परिस्थितीत आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असा कौल त्यांच्या मनाने त्यांना दिला. मग ती वसाहतवादी शक्तींशी लढाई असो, जातीवाद, धर्मभेद किंवा मग मानवतेसमोरची आव्हाने असोत, अथवा इतर काही. त्यांच्या या प्रवासात त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे, दु:खाचा सामना करावा लागला, यात अगदी त्यांचं बाळ आणि नंतर त्यांच्या पत्नीचे झालेले देहावसान, अशा अपार दु:खाच्या प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागला. मात्र अशा सगळ्या दु:खांनी, त्यांचा दृढनिश्चय अधिक वाढवला आणि देशाची सेवा करण्याची कटिबद्धता अधिक दृढ केली.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या सार्वजनिक जीवनातील एक आदर्श, जो या सगळ्या गुणांच्या वर होता, असे सांगायचे झाले, तर तो आदर्श गुण ठरेल, अखंड भारताप्रती त्यांची निष्ठा! फाळणीच्या गदारोळात, हिंसाचारातही, पश्चिम बंगाल हा भारताचा अविभाज्य घटक राहील, यासाठी ते पाय घट्ट रोवून उभे राहिले. काही वर्षांनी, त्यांच्या याच अखंडतेच्या ध्यासाने, ते जम्मू आणि काश्मीरला गेले. तिथे झालेला तुरुंगवास ही त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करु शकला नाही. मात्र, याच तुरुंगवासात त्यांचा अकाली मृत्यू झाला. तुरुंगावासात, अशा ठिकाणी..एकटेपणात.. ज्या लाखो लोकांचं आयुष्य त्यांनी स्वतःचे आयुष्य बनवले होते, अशा सगळ्या मोलाच्या माणसांपसून दूर. इतिहासात असे काही क्षण येतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सर्वोच्च बलिदानामुळे ती व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे जाते आणि त्यांचे कर्तव्य, एका राष्ट्रीय स्मृती ठरतात. आचार्य विनोबा भावे एकदा असे म्हणाले होते की, ज्या तत्वावर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा दृढविश्वास होता, त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःचे बलिदान दिले. या घटनेनंतर अनेक वर्षांनी, कलम 370 आणि अनुच्छेद 35 (अ) हटवणे (2019 चा कायदा), ही त्यांच्या बलिदानाला दिलेली सर्वोच्च मानवंदना होती.

डॉ. मुखर्जी यांनी, कायमच भारताला आणि भारतीय मूल्यांना प्रथमस्थानी ठेवले. त्यासाठी त्यांनी त्या काळातील प्रचलित विचारसरणींना छेद देणाऱ्या संस्था उभारून आणि सक्षम व्यवस्था घडवून हे सिद्ध केले. ते कलकत्ता विद्यापीठाचे सर्वांत तरुण कुलगुरू बनले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीद्वारे त्यांनी देशभक्तीची प्रेरणा देणारे आणि भविष्याची दृष्टी असलेले सकारात्मक बदल घडवून आणले. शिक्षणतज्ज्ञांच्या एका परिषदेला संबोधित करताना डॉ. मुखर्जी यांनी अतिशय समर्पक शब्दांत म्हटले होते की, शैक्षणिक संस्थांकडे संभाव्य कारकून आणि अल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी तयार करणारे कारखाने म्हणून पाहणे चुकीचे आहे. नगरपालिका, प्रांतीय आणि केंद्रीय विधिमंडळे यांसारख्या आपल्या स्वशासित संस्थांना नेतृत्व देण्यास सक्षम असलेले, तसेच वित्तीय, व्यापारी आणि औद्योगिक अशा जीवनाच्या विविध क्षेत्रांतील कामकाजाचे संचालन करू शकणारे विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता विद्यापीठाने ग्रंथालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, विज्ञान विषयातील संशोधनाला चालना देणे, पुरावस्तूंच्या अध्ययनाला प्रोत्साहन देणे तसेच कृषी विषयातील अभ्यासक्रम सुरू करणे, अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. त्यांनी क्रीडा, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी कल्याण यांसारख्या क्षेत्रांकडेही विशेष लक्ष वेधले. विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी 24 जानेवारी हा दिवस विद्यापीठाचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. विद्यापीठासाठी गीत रचण्याची विनंती त्यांनी थेट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनाच केली होती.

त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, त्यातूनही हीच भावना दिसून येते. त्या काळात काँग्रेस पक्षाचे सगळीकडे वर्चस्व असताना, भारताच्या प्रगतीसाठी आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहून पर्यायी आवाज उभा राहणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांना वाटत होते. कदाचित म्हणूनच त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मातीचा दिवा होते. एक दिवा दिसायला साधा वाटू शकतो; मात्र स्वतःच्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक अंधार दूर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. जनसंघाने आपल्या कार्यरत असलेल्या काळात आणि त्यानंतरही नेमके हेच कार्य केले.

भारताचे पहिले उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा कार्यकाळ हा विकासाविषयी अत्यंत व्यापक आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या एका नेत्याचे दर्शन घडवतो. नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राचा सन्मान, संधी आणि आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याचे साधन म्हणून त्यांनी उद्योगांकडे पाहिले. संपत्तीची निर्मिती आणि मूल्यवर्धन यांचा त्यांनी आदर केला. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, सिंद्री खत प्रकल्प आणि भक्कम औद्योगिक धोरण यांसारख्या अग्रणी उपक्रमांद्वारे आधुनिक औद्योगिक भारताचा पाया रचत असतानाच, भारताच्या पारंपरिक सामर्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही त्यांनी खात्री केली. हातमाग, कुटीर उद्योग, कारागीर आणि वस्त्रोद्योगातील कामगार यांनाही त्यांच्यामध्ये तितकाच कटिबद्ध पुरस्कर्ता लाभला.

याठिकाणी मला एक वैयक्तिक अनुभव सांगायचा आहे. आत्मनिर्भरतेच्या स्पष्ट दृष्टिकोनातून डॉ. मुखर्जी यांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या सिंद्री खत प्रकल्पाकडे अनेक दशके देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मला याचा अभिमान वाटतो की, आमच्या सरकारला या परंपरेच्या पुनरुज्जीवनात योगदान देण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात उपस्थित राहणे हा खरोखरच सर्वात विशेष क्षणांपैकी एक होता.

भारताच्या सांस्कृतिक परंपरेने फार पूर्वीपासून संवाद आणि चर्चांना महत्त्व दिले आहे. डॉ. मुखर्जी यांनी याच लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व केले होते. सुरुवातीच्या काळात राष्ट्र उभारणीचे कार्य राजकीय मतभेदांच्या पलीकडचे आहे, असा विश्वास बाळगून ते पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात सामील झाले. त्यांनी प्रामाणिकपणे आणि विधायक भावनेने काम केले; परंतु जेव्हा त्यांना वाटले की राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांसाठी वेगळ्या मार्गाची आवश्यकता आहे, तेव्हा त्यांनी सन्मानाने पदाचा त्याग केला आणि राष्ट्राला आवश्यक असलेल्या राजकीय कार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.

75 वर्षांपूर्वी, पंडित नेहरूंनी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात करणारे होते. डॉ. मुखर्जी हे त्याच्या सर्वात कट्टर विरोधकांपैकी एक होते. काँग्रेस काय करू शकते, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आणि पुढील घडामोडींनी त्यांची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध केले. ज्यांनी 75 वर्षांपूर्वी पहिले घटनादुरुस्ती विधेयक आणले, त्यांनीच 1975 मध्ये आणीबाणी लादली आणि त्यानंतर 50 वर्षांपूर्वी 42वी घटनादुरुस्ती करून उदारमतवादी लोकशाही मूल्यांच्या मुळावरच घाव घातला.

डॉ. मुखर्जी त्यांचा मानवतावादी कार्यासाठीही ओळखले जातात. 1943 मध्ये जेव्हा बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला, तेव्हा डॉ. मुखर्जींनी स्वतःला पीडितांच्या सेवेत झोकून दिले. लोकांना अन्न मिळावे, यासाठी त्यांनी अनेक उपहारगृहे आणि मदत केंद्रे उघडली जातील याची खात्री केली. एकीकडे ते आपल्या लोकांच्या दुर्दशेने अत्यंत व्यथित झाले होते, तर दुसरीकडे वसाहतवादी शासकांच्या असंवेदनशीलतेमुळे ते व्यथित झाले होते. त्यांनी ‘पंचशेर मनवंतर’ नावाचे एक पुस्तकही लिहिले, ज्यात त्यांनी आपली व्यथा मांडली. 1942 मध्ये जेव्हा मेदिनीपूरला महाचक्रीवादळाचा तडाखा बसला, तेव्हा परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सर्वत्र प्रशंसा झाली.

कोलकाता येथील एका महाविद्यालयात बोलताना डॉ. मुखर्जी यांनी तरुणांना आवाहन केले, “तुम्ही जे काही काम हाती घ्याल, ते गांभीर्याने, सखोलपणे आणि उत्तमरित्या करा; ते कधीही अर्धवट किंवा अपूर्ण सोडू नका, आणि जोपर्यंत तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान देत नाही, तोपर्यंत समाधानी राहू नका.”

भारत देश ‘विकसित भारता’च्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना, त्यांनी ज्या मजबूत, एकसंध, आत्मविश्वासी आणि करुणामय भारतावर दृढ विश्वास ठेवला होता, तो घडवण्यासाठी दररोज प्रयत्न करणे, हीच त्यांच्या स्मृतीला वाहीलेली सर्वोत्तम आदरांजली आहे. आजच्या तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे की ते या आवाहनाला समर्थन देतील.