माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी जोडले जाणे, तुमच्याकडून काही शिकणे, देशातील लोकांच्या यशस्वी कामगिऱ्यांबद्दल माहिती घेणे हा माझ्यासाठी खरोखरचं एक सुखद अनुभव आहे. आपले म्हणणे एकमेकांशी सामायिक करताना, आपल्या ‘मनातली बात’ करता, करता या कार्यक्रमाने 125 भाग कधी पूर्ण केले, ते आपल्याला कळले देखील नाही. आजचा हा भाग या कार्यक्रमाचा 126 वा भाग आहे आणि आजच्या दिवसाचे काही विशेष महत्त्व आहे. आज भारतातील दोन महान व्यक्तींची जयंती आहे. मी हुतात्मा भगतसिंग आणि लता दीदी यांच्याबद्दल बोलतो आहे.
मित्रांनो, अमर हुतात्मा भगतसिंग हे प्रत्येक भारतवासीयासाठी, विशेषतः देशातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांच्या स्वभावात निर्भीडता ओतप्रोत भरलेली होती. देशासाठी फाशीवर जाण्यापूर्वी त्यांनी इंग्रजांना एक पत्र देखील लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, इंग्रजांनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना युध्दकैद्यांसारखे वागवावे. आणि म्हणूनच आमचे जीव फाशी देऊन नव्हे तर थेट गोळी घालून घेण्यात यावेत. हा त्यांच्यातील अदम्य साहसाचा पुरावाच आहे. भगतसिंग लोकांच्या दुःखाबाबत देखील अत्यंत संवेदनशील होते आणि त्यांच्या मदतीसाठी सर्वात आघाडीवर असत. मी हुतात्मा भगतसिंग यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो.
मित्रांनो,
आज लता मंगेशकर यांची देखील जयंती आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताची आवड असणारी कोणतीही व्यक्ती त्यांची गाणी ऐकून भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. मानवी संवेदनांना जागृत करणारी प्रत्येक गोष्ट यामध्ये आहे. त्यांनी जी देशभक्तीपर गीते गायली त्या गीतांनी लोकांना खूप प्रभावित केले. भारताच्या संस्कृतीची देखील त्यांना अतिशय आवड होती. मी लतादीदींना हृदयापासून श्रद्धांजली वाहतो. मित्रांनो, लता दीदी ज्या महान व्यक्तींकडून प्रेरित झाल्या होत्या त्यापैकी एक होते वीर सावरकर. लता दीदी त्यांना तात्या म्हणत असत. लता दिदींनी सावरकरांच्या अनेक रचनांना स्वतःच्या सुरांमध्ये गुंफले आहे.
लता दिदींशी माझे स्नेहाचे नाते होते आणि ते शेवटपर्यंत कायम राहिले. त्या मला न विसरता प्रत्येक वर्षी राखी पाठवत असत. मला आठवतंय, मराठी सुगम संगीतातील महान दिग्गज सुधीर फडके यांनी सर्वप्रथम लता दिदींशी माझी ओळख करून दिली होती, त्यावेळी मी लता दीदींना सांगितले की मला तुम्ही गायलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ‘ज्योति कलश छलके’ हे गाणे फार आवडते.
मित्रांनो, तुम्हीदेखील माझ्यासोबत या गाण्याचा आस्वाद घ्यावा.
#Audio# (ध्वनिफीत)
माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्रीच्या या काळात आपण शक्तीची उपासना करतो, आपण नारी-शक्तीचा उत्सव साजरा करतो. व्यवसायापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत आणि शिक्षण क्षेत्रापासून विज्ञानापर्यंत तुम्ही कोणतेही क्षेत्र बघा - देशाच्या सुकन्या प्रत्येक ठिकाणी स्वतःची पताका फडकावत आहेत. आज त्या अशा आव्हानांवर मात करत आहेत ज्यांची कल्पना करणे देखील अशक्य आहे. जर मी तुम्हाला विचारले की तुम्ही समुद्रात सतत 8 महिने राहू शकाल? किंवा तुम्ही समुद्रात शिडाच्या म्हणजेच वाऱ्याच्या जोरावर पुढे जाणाऱ्या होड्यांतून 50 हजार किलोमीटरचा प्रवास करू शकता? आणि तेही अशा परिस्थितीत की जेव्हा समुद्रातील हवामान कधीही बिघडू शकते. असे करताना तुम्ही हजार वेळा विचार कराल, मात्र भारतीय नौदलातील दोन शूर वीरांगनांनी सागर परीक्रमेदरम्यान हे करून दाखवले आहे. साहस आणि दृढ निश्चय काय असतो ते त्यांनी दाखवून दिले आहे. आज मी ‘मन की बात’ मध्ये श्रोत्यांना याच दोन साहसी अधिकाऱ्यांची ओळख करून देऊ इच्छितो. एक आहे लेफ्टनंट कमांडर दिलना आणि दुसरी आहे लेफ्टनंट कमांडर रुपा. या दोन्ही अधिकारी महिला दूरध्वनी द्वारे आपल्याशी जोडल्या आहेत.
पंतप्रधान -हॅलो!
लेफ्टनंट कमांडर दिलना - हॅलो सर |
पंतप्रधान – नमस्कार...
लेफ्टनंट कमांडर दिलना - नमस्कार सर |
पंतप्रधान - तर लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रुपा तुम्ही दोघी माझ्यासोबत आहात ना?
लेफ्टनंट कमांडर दिलना आणि रुपा – होय सर, दोघीही आहोत.
पंतप्रधान – चला तुम्हा दोघींना नमस्कार आणि वणक्कम.
लेफ्टनंट कमांडर दिलना – वणक्कम सर.
लेफ्टनंट कमांडर रूपा - नमस्कार सर |
पंतप्रधान – आता सर्वात आधी तर प्रत्येक देशवासीय तुमच्याबद्दल जाणून घेऊ इच्छितो. तुम्ही सांगा जरा.
लेफ्टनंट कमांडर दिलना – सर, मी लेफ्टनंट कमांडर दिलना. मी भारतीय नौदलात लॉजिस्टिक्स विभागात कार्यरत आहे. मी 2014 मध्ये नौदलात प्रवेश केला. सर मी मुळची केरळ मधील कोझिकोडे गावातील आहे. माझे वडील लष्करात होते आणि आई गृहिणी आहे. माझे पती देखील भारतीय नौदलात अधिकारी आहेत सर आणि माझी बहिण एनसीसीमध्ये नोकरी करते आहे.
लेफ्टनंट कमांडर रूपा – जय हिंद सर. मी लेफ्टनंट कमांडर रूपा आहे आणि 2017 ला नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन केडर मध्ये माझी नेमणूक झाली. माझे वडील तामिळनाडूचे आहेत तर आई पुदुचेरीची आहे. माझे वडील हवाई दलात होते सर, खरंतर सैन्यात जाण्यासाठी मला त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली. माझी आई गृहिणी आहे.
पंतप्रधान – अच्छा, दिलना आणि रुपा, तुमची ही जी सागर परिक्रमा आहे त्याचा अनुभव संपूर्ण देश ऐकू इच्छितो. आणि मला हे निश्चितच माहित आहे की हे साधेसोपे काम नव्हे, अनेक अडचणी आल्या असतील, कित्येक संकटांचा सामना करावा लागला असेल तुम्हाला.
लेफ्टनंट कमांडर दिलना – होय सर. मी तुम्हाला सांगू इच्छिते की जीवनात आपल्याला एक संधी अशी मिळते की आपले जीवन बदलून टाकते. आणि सर ही सागर परिक्रमा ही भारतीय नौदल आणि भारत सरकारने आम्हाला दिलेली अशीच एक संधी होती. या प्रवासात आम्ही सुमारे 47,500 (सत्तेचाळीस हजार पाचशे) किलोमीटरचे अंतर पार केले सर. आम्ही 2 ऑक्टोबर 2024 रोजी गोवा येथून प्रयाण केले आणि 29 मे 2025 रोजी आम्ही परत येऊन ठेपलो. ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी आम्हाला 238 (दोनशे अडतीस) दिवस लागले सर आणि या 238 दिवसांमध्ये या बोटीवर केवळ आम्ही दोघीच होतो सर.
पंतप्रधान – हं..हं
लेफ्टनंट कमांडर दिलना – सर या परिक्रमेसाठी आम्ही तीन वर्ष तयारी केली. नौकानयनापासून आपत्कालीन संवाद साधने कशी चालवायची, डायव्हिंग कसे करतात तसेच बोटीवर कोणतीही आपत्कालीन स्थिती उद्भवली, उदाहरणार्थ, आरोग्य विषयक आपत्कालीन स्थिती उद्भवली तर परिस्थिती कशी हाताळायची अशा सगळ्याचे प्रशिक्षण भारतीय नौदलाने आम्हाला दिले सर. आणि या परिक्रमेतील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणता असेल तर आम्ही पॉइंट नीमोवर भारतीय झेंडा फडकवला तो होता सर. सर पॉइंट नीमो ही अशी जागा आहे जी जगातील सर्वात दुर्गम असून तेथून सगळ्यात जवळ कुठली मनुष्यवस्ती असेल तर ती आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील आहे. आणि अशा ठिकाणी शिडाच्या होडीने पोहोचणारी पहिली भारतीय व्यक्ती, पहिली आशियायी व्यक्ती आणि जगातील पहिला मनुष्य आम्ही ठरलो सर आणि ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
पंतप्रधान – वाहवा... तुमचे खूप खूप अभिनंदन
लेफ्टनंट कमांडर दिलना – धन्यवाद सर.
पंतप्रधान: तुमचे सहकारी देखील काही सांगू इच्छितात.
लेफ्टनंट कमांडर रुपा: सर मी असे सांगू इच्छिते की या शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्यांची संख्या एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्यांपेक्षा कितीतरी कमी आहे.आणि खरेतर शिडाच्या नौकेतून जे लोक एकटे पृथ्वी प्रदक्षिणा करतात त्यांची संख्या अवकाशात मोहिमेवर गेलेल्यांपेक्षा देखील कितीतरी कमी आहे.
पंतप्रधान : बरं, इतक्या गुंतागुंतीच्या प्रवासासाठी मोठ्या सांघिक सहकार्याची गरज भासत असेल आणि तेथे तर पथकात केवळ तुम्ही दोघी अधिकारीच होतात. तुम्ही हे सर्व कसे सांभाळलेत?
लेफ्टनंट कमांडर रुपा – होय सर, अशा प्रवासासाठी आम्हांला दोघींना एकत्र मेहनत करावी लागत होती आणि जसे लेफ्टनंट कमांडर दिलनाने सांगितले, हे साध्य करण्यासाठी आम्ही दोघीच होतो नौकेवर आणि आम्हीच नौका दुरुस्त करणारे होतो, इंजिन दुरुस्त करणारे पण आम्हीच होतो. शीड बांधणारे, आरोग्य मदतनीस, स्वयंपाकी, सफाई कामगार, डायव्हर, दिशादर्शक अशा अनेक भूमिका एकच वेळी पार पाडाव्या लागत होत्या. आणि हे साध्य करण्यासाठी भारतीय नौदलाने मोठे योगदान दिले.आणि आम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रशिक्षण दिले. खरंतर आम्ही चार वर्षांपासून एकत्र नौकानयन करत आहोत, त्यामुळे परस्परांचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो.आणि म्हणूनच आम्ही सर्वांना सांगतो की या प्रवासात केवळ एकच उपकरण असे होते जे कधीच बिघडले नाही, आणि ते म्हणजे आम्हा दोघींचे टीम वर्क होते.
पंतप्रधान : बरं, जेव्हा हवामान वाईट होत असे, कारण हे समुद्रातले जग असे आहे की कधीही हवामान बिघडू शकते. तर अशावेळी तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळत होतात.
लेफ्टनंट कमांडर रुपा – सर आमच्या या परिक्रमेत अनेकदा विपरीत स्थितीचा सामना करावा लागला. आम्हांला या प्रवासात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. विशेषतः, दक्षिणी महासागरात हवामान सतत वाईट असे. आम्हाला तीन चक्रीवादळांचा देखील सामना करावा लागला. आमच्या नौकेची लांबी 17 मीटर तर रुंदी केवळ 5 मीटर आहे. कधीकधी तर तीन मजली उंचीच्या लाटा उसळत असत आणि आमच्या प्रवासात आम्ही टोकाची उष्णता आणि कडाक्याची थंडी अशा दोन्ही तापमानांना तोंड दिले. सर, आम्ही जेव्हा अंटार्क्टिकामध्ये नौका चालवत होतो तेव्हा तापमान होते 1 अंश सेल्सियस आणि 90 किमी प्रतितास वेगाने वाहणारी हवा, अशा दोन्हींचा आम्हाला एकाच वेळी सामना करावा लागत होता. थंडीपासून संरक्षणासाठी आम्ही कपड्यांचे 6 ते 7 थर एकावर एक चढवत असू. संपूर्ण दक्षिणी महासागर पार करताना आम्ही असेच कपड्यांचे 7 थर घालून तो प्रवास केला. कधी कधी आम्ही गॅसच्या शेगडीवर आमचे हात शेकत असू सर, आणि कधीकधी तर असे व्हायचे की वारा अजिबात पडलेला असायचा, अशा वेळी आम्ही शीड खाली करून केवळ तरंगत राहायचो. आणि अशा परिस्थितीत सर आमच्या संयमाची खरी परीक्षा असायची.
पंतप्रधान – आपल्या देशातील मुली असे त्रास सहन करत आहेत हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल. बरं, या पृथ्वीप्रदक्षिणेदरम्यान तुम्ही वेगवेगळ्या देशामध्ये थांबत असाल. तेथे कसा अनुभव आला, जेव्हा तिथले लोक भारताच्या या दोन कन्यांना बघत तेव्हा त्यांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होत असतील.
लेफ्टनंट कमांडर दिलना – होय सर, आम्हाला फार चांगले अनुभव आले. आम्ही या 8 महिन्यांमध्ये चार ठिकाणी थांबलो सर. ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, पोर्ट स्टॅनले आणि दक्षिण आफ्रिका येथे थांबा घेतला सर.
पंतप्रधान – प्रत्येक ठिकाणी सरासरी किती वेळ थांबायचात तुम्ही?
लेफ्टनंट कमांडर दिलना – सर आम्ही एका ठिकाणी 14 दिवस राहिलो सर.
पंतप्रधान – एकाच ठिकाणी 14 दिवस?
लेफ्टनंट कमांडर दिलना – होय सर, बरोबर ऐकलेत तुम्ही. आणि सर आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीयाला पाहिले. ते देखील अत्यंत सक्रीय आणि आत्मविश्वासपूर्ण असून भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत. आणि सर आम्हाला असे वाटले की आमचे जे यश आहे ते त्यांना त्यांचे देखील यश वाटत होते. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला वेगवेगळा अनुभव आला, उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियन पार्लमेंटच्या अध्यक्षांनी आम्हाला आमंत्रण दिले आणि आम्हांला खूप प्रोत्साहित केले सर. आणि अशा गोष्टी झाल्या की नेहमीच आम्हाला अभिमान वाटतो. आणि जेव्हा आम्ही न्युझीलंडला जो तेव्हा माउरी लोकांनी आमचे स्वागत केले आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रती आदरभाव व्यक्त केला सर. आणखी एक महत्त्वाची बाब आहे सर. पोर्ट स्टॅनले हे एक दुर्गम बेट आहे जे दक्षिण अमेरिकेच्या जवळ आहे. तिथली एकूण लोकसंख्या केवळ साडेतीन हजार आहे सर. पण तिथे आम्ही एक मिनी भारत पाहिला, तेथे 45 भारतीय लोक राहतात, त्यांनी आम्हाला आपले मानले आणि आम्हाला घरी असल्यासारखेच वाटले सर.
पंतप्रधान : देशातील ज्या सुकन्या तुमच्यासारखेच काही वेगळे करून दाखवण्याची इच्छा मनात धरुन आहेत त्यांना तुम्ही दोघी काय संदेश द्याल.
लेफ्टनंट कमांडर रूपा : सर, मी लेफ्टनंट कमांडर रूपा आता बोलत आहे. तुमच्या माध्यमातून मी सर्वांना असं सांगू इच्छिते की, जर एखाद्यानं अगदी मनापासून कसलीही कुचराई न करता परिश्रम केले तर या विश्वामध्ये काहीही अशक्य नाही. तुम्ही कुठून आले आहात, तुमचा जन्म कुठे झाला आहे, या गोष्टींना काहीही महत्त्व नसते. सर, आम्हा दोघींची इच्छा आहे की, भारतातल्या युवकांनी आणि महिलांनी खूप मोठ-मोठी स्वप्नं पहावीत आणि भविष्यामध्ये सर्व मुलींनी आणि महिलांनी संरक्षण क्षेत्र , क्रीडा क्षेत्र, साहसी क्षेत्रांमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं.
प्रधानमंत्री: दिलना आणि रूपा, तुम्हा दोघींचं बोलणं ऐकून अगदी रोमांचक अनुभवाची अनुभूती मला आली. तुम्ही किती मोठं साहस दाखवलं आहे. तुम्हा दोघींनाही माझ्यावतीने खूप -खूप धन्यवाद. तुमचे परिश्रम, तुमचे यश, तुमची कामगिरी संपूर्ण देशातील युवक-युवतींना निश्चितच खूप प्रेरणा देईल. अशाच प्रकारे तिरंगा अभिमानानं फकडवत रहा, तुम्हा दोघींनाही उत्तम भविष्यासाठी माझ्याकडून खूप-खूप सदिच्छा !!
लेफ्टनंट कमांडर दिलना: थ्यँक्यू सर.
प्रधानमंत्री: खूप-खूप धन्यवाद. वणक्कम. नमस्कारम् !
लेफ्टनंट कमांडर रूपा: नमस्कार सर !
मित्रांनो,
आपले पवित्र सण, उत्सव भारताच्या संस्कृतीला जीवंत ठेवतात. छठ पूजा असेच एक पवित्र पर्व आहे, दिवाळीनंतर छठपूजा केली जाते. सूर्य देवाला समर्पित हे महापर्व खूप विशेष आहे. यामध्ये संध्याकाळी - मावळत्या दिनकराला अर्घ्य दिले जाते. त्याची आराधना केली जाते. छठ पर्व फक्त देशाच्या वेगवेगळ्या भागात साजरं केलं जातं असं नाही, तर अवघ्या जगामध्ये याची वेगवेगळी छटा दिसून येते. आज हा एक वैश्विक उत्सव-सण बनला आहे.
मित्रांनो,
मला तुम्हाला ही गोष्ट सांगताना आनंद वाटतो की, भारत सरकारही छठ पूजेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर तयारीच्या कामामध्ये गुंतले आहे. भारत सरकार छठ महापर्वाला ‘युनेस्का‘च्या ‘इंन्टॅजिबल कल्चरल हेरिटेज लिस्ट‘ मध्ये म्हणजेच युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. छठ पूजा ज्यावेळी युनेस्कोच्या सूचीमध्ये समाविष्ट केले जाईल, त्यावेळी संपूर्ण जगाच्या कोना-कोप-यामधले लोक छठ पूजेची भव्यता आणि दिव्यता यांचा अनुभव घेवू शकतील.
मित्रांनो,
काही काळ आधी भारत सरकारने असाच प्रयत्न कोलकाताच्या दुर्गा पूजेबाबत केला होता. आणि ही दुर्गापूजा आता युनेस्कोच्या सांस्कृतिक सूचीमध्ये समाविष्ट झाली आहे. आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अशाच प्रकारे वैश्विक ओळख निर्माण करून दिली तर, इतर जगालाही त्यांच्याविषयी माहिती समजेल, त्यांना याविषयी जाणून घेता येईल. आणि मग ते लोकही या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी येतील.
मित्रांनो,
2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. गांधीजींनी नेहमीच स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर दिला आणि त्यामध्ये खादी सर्वात प्रमख होते. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर खादीची चमक थोडी कमी होत गेली. परंतु गेल्या 11 वर्षांमध्ये खादीविषयी देशातील लोकांचे आकर्षण खूप वाढले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये खादीच्या विक्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तेजी आल्याचं दिसून आलं आहे. आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की, 2 ऑक्टोबरला खादीचे एखादे कोणतेही उत्पादन जरूर खरेदी करावे. अभिमानाने म्हणा - हे स्वदेशी आहे. ही गोष्ट समाज माध्यमांवर ‘’हॅशटॅग व्होकल फॉर लोकल’’ अशी सामायिकही करावी.
मित्रांनो, खादीप्रमाणे आपल्या हातमाग आणि हस्तकला क्षेत्रामध्येही खूप मोठया प्रमाणावर परिवर्तन घडून आलेलं दिसून येत आहे. आज आपल्या देशामध्ये अनेक उदाहरणं समोर येत आहेत, त्यावरून असं म्हणता येईल की, जर परंपरा आणि नवोन्मेषी कल्पना यांची एकमेकांना जोड मिळाली तर त्याचे अद्भूत अगदी अचंबित करणारे परिणाम दिसून येतात. याचंच एक उदाहरण तामिळनाडूच्या याजह नॅचरल्स चे देता येते. इथे अशोक जगदीशन जी आणि प्रेम सेल्वाराज जी यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून हर्बल रंगांतून कपडे रंगविण्याचं काम सुरू केलं. यामध्ये 200 कुटुंबांना प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार दिला.
झारखंडचे आशीष सत्यव्रत साहू जी यांनी जोहरग्राम ब्रॅंडच्या माध्यमातून आदिवासी विणकाम आणि वस्त्र-प्रावरणे वैश्विक मंचापर्यंत पोहोचवली आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज झारखंडचा सांस्कृतिक वारसा दुस-या देशांच्या लोकांनाही माहिती होऊ लागला आहे.
बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील स्वीटी कुमारी जी यांनीही संकल्प क्रिएशन सुरू केले आहे. मिथिला पेटिंगला त्यांनी महिलांच्या उत्पन्नाचं साधन बनवलं आहे. आज 500 पेक्षा जास्त ग्रामीण महिला, त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि स्वावलंबी बनण्याच्या मार्गावर आहेत. यासर्व यशोगाथा आपल्याला शिकवतात की, आपल्या परंपरांमध्ये ,उत्पन्नाची किती तरी साधने दडलेली आहेत. जर आपला दृढ निश्चय असेल तर, यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आगामी काही दिवसातच आपण विजयादशमी साजरी करणार आहोत. यावर्षीची विजयादशमी आणखी एका कारणामुळे खूप जास्त विशेष आहे. याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष होत आहेत. एका शताब्दीचा हा प्रवास जितका अद्भूत आहे, अभूतपूर्व आहे, तितका तो प्ररेक आहे. आजपासून 100 वर्षांपूर्वी ज्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती, त्यावेळी देश अनेक युगांपासून गुलामीच्या साखळदंडामध्ये बांधलेला होता. शतकांपासून सुरू असलेल्या या गुलामीने आपल्या स्वाभिमानाला आणि आत्मविश्वासाला खूप खोलवर इजा पोहोचवली होती. संपूर्ण विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतीसमोर तिची ओळख तरी शिल्लक राहणार की नाही, असे संकट उभे केले जात होते. देशवासी हीन-भावनेचे शिकार होत होते. म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच इतरांच्या वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होणेही तितकंच महत्वाचं होतं. अशा काळामध्ये परमपूज्य डॉक्टर हेडगेवार जी यांनी या विषयी विचारमंथन सुरू केले आणि त्यानंतर या भगीरथ कार्यासाठी त्यांनी 1925 च्या विजयादशमीच्या शुभदिनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना केली. डॉक्टर साहेब गेल्यानंतर परम पूज्य गरूजींनी राष्ट्रसेवेचा हा महायज्ञ पुढे सुरू ठेवला. परमपूज्य गुरूजी असे म्हणायचे की - ‘‘ राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम‘‘ याचा अर्थ असा की, ही गोष्ट माझी नाही. ती राष्ट्राची आहे. यामध्ये स्वार्थाच्याही पलिकडे जावून राष्ट्रासाठी समर्पण भाव आपल्याठायी निर्माण करण्याची प्रेरणा आहे. गोळवलकर गुरूजींच्या या वाक्यामुळे लक्षावधी स्वयंसेवकांना त्याग आणि सेवा यांचा मार्ग दाखवला. त्याग आणि सेवेची भावना आणि शिस्तीचे धडे, हीच संघाची खरी ताकद आहे. आज आरएसएस 100 वर्षे विना थकता, विना थांबता, अखंड राष्ट्रसेवेच्या कार्यामध्ये गुंतलेला आहे. म्हणूनच आपण पाहतो आहोत, देशामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर आरएसएसचे स्वयंसेवक सर्वात प्रथम तिथे पोहोचतात. लक्षावधी स्वयंसेवकांचे जीवन प्रत्येक कर्म, प्रत्येक प्रयत्न हे राष्ट्र प्रथम ‘नेशन फर्स्ट‘ या भावनेने संघ कार्यकर्ते करतात. राष्ट्र प्रथम, सर्वोपरी असेच त्यांना वाटते. राष्ट्रसेवेच्या या महायज्ञामध्ये स्वतःला समर्पित करणा-या प्रत्येक स्वयंसेवकाला मी आपल्या शुभेच्छा अर्पित करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या महिन्यामध्ये 7 ऑक्टोबरला महर्षि वाल्मिकी जयंती आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, महर्षी वाल्मिकी भारतीय संस्कृतीचे किती मोठे आधार आहेत. ज्यांनी आपल्याला भगवान रामाच्या अवताराची कथा इतक्या विस्ताराने सांगितली ते, महर्षी वाल्मिकीच होते. त्यांनी मानवतेला रामायणासारखा अद्भूत, महान ग्रंथ दिला.
मित्रांनो, रामायणाचा हा प्रभाव त्यामध्ये असलेल्या भगवान रामांचे आदर्श आणि त्यांची मूल्ये यांच्यामुळे आहे. भगवान राम यांनी सेवा, समरसता आणि करूणा भावनेने सर्वांना अलिंगन दिले होते. म्हणूनच आपण पाहतो, महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणामध्ये राम, हे माता शबरी आणि निषादराज यांच्याबरोबरच पूर्ण होतात. म्हणूनच मित्रांनो, अयोध्येमध्ये ज्यावेळी राम मंदिराचे निर्माण कार्य झाले, त्याच्याबरोबरच निषादराज आणि महर्षी वाल्मिकी यांचेही मंदिर बनविण्यात आले आहे. आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की, तुम्ही सर्वजण ज्यावेळी अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहात, त्यावेळी महर्षि वाल्मिकी आणि निषादराज मंदिरांमध्ये जावून जरूर दर्शन घ्यावे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
कला, साहित्य आणि संस्कृती सर्वांची एक खास गोष्ट असते, ती अशी की, एका विशिष्ट परिघामध्ये या गोष्टी बांधलेल्या नसतात. त्यांचा सुगंध सर्व सीमेच्या पलिकडे जावून लोकांच्या मनाला स्पर्श करीत असतो. अलिकडेच पॅरिसची एक संस्कृतिक संस्था ‘‘सौन्त्ख मंडपा‘‘ ने आपली 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या केंद्राने भारतीय नृत्याला लोकप्रिय बनविण्यासाठी खूप व्यापक योगदान दिले आहे. या केंद्राची स्थापना मिलेना सालविनी यांनी केली होती. त्यांना काही वर्षांपूर्वी पद्मश्री देवून सन्मानित केले होते. ‘‘सौन्त्ख मंडपा‘‘बरोबर जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचे मी खूप -खूप अभिनंदन करतो.
आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांना अनेकानेक शुभेच्छा देतो.
मित्रांनो, आता मी आपल्याला दोन लहान ऑडिओ क्लिप ऐकवणार आहे. त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे.
# ऑडिओ क्लिप -1#
आता दुसरी क्लिपही ऐकावी:
#ऑडिओ क्लिप -2#
मित्रांनो, हा आवाज या गोष्टीचा साक्षीदार आहे की, भूपेन हजारिका जी यांच्या गीतांमुळे कशा प्रकारे जगभरातील वेगवेगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत.
वास्तविक, श्रीलंकेमध्ये एक अतिशय कौतुकास्पद प्रयत्न झाला आहे. यामध्ये भूपेन दा यांचे लोकप्रिय गीत ‘मनुहे-मनुहार बाबे‘ याचा श्रीलंकेतील कलाकारांनी सिंहली आणि तमिळमध्ये अनुवाद केला आहे. आत्ताच मी आपल्याला त्याचा ऑडिओ ऐकवला आहे. काही दिवसांपूर्वी मला आसाममध्ये त्यांच्या जन्म-शताब्दी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं सद्भाग्य मिळालं. खरोखरीच हा खूप संस्मरणीय कार्यक्रम झाला.
मित्रांनो, आसाममध्ये आज जिथे भूपेन हजारिका जी यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे, त्याच आसामबाबत एक दुःखद घटना काही दिवसांपूर्वी घडली. जुबीन गर्ग यांचं अकाली निधन झालं. या दुर्घटनेमुळे लोकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
जुबीन गर्ग एक लोकप्रिय गायक होते. त्यांनी देशभरामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आसामच्या संस्कृतीशी त्यांचं दृढ नातं होतं. जुबीन गर्ग आपल्या कायम स्मरणामध्ये राहतील आणि त्यांचं संगीत आगामी पिढ्यांना मंत्रमुग्ध करीत राहील.
जुबीन गर्ग, आसिल
अहोमॉर हमोसकृतिर, उज्जॉल रत्नो...
जनोतार हृदयॉत, तेयो हदाय जियाय, थाकीबो !
[Translation:Zubeen was the Kohinoor (the brightest gem) of Assamese Culture. Though he is physically gone from our midst, he will remain forever in our hearts.]
[अनुवाद : झुबीन हे आसामी संस्कृतीचे कोहिनूर (सर्वात तेजस्वी रत्न) होते. ते शरीराने आपल्यामधून गेले असले तरी, त्यांचे स्थान आपल्या हृदयामध्ये कायम राहील.]
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वी आपल्या देशानं एक महान लेखक, चिंतक एस.एल. भैरप्पा यांनाही गमावलं. माझा आणि भैरप्पा जींचा व्यक्तिगत संपर्कही होता आणि आमच्यामध्ये अनेकवार वेगवेगळ्या विषयांवर अगदी सखोल चर्चाही झाली. त्यांच्या साहित्यकृती युवा पिढीला वैचारिक दिशा देतील. कानडीमध्ये त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांचे अनुवादही उपलब्ध आहेत. आपली पाळेमुळे आणि संस्कृतीविषयी अभिमान करणे, किती महत्वाचे आहे, हे त्यांनी मला एकदा सांगितलं होतं. मी एस.एल. भैरप्पा जींना मनःपूर्वक श्रध्दांजली अर्पण करतो. आणि युवकांनी त्यांचं साहित्य जरूर वाचावं, असा आग्रह करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आगामी काळात एका पाठोपाठ एक सण आनंद घेऊन येत आहेत . प्रत्येक सणाच्या निमित्ताने आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो आणि यावेळी तर जी. एस. टी. बचत उत्सवही सुरु आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, एक संकल्प करून तुम्ही आपल्या सण-समारंभांना आणखी विशेष-खास बनवू शकता. आपण असा दृढनिश्चय करावा की, हे सर्व सण फक्त स्वदेशी गोष्टींचा वापर करूनच साजरे करायचे. तुमच्या या निश्चयामुळे पहा, आपल्या सणांची रंगत, चमक अनेक पटींनी वाढेल. ‘व्होकल फॉर लोकल‘ हा आपल्या सर्वांचा खरेदीचा एक मंत्र बनला पाहिजे. तर मग हा निर्धार करावा. तसंच नेहमीसाठीही, देशामध्ये निर्माण होणा-या वस्तूच आपण खरेदी करायच्या आहेत. ज्या गोष्टी आपल्या देशातील लोकांनी तयार केल्या आहेत, त्याच आपण घरी घेवून जायचे आहे. ज्या वस्तूच्या निर्मितीमागे आपल्या देशाच्या कोणा एका नागरिकाचे परिश्रम आहेत, तेच सामान वापरलं जावं. ज्यावेळी आपण असा निर्धार करतो, त्यावेळी आम्ही फक्त काही सामान खरेदी करीत नसतो तर, आपण कोणा एका कुटुंबाच्या आशा, आकांक्षा घरी घेवून जात असतो. कोणा कारीगराच्या परिश्रमाचा सन्मान करीत असतो. कोणा एका युवा उद्योजकाच्या स्वप्नांना पंख देत असतो, बळ देत असतो.
मित्रांनो,
सण-उत्सवामुळे आपण सर्वजण आपल्या घराच्या स्वच्छतेच्या कामामध्ये व्यग्र होतो. परंतु स्वच्छता फक्त घराच्या चार भिंतींपुरती मर्यादित राहून उपयोगी नाही. आपली गल्ली, बोळ, परिसर, बाजार,गाव अशा सर्व ठिकाणी स्वच्छता कायम राखणे आपलीच जबाबदारी आहे.
मित्रांनो,
आपल्याकडे हा संपूर्ण कालावधी म्हणजे सण-समारंभाचा काळ असतो. आणि दिवाळी एक प्रकारे महा-उत्सव असतो. आपल्या सर्वांना मी आगामी दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा देतो. परंतु त्याच्याबरोबरच एक गोष्टीचा पुनरूच्चारही करतो की, आपल्याला आत्मनिर्भर, स्वावलंबी बनायचं आहे. देशाला स्वावलंबी बनावयचं आहे आणि या ध्येयाचा मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो.
मित्रांनो, ‘मन की बात‘ मध्ये यावेळी इतकेच! पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा नवीन यशोगाथा आणि प्रेरणादायी माहिती घेवून तुमच्याशी संवाद साधेन. तोपर्यंत, आपल्या सर्वांना शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद!!
Amar Shaheed Bhagat Singh is an inspiration for every Indian, especially the youth of the country. #MannKiBaat pic.twitter.com/6yE1a73H9e
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
Lata Didi's songs comprise everything that stirs human emotions. The patriotic songs she sang had a profound impact on people. #MannKiBaat pic.twitter.com/XCcbXLAEyH
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
India's Nari Shakti is making a mark in every field. #MannKiBaat pic.twitter.com/LGAH8xKplo
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
Lieutenant Commander Dilna and Lieutenant Commander Roopa have exemplified true courage and unshakable resolve during the Navika Sagar Parikrama. #MannKiBaat pic.twitter.com/McWDkNBTFT
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
Chhath Puja honours Surya Dev with offerings to the setting sun. Once local, it is now becoming a global festival. #MannKiBaat pic.twitter.com/KIgB6kdm05
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
Over the last 11 years, the attraction for Khadi has grown remarkably, with sales rising steadily. #MannKiBaat pic.twitter.com/AIHtbDT9rR
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
India's handloom and handicraft sector is undergoing a remarkable transformation. #MannKiBaat pic.twitter.com/5NrH8Kzt38
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
The RSS has been relentlessly and tirelessly engaged in national service for over a hundred years. #MannKiBaat pic.twitter.com/1tle1CRHWI
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
Remembering the noble ideals of Maharshi Valmiki. #MannKiBaat pic.twitter.com/AJ8t3Xadbn
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
Indian culture transcends all boundaries, touching hearts not just across India but around the world. #MannKiBaat pic.twitter.com/eadFE7S8PH
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
Let us make 'Vocal for Local' the shopping mantra. #MannKiBaat pic.twitter.com/yNUC3dBj4W
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025
Cleanliness should extend beyond our homes, becoming our responsibility everywhere - in streets, neighbourhoods, markets and villages. #MannKiBaat pic.twitter.com/W08219X4HO
— PMO India (@PMOIndia) September 28, 2025


