क्वालालंपूरमधील भारतीय समुदायाने दिलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे, इथला भारतीय समुदाय भारत आणि मलेशिया दरम्यान एक भक्कम दुवा म्हणून काम करत आहे : पंतप्रधान
मलेशिया हा जगात सर्वाधिक मोठ्या संख्येने भारतीय वंशाचा समुदाय असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, भारत आणि मलेशियाची हृदये जोडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत : पंतप्रधान
इथल्या समुदायाने शतकानुशतके ज्या प्रकारे परंपरा जपल्या आहेत ते उल्लेखनीय आहे. आपण अलिकडेच मन की बात या मासिक रेडिओ संवादात तुमच्याबद्दल बोललो होतो, मलेशियातील 500 पेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांना भारतीय भाषा शिकवल्या जात असल्याची माहिती आपण या संवादातून 1.4 अब्ज भारतीयांना दिली होते : पंतप्रधान
मलेशियातील तामिळ समुदाय विविध क्षेत्रांच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहे, हा समुदाय गेल्या अनेक शतकांपासून इथे वसला आहे. या इतिहासातून प्रेरणा घेत मलाया विद्यापीठात तिरुवल्लुवर अध्यासन (Thiruvalluvar Chair) स्थापन केले गेले, याचा आम्हाला अभिमान आहे. आता आपला परस्पर सामायिक वारसा अधिक दृढ करण्यासाठी आम्ही तिरुवल्लुवर केंद्र स्थापन करणार आहोत : पंतप्रधान
भारताचे यश हे मलेशियाचे यश आहे, हे आशियाचे यश आहे. म्हणूनच इम्पॅक्ट (IMPACT) हा आपल्यामधील संबंधांमागचा मार्गदर्शक शब्द असल्याचे मी म्हणतो, म्हणजेच इंडिया मलेशिया पार्टनरशीप फॉर अॅडव्हान्सिंग कलेक्टिव्ह ट्रान्सफर्मेशन : पंतप्रधान
तुमच्यापैकी अधिकाधिक लोकांनी अतुल्य भारताचा अनुभव घेण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन मी करतो, तुम्ही तुमच्या मलय मित्रांनाही सोबत आणावे, कारण लोकांमधील परस्पर संबंध हेच आपल्या मैत्रीचे सार आहे : पंतप्रधान
युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, युरोपीय संघ अथवा अमेरिका असो, भारताकडे विकासाचा एक विश्वासार्ह भागिदार म्हणून पाहिले जाते, या देशांचे भारताशी व्यापारी करार आहेत. विश्वासार्हता हेच भारताचे सर्वात मजबूत चलन बनले आहे : पंतप्रधान
पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सुधारणांवर दिलेला भर, त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि 2025 मधील आसियानच्या आयोजनातील त्यानी पार पाडलेली सक्षम अध्यक्षतेची भूमिका याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. या स्वागतातील उत्साहातून आपल्या परस्पर सामायिक संस्कृतीमधील सुंदर विविधतेचे प्रतिबिंब  उमटल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे प्रिय मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे आभार मानले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम आपल्याला विमानतळावर घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी स्वतःच्या गाडीतून आपल्याला या कार्यक्रमात आणले, याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनात केला. यातून पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे भारताप्रती आणि इथल्या लोकांसाठी असलेले प्रेम आणि आदराची भावना दिसून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

800 पेक्षा जास्त नृत्य कलाकारांनी समन्वय राखून केलेला विक्रमी सांस्कृतिक कलाविष्कार अनेक वर्षे स्मरणात राहील असे ते म्हणाले. त्यांनी सर्व कलाकारांचे अभिनंदनही केले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत, ते पंतप्रधान होण्याआधीपासूनची मैत्री आहे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सुधारणांवर दिलेला भर, त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि 2025 मधील आसियानच्या आयोजनातील त्यानी पार पाडलेली सक्षम अध्यक्षतेची भूमिका याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.

गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी आपण मलेशियाला येऊ शकलो नाही याचे स्मरण त्यांनी करून दिले. त्यावेळीच आपण लवकरच मलेशियाला भेट देऊ असे आश्वासन दिले होते आणि ते आश्वासन आज पूर्ण केले आहे असे ते म्हणाले. 2026 मधला हा आपला पहिला परदेश दौरा असल्याचे त्यांनी नमूद केले, उत्सवाच्या काळात आपण इथल्या समुदायासोबत असल्याबद्दल आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने संक्रांती, पोंगल आणि थाईपुसम अत्यंत उत्साहात साजरे केले असतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शिवरात्री जवळ येत आहे, त्यानंतर रमजानची सुरुवात होईल आणि नंतर हरि रायाचा सण येणार असल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. सर्वांना सुख आणि उत्तम आरोग्यासाठीच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

मोदी म्हणाले की मलेशियात जगातली दुसऱ्या क्रमांकाची भारतीय वंशाची लोकसंख्या आहे आणि भारत-मलेशियाच्या मनाला जोडणाऱ्या खूप गोष्टी आहेत. थोड्यावेळापूर्वी त्यांनी जे प्रदर्शन पाहिले, ते हे सगळे संबंध खूप सुंदररीत्या दाखवते, असे ते म्हणाले. “भारतीय वंशाचा समुदाय म्हणजे दोन्ही देशांना जोडणारा जिवंत पूल आहे. सामायिक परंपरा आणि चवींमधून हे सांस्कृतिक नाते दिसते. रोटी कॅनाई आणि मलबार परोटा, तसेच नारळ, मसाले आणि तेह तारिक - हे क्वालालंपूर आणि कोची दोन्हीकडे अगदी ओळखीचे वाटतात,” असे मोदी म्हणाले. दोन्ही देशांचे लोक एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात, कदाचित त्यांच्या भाषांमध्ये आणि मलेय भाषेत असलेल्या खूप समान शब्दांमुळे असे घडत असेल, असेही त्यांनी सांगितले. मलेशियात भारतीय चित्रपट आणि संगीत लोकप्रिय आहेत, असेही आपण ऐकल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम छान गातात आणि त्यांना एम. जी. रामचंद्रन यांची तमिळ गाणीही खूप आवडतात, हेही मोदींनी सांगितले.

 

पंतप्रधानांनी सांगितले की मलेशियातल्या भारतीय वंशाच्या लोकांच्या मनात भारताला खास जागा आहे. 2001 मधला एक प्रसंग आठवत ते म्हणाले की गुजरातमध्ये भूकंप आला तेव्हा या समुदायातले खूप लोक मदतीसाठी एकत्र आले होते, आणि त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. “मलेशियातल्या या समुदायाचे हजारो पूर्वज भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मोठे त्याग करून गेले. त्यातले अनेक जणांनी भारत कधीच पाहिलेला नव्हता, तरी ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेत सामील होणाऱ्यांमध्ये अग्रेसर होते,” असे मोदी म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ मलेशियातल्या भारतीय सांस्कृतिक केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. मलेशियातल्या नेताजी सेवा केंद्र आणि नेताजी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या कामालाही त्यांनी सलाम केला.

पंतप्रधानांनी पुन्हा सांगितले की मलेशियातल्या भारतीय वंशाच्या लोकांनी शतकानुशतके आपली परंपरा टिकवून ठेवली आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात आपण या समुदायाचा उल्लेख केला होता, असे आठवत ते म्हणाले की मलेशियात 500 पेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांना भारतीय भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. “तिरुवल्लुवर आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या संतांचा प्रभाव मलेशियात दिसतो, आणि बातू केव्ह्ज इथला थायपुसम उत्सव तर पालनीसारखाच दिव्य वाटतो,” असे मोदी म्हणाले. गरबा मलेशियात लोकप्रिय आहे, असेही त्यांनी सांगितले, आणि शीख समुदायाशी असलेले सांस्कृतिक नाते भारत मनापासून जपतो, कारण हा समुदाय गुरु नानक देव यांच्या शिकवणीचा प्रचार करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले की 'तमिळ' ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. तमिळ साहित्य अजरामर आहे, तमिळ संस्कृती जागतिक आहे आणि तमिळ लोकांनी आपल्या कौशल्यांनी मानवतेची सेवा केली आहे. “भारताचे उपराष्ट्रपती थिरु सी. पी. राधाकृष्णन, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. मुरुगन हे सगळे तमिळनाडूचे आहेत,” असे मोदींनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की मलेशियातला तमिळ प्रवासी समाज वेगवेगळ्या क्षेत्रांत समाजासाठी काम करत आहे, आणि हा समाज अनेक शतकांपासून मलेशियात आहे. या इतिहासातून प्रेरणा घेऊन भारतानं मलाया विद्यापीठात तिरुवल्लुवर चेअर सुरू केली आहे आणि आता सामायिक वारसा अजून मजबूत करण्यासाठी तिरुवल्लुवर केंद्रही उघडणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

पंतप्रधानांनी सांगितले की भारत-मलेशिया संबंध दरवर्षी नवीन उंची गाठत आहेत. पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या 2024 मधील नवी दिल्ली भेटीची आठवण करून देत त्यांनी नमूद केले की द्विपक्षीय संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीपर्यंत उन्नत करण्यात आले आहे. ते म्हणाले की दोन्ही देश आता प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने भागीदार म्हणून हातात हात घालून वाटचाल करत आहेत आणि एकमेकांच्या यशाचा आनंद आपलाच मानून साजरा करत आहेत.

मोदी यांनी आठवण जागवली की चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दिलेल्या शुभेच्छांनी ते भारावून गेले होते आणि भारताचे यश हे मलेशियाचे आणि आशियाचेही यश आहे, यावर त्यांनी सहमती दर्शवली. ते म्हणाले की या संबंधांचा मार्गदर्शक शब्द 'इम्पॅक्ट' (IMPACT) आहे, ज्याचा अर्थ 'सामूहिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी भारत-मलेशिया भागीदारी' असा आहे. त्यांनी संबंधांचा वेग, महत्त्वाकांक्षेची व्याप्ती आणि लोकांसाठीचे फायदे यासाठी ही भागीदारी परिणामकारक ठरल्याचे सांगत दोन्ही देश संपूर्ण मानवजातीला फायदा पोहोचवू शकतात, असे स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी सांगितले की भारतीय कंपन्या मलेशियासोबत काम करण्यास नेहमीच उत्सुक राहिल्या आहेत. मलेशियातील पहिला व आशियातील सर्वात मोठा इन्सुलिन उत्पादन प्रकल्प उभारण्यातील भारताच्या भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला. "100 पेक्षा जास्त भारतीय आयटी कंपन्या मलेशियामध्ये कार्यरत आहेत, ज्यामुळे हजारो रोजगारांची निर्मिती होत आहे, आणि मलेशिया-भारत डिजिटल परिषद डिजिटल सहकार्यासाठी नवीन मार्ग प्रशस्त करत आहे," असे मोदी म्हणाले. भारताची यूपीआय प्रणाली लवकरच मलेशियामध्ये सुरू होईल, अशी घोषणा त्यांनी केली.

 

मोदी म्हणाले की भारत आणि मलेशिया हिंदी महासागराचे समान निळे पाणी सामायिक करतात. त्यांनी सर्वांना भारताच्या विविध भागांना भेट देण्याचे आमंत्रण दिले. "पायाभूत सुविधांमध्ये भारताची अभूतपूर्व वाढ, एका दशकात विमानतळांची संख्या दुप्पट करणे, विक्रमी वेगाने महामार्ग बांधणे आणि वंदे भारतसारख्या आधुनिक गाड्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवणे," यांचा मोदी यांनी उल्लेख केला. आपल्या मलेशियन मित्रवर्गासह अधिकाधिक लोकांनी भारताला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. असा संपर्क दोन्ही देशांमधील मैत्रीचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पंतप्रधानांनी सांगितले की गेल्या दशकात भारताचा कायापालट झाला आहे. "अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत आता जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे," असे मोदींनी अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की 'मेक इन इंडिया' उपक्रमाने एका लहान रोपट्यापासून विकसित होऊन भारताला जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक बनवले आहे, तर 2014 पासून संरक्षण निर्यातीत जवळपास 30 पटीने वाढ झाली आहे. "भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप हब बनला आहे आणि त्याने जगातील सर्वात मोठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि फिनटेक इकोसिस्टम तयार केली आहे, जिथे जगातील जवळपास अर्धे रिअल-टाइम डिजिटल व्यवहार यूपीआयद्वारे होतात. भारताची वाढ स्वच्छ आणि हरित आहे आणि गेल्या दशकात सौर ऊर्जा क्षमता सुमारे 40 पटीने वाढली आहे," यावर मोदींनी भर दिला.

 

पंतप्रधान म्हणाले की भारताकडे आता केवळ एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जात नाही, तर गुंतवणूक आणि व्यापाराचे केंद्र, तसेच विकासासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिले जाते. त्यांनी पुढे सांगितले की भारताचे यूके, यूएई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, युरोपियन युनियन आणि अमेरिकेशी व्यापारी करार आहेत आणि विश्वास हे भारताचे सर्वात मोठे चलन बनले आहे.

 

 

पंतप्रधानांनी सांगितले की भारत आपल्या अनिवासी भारतीयांना नेहमीच खुल्या दिलाने स्वीकारेल. त्यांनी भारतीय वंशाच्या सहाव्या पिढीपर्यंतच्या मलेशियन नागरिकांना ओसीआय कार्डची पात्रता देण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर प्रकाश टाकला. मोदी यांनी इंडियन स्कॉलरशिप्स ट्रस्ट फंडद्वारे भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला आणि विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी आगामी थिरुवल्लुवर शिष्यवृत्तीची घोषणा केली. त्यांनी 'भारताला जाणून घ्या म्हणजेच नो इंडिया प्रोग्राम' आणि मलेशियामध्ये लवकरच उघडल्या जाणाऱ्या भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचाही उल्लेख केला, ज्यामुळे संबंध अधिक दृढ होतील.

 

पंतप्रधानांनी सांगितले की 1.4 अब्ज भारतीयांचे 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे ध्येय आहे आणि या प्रवासात अनिवासी भारतीय समुदाय एक मौल्यवान भागीदार आहे. "कुआलालंपूरमध्ये जन्मलेले असोत किंवा कोलकातामध्ये, भारत अनिवासी भारतीयांच्या हृदयात वसलेला आहे. ते मलेशिया आणि भारताच्या प्रगतीचा एक सक्रिय भाग आहेत आणि ते समृद्ध मलेशिया व विकसित भारताची संकल्पना साकार करण्यास मदत करतील," असे सांगून मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India Exports 3.15 lakh Tonnes Sugar in Oct-Feb of 2025-26 Marketing Year: AISTA

Media Coverage

India Exports 3.15 lakh Tonnes Sugar in Oct-Feb of 2025-26 Marketing Year: AISTA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares a Sanskrit Subhashitam, highlights the power of courage and willpower to overcome challenges
March 17, 2026

Prime Minister Shri Narendra Modi shared a Sanskrit Subhashitam today, highlighting the significance of self-confidence and inner strength in conquering life's most difficult obstacles.

The Prime Minister remarked that for an individual filled with courage and resolve, nothing in life is impossible. Shri Modi affirmed that we can overcome the most difficult challenges on the strength of willpower and self-confidence.

The Prime Minister wrote on X;

"जो व्यक्ति साहस और संकल्प से भरा हो, उसके लिए जीवन में कुछ भी असंभव नहीं। आत्मविश्वास और इच्छाशक्ति के बल पर हम कठिन से कठिन चुनौतियों को पार कर सकते हैं।

एकोऽपि सिंहः साहस्रं यूथं मथ्नाति दन्तिनाम् ।
तस्मात् सिंहमिवोदारमात्मानं वीक्ष्य सम्पतेत्॥"

Just as one lion has the power to defeat a thousand elephants, in the same way a person should engage in noble actions fearlessly, with courage, confidence, and inner strength like a lion.