क्वालालंपूरमधील भारतीय समुदायाने दिलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे, इथला भारतीय समुदाय भारत आणि मलेशिया दरम्यान एक भक्कम दुवा म्हणून काम करत आहे : पंतप्रधान
मलेशिया हा जगात सर्वाधिक मोठ्या संख्येने भारतीय वंशाचा समुदाय असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, भारत आणि मलेशियाची हृदये जोडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत : पंतप्रधान
इथल्या समुदायाने शतकानुशतके ज्या प्रकारे परंपरा जपल्या आहेत ते उल्लेखनीय आहे. आपण अलिकडेच मन की बात या मासिक रेडिओ संवादात तुमच्याबद्दल बोललो होतो, मलेशियातील 500 पेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांना भारतीय भाषा शिकवल्या जात असल्याची माहिती आपण या संवादातून 1.4 अब्ज भारतीयांना दिली होते : पंतप्रधान
मलेशियातील तामिळ समुदाय विविध क्षेत्रांच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहे, हा समुदाय गेल्या अनेक शतकांपासून इथे वसला आहे. या इतिहासातून प्रेरणा घेत मलाया विद्यापीठात तिरुवल्लुवर अध्यासन (Thiruvalluvar Chair) स्थापन केले गेले, याचा आम्हाला अभिमान आहे. आता आपला परस्पर सामायिक वारसा अधिक दृढ करण्यासाठी आम्ही तिरुवल्लुवर केंद्र स्थापन करणार आहोत : पंतप्रधान
भारताचे यश हे मलेशियाचे यश आहे, हे आशियाचे यश आहे. म्हणूनच इम्पॅक्ट (IMPACT) हा आपल्यामधील संबंधांमागचा मार्गदर्शक शब्द असल्याचे मी म्हणतो, म्हणजेच इंडिया मलेशिया पार्टनरशीप फॉर अॅडव्हान्सिंग कलेक्टिव्ह ट्रान्सफर्मेशन : पंतप्रधान
तुमच्यापैकी अधिकाधिक लोकांनी अतुल्य भारताचा अनुभव घेण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन मी करतो, तुम्ही तुमच्या मलय मित्रांनाही सोबत आणावे, कारण लोकांमधील परस्पर संबंध हेच आपल्या मैत्रीचे सार आहे : पंतप्रधान
युनायटेड किंगडम, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, युरोपीय संघ अथवा अमेरिका असो, भारताकडे विकासाचा एक विश्वासार्ह भागिदार म्हणून पाहिले जाते, या देशांचे भारताशी व्यापारी करार आहेत. विश्वासार्हता हेच भारताचे सर्वात मजबूत चलन बनले आहे : पंतप्रधान
पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सुधारणांवर दिलेला भर, त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि 2025 मधील आसियानच्या आयोजनातील त्यानी पार पाडलेली सक्षम अध्यक्षतेची भूमिका याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले

महामहिम पंतप्रधान अन्वर इब्राहीम,

माझ्या प्रिय मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो,

सलामत पतांग!

वणक्कम्!

सुखमाणो?

सत श्री अकाल!

बागुन्नारा?

केम-छो?

तुम्हा सर्वांच्या  अभिवादनातील जिव्हाळा आपल्या सामायिक संस्कृतीतील सुंदर विविधतेचे प्रतिबिंब दर्शवतो.

सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे,  या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी आत्ताच आपल्या भाषणात भारत-मलेशिया मैत्रीची व्याप्ती आणि भविष्यातील संधी इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्या, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो.

 

इतकेच नाही तर, पंतप्रधान माझे स्वागत करण्यासाठी विमानतळावर आले आणि त्यांनी मला स्वतःच्या गाडीतून आणले. केवळ स्वतःच्या गाडीतूनच नाही, तर स्वतःच्या शेजारील जागेवर  बसवून आणले. हे विशेष स्वागत भारत आणि तुम्हा सर्वांविषयी  असलेले त्यांचे प्रेम आणि आदर प्रतिबिंबित करणारे आहे.

मी तुमच्या प्रेमळ शब्दांबद्दल, आदरातिथ्याबद्दल आणि मैत्रीबद्दल कृतज्ञ आहे.

मित्रांनो,

आपण आत्ताच एक विक्रम प्रस्थापित करण्याच्या स्तरावरील  सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला. 800 पेक्षा जास्त नर्तक पूर्णपणे तालासुरात आणि समन्वयाने सादरीकरण करत होते. आमचे लोक भावी काळात अनेक वर्षे हा कार्यक्रम लक्षात ठेवतील. मी तुमचे अभिनंदन करतो. मी सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि मी ते पंतप्रधान होण्यापूर्वीपासूनच मित्र आहोत. त्यांनी सुधारणांवर दिलेला भर, त्यांची अफाट बुद्धिमत्ता आणि 2025 मध्ये ‘आसियान’चे  अध्यक्षपद सक्षमतेने भूषवल्याबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो.

गेल्या वर्षी, मी आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मलेशियाला येऊ शकलो नव्हतो. परंतु मी माझ्या या  मित्राला वचन दिले होते की,  मी लवकरच मलेशियाला येईन. आणि दिलेल्या वचनानुसार, मी येथे हजर आहे.

ही माझी 2026 ची पहिली परदेश भेट आहे. या उत्सवांच्या काळात तुमच्या सोबत असताना मला मनापासून आनंद होत आहे. मला आशा आहे की,  सर्वांनी संक्रांत, पोंगल आणि तइ-पूसम् मोठ्या उत्साहात साजरे केले असतील. लवकरच, शिवरात्रीचा उत्सव  येणार आहे. काही दिवसांतच रमजानचा महिना  सुरू होईल आणि त्यानंतर 'हरि राया' मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाईल. तुम्हा सर्वांना सुख आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच माझी कामना आहे.

मित्रांनो,

मलेशियामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची जगातील दुसरी सर्वात मोठी लोकसंख्या आहे. भारतीय आणि मलेशियाई हृदयांना परस्परांशी जोडणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत. ज्याचे  प्रदर्शन पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि मी थोड्या वेळापूर्वी पाहिले, ते या संबंधांना अतिशय सुंदर रीतीने दर्शवते. तुम्ही एक जिवंत सेतू आहात, जो आपल्याला जोडतो.

 

तुम्ही रोटी चनाईला मलाबार परोट्टा सोबत जोडले आहे.

नारळ, मसाले आणि अर्थातच तेह तारिक…

व्यक्ती क्वालालंपुरमध्ये असो किंवा कोच्चीमध्ये, ही चव खूप  परिचयाची वाटते. त्यामुळेच आपण एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. हे कदाचित आपल्या भाषा आणि मलय भाषेतील सामायिक शब्दांच्या मोठ्या संख्येमुळे असावे.

मी असे ऐकले आहे की भारतीय चित्रपट आणि संगीत मलेशियामध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की,  पंतप्रधान अन्वर इब्राहिम खूप छान गातात. परंतु भारतातील अनेक देशवासियांना हे माहिती नव्हते. त्यांच्या मागील दौऱ्यादरम्यान, लोकांना एक सुखद धक्का बसला होता.  एक जुने हिंदी गाणे गातानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता! हे खरोखरच अद्भुत आहे की,  त्यांना महान एम.जी.आर. यांची तमिळ गाणी देखील आवडतात.

मित्रांनो,

मला माहिती आहे की, भारताचे तुमच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. मला 2001 मधील एक घटना अगदी स्पष्टपणे आठवते. ज्यावेळी  माझ्या गृहराज्यात, गुजरातमध्ये भूकंप आला होता, त्यावेळी  तुमच्यापैकी अनेकजण मदतीसाठी पुढे आले होते. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

आणि त्याच्याही खूप आधी, भारताला स्वतंत्र देश बनवण्यासाठी तुमच्या हजारो पूर्वजांनी महान बलिदान दिले. यांपैकी अनेकांनी कधीही भारत पाहिला नव्हता. परंतु ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'इंडियन नॅशनल आर्मी'मध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या लोकांपैकी होते.

 

मित्रांनो,

हे खरोखरच अद्भुत आहे की तुम्ही शतकानुशतके परंपरा जपल्या आहेत. अलीकडेच, मी माझ्या 'मन की बात' या मासिक रेडिओ संवादात तुम्हा सर्वांबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी मी  1.4 अब्ज भारतीयांना सांगितले की, मलेशियामधील 500 पेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांना भारतीय भाषांमध्ये शिकवले जाते.

तिरुवळ्ळुवर आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान संतांचा प्रभाव येथेही जाणवतो. गेल्या आठवड्यात बाटू  गुहांमध्ये साजरा झालेला 'तइ-पूसम्' उत्सव इतका दिव्य होता की, तो पळणीमध्ये होणाऱ्या उत्सवांसारखाच भासत होता. बागान दातोह येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरातील सांस्कृतिक उत्सवही तितकेच भव्य आहेत.

मला असे सांगण्यात आले आहे की,  येथे गरबा खूप लोकप्रिय आहे. येथे राहणाऱ्या शीख बांधवांसोबतचे सांस्कृतिक संबंधही आम्ही आमच्या हृदयात जपले आहेत. तुम्ही 'नाम जपो, किरत करो, वंड छको' यांचा प्रसार करून श्री गुरु नानक देव जी यांच्या शिकवणीला आजही जिवंत ठेवले आहे.

मित्रांनो,

येथे भारताच्या सर्व भागांतील लोक उपस्थित आहेत. सांस्कृतिक एकतेचे सूत्र आपल्याला घट्ट बांधून ठेवते. आपली ताकद ही आहे की,  आपण 'विविधतेत एकता' समजून घेतो.

मित्रांनो,

तमिळ ही जगाला भारताने दिलेली एक भेट आहे. तमिळ साहित्य शाश्वत आहे आणि तमिळ संस्कृती जागतिक आहे. त्याचप्रमाणे, तमिळ लोकांनीही आपल्या प्रतिभेने मानवतेची सेवा केली आहे. आणि मी अभिमानाने सांगतो की, भारताचे उपराष्ट्रपती  सी. पी. राधाकृष्णन जी, आमचे परराष्ट्र मंत्री  जयशंकर,  जे आज आपल्यासोबत आहेत,  भारताचा 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणा-या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि आमचे माहिती आणि  प्रसारण राज्यमंत्री डॉ. मुरुगन, हे सर्व तामिळनाडूचे आहेत.

 

त्याचप्रमाणे, मलेशियातील तमिळ प्रवासी समाजाच्या विविध क्षेत्रांत सेवा बजावत आहेत. प्रत्यक्षात, तमिळ प्रवासी समाज येथे अनेक शतकांपासून वास्तव्यास आहे. या इतिहासापासून प्रेरणा घेऊन, मलाया विद्यापीठामध्ये 'तिरुवळ्ळुवर अध्यासन' स्थापन केल्याचा आम्हाला अभिमान आहे. आता आपण आपला सामायिक वारसा अधिक मजबूत करण्यासाठी एक 'तिरुवळ्ळुवर केंद्र' स्थापन करणार आहोत.

मित्रांनो,  

मलेशियाबरोबरचे आमचे संबंध दरवर्षी नवी उंची गाठत आहेत. 2024 मध्ये, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या नवी दिल्ली दौऱ्याच्या काळात, आम्ही आमच्या संबंधांना एका 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत'  उन्नत केले आहे.

आज, आम्ही  प्रगती आणि समृद्धीच्या दिशेने भागीदार म्हणून हातात हात घालून पुढे जात आहोत. आपण ज्याप्रमाणे  स्वतःच्या यशाचा आनंद करतो, त्याचप्रमाणे  एकमेकांच्या यशाचा आनंद तसाच साजरा करतो.  चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे मला खूप आनंद झाला. माझे प्रिय मित्र, तुमच्या मताशी मी सहमत आहे. भारताचे यश हे मलेशियाचे यश आहे, हे आशियाचे यश आहे.

म्हणूनच, मी म्हणतो की, आमच्या संबंधांचा मार्गदर्शक शब्द आहे— 'इम्पॅक्ट'- आयएमपीएसीटी. म्हणजेच ‘इंडिया मलेशिया पार्टनरशिप फॉर अॅडव्हान्सिंग कलेक्टिव्ह ट्रान्सफॉरमेशन’  अर्थात 'इम्पॅक्ट' म्हणजेच -  सामूहिक परिवर्तनाला गती देण्यासाठी भारत-मलेशिया भागीदारी.

 

आपल्या संबंधांच्या गतीवर ‘इम्पॅक्ट’

आपल्या आकांक्षांच्या व्याप्तीवर ‘इम्पॅक्ट’

आपल्या लोकांच्या फायद्यासाठी ‘इम्पॅक्ट’

एकत्र येऊन, आपण संपूर्ण मानवतेचे कल्याण करू शकतो!

मित्रांनो,

भारतीय कंपन्या मलेशियासोबत काम करण्यासाठी नेहमीच उत्सुक राहिल्या आहेत. मलेशियातील पहिली आणि आशियातील सर्वात मोठी इन्सुलिन निर्मिती सुविधा उभारण्यात आम्ही सहभाग घेतला,  ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

100 पेक्षा जास्त भारतीय आयटी कंपन्या मलेशियामध्ये कार्यरत आहेत, या कंपन्यांमुळे हजारो नोकऱ्यांची निर्मिती झाली आहे. 'मलेशिया-भारत डिजिटल परिषद' आपल्या डिजिटल सहकार्यासाठी नवनवीन मार्ग खुले करत आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, भारताची यूपीआय सेवा लवकरच मलेशियामध्येही सुरू होईल.

मित्रांनो,

आपण सर्वजण एकाच हिंद महासागराचे निळे पाणी सामायिक करतो. महासागराच्या पलीकडे, आपल्याला एकमेकांना भेटण्याची खूप ओढ आहे. मी तुम्हा सर्वांना भारताच्या विविध भागांना भेट देण्यासाठी आमंत्रित करतो.

गेल्या काही वर्षांत, भारताने पायाभूत सुविधा आणि दळणवळण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती पाहिली आहे. एका दशकात आपल्या विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. महामार्गांचे निर्माण विक्रमी वेगाने होत आहे. 'वंदे भारत' सारख्या आधुनिक ट्रेनना आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मिळत आहे. मी तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोकांना प्रवास करण्यासाठी आणि 'अद्भुत भारता'चा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करतो.

 

तुम्ही तुमच्या मलय मित्रांनाही सोबत आणले पाहिजे. एकटे येऊ नका. कारण लोकांमधील परस्पर संवाद हाच आपल्या मैत्रीचा आधार आहे.

मित्रांनो,

ज्यावेळी  आपण 2015 मध्ये भेटलो होतो, त्यावेळी  मी तुमच्याशी भारताच्या क्षमतेबद्दल (Potential) बोललो होतो. आता, मी तुमच्याशी भारताच्या कामगिरीबद्दल (Performance) बोलत आहे. एका दशकात भारताने मोठे परिवर्तन   पाहिले आहे.

त्यावेळी , आम्ही जगातील 11 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतो. आता, आता आम्ही 'अव्वल  3' च्या उंबरठ्यावर  आहोत. आम्ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था देखील आहोत.

त्यावेळी , 'मेक इन इंडिया' हे एक छोटे रोपटे होते, ज्याची नुकतीच लागवड करण्यात आली होती. आता, भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल निर्माता आहे. आपली संरक्षण निर्यात 2014 च्या तुलनेत जवळपास 30 पट वाढली आहे. भारत जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र  देखील बनले  आहे.

आम्ही जगातील सर्वात मोठ्या 'डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा' आणि जगातील सर्वात मोठ्या 'फिनटेक’ परिसंस्थेची निर्मिती केली आहे.

 

आमच्या यूपीआय मंचामुळे, जगातील जवळपास निम्मे ‘रिअल-टाइम’ – वास्तविक वेळेवर डिजिटल व्यवहार भारतात होतात.

वेगाबरोबरच, आमची प्रगती स्वच्छ आणि हरित असेल याचीही आम्ही खातरजमा केली आहे. उदाहरणार्थ, एका दशकात आमची सौर ऊर्जा क्षमता जवळपास 40 पट वाढली आहे.

मित्रांनो,

पूर्वी भारताकडे केवळ एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जात होते. आता, आम्ही गुंतवणूक आणि व्यापाराचे एक केंद्र आहोत. भारताकडे विकासासाठी एक विश्वसनीय भागीदार म्हणून पाहिले जाते. मग ते यूके असो, यूएई असो, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, ईयू किंवा यूएसए असो, या देशांनी भारतासोबत व्यापारी करार केले आहेत. विश्वास हे भारताचे सर्वात मजबूत चलन बनले आहे.

मित्रांनो,

भारत नेहमीच तुम्हा सर्वांचे खुल्या मनाने स्वागत करेल. याच कारणामुळे आम्ही काही महिन्यांपूर्वी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आम्ही भारतीय वंशाच्या मलेशियन नागरिकांसाठी ओसीआय  कार्डची पात्रता 6 व्या पिढीपर्यंत वाढवली आहे.

आम्ही 'भारतीय शिष्यवृत्ती न्यास निधी'ला पाठबळ देत आहोत. आता, आम्ही 'तिरुवळ्ळुवर शिष्यवृत्ती' देखील देणार आहोत, जेणेकरून विद्यार्थी भारतात शिक्षण घेऊ शकतील. तसेच, आम्ही तुम्हाला ‘भारत जाणून घ्या’ कार्यक्रमात ('नो इंडिया प्रोग्राम') पाहण्यासाठी उत्सुक आहोत.

तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, आम्ही लवकरच मलेशियामध्ये भारताचे एक नवीन वाणिज्य दूतावास  उघडणार आहोत. यामुळे आपण एकमेकांच्या अधिक जवळ येऊ.

मित्रांनो,

1.4 अब्ज भारतीयांना 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवायचा आहे.

विकसित भारत घडवायचा आहे ना?

विकसित भारत घडवूनच दाखवणार की नाही?

आपण आपली स्वप्ने साकार करणार की नाही?

आपण स्वप्नांचे रूपांतर संकल्पात करणार की नाही?

आपण संकल्प सिद्धीस नेणार की नाही?

या प्रवासात, आमचे प्रवासी भारतीय आणि भारतीय प्रवासी समुदाय हे एक मौल्यवान भागीदार आहेत. तुमचा जन्म मग क्वालालंपूरमध्ये झाला असो वा कोलकातामध्ये, भारत तुमच्या हृदयात वसतो. तुम्ही मलेशिया आणि भारताच्या प्रगतीचा सक्रिय भाग आहात. तुम्ही समृद्ध मलेशिया आणि विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यात मदत कराल.

जय हिंद!

जुम्पा लागी!

मिक्का नण्ड्री!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways takes up 764 km of new lines to boost connectivity in Bihar’s Seemanchal region

Media Coverage

Indian Railways takes up 764 km of new lines to boost connectivity in Bihar’s Seemanchal region
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांनी निःस्वार्थ सेवेच्या भावनेवर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
August 07, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नि:स्वार्थ सेवेचे गुण आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याचा उदात्त आदर्श अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

"किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥"

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥