पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमच्या राजकुमारी अॅस्ट्रिड यांची भेट घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली 1 ते 8 मार्च 2025 दरम्यान भारतात उच्चस्तरीय बेल्जियन आर्थिक अभियान सुरू आहे.
पंतप्रधानांनी राजकुमारी अॅस्ट्रिड यांचे भारतात स्वागत केले आणि प्रमुख व्यावसायिक नेते, सरकारी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींसह 300 हून अधिक सदस्यांच्या मोठ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या पुढाकाराचे खूप कौतुक केले.
राजकुमारी अॅस्ट्रिड यांची भारतात आर्थिक अभियानाचे नेतृत्व करण्याची ही दुसरी वेळ आहे, ज्याद्वारे उभय देशांमधील प्रगतीपथावर असणाऱ्या मजबूत आर्थिक संबंधांचे महत्त्व अधोरेखित होते.
पंतप्रधान आणि राजकुमारी अॅस्ट्रिड यांच्यात झालेल्या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, नवोन्मेष, स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधा, शेती, कौशल्य, शैक्षणिक आदानप्रदान तसेच सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंधासह विविध क्षेत्रांचा समावेश होता.
दोन्ही बाजूंनी उदयोन्मुख आणि उच्च-प्रभाव असलेल्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी बारकाईने काम करण्यास सहमती दिली, ज्यामुळे आर्थिक लवचिकता मजबूत होईल, नवोन्मेष -नेतृत्वाखालील विकासाला चालना मिळेल आणि दोन्ही देशांच्या जनहितासाठी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होईल.
Pleased to meet HRH Princess Astrid of Belgium. Deeply appreciate her initiative to lead a 300-member Economic Mission to India. Look forward to unlocking limitless opportunities for our people through new partnerships in trade, technology, defence, agriculture, life sciences,… pic.twitter.com/Fjx0x44Vob
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2025


