18,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी.
गंगा नदीवरील सहा पदरी पुलाची केली पायाभरणी.
बिहारमधील 3 रेल्वे प्रकल्प केले राष्ट्राला समर्पित.
बिहारमध्ये नमामि गंगे प्रकल्प अंतर्गत सुमारे 2,190 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या 12 प्रकल्पांचे केले उद्घाटन.
पाटण्यात युनिटी मॉलची केली पायाभरणी.
"बिहारचा अभिमान श्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न हा संपूर्ण बिहारचा सन्मान आहे"
"आमचे सरकार देशातील प्रत्येक गरीब, आदिवासी, दलित आणि वंचित व्यक्तीच्या क्षमता वाढवत आहे"
"बिहारचा विकास, शांतता, बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच बिहारमधील भगिनी आणि मुलींना हक्क - ही मोदींची गॅरंटी आहे"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील औरंगाबाद येथे 21,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले.  आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे आणि नमामि गंगे या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी एका छायाचित्र प्रदर्शनालाही भेट दिली.

बिहार विभूती अनुग्रह नारायण यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान व्यक्तींना जन्म देणाऱ्या  औरंगाबादच्या भूमीवर आज बिहारच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे, असे पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना संबोधित करताना म्हणाले. आज आधुनिक बिहारची झलक दाखवणाऱ्या सुमारे 21,500 कोटी रुपयांच्या रस्ते आणि रेल्वेसह इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जात आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.  अमास-दरभंगा चौपदरी कॉरिडॉर, दानापूर-बिहटा चार पदरी उन्नत मार्ग  आणि पाटणा वळण रस्त्याच्या शेरपूर-दिघवारा टप्प्याच्या पायाभरणीचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आणि ते राष्ट्राला समर्पित करणे ही सध्याच्या सरकारची ओळख आहे. "ही मोदींची गॅरंटी आहे", असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी आरा बायपास रेल्वे मार्ग  आणि नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत बारा प्रकल्पांची पायाभरणी करत असल्याचेही नमूद केले.  बिहारचे लोक, विशेषत: औरंगाबादचे नागरिक वाराणसी-कोलकाता द्रुतगती मार्गाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या मार्गामुळे उत्तर प्रदेश आणि कोलकाता प्रवासाचा वेळ काही तासांनी कमी होईल, असे ते म्हणाले.  पंतप्रधानांनी सध्याच्या  सरकारची कार्यशैली अधोरेखित केली आणि आजच्या विकास प्रकल्पांसाठी बिहारच्या जनतेचे अभिनंदन केले.

 

पंतप्रधानांनी जननायक कर्पूरी ठाकूर यांना आदरांजली वाहिली. ठाकूर यांना नुकतेच  सरकारने भारतरत्न पुरस्काराणे गौरवले आहे.  हा पुरस्कार संपूर्ण बिहारचा सन्मान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  त्यांनी अयोध्या धाम येथील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख करून माता सीतेच्या भूमीत घडलेली ही अत्यंत आनंदाची घटना असल्याचे त्यांनी सांगितले.  बिहारच्या लोकांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने सहभाग नोंदवला, यांची आठवण पंतप्रधानांनी केली.

राज्यात दुहेरी इंजिन सरकार पुन्हा कार्यरत असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, आज बिहार उत्साह आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  बिहारमधील घराणेशाहीच्या राजकारणावरही पंतप्रधानांनी भाष्य केले.

केवळ एका दिवसात उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रमाणाकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की हे दुहेरी इंजिन सरकारच्या कार्यकाळात बदलाच्या गतीचे हे संकेत आहे.  आजच्या रस्ते प्रकल्पांमुळे पाटणा, नालंदा, जहानाबाद, गया, वैशाली, समस्तीपूर आणि दरभंगा या शहरांचे त्याचप्रमाणे बोधगया, विष्णुपद, राजगीर, नालंदा, वैशाली आणि पावापुरी ही पर्यटन स्थळांचा कायापालट होईल, असे पंतप्रधान म्हणाले. लवकरच दरभंगा विमानतळ आणि बिहता विमानतळ देखील या रस्त्याच्या पायाभूत सुविधांशी जोडले जातील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

बिहारच्या पर्यटन क्षेत्राच्या संभाव्य बदलांवर भाष्य करताना, पंतप्रधानांनी वंदे भारत आणि अमृत भारत यांसारख्या आधुनिक गाड्यांना झेंडा दाखवल्याचा आणि अमृत भारत स्थानकांच्या विकासाचा उल्लेख केला.  पंतप्रधानांनी नागरिकांमध्ये वाढत्या असुरक्षिततेच्या दिवसांची  आठवण करून त्यामुळेच तरुणांचे स्थलांतर होत होते, असे  सांगितले. आज मात्र, त्याच प्रदेशात नव्या पिढीतील तरुणांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या युगावर त्यांनी प्रकाश टाकला. बिहारमधील हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांच्या एकता मॉलच्या पायाभरणीचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. हा मॉल राज्यासाठी एक नवीन दिशा आणि सकारात्मक विचार दर्शवतो, असे ते म्हणाले.  “आम्ही बिहारला पुन्हा काळाच्या मागे पडू देणार नाही.  ही गॅरंटी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

“बिहारमधील गरीबांचा विकास होईल तेव्हाच बिहारचा विकास होईल”, असे सांगताना पंतप्रधानांनी गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि वंचितांवर सरकारचे लक्ष केंद्रित आहे, याची ग्वाही  दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ सुमारे 9 कोटी लाभार्थ्यांना मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

उज्ज्वला गॅस जोडणी योजनेचा बिहारमधील 1 कोटी महिलांना फायदा झाला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 90 लाख शेतकरी लाभार्थी असून त्यांच्या खात्यात 22,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, 5 वर्षांपूर्वीपर्यंत फक्त 2 टक्के घरांना नळाद्वारे पाणी मिळत होते, तर आता 90 टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळत आहे. बिहारमध्ये 80 लाख आयुष्मान कार्डधारक आहेत आणि उत्तर कोयल जलाशय योजना लवकरच पूर्ण केली जाईल आणि त्यामुळे बिहार आणि झारखंडमधील 4 जिल्ह्यांतील 1 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे .

“बिहारचा विकास, बिहारमध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था आणि बिहारमधील भगिनी आणि मुलींना हक्क - ही मोदींची हमी आहे”, या हमींची पूर्तता करण्यासाठी आणि आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात विकसित बिहार निर्माण करण्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी केलेल्या विनंतीवरून जमलेल्या समुदायाने आजचा विकासाचा उत्सव आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाइट चालू करून साजरा केला.

यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र व्ही.आर्लेकर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासह इतर संसद सदस्य, विधानसभा सदस्य आणि  बिहार सरकार मधील मंत्रीगण उपस्थित होते.

पार्श्वभूमी

यावेळी पंतप्रधानांनी 18,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन केले त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग-227 च्या जयनगर-नरहिया विभागासह 63.4 किमी लांबीचे दोन मार्ग; राष्ट्रीय महामार्ग-131G वरील कन्हौली ते रामनगर पर्यंत सहा मार्गीका असलेल्या पाटणा रिंग रोडचा भाग; किशनगंज शहरातील विद्यमान उड्डाणपुलाला समांतर 3.2 किमी लांबीचा दुसरा उड्डाणपूल; 47 किमी लांबीचे बख्तियारपूर-राजौली रस्त्याचे चौपदरीकरण; आणि राष्ट्रीय महामार्ग-319 वरील 55 किमी लांबीच्या अरा - पररिया विभागाचे चौपदरीकरण इत्यादी कामांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधानांनी सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी देखील केली, यामध्ये अमास ते शिवरामपूर गावापर्यंतचा 55 किमी लांबीच्या चार- मार्गिका प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम, शिवरामपूर ते रामनगर पर्यंत 54 किमी लांबीचा चार- मार्गिका प्रवेश-नियंत्रित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग; कल्याणपूर गाव ते बलभदरपूर गावापर्यंत 47 किमी लांबीचा चार मार्गिका प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग; बलभदरपूर ते बेला नवाडा हा 42 किमी लांबीचा चार मार्गिका प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग; दानापूर-बिहटा विभागापासून 25 किमी लांबीचा चार पदरी उन्नत कॉरिडॉर; आणि बिहता - कोइलवार विभागाच्या सध्याच्या दोन मार्गिका असलेल्या रस्त्याचे चार मार्गिका रस्त्यामध्ये होणारे आधुनिकीकरण कामांचा  समावेश आहे. या रस्ते प्रकल्पांमुळे दळणवळण सुविधा सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि प्रदेशाचा सामाजिक-आर्थिक विकास साध्य होईल.

 

पाटणा रिंग रोड रस्त्याचा एक भाग म्हणून विकसित होणाऱ्या गंगा नदीवरील सहा मार्गिका पुलाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. हा पूल देशातील सर्वात लांब नदीवरील पुलांपैकी एक असेल. हा प्रकल्प पाटणा शहरातून होणारी वाहतूक कोंडी कमी करेल आणि बिहारच्या उत्तर आणि दक्षिण भागांमध्ये जलद आणि उत्तम  दळणवळण सुविधा प्रदान करेल, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.

पंतप्रधानांनी यावेळी नमामि गंगे योजने अंतर्गत बिहार मधील सुमारे 2,190 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या 12 प्रकल्पांचेही उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये सैदपूर आणि पहाडी  येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सैदपूर, बेऊर, पहाडी झोन चार ए साठी सांडपाणी मार्गिकेचे जाळे; करमाळीचक येथे गटार बांधणी आणि मलनिस्सारण व्यवस्था; पहाडी झोन पाचमधील मलनिस्सारण योजना; आणि बारह, छपरा, नौगाचिया, सुलतानगंज आणि सोनेपूर शहर येथे इंटरसेप्शन अंतरावरोधन, पर्यायी मार्ग आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प इत्यादींचा समावेश आहे. हे प्रकल्प अनेक ठिकाणी पाणी गंगा नदीत सोडण्यापूर्वी सांडपाणी प्रक्रिया सुनिश्चित करतात, नदीच्या स्वच्छतेला चालना देतात आणि यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.

 

यावेळी पंतप्रधानांनी पाटणा  येथे युनिटी मॉलची पायाभरणी  केली. 200 कोटींहून अधिक खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची कल्पना आंतरराष्ट्रीय डिझाइन पद्धती, तंत्रज्ञान, आरामदायी आणि सौंदर्यशास्त्र यांचा समावेश असलेली अत्याधुनिक सुविधा म्हणून करण्यात आली आहे. हा मॉल राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना समर्पित दालने प्रदान करेल आणि त्यांना त्यांची अद्वितीय उत्पादने आणि कारागिरीचे प्रदर्शन करण्यास सक्षम करेल. या मॉलमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी 36 मोठी दालने आणि बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी 38 छोटी दालने असतील.  हा युनिटी मॉल एक जिल्हा एक उत्पादने, भौगोलिक वैशिष्ट्ये असलेली (GI) उत्पादने तसेच बिहार आणि भारतातील हस्तकला उत्पादनांना तसेच स्थानिक कलेला प्रोत्साहन देईल आणि त्यांना प्रसिद्धी मिळवून देईल. या प्रकल्पाचा रोजगार निर्मितीसाठी, पायाभूत सुविधांचा विकास आणि राज्यातून होणारी निर्यात या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे.

पाटलीपुत्र ते पहलेजा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पासह बंधुआ - पायमार दरम्यान 26 किमी लांबीचा नवीन रेल्वे मार्ग; आणि गया मध्ये उभारण्यात आलेले एक मेमू शेड हे बिहारमधील तीन रेल्वे प्रकल्पही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले; यावेळी पंतप्रधानांनी आरा बायपास रेल्वे मार्गाचे भूमिपूजनही केले. या रेल्वे प्रकल्पांमुळे उत्तम रेल्वे दळणवळण सुविधा, मार्गिकांची क्षमता आणि गाड्यांची गतिशीलता सुधारेल आणि प्रदेशातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
India digital public infrastructure is charting the journey towards becoming $1-tn digital economy by 2027-28

Media Coverage

India digital public infrastructure is charting the journey towards becoming $1-tn digital economy by 2027-28
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जुलै 2024
July 20, 2024

India Appreciates the Nation’s Remarkable Rise as Global Economic Powerhouse