पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 7, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमावरील (एनटीईपी) उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
2024 सालात टीबी (क्षयरोग) च्या रूग्णांचे लवकर निदान आणि उपचार करण्यामध्ये झालेल्या उल्लेखनीय प्रगतीची प्रशंसा करून, पंतप्रधानांनी देशभरात यासाठी यशस्वी रणनीती आखण्याचे आवाहन केले, आणि भारतातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी नुकत्याच पार पडलेल्या 100 दिवसांच्या क्षयरोगमुक्त भारत अभियानाचा आढावा घेतला. या अभियानात अधिक लक्ष पुरवण्याची आवश्यकता असलेल्या जिल्ह्यांचा समावेश होता, ज्यामध्ये या रोगाला बळी पडण्याची शक्यता असलेल्या 12.97 कोटी व्यक्तींची तपासणी करण्यात आली, यावेळी 7.19 लाख टीबीचे रुग्ण आढळले, ज्यात 2.85 लाख लक्षणे नसलेल्या क्षयरुग्णांचा समावेश आहे. या मोहिमेत एक लाखांहून अधिक नवीन नि-क्षय मित्र सहभागी झाले. जनभागीदारीसाठी हे एक उत्तम मॉडेल ठरले असून, देशभरात संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी त्याला गती देता येईल आणि विस्तार करता येईल.
शहरी अथवा ग्रामीण भागावर, तसेच व्यवसायावर आधारित टीबी रूग्णांमधील आजाराचा कल लक्षात घेऊन त्याचे विश्लेषण करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विशेषत: बांधकाम, खाणकाम, कापड गिरण्या आणि यासारख्या क्षेत्रातील कामगारांचे गट, ज्यांना लवकर चाचणी आणि उपचारांची आवश्यकता आहे, ते ओळखायला याचा उपयोग होईल. आरोग्य सेवेतील तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होत असल्यामुळे निक्षय मित्रांना (टीबी रुग्णांना आधार देणारे) टीबी रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला प्रोत्साहन द्यायला हवे. संवादात्मक आणि वापरण्यासाठी सुलभ तंत्रज्ञानाचा वापर करून, ते रुग्णांना रोग आणि त्याचे उपचार समजून घ्यायला सहाय्य करतील.
क्षयरोग आता नियमित उपचारांनी बरा होऊ शकतो, त्यामुळे लोकांमध्ये या आजाराबद्दल भीती कमी आणि जागरुकता अधिक असायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.
क्षयरोगनिर्मूलनामधील महत्त्वाचे पाऊल म्हणून जनभागीदारीच्या माध्यमातून स्वच्छता महत्वाची असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक रुग्णाशी संपर्क साधण्याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत पंतप्रधानांनी डब्ल्यूएचओ ग्लोबल टीबी रिपोर्ट 2024 च्या उत्साहवर्धक निष्कर्षांची नोंद घेतली, ज्यामध्ये टीबीचा प्रादुर्भाव 18% कमी (2015 ते 2023 दरम्यान प्रति लाख लोकसंख्येमागे 237 वरून 195 वर), जो दर जागतिक वेगाच्या दुप्पट असल्याचे, टीबीच्या मृत्यूदरात 21% घट (प्रति लाख लोकसंख्येमागे 28 वरून 22 वर) झाल्याचे आणि उपचारांची व्याप्ती 85% झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामधून कार्यक्रमाची वाढती व्याप्ती आणि परिणामकारकता प्रतिबिंबित होते.
पंतप्रधानांनी क्षयरोगाच्या निदानासाठी आवश्यक पायाभूत सुविधा जसे की 8,540 एनएएटी (न्युक्लेइक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्टिंग) प्रयोगशाळा आणि 87 संवर्धित नमुने आणि औषध-संवेदनशीलता प्रयोगशाळांचा विस्तार, तसेच 26,700 हून अधिक एक्स-रे यंत्रणा ज्यामध्ये 500 एआय-आधारित सहज हाताळण्यायोग्य एक्स-रे उपकरणांचा समावेश आहे. तसेच, आणखी 1,000 उपकरणे विकसित होण्याच्या मार्गावर आहेत. अशा महत्त्वाच्या पायाभूत सुधारणा आणि विस्ताराबाबत पंतप्रधानांनी आढावा घेतला. आयुष्मान आरोग्य केंद्रांमधून मोफत तपासणी, निदान, उपचार आणि पोषण सहाय्य यांसह क्षयरोगावर उपचाराच्या सर्वसेवांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर देण्यात आला.
पंतप्रधानांना अनेक नव्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये, एआय-आधारित सहज हाताळण्यायोग्य एक्स-रे उपकरणांच्या साहाय्याने क्षयरोग तपासणी, औषधाला न जुमानणाऱ्या क्षयरोगासाठी अल्पकालीन उपचार पद्धती, स्वदेशी बनावटीची नवीन रेण्वीय निदान तंत्रे, पोषणाबाबत उपक्रम, तसेच खाणी, चहाच्या बागा, बांधकाम स्थळे, शहरी झोपडपट्ट्या इत्यादी भागांमध्ये क्षयरोग तपासणी आणि लवकर निदानावर भर आदींचा समावेश आहे.
निःक्षय पोषण योजने अंतर्गत 2018 पासून 1.28 कोटी क्षयरुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक सहाय्य देण्यात आले असून, 2024 मध्ये ही रक्कम वाढवून ₹1,000 करण्यात आली आहे.
निःक्षय मित्र उपक्रमांतर्गत 2.55 लाख निःक्षय मित्रांनी अन्नधान्याच्या 29.4 लाख टोपल्या क्षयरुग्णांना वितरित केल्या आहेत.
बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा, प्रधान सचिव-2 शक्तिकांत दास, पंतप्रधानांचे सल्लागार अमित खरे, आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Chaired a meeting on India’s mission to eliminate TB. Driven by active public participation, the movement has gained significant momentum over the last few years. Our Government remains committed to working closely with all stakeholders to realise the vision of a TB-free India. pic.twitter.com/axi2cJJOhV
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025


