भारताच्या अतुलनीय क्रीडा कौशल्याचा हा उत्सव असून देशभरातील खेळाडूंच्या उत्साहाचे दर्शन घडवतो : पंतप्रधान
आम्ही खेळांना भारताच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख माध्यम मानतो: पंतप्रधान
आम्ही आमच्या खेळाडूंसाठी अधिकाधिक संधी निर्माण करत आहोत जेणेकरून ते त्यांची क्षमता पूर्णपणे विस्तारू शकतील: पंतप्रधान
2036 ऑलिम्पिक यजमानपद भूषवण्यासाठी भारत जोरदार प्रयत्न करत आहे: पंतप्रधान
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भावना प्रदर्शित करण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे, हा भारताच्या समृद्ध विविधता आणि एकतेचा उत्सव आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की आज उत्तराखंड युवकांच्या ऊर्जेने अधिक झळाळून निघाले आहे. ते पुढे म्हणाले की, बाबा केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगा मातेच्या आशीर्वादाने आज 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. उत्तराखंडच्या स्थापनेचे हे  25 वे वर्ष आहे असे अधोरेखित करून,मोदी म्हणाले की  या तरुण राज्यात देशभरातील युवक त्यांची क्षमता प्रदर्शित करणार आहेत.

ते पुढे म्हणाले की या कार्यक्रमात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चे सुंदर चित्र दिसत  आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यावर्षी अनेक स्थानिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे तसेच पर्यावरण-स्नेही  वस्तूंचा बराच वापर होत असल्यामुळे  ‘ग्रीन गेम्स’ अशी संकल्पना आहे असे ते म्हणाले. या संकल्पनेबाबत अधिक  माहिती देताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की ट्रॉफी आणि पदके देखील ई-कचऱ्यापासून बनवलेली आहेत आणि प्रत्येक पदक विजेत्याच्या नावाने इथे एक झाड लावले जाईल जो एक स्तुत्य उपक्रम आहे. त्यांनी सर्व खेळाडूंना उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या भव्य आयोजनाबद्दल  त्यांनी उत्तराखंड सरकार आणि जनतेचे अभिनंदन केले.

 

ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापल्यावर  शुद्ध होते, त्याचप्रमाणे खेळाडूंना त्यांची क्षमता सुधारण्यासाठी अधिकाधिक संधी दिल्या जात आहेत असे  पंतप्रधान म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, आता वर्षभर अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते  आणि खेलो इंडिया मालिकेत अनेक नवीन स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमुळे  अनेक युवा  खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळाली आहे, तर विद्यापीठ स्पर्धा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक संधी देत आहेत. खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेने  पॅरा ऍथलीट्सना त्यांची कामगिरी सुधारण्यात आणि नवीन शिखरे गाठण्यात मदत केली आहे असे त्यांनी नमूद केले.  अलीकडेच लडाखमध्ये खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांची  5वी आवृत्ती सुरू झाल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली आणि गेल्या वर्षी बीच गेम्सचे आयोजन करण्यात आले होते याचा  उल्लेख केला.

 

खेळांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केवळ सरकार करत  नाही, तर अनेक खासदार त्यांच्या मतदारसंघात नवीन प्रतिभा वंताना पुढे आणण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करत आहेत असे मोदी म्हणाले.  पंतप्रधान, जे काशीचे खासदार देखील आहेत, त्यांनी नमूद केले की त्यांच्या संसदीय मतदारसंघात दरवर्षी सुमारे 2.5 लाख युवकांना  क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची  संधी मिळते. खेळांचा एक सुंदर गुच्छ तयार झाला आहे ज्यात प्रत्येक हंगामात  फुले उमलत आणि सातत्याने  स्पर्धा आयोजित केल्या जातात यावर त्यांनी भर दिला.

“खेळ हे भारताच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे माध्यम मानले जाते”, असे पंतप्रधान म्हणाले आणि जेव्हा एखादा देश क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतो तेव्हा त्याची प्रतिष्ठा आणि प्रतिमा  देखील उंचावते  यावर त्यांनी भर दिला. म्हणूनच  खेळांना भारताच्या विकासाशी आणि युवकांच्या आत्मविश्वासाशी जोडले जात आहे असे  त्यांनी सांगितले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने प्रगती करत आहे आणि क्रीडा अर्थव्यवस्था हा या प्रयत्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  प्रत्येक खेळाडूच्या मागे मार्गदर्शक , प्रशिक्षक, पोषण आणि फिटनेस तज्ञ, डॉक्टर आणि उपकरणे यांचा समावेश असलेली संपूर्ण परिसंस्था असते असे त्यांनी नमूद केले.  जगभरातील खेळाडू वापरत असलेल्या क्रीडा साहित्याचा भारत दर्जेदार उत्पादक बनत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की मेरठमध्ये क्रीडा उपकरणे तयार करणारे 35,000 हून अधिक लहान आणि मोठे कारखाने आहेत जिथे  3 लाखांहून अधिक लोक काम करत आहेत. देशभरात अशा प्रकारच्या परिसंस्था विकसित केल्या जात आहेत यावर त्यांनी भर दिला.

 

काही दिवसांपूर्वी मला दिल्लीतील माझ्या  निवासस्थानी भारताच्या ऑलिम्पिक संघाला  भेटण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख करत  पंतप्रधान म्हणाले की, या संवादादरम्यान एका खेळाडूने "पीएम " ची व्याख्या "पंतप्रधान" ऐवजी "परम मित्र" (सर्वोत्तम मित्र) अशी केली.  हा विश्वास आपल्याला  ऊर्जा देत असल्याचे ते म्हणाले.  त्यांनी खेळाडूंच्या प्रतिभेवर आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी गेल्या 10  वर्षांत खेळाडूंच्या   प्रतिभेला सातत्याने  पाठिंबा दिला जाईल, याकडे  लक्ष केंद्रित केल्याचे अधोरेखित केले.  तसेच गेल्या दशकात क्रीडा क्षेत्रासाठी अंदाजपत्रकामध्‍ये करण्‍यात आलेल्‍या तरतुदीचा निधी  तिप्पट केला असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की,  ‘टॉप्स’  योजनेअंतर्गत, डझनभर खेळाडूंमध्ये शेकडो कोटी रुपये गुंतवले जात आहेत. ‘खेलो इंडिया’  कार्यक्रमातून  देशभरात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्‍यावर  त्यांनी भर दिला. शाळांमध्ये खेळ हा मुख्य प्रवाहातला विषय  बनला आहे आणि मणिपूरमध्ये देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापन होत आहे यावर पंतप्रधान  मोदी यांनी भर दिला.

सरकारच्या प्रयत्नांचे परिणाम  आता  मैदानावर आणि पदक तालिकेत दिसून येत आहेत , हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, भारतीय खेळाडू प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवत आहेत. त्यांनी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.उत्तराखंडमधील अनेक खेळाडूंनी देखील पदके जिंकली आहेत, असेही त्यांनी  नमूद केले. सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पदक विजेते खेळाडू  कार्यक्रमस्थळी उपस्थित होते, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी  हॉकी खेळाला  पुन्हा गौरवशाली दिवस  येत आहेत,  असे म्हटले. त्यांनी अधोरेखित केले की,  भारताच्या खो-खो संघाने नुकताच विश्वचषक जिंकला आणि गुकेश डी. ने जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकून जगाला चकित केले. याशिवाय  कोनेरू हम्पी महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद  विजेती बनली. या यशावरून हे दिसून येते की,  भारतातील खेळ आता केवळ अभ्यासक्रमाबाहेरील क्रियाकलाप राहिलेले नाहीत तर युवावर्ग  आता खेळांना करिअरचा एक प्रमुख पर्याय म्हणून पाहत आहेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

 

"जसे खेळाडू नेहमीच मोठे ध्येय ठेवतात, तसेच भारत देखील महान संकल्पांसह पुढे जात आहे", असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की,  भारत 2036  च्या ऑलिंपिकचे आयोजन करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे, ज्यामुळे भारतीय खेळांना नवीन उंचीवर नेता येईल. ऑलिंपिक ही  केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही; तर यजमान देशातील अनेक क्षेत्रांना चालना मिळते, यावर भर देऊन, पंतप्रधान  मोदी म्हणाले की,  ऑलिंपिकसाठी बांधलेल्या क्रीडा पायाभूत सुविधा रोजगार निर्माण करतात आणि भविष्यातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा प्रदान करतात. त्यांनी पुढे सांगितले की,  ऑलिंपिकचे आयोजन करणाऱ्या शहरात नवीन ‘कनेक्टिव्हिटी’ पायाभूत सुविधा बांधकाम आणि वाहतूक क्षेत्रांना चालना मिळते. आणि सर्वात मोठा फायदा देशाच्या पर्यटनाला झाला आहे, नवीन हॉटेल्स बांधली जात आहेत आणि जगभरातील लोक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच  खेळ पाहण्यासाठी येत असतात. देवभूमी उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय खेळांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, देशाच्या इतर भागातील प्रेक्षक उत्तराखंडच्या विविध भागांना भेट देतील. त्यामुळे असे  दिसून येईल की,  क्रीडा स्पर्धांमुळे केवळ खेळाडूंनाच नव्हे तर अर्थव्यवस्थेच्या इतर विविध क्षेत्रांनाही फायदा मिळत असतो.

21 वे शतक हे  भारताचे शतक म्हणून ओळखले जात आहे,यावर भर देऊन, बाबा केदारनाथला भेट दिल्यानंतर, पंतप्रधान  मोदी यांना उत्स्फूर्तपणे वाटले की,  हे उत्तराखंडचे दशक आहे. त्यांनी उत्तराखंडच्या वेगवान  प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की,समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले असून  मुली, माता आणि भगिनी यांच्या  सन्माननीय जीवनाचा पाया यामुळे रचला  जाईल. यामुळे लोकशाहीची भावना आणि राज्यघटनेचे  सार मजबूत होईल.  पंतप्रधान  मोदी यांनी  ही गोष्‍ट  क्रीडा स्पर्धेशी जोडताना,असे नमूद केले की,  खिलाडू प्रवृत्ती सर्व भेदभावाच्या भावना दूर करते. त्यांनी पुढे म्हटले की,  प्रत्येक विजय आणि पदक सामूहिक प्रयत्नातून मिळवले जाते आणि खेळ टीमवर्क म्हणजे सांघिक कामगिरीला  प्रेरणा देतो. त्यांनी सांगितले की, समान नागरी संहितेनुसार सर्वांना  समान भावना लागू होते, जिथे कोणताही भेदभाव नाही आणि सर्वजण समान आहेत. समान नागरी कायदा लागू करण्‍याचे  हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल उत्तराखंड राज्य सरकारचे त्यांनी  अभिनंदन केले.

 

पहिल्यांदाच उत्तराखंड इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करत आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी हेही  एक महत्त्वपूर्ण यश आहे, असे सांगून आयोजनाचे  कौतुक केले.   या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामुळे   रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील आणि स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळतील. उत्तराखंडची अर्थव्यवस्था केवळ चार धाम यात्रेवर अवलंबून राहू शकत नाही, त्यामुळे विकासाचे नवीन मार्ग शोधावेत असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले की, सरकार या तीर्थक्षेत्रांविषयी अधिक आकर्षण वाढवण्यासाठी सुविधांमध्ये सातत्याने वाढ करत आहे, दर हंगामात भाविकांची संख्या नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. तथापि , इतकेच करणे काही पुरेसे नाही, असेही  त्यांनी नमूद केले.उत्तराखंडमध्ये हिवाळी आध्यात्मिक यात्रेला चालना देण्यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या हिवाळी प्रवासात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. हिवाळ्यात यात्रेकरूंची संख्या कमी असते, तसेच साहसी उपक्रमांच्या अनेक संधी उपलब्ध असतात, त्यामुळे देशभरातील तरुणांना हिवाळ्यात उत्तराखंडला भेट देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर सर्व खेळाडूंनी या संधी शोधाव्यात आणि देवभूमीच्या आदरातिथ्याचा दीर्घकाळ आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

खेळाडू आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत असून, ते आगामी काळात मोठ्या स्पर्धेत उतरून  राष्ट्रीय विक्रम मोडतील आणि नवे विक्रम प्रस्थापित करतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून भारताच्या विविधतेचा उत्सव साजरा करणाऱ्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे व्यासपीठ आहे, असे त्यांनी नमूद केले. आपण जिंकलेल्या पदकांमध्ये भारताची एकता आणि उत्कृष्टता प्रतिबिंबित होईल, हे खेळाडूंनी सुनिश्चित करावे, असे आवाहन मोदी यांनी केले. त्यांनी विविध राज्यांच्या भाषा, खाद्य पदार्थ आणि संगीत जाणून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, उत्तराखंड प्लास्टिकमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि खेळाडूंच्या सहकार्याशिवाय हे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.

फिटनेसचे महत्त्व आणि देशातील लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येवर भर देताना पंतप्रधानांनी नमूद केले की, तरुणांसह सर्व वयोगटांवर लठ्ठपणामुळे विपरीत परिणाम होत असून, मधुमेह आणि हृदयरोगासारख्या आजारांची जोखीम वाढत आहे. फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून देश फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबाबत अधिक जागरूक होत आहे, याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शारीरिक हालचाली, शिस्त आणि संतुलित जीवनाचे महत्त्व शिकवतात. नागरिकांनी व्यायाम आणि आहार या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन त्यांनी केले. सर्वांनी रोज थोडा वेळ व्यायामासाठी राखून ठेवावा, मग ते चालणे असो किंवा व्यायाम असो, असे आवाहन त्यांनी केले. संतुलित आणि पौष्टिक आहाराच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला आणि आरोग्याला अपायकारक चरबी आणि तेलांचे प्रमाण कमी करावे अशी सूचना केली. स्वयंपाकाच्या तेलाचा वापर दर महिन्याला किमान 10%  कमी करावा, कारण अशा छोट्या उपायांनी आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल, असे ते म्हणाले.

निरोगी शरीरामुळे निरोगी मन आणि निरोगी राष्ट्राची निर्मिती होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. राज्य सरकारे, शाळा, कार्यालये आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी फिटनेस आणि पोषणाविषयी जनजागृती करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. प्रत्येकांनी योग्य पोषणाविषयीचे आपले अनुभव आणि ज्ञान इतरांना द्यावे असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी 'फिट इंडिया'च्या उभारणीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले, आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देत 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू होत असल्याचे घोषित केले.

उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल. (निवृत्त) गुरमीत सिंह, उत्तराखंड चे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय राज्यमंत्री अजय तामता, रक्षा खडसे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या रौप्यमहोत्सवी वर्षात उत्तराखंडमधील डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत उत्तराखंडच्या 8 जिल्ह्यांमधील 11 शहरांमध्ये या स्पर्धा होणार आहेत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 36 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहे. 17 दिवसांत 35 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. यापैकी 33 क्रीडा प्रकारांसाठी पदके दिली जातील, तर दोन प्रदर्शनीय खेळ असतील. योग आणि मल्लखांब यांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत देशभरातून दहा हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. शाश्वततेवर भर देत यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संकल्पना 'ग्रीन गेम्स' अशी आहे. स्पर्धेच्या ठिकाणी ‘स्पोर्ट्स फॉरेस्ट’ नावाचे एक विशेष उद्यान विकसित केले जाणार असून या ठिकाणी खेळाडू आणि पाहुणे 10,000 हून अधिक रोपे लावतील. खेळाडूंना प्रदान करण्यात येणारी पदके आणि प्रमाणपत्रे पर्यावरणपूरक आणि बायोडिग्रेडेबल (विघटनशील) पदार्थांपासून बनवली जातील.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's telecom sector surges in 2025! 5G rollout reaches 85% of population; rural connectivity, digital adoption soar

Media Coverage

India's telecom sector surges in 2025! 5G rollout reaches 85% of population; rural connectivity, digital adoption soar
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology