सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानू इच्छितो कारण आज ते स्वतः विमानतळावर माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी व्यापार क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत इतकी भव्य गोलमेज बैठक आयोजित केली, त्याबद्दल देखील मी खूप आभारी आहे. त्यांनी माझ्याप्रती तसेच आपल्या भागीदारीप्रती जे सकारात्मक विचार व्यक्त केले त्याबद्दल देखील मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो.
मित्रांनो,
23 वर्षांच्या कालावधीनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाचे सायप्रसमध्ये येणे झाले आहे. आणि यातला सर्वात पहिला कार्यक्रम होत आहे तो म्हणजे व्यापार गोलमेज परिषद. भारत आणि सायप्रस या देशांमधील नात्याचे आर्थिक विश्वाशी संबंधित लोकांना किती महत्त्व आहे याची खूण यातून पटते आहे. तुमचे विचार मी अत्यंत लक्षपूर्वक ऐकले आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यातील आर्थिक संबंधांप्रती तुमची कटिबद्धता मला जाणवली आहे. तुमच्या विचारांमध्ये केवळ शक्यता नव्हे तर निर्धार आहे असे मला जाणवले. आणि हे देखील स्पष्ट आहे की आपल्या संबंधांमध्ये प्रगतीच्या अपरंपार शक्यता आहेत.
मित्रांनो,
सायप्रस देश दीर्घ काळापासून आपला भागीदार आहे, आणि तुम्ही सर्वांनी देखील याचा उल्लेख केला. तसेच या देशातून भारतात उल्लेखनीय प्रमाणात गुंतवणूक देखील झालेली आहे. अनेक भारतीय कंपन्या देखील सायप्रसकडे एका अर्थी युरोपचे प्रवेशद्वार म्हणूनच पाहतात. आपल्या देशांतील व्यापार आजघडीला दीडशे दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. मात्र आपल्या नात्याची खरी क्षमता याहूनही कितीतरी अधिक आहे. तुमच्यापैकी बहुतांश लोक भारताशी जोडलेले आहेत आणि गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने केलेली विकासात्मक वाटचाल देखील तुम्ही पाहिली आहे. गेल्या एका दशकात भारताने जगातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे स्थान मिळवले आणि लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने आम्ही वेगवान वाटचाल करत आहोत. जगभरात आज वेगाने विकास पावणाऱ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये देखील भारताने स्थान मिळवले आहे.

मित्रांनो,
तुम्हाला हे चांगलेच माहित आहे की आम्ही करविषयक सुधारणा केल्या आहेत. जीएसटीसोबत ‘एक देश, एक कर’प्रणाली सुरु केली आहे, कॉर्पोरेट कराचे तर्कसंगतीकरण करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने असलेल्या कायद्यांमध्ये कायद्याने शिक्षापात्र मानणे बंद करण्याचे काम आम्ही केले आहे. आम्ही व्यापार करण्यातील सुलभतेसह व्यापार करण्यातील विश्वसनीयतेवर देखील तितकाच भर दिला आहे. आज भारतात स्पष्ट धोरणे आहेत आणि त्यासोबत स्थिर राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. सहा दशकानंतर देशात असे घडले आहे की एकच सरकार सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहे. भारताचा लोकसंख्याविषयक लाभांश आणि प्रतिभा यांच्याशी तुम्ही चांगल्या प्रकारे परिचित आहात आणि तुमच्या बोलण्यातून याचा उल्लेख देखील झाला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भारतात डिजिटल क्रांती झाली, आर्थिक समावेशनाने एक उदाहरण घालून दिले आहे. एकात्मिक भरणा सेवा म्हणजेच युपीआयच्या माध्यमातून आज जगातील 50% डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. फ्रान्ससारखे अनेक देश या प्रणालीशी जोडले गेले असून सायप्रस देखील याच्याशी जोडला जाण्याबाबत विचार विनिमय सुरु आहे आणि मी याचे स्वागत करतो. भारतात भविष्यकालीन पायाभूत सुविधा विकासासाठी आम्ही दरवर्षी 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधीची गुंतवणूक करत आहोत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही उत्पादन अभियानाची सुरुवात केली आहे. जगभरात लसी, जेनेरिक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक झाला आहे. सागरी क्षेत्र तसेच बंदरांच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. तसेच जहाजबांधणी जहाज तोडणी यांना देखील आम्ही प्राधान्य देत असून त्यासाठी एक नवे धोरण लागू करण्यात येणार आहे. हवाई वाहतूक क्षेत्र देखील वेगाने प्रगती करत आहे. भारतीय कंपन्यांनी हजारहून अधिक विमानांची नवी ऑर्डर दिली आहे. नवोन्मेष हा भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा मजबूत आधारस्तंभ बनला आहे. आमचे एक लाखाहून अधिक स्टार्ट अप्स केवळ स्वप्नेच नव्हे तर समाधान देखील पूर्ण करतात. यापैकी 100 उद्योग युनिकॉर्न बनले आहेत. अर्थव्यवस्था आणि पर्यावरणशास्त्र यांच्या समतोलावर भारताचा विश्वास आहे आणि त्याच्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत. एका स्वच्छ आणि हरित भविष्याचा मार्ग खुला होतो आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय उर्जा निर्मितीच्या लक्ष्यपूर्तीकडे वेगाने वाटचाल करत आहोत. हरित नौवहन क्षेत्राचा विकास आणि 2030 पर्यंत रेल्वेला 100% कार्बन न्युट्रल बनवण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जलदगतीने कार्य करत आहोत. एआय अभियान, क्वांटम अभियान, सेमीकंडक्टर मोहीम, महत्त्वाची खनिजे अभियान, अणुउर्जा मोहीम आमच्या वृद्धीच्या इंजिनाची नवी प्रेरकशक्ती बनत आहेत. सायप्रसमधील शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी माझ्या स्वतःच्या राज्यात, गुजरातमध्ये गिफ्ट सिटी उभारण्यावर सहमती दर्शवली आहे हे समजल्यावर मला अत्यंत आनंद झाला आहे. सायप्रस एक सुप्रसिध्द पर्यटनस्थळ आहे. भारतात देखील आम्ही पर्यटनस्थळ विकास आणि व्यवस्थापनावर अधिक भर देत आहोत. आपल्या सहल परिचालकांमध्ये असणारे दृढ सहकार्य विविध स्वरूपाचे असू शकते. अशी आणखी अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये परस्पर सहयोगाच्या खूप शक्यता आहेत.

मित्रांनो,
गेल्या महिन्यात भारत आणि युके यांच्यात एका महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराबद्दल एकमत झाले आहे. आता भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील या मुक्त व्यापार कराराला हे वर्ष संपेपर्यंत अंतिम स्वरूप देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यासंदर्भातील वाटाघाटींना आता वेग आला असून त्याचा लाभ तुम्हा सर्व मित्रांना होणार आहे. मी भारत, सायप्रस तसेच ग्रीस व्यापार आणि गुंतवणूक मंडळाच्या स्थापनेचे स्वागत करतो. हा एक खूप उत्तम उपक्रम आहे आणि हा आर्थिक सहयोगासाठीचा महत्त्वाचा मंच बनू शकतो. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जे विचार मांडले आहेत, ज्या सूचना केल्या आहेत त्यांची माझ्या सहकाऱ्यांनी नोंद घेतली आहे. आम्ही एक कृती योजना तयार करून त्यावर काम करू. मी तुम्हांला भारतात येण्याचे आमंत्रण देखील देतो आहे. शेवटी, या बैठकीसाठी वेळ काढल्याबद्दल मी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षांचे आभार मानतो. तसेच अत्यंत सुनियोजित पद्धतीने या गोलमेज परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मी सायप्रस, तसेच सायप्रसच्या वाणिज्य आणि उद्योग तसेच गुंतवणूक मंडळाचे देखील आभार मानतो. तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद.


